व्हॉट्सऍप
रविवार असल्याने मोबाईलचा अलार्म बंद करुन मी आळस देत पडून होतो. रोज साडेपाच वाजता morning walk ला आम्ही चार मित्र गेले अनेक वर्षे जात होतो. पण गेल्या वर्षापासून करोनाकाळात Lockdown झाले त्यामुळे morning walk ला फाटा द्यावा लागला.
गेल्या महिन्याभरात नात्यातील तीन वयस्कर माणसांनी निरोप घेतला होता. त्यात आईचा धाकटा भाऊ राम मामा होता, आईची मावस बहीण सिंधू होती आणि वडिलांचा नव्वद वर्षांचा आतेभाऊ होता. पण त्याच बरोबर मित्र परीवारातील पाच सहा लोक वारले होते. आता मोबाईल वाजला तरी काही वाईट बातमी नसेल ना अशी शंका येऊन मन कावर बावर होत होतं. गेल्या वर्ष भरात डझनभर जवळच्या नातेवाईक आणि मिंत्रांना अखेरचा निरोप दिला होता. स्मशानात जाण्याचे टाळले होते. गेलेल्या व्यक्तीच्या घरी पाचारायला जायचा धीर होत नव्हता म्हणून कधी मेसेज करून तर कधी फोन करुन निरोपाचे काम संपवले होते. संसर्ग झपाट्याने होत होता आणि घरी म्हातारी आई डायबेटीस पेशंट होती. तिला जपण फार जिकरीच होत कारण घरी राहून राहून तीची चिडचिड होत होती. साहजिकच माझा मोबाईल वाजला की बायको, आता कोण —-? म्हणून माझ्याकडे पहात होती.
कडक निर्बंध असतांना माझ वर्कशॉप अनेकदा बंद ठेवावे लागले, कधी कामगार येऊ शकले नाही म्हणून तर कधी कच्चा माल संपला म्हणून. नियमितता ना कामात उरली होती ना उत्पादनात. मोजकेच चार कामगार मालक वेळेत पगार देत नाही म्हणून नाराज होते तर मला काम देणारे ग्राहक काम वेळेत पूर्ण करत नाही म्हणून नाराज होते. मला लागणारा कच्चा माल मी ग्रांट रोड येथून खरेदी करत होतो पण तिथेही कधी मार्केट बंद, तर कधी फॅक्टरी मधून माल आला नाही म्हणून बोंब होती. शिवाय एवढ्या दुरून माल आणतांना ट्रान्सपोर्ट, कुली आणि सप्लायर यांच्या संपर्कात येण्यावाचून गत्यंतरच नव्हते. आमच्यासारख्या छोट्या व्यवसायिकांचे कंबरडे मोडले होते. खरेदीसाठी, कामासाठी घराबाहेर पडावं लागत होतं. कोणी दिसले की मोठयाने हाक मारण्याची, शेक हँड करण्याची जुनी सवय जात नव्हती. तोंडावर सतत मास्क लावून कंटाळा आला होता. तल्लफ आली तरी चहा प्यावा की पिऊ नये भूक लागली तरी स्टॉलवर खावं की खाऊ नये सगळेच प्रश्न स्वतःचे आणि उत्तरही स्वतःची.
अगदी मोठ्या हॉटेलमध्ये गेलं तरी तेथे असणाऱ्या वेटरना करोना नाही याची काय हमी होती. अस सगळंच अगदी असुरक्षित वातावरण होतं. मित्राच्या घरी जावं की जाऊ नये त्याच्या आईने, काकूंनी दिलेला चहा घ्यावा की घेऊ नये. मित्र घरात घेईल की घेणार नाही, त्याच्या घरी असणारी म्हातारी माणसे यांना आपल्या जाण्याने संसर्ग होणार तर नाहीना? असं अगदी असुरक्षित वातावरण.
ना कुणी घरी बोलवायची हिम्मत दाखवत होता ना कुणी कुणाच्या घरी जाण्याची डेरिंग करत होता कारण सारंच संशयास्पद, सारच अतर्क्य. सकाळी मोबाइल वाजला म्हणून पाहिलं तर मेसेज होता . माझा जीवभावाचा मित्र अचानक गेला, त्याच्या मयताला जाणे भाग होते.
मी आमच्या हिला तसं म्हटलं, “अग आपला अरुण सकाळी गेलाला मी जरा जाऊन येतो. तिथे स्मशानात परस्पर बॉडी नेणार आहेत, फारस कोणी नसेल तासाभरात येईन.” तिने माझ्याकडे वेगळ्याच नजरेनं पाहिलं,”अहो! या घरात, काय सांगते ऐका.” तिने दाराला कडी घातली,”बसा गुपचूप घरी, आई डायबिटीस पेशन्ट आहेत आणि चालले समाजसेवा करायला, उद्या आपल्या घरात घेऊन याल,मदत करायला कोणी आहे का?”
मी तिला रागावलो, “मी सुरक्षा समिती सदस्य आहे, मीच घरात लपून बसलो चालेल का?” ती उफाळून बोलली, “संसार वाऱ्यावर सोडून द्यायला तुम्ही मोकळे नाही, दोन पोर, तुमची म्हातारी यांची जबाबदारी आहे ना? तुमचा फोनच काढून घेते. सारखं फोनवर. सारखे मेसेज. सध्या घरी काय चाललंय पाहताय का?” मी रागावलो,”काय पाहू? तुला काय कमी पडले?ऑर्डर दिली की सगळं घरपोच येतंय अजून काय हवं!” “अहो, गेले दोन दिवस आईची तब्येत नरम गरम आहे,नीट जेवत नाहीत.” तिचे ते शब्द ऐकले नी मी गेलेल्या मित्राला विसरलो. किती स्वार्थी असतो माणूस. काही वेळेपूर्वी माझी priority माझ्या मित्राला मूठमाती द्यावी, त्याचं शेवटचे दर्शन घ्यावे ही होती पण आईच्या तब्बेतीचे पत्नीने सांगितले आणि माझे पाय वळले, तो पर्यंत मोबाईल वाजला. पुन्हा मेसेज आला. मी मेसेज वाचला माझ्या मित्राचा भाऊ माझी वाट पहात होता. To be or not to be. हॅम्लेट सारखी माझी अवस्था झाली होती, एकीकडे माझा बालमित्र मृत्यूशय्येवर ताटकळत थांबला होता तर दुसरीकडे माझ्या आईची किमान विचारपूस करणे गरजेचे होते. मी काही न बोलता,हळूच दार उघडून बाहेर पडलो. माझी पत्नी विमनस्कपणे माझ्या दिशेने पहात उभी होती. “Sorry अंजू मी येतो तासाभरात पाणी ठेव तापत, मी कॉल करतो.”
मी स्मशानात पोचलो,पीपीई किट घातलेले हॉस्पिटलचे वॉर्डबॉय माझ्या येण्याची वाट पहात असावेत. माझ्या मित्राचा भाऊ दबक्या आवाजात रडत होता. त्याला जवळ घेऊन त्याच सांत्वन करावं असं वाटत होतं पण मला घरी असणारी आई दिसत होती. मी त्याच्या जवळ जात नमस्कार केला, तो त्याच्या भावाच्या अचानक जाण्याने कोसळला होता. त्याचा भाऊ हाच त्या घरचा कर्ता सवरता पुरुष होता, वडील वृद्ध होते. मी अगदी नाईलाज म्हणून त्याचे हात हाती घेतले. त्याच्या पाठीवरून हात फिरवला. वार्डबॉयना घाई होती. त्यांनी मित्राचा देह चितेवर ठेवला. मी वार्ड बॉयना चेहरा मोकळा करण्याची विनंती केली. त्यांनी माझ्याकडे रागाने पाहिले, “हॉस्पिटलची स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे,आम्ही तसे करू शकणार नाही.”
मी दोनशे त्यांच्या पुढे धरले. त्यांनी थोडा भाग मोकळा केला. मी आणि मित्राच्या भावाने दुरून मुखदर्शन घेतले. मी त्या वॉर्डबॉय चे आभार मानले. मित्राच्या भावाने भडाग्नी दिला, ना मंत्रोच्चार, ना यमदेवतेची पूजा ना दुःख व्यक्त करण्यास वेळ. बाजूलाही दोन चार प्रेते जळत होती. धूराने आसपासचा परिसर कोंदट झाला होता. आम्ही निघणार तो लाकडे रचण्यासाठी असणाऱ्या माणसाने माझ्याकडे अपेक्षेने पाहिले. मी एक शंभरची नोट त्याच्या हातावर ठेवली. तस तो निघून जाता जाता म्हणाला,साहेब उद्या सकाळी लवकर या, गोमूत्र, दूध, फुले, निरांजन घेऊन या.” मी मान डोलवली. मित्राचा भाऊ या धक्यातून सावरला नव्हता,तो तिथून निघायला तयार होईना.
“दादा,घरी गेल्यावर आई, आप्पा आणि सोनूला कस तोंड देवू, काय सांगू त्यांना?” मी त्याच्या पाठीवरून हात फिरवला, “समीर इथ जास्त वेळ थांबणे योग्य नाही, राजा याला काही उपाय नाही,चल मी आहे ना? नियतीची इच्छा दुसर काय! धिरानं घे,घरी काळजी घ्या, मुख्य म्हणजे तू टेस्ट करुन घे, गेले दोन तीन दिवस तू संपर्कात होता. काही तसं वाटलं तर मला कळव.” आम्ही बाहेर पडलो. मी त्याला घरी सोडले, त्याच्या आईच्या समोर जायची माझी हिंमत नव्हती, माझा मोबाईल वाजत होता,मी त्याची समजूत काढली. तो घरात जाऊन आपल्या आईला,वडिलांना काय सांगणार होता?दादाला मुठमाती देऊन आलो!किती विचित्र अवस्था त्या जीवाची झाली होती.अवघ्या अठरा, वीस वर्षांचा तो आणि घरी चार पाच तोंडे, दुर्दैवविलास म्हणतात तो वेगळा काय असावा. निघताना मी पाचशेच्या दोन तीन नोटा त्याच्या खिशात कोंबल्या.
मी निघालो तसा त्यांनी पून्हा हात पकडला, “दादा,चल ना घरी, थोडा वेळ थांब, मी घरात पाऊल कसं ठेऊ, आईला काय सांगू?” मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर दिला, त्याच्या घरी पोचलो तो आक्रोश ऐकला, मन सुन्न झालं. कसा बसा मी घरात शिरलो,समीरला पाहताच आईने लोळण घेतली, “समीर माझ्या दादाला घेऊन ये! कुठे ठेऊन आलास तू? मी कशी जगू. विकास मित्राला एकटं टाकून आलास का?” तिचा आक्रोश असह्य होता. मी त्याच्या बाबांच्या बाजूला बसणार होतो पण मग लक्षात आल मी आणि समीर स्मशानात जाऊन आलो होतो. मी समीरला बाजूला घेऊन, त्याला सूचना दिल्या, sanitize कर आणि आंघोळ कर त्या शिवाय कोणाला स्पर्श करु नको. तो लहान असला तरी शहाणा होता. मी सर्वांना नमस्कार करुन निरोप घेतला.
घरी आलो तोपर्यंत दुपारचे दोन वाजले होते, मी वाटेवरच तिला फोन करुन गरम पाणी करण्यास सांगितले होते. तीने दार उघडले. मी काही न बोलता थेट बाथरूममध्ये गेलो. गरम पाण्याने आंघोळ केली दोन तीन वेळा खसाखसा साबण लावला, माझ्या कपड्याना स्मशानातील तो कातडी जळाल्याचा उग्र दर्प येतो आहे असा मला भास होत होता.
घशाला कोरड पडत होती. मी बाहेर आलो, पंख्याखाली बसलो,बायकोने आणलेले पाणी घटाघट प्यायलो आणि पडून राहिलो. ती घाबरली, “अहो काही होतय का?चार घास खाऊन घ्या म्हणजे बर वाटेल.” तीने ताट वाढून आणले, मला माहित होते ती जेवली नसावी, मी तिलाही तुझं ताट वाढून आण अस खुणेनेच सांगितले, माझ्या एकूण वागण्या वरून ती हबकून गेली.
सकाळी माझा शाब्दिक समाचार घ्यायला सज्ज असणारी ती आता मात्र माझी अवस्था पाहून गांगरून गेली. आतूनच हलली. तीने ताट वाढून आणले मी तिच्यापासून दूर बसलो, तिला कळेना, मी अस का वागतो? मी हातानेच तीला खुणावले. चार घास जेवून मी झोपलो तो अंधार पडताना उठलो. थोड बर वाटत होतं, सगळा घडला प्रकार तिला सांगितला आणि चार सहा दिवस सर्वांनी माझ्या पासून दूर रहा सांगितले. आईची चौकशी केली, मी घरी नव्हतो म्हणून आई जेवायची थांबली होती कशीबशी समजूत काढून तिला जेवायला भाग पाडले होते. मी दुरूनच आईला समजावून सांगत होतो तर ती तिच्या जवळ येऊन बसण्यासाठी हट्ट करत होती.तिला समजावता नाकीनऊ आले.
तो आठवडा अतिशय टेन्शनखाली काढला,मला करोना संसर्ग झाला नसेल ना या विचाराने झोप उडाली होती. मोबाईल वाजला तरी भिती वाटे. अंगात कणकण असल्याचा भास होई आणि मी माझ्याच गळ्यावर हात ठेऊन अंग गरम तर नाही ना याची खात्री करून घेत असे. बायको कसले कसले काढे करून पाजत होती. आई ,मी तिच्या चवकशीला जात नाही, तिच्या शेजारी बसत नाही म्हणून रागावून जेवताना आढेवेढे घेत होती. बायको भितीने गोठली होती. हे सर्व पाहून जास्त टेन्शन येत होत खरच आपण आजारी नाहीत ना? असा संशय पून्हा पून्हा बळावत होता. रोज सकाळी मी सही सलामत आणि जिवंत असल्याबद्दल विधात्याचे आभार मनात होतो. एकदाचा तो आठवडा संपला आणि मी सुटकेचा निश्वास सोडला.
गेला संपूर्ण आठवडा बायकोने आणि मुलांनी माझा मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला होता. माझ्या वर्कशॉपमध्ये काम करणारे कारागीर माझी चौकशी करून गेले होते. मालक गेला तर आपलं काय ही शंका की चिंता त्यांनाही खात असावी. मुलाने मला विचारून कोणते काम आधी करायचे ते त्यांना सुचवले होते. मुले आणि पत्नी यांच्या सूचनेनुसार मी आज्ञाधारी बालकाप्रमाणे मोबाईल शिवाय जगत होतो. खर तर ती माझी परीक्षा होती म्हंटल तर वावग ठरू नये. मी आंघोळ केली, देवपूजा केली आणि त्या नियंत्याचे, ईश्वराचे आभार मानले. चहाचा कप एक माझ्यासाठी आणि पथ्याचा आईसाठी घेऊन मी आईच्या खोलीत गेलो तर तीने मला मिठी मारली आणि ओक्साबोक्शी रडली. जणू मी मृत्यूच्या दारातून आलो आहे.मी तिला जवळ घेत तिच्या गालावरून,पाठीवरून तिच्या तळव्यावरन हात फिरवला तशी तिची खात्री पटली, तिच्या डोळ्यात अश्रू फुटले. कितीतरी वेळ तिच्या प्रेमळ मिठीत मी पडून राहिलो. तिचे अश्रू पुसले. मी जिवंत आहे. मी मीच आहे हे पाहून ती रडता रडता हसली .तिने माझ्या हातून चहा प्यायला. तिच्या शेजारी तासभर बसून मी हॉलमध्ये आलो.
आज आठवड्यानंतर मी मोबाइल हाती घेतला आणि सुरू केला. काही मिनिटात असंख्य मेसेज मला आले. कोणता आधी आणि कोणता नंतर वाचवा ह्या संभ्रमात असताना माझे लक्ष एक मेसेजवर गेले. गेले अनेक महिने पेंडिंग असलेले शासकीय बिल पास होऊन माझ्या खात्यावर दीड लाख जमा झाले होते, तर दुसरा मेसेज माझा दूरचा मावसभाऊ करोनामुळे पाच दिवसापूर्वी निवर्तल्याचा मेसेज आणि त्याच्या मुलांचे मिस कॉल होते. गेलेल्या मावसभावाबद्दल शोक व्यक्त करू की माझे थकीत बिलाचे पैसे जमा झाल्याचा आनंद व्यक्त करू हेच कळत नव्हते. मोबाईल तोच जो मला क्षणा क्षणाला संभ्रमित करत होता.मेसेज येण थांबले नव्हते. किती कडू गोड बातम्या त्या मेसेजेमध्ये लपल्या होता ईश्वरास ठाऊक.
गेले पाच दिवसात कोणी कोणी जगाचा निरोप घेतला ते कळणार होते पण सर्व मेसेजेस पहावे अस काही वाटेना, धीरच होईना. निवांत जगायचे असेल तर काही दिवस का होईना शांत झोपणे गरजेचे होते म्हणून मी whasapp बंद केला आणि स्वतःच हे मला जमेल ना म्हणून संशयाने मोबाइलच्या स्क्रीनकडे पहात बसलो. आता कितीही बेल वाजली तरी मोबाईल स्क्रीन पहायची नाही, अस ठरवून मी पडून राहिलो. आता मेसेज असो किंवा कॉल नाही उचलणार अस म्हणत होतो तो कॉल आला. घाबरतच मी कॉल घेतला माझ्या मित्राचे वडील सांगत होते त्यांना नातू झाला होता. अरुणला मुलगा झाला होता. माझा मित्र पुन्हा नव्याने जन्माला आला होता.
Sundar katha 👍👌