विसरून जायचंय मला
नको ते संदर्भ, कशास आठवू? सारेच मला विसरायचे
नको त्या आठवणी, कशास जागवू? इथेच सारे हरवायचे
काय गवसले काय हरवले, हिशेब मांडून काय मिळेल?
नको त्या भुतकाळात रमताना, उगाच मन स्वतःस छळेल
शैशव माझ्या नशीबी नव्हते, अनाथ बालपण कसे असेल?
सतत आश्रयाचे जीणे जगता, मन निबर, सांगा कसे हसेल?
स्वतःभोवती बंदिस्त कुंपण, जेव्हा मनास हवे होते मुक्तांगण
वाढलो निर्लज्ज बनत, का? माहिती नाही, वाट्यास आले रण
प्रत्येक गोष्टीसाठी झुंज यालाच जर म्हणायचं कृतार्थ जीवन
आम्ही मन मारूनच उभारलं, कोरड्या स्वप्नांचं नंदनवन
कोणी माझ्यासाठी काय केले याने मनाला शांती मिळेल?
कोण मदत करुनही विसरून गेला हे आठवूनही रक्त जळेल
आठवणीची जळमट स्वच्छ करूनच मनःशांती मिळेल
ऐश्वर्य असुनही उपभोगता न येणं याचं कारण कळेल?
जीवनात सगळंच गवसल असतं,तर दुःख उरलच नसतं
कष्टानंतरही सुखाचं अप्रुप कोणाला कधीच वाटलंही नसतं
जे वाट्याला येईल त्यालाच थोडं समजून घेता आलं असतं
तर सुखदुःखातही शांत राहून स्वतःशीच हसता आलं असतं
मनाशी बोलताना विसरून जायला हवेत सगळेच संदर्भ
घालायला हवं त्यांचं श्राद्ध नकोच आठवणीचा एकही दर्भ
बरोबर आहे सर, खूप छान कविता आहे
खूप छान सर