गावाकडील पाऊस आणि मुंबई ते तुंबई भाग 1

गावाकडील पाऊस आणि मुंबई ते तुंबई भाग 1

लहानपणी पावसाची आम्हाला मज्जा यायची, आकाश काळकुट्ट व्हायचं अगदी दिवसा अंधारून यायचं, मग कितीतरी वेळ आकाशात फटाके फुटायचे, धडाड धूम, धडाड धूम. मग फटाक्यांची आताषबाजी संपतासंपता, सगळ लख्ख उजळून निघायचं, थोड्या वेळात गार वारं सुटायचं आणि ‘तो’ यायचा. पहिला अतिशय दबक्या पावलांनी, लाजत लाजत आम्हाला त्या रव्या सारख्या बारीक थेंबाची मजा यायची. तोंड उघडूनही दोन थेंब तोंडात जायचे नाहीत. नंतर प्रचंड आवेग,धारा बरसू लागायच्या. मस्त झिम्माड पाऊस. अगदी थोड्याच वेळात सगळा नुर पालटायचा. सगळी झाडं त्या पहिल्या पावसात छान स्नान करायची, त्यांचाही थकवा कुठच्या कुठे पळून जायचा.
आम्ही मुलं ताल धरून अंगणात नाचायचो, पाणी नाकावरून वाहू लागलं की आम्ही जीभ बाहेर काढायचो ते अमृत ओठातून पोटात घेण्यासाठी. पहिला पाऊस म्हणजे त्या वयात नुसती धम्माल, अर्धकपड्यात आम्ही, त्या पहिल्या पावसात मस्त ताल धरून बेभान नाचायचो, कपडे अंगाला चिकटायचे. आता पिक्चर शुट करतांना खोटा पाऊस पाडून अभिनेते किंवा अभिनेत्री भिजते आणि मग त्यांना सर्दी होऊ नये म्हणून लगेच कपडे बदलण्याची व्यवस्था केली जाते, आम्ही भिजायचो खऱ्या पावसात.

तेव्हा पाऊस हा पाऊस असायचा त्यामुळे पावसात न भिजण्याचा करंटेपणा आम्ही नाही करायचो. कितीही भिजल तरी काही धाड भरायची नाही. सर्दी, खोकला, ताप असली कारण पालकांना देता येत नव्हती. भिजून झालं की आई खसखसून डोक पुसायची.नाही म्हटल तरी घरात आलं की थोडी हुडहुडी भरायची. भाजलेले चार चिंचोके दाताखाली घातले की थंडी पळून जायची.

१९७४-७५ साली पाऊस पडला नव्हता, लोक प्रचंड खंतावले होते. आता पूढे काय? प्रश्न आ वासून होता. म्हणून कोणी मोठ्या व्यक्तीने सांगितले की महादेवाची पिंड पाण्यात बुडवून त्याला गा-हाण घातल की पाऊस नक्की पडतो, म्हणून आम्ही देव्हारा पुढील बाजुस विटा लावून ओल्या मातीने अडवला आणि महादेवाची पिंड पाण्यात बुडवली. दुर्दैव पाऊस तर पडला नाहीच, घरातलं पाणी संपवलं म्हणून तळाला गेलेल्या विहिरीतून पाणी भरण्याची शिक्षा झाली.





पाऊस यावा म्हणून आम्ही सफाळा येथील स्थानिक देवाला ‘ढोकुंबा देव पाणी मोठा येव’ अशी बोंब ठोकायचो, तो आमच गाऱ्हाण ऐकायचा की नाही आठवत नाही. कधीकधी सतत दोन तीन दिवस कोसळायचा अगदी उसंत न घेता. जाड गोधडी घेऊन झोपून राहावं अस वाटायचं, त्यावेळी जुन्या सुती साड्यांची गोधडी आई शिवून घ्यायची. बिचाऱ्या आईला पाऊस पडो की कडक ऊन सुट्टी नाहीच.

‘पाणीच पाणी चहूकडे बाई गेला मोहन कुणीकडे?’ गाणं आठवायचं, पण हा मोहन कोण? हा प्रश्न आम्ही ना आई-बाबांना विचारला ना आमच्या बाईंना कारण त्यांना तरी उत्तर माहिती होत की नव्हते ईश्वर जाणे आणि माहिती नसेल तर आम्ही आगाऊ ठरायचो, पाठ फोडून घ्यायची नसेल तर मोहन कुठेही गेला तरी आपल्याला फरक काय पडतोय? असा तो सुज्ञ विचार असायचा. असाच जर सतत पाऊस पडत राहिला तर घरात गळायचं जिथंतिथं गळतवणीखाली भांडी लावावी लागत. इतक्या ठिकाणी गळू लागे की घरातील सगळी भांडी गळतवणीखाली मांडून संपायची. घरातील कोणी तरी म्हणायचे की नागु होऊन अळवाच्या पानात पागोळ्याच पाणी बांधल तर पाऊस कमी होतो. ते ही आम्ही लहानपणी केलं. पावसात भरच पडली पाऊस कमी झाल्याच कळलच नाही. घरावर मंगलोरी कौलं होती, त्यात भिंग म्हणजे काच लावलेली असे त्यावरून जाणारे पाणी पाहतांना गंमत वाटे. माळ्यावर चढून तिथे झोपून आम्ही ते कौलारू घरातील काचेवरून जाणारे पाणी पहात तिथेच झोपून जायचो.

पाऊस थोडा कमी झाला की पावसाच्या पाण्यात कागदी बोटी सोडायला खूप मजा यायची, साधी होडी, नांगर होडी, शिडाची होडी आणि राजाराणीची होडी करण माझ्या हातचा मळ होता. याच काळात आम्ही साधे खेकडे पकडायचो त्यांना सफाळ्यात बेलकट म्हणतात. झाडूच्या हिराला गांडूळ लावलेली काडी बिळाकडे नेली की खेकडा ते गांडूळ खायला बिळातून बाहेर यायचा.मग आम्ही तो खेकडा पकडायचो, त्याचा फांगडा दोरीने बांधून ठेवायचो.आमची गंमत व्हायची त्यांचा जीव जायचा. तेव्हा बरं ,वाईट अस काही समजत नव्हतं, पालकांना आमचे उद्योग पहायला वेळ नव्हता. पावसात खाडीमध्ये चिंबोरी अर्थात खेकडे,निवट्या आणि बारीक कोलंबी मिळायची, एकदम टेस्टी. खारपाटील, आदिवासी खाडीतून मासे घेऊन आले की दारोदार “मावरा घेतन का?” विचारत फिरायचे. दोन रूपयाच्या एकवीस निवट्या. स्वस्ताई होती.

तेव्हा सगळेच मातीचे रस्ते होते, रस्त्यामधून पाणी वहायचं या पाण्यात जोराने पाय आपटला की पाणी सर्वत्र उडायचं, मग ज्याचा अंगावर उडेल तो भांडायचा. पाऊस पडल्यानंतर ओल्या मातीचा स्पर्श आणि मी लहान असतांना आंघोळ घालतांना आई किंवा ताईच्या हातांचा स्पर्श यांना कशाचीच जोड नाही. त्या मऊ, लुसलुशीत मातीचा स्पर्श अनुभवण्यासाठी पून्हा लहान व्हावं अस नेहमीच वाटतं.

या पावसाचे पाणी जेथून येई तेथे आम्ही ओल्या मातीचा बांध घालत असू, तो फुटून जाऊ नये म्हणून त्यात गवत, काड्या, पालापाचोळा घालत असू. बांधात पाणी अडलं की दूरून ते कस दिसत पाहात असू, तेव्हाच ते आमचं धरण. फारच गंमत यायची. शाळेत जातांना भली थोरली कमळाबाई छत्री असायची तीला भरपूर ठिगळ लावलेले असत, त्याचा दांडा आजोबांच्या काठीसारखा गोल असे. हा दांडा वेताचा असे. पावसात ही छत्री आम्ही गरगर फिरवत असू, पाणी दूर फेकले जाई. छत्रीवर पिवळ्या रंगाने नाव घातलेले असे त्यामुळे ढापाढापी होत नसे.





पावसात टाकळा, कुर्डू, शतावरी अशी भाजी अलगद उपटण्यास मजा यायची. पाऊस पडतांना सुरणाचं फुल फुलायच, त्याचा बेसनबरोबर सुंदर झुणका होतो. भरपूर पाऊस पडला की गेरूच्या ओहोळाचे पाणी घरापाठील ओहाळाला यायचे, त्या तुडुंब भरलेल्या ओहाळात आम्ही पोहण्यासाठी उड्या घालत असू, दहा विस फुट दूर गेल्यावर जमीनीवर पाय लागत,येथून पून्हा मागे पळत येऊन उडी घालत असू. ते पाणी गढूळ आहे, आरोग्यासाठी हानीकारक आहे असला विचार मनाला शिवला नाही. ‘मन चिंती ते वैरी न चिंती. ‘त्यामुळे कधी आजारी पडलो नाही. ‘अति बाऊ त्यालाच धरून ठेऊ’ असा प्रकार असतो. खूप जपलं की आत्मविश्वास डळमळीत होतो आणि आजार पाठी लागतात.

पावसात सुट्टीच्या दिवशी पोहायला जात असू. आधी फक्त डुबक्या मारत होतो, थोडं बरं पोहता यायला लागल्यावर बिनधास्त तुडुंब भरलेल्या ओहळात उडी मारायची डेरींग निर्माण झाली. तांदुळवाडी किल्ल्यावरून पाण्याचा लोट यायचा. ओहळ भरून वहायचा. ओहोळाच्या फेसाळत्या प्रवाहात बुडू, वाहून जाऊ अशी भिती कधी वाटली नाही, का? माहिती नाही.

आज पावसात जास्त वेळ भिजू नको रे सर्दी होईल असं मुलांना का सांगतो? माहीत नाही, कदाचित ताप येईल, डॉक्टर पाठी लागेल ही भिती मनी असावी. पोहायला कोणी शिकवल नाही, पाण्यात उड्या मारतच शिकलो. कधीकधी डालड्याचे दोन रिकामे हवाबंद डबे दोरी बांधून पोहण्याचा प्रयत्न केला तेवढाच, पण त्यानंतर मोठमोठाल्या तुडुंब भरलेल्या खोल विहिरीत उड्या मारल्या, नाही मेलो म्हणून आज हक्काने लिहितो. तेव्हा गरीबी पाचवीला पुजलेली पण भन्नाट जगता आलं, आनंद, आनंद आणि आनंद. जगायला तेव्हा तरी काही लागत नव्हतं.

आज शहरात सगळेच भितीच्या छायेत,पाऊस पडेल का? धरणात पाणी जमेल का? जास्त पाऊस पडला तर कामावर पोचता येईल का? पोचलोच तर परत घरी येता येईल का? या प्रश्नांची उत्तरे ना आपल्याला माहिती ना घरच्यांना माहिती, हवामानात खाते बिचारे हतबल ते फक्त वातावरणातील बदल टिपतात पण त्या नियंत्याच्या मनात काय? ते कोणाला माहिती? म्हणून तर ‘माळीण’ गाव एका रात्रीत नाहिसं झालं. गेले चार पाच वर्षे पाऊस भारतावर कृपा करत आहे. करोना संकटात आपल्याला तारलं ते उत्तम पाऊस आणि पिके यांनी, अर्थात कष्टकरी शेतकऱ्यांनी.

माझी शाळा ग्रामीण भागात असल्याने शेती हा विषय होता. शाळेची दोन एकर शेती होती. बैलजोडी होती. शेतीची अवजारे होती. गावड नावाचे शिक्षक शेती विषय शिकवत. पावसाळ्यात शाळेत भात लागवड करत असत. भात रोपणी किंवा लावणीला खूप मजा यायची. भाताच रोप लावतांना मुलमुली एकमेकांवर चिखल उडवायची. गोव्यात पावसाळ्यात चिखलकाला सण असतो,आदल्या दिवशी सर्वजण माशेल येथील प्रसिद्ध देवकी कृष्ण मंदिरात जमा होऊन पूजा करतात आणि दुसऱ्या दिवशी तिच्या समोर मैदानावर सर्व या खेळात भाग घेतात. चक्क चिखलात लोळतात.कुणी बघ्या आला तर त्याला धरुन आणून चिखलात आडवा पाडतात. आंधळी कोशिंबीर, पाठशिवणी असे खेळ खेळतात. पावसात फुटबॉल खेळण्याचा आनंद गोव्यात लुटतात.

या वर्षी हिमाचल प्रदेशात अनेकदा लँड स्लाईड झालं. आसाम, मणिपूर, काश्मीर खोरे या पर्वतीय भागात नेहमीच निसर्ग भयानक होतो. पूर्ण रस्ता कोसळतो, होत्याचं नव्हतं होतं, तरीही आपले सैनिक पुन्हा नव्याने रस्ते उभारतात. हे फिनिक्स पक्षाचे जगणे ही पुन्हा उठून उभे राहण्याची ताकद, ती शक्ती की जादू. सारेच अनाकलनीय.

या वर्षी क्लायमेट संस्थेने पाऊस अंदाज वर्तवला होता त्यानुसार तो दोन जूनला पडला नाही. अंदमान, निकोबार बेटातच तो रखडला, केरळात त्याने हजेरी लावली आणि आपल्या आशा पल्लवित झाल्या. पण त्या काळतोंडया पावसानं कृपा केली नाहीअखेर हवामान खात्याच्या अब्रुची लक्तरे लोंबू नये म्हणून पाऊस २३ जून रोजी आला, तसा तो ०४, ०५ जून रोजी केरळमध्ये रेंगाळत होता पण बिपर जॉय चा परिणाम म्हणा किंवा कोणत्या अन्य कारणामुळे त्याला दिशा सापडत नव्हती. लग्नाच्या मुहूर्ताची तारीख काढावी तशी हवामान खात्याने त्याची ११ जून तारीख काढली होती पण तो काही आपला गुलाम नाही, हल्ली तर घरातील मुले आपलं ऐकत नाहीत, नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष पद आणि विरोधीपक्ष नेता पद यावरून मा. शरदचंद्र पवार यांच्या समोरच जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ,यांच्यात सुंदोपसुंदी सूरू होती. त्यानंतर शरदचंद्र पवारांसमोर कधीही बोलण्याच धाडस न करणारे त्यांच्या विषयी काय काय बोलले ते सर्वश्रुत आहे.

मुद्दा इतकाच की पाऊस हल्ली अवखळ तरूण राजकीय नेत्यांप्रमाणे वागतो. कधीकधी अवकाळी म्हणत डिसेंबर, जानेवारीत पडतो. दोन वर्षांपूर्वी आसनगाव आणि कोल्हापुरात पावसाने शिंदे साहेब यांना जबरदस्त कामगीरी करण्याची संधी दिली आणि त्यांच धडाकेबाज मंत्री म्हणून यश समोर आलं, दैव फळफळलं. तेव्हा पाऊस कोणाच राजकीय करिअर घडवू शकतो किंवा बिघडवू शकतो आपल्या फडणवीस साहेबांना विचारून पहा. असा तो चित्रविचित्र पागल पाऊस.

क्रमशः

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar