संसार

संसार

सुक्याचे फोलपट निघावे तसे, लग्न झाले की मतभेद उघड होतात
चार वर्षे ते रिलेशनशिपमध्ये होते, नेहमी फिरत, हात घालून हातात

मनास दोघांच्या वाटले म्हणून लग्नाच्या बंधनानी सुपातून जात्यात
लवकरच स्वातंत्र्य सरले, मग शब्दांची लढाई, कित्येक बाण भात्यात

विचार स्पष्ट, स्वच्छ असले तरी, मनास ते पटावे नसे कुणाच्याच हातात
तुमच्यावर कोणी अधिकार गाजवला, की कडवटपणा उतरतो रक्तात

लग्नापूर्वी तुम्ही तोडून आणलेल्या चांदण्या, आता नाही तिला खुलवत
काही तरी संसारात कमी असणारच, पण तेच तर राहते तिला खुणवत

किती मोकळ्या मनाची होतीस, माझी प्रत्येक गोष्ट होती तूला आवडत
ती तात्कळ उत्तरते, तेव्हाचा तू, न कळे, आता कुठे चाललास हरवत?

तो, पूर्वीची तू तरी कुठे राहिलीस? उगाचच अडचणी राहतेस गिरवत
मला थोडीच हौस आहे, सतत तुझेच गातोस, राहू का बायको म्हणून मिरवत?

आपण सारखेच तर कमावतो, नवरेपणाचा टेंभा कुठवर राहशील खुलवत
तू नर आणि मी मादी हा फरक म्हणून तू ठेवशील का मला झुलवत?

लोणचे मुरले की वाढतो स्वाद, वर्षे पाठी पडली की उणेधुणे तू तू शब्दात
काय दाखवायचे काय राखायचे याचे हवे भान, करावी उणिवांवर मात

शिक्षण, संस्कार आणि संस्कृती याचे बंध फार काळ नाही टिकत
अशिक्षित जोडप्यातही असतो हळवा प्रेमळ बंध ते अधिकार नाही मागत

सुशिक्षित, हाय प्रोफाइल नावासोबत जोडले, तरी एवढ्याने नाही भागत
स्वभावात विनय, नम्रता, सहवेदना यांची जोड, ते शब्दांने नाही मागत

प्रेम द्यावे प्रेम घ्यावे, दिखावा कशासाठी? मनाने आचरावे, करावा संसार
वृक्ष जरी गेला आकाशी तरी हवा त्यालाही लता वेलीचा प्रेमळ आधार

सप्तपदीचा अर्थ घ्यावा समजून, द्यावे सर्वस्व अर्पून, गाडावा अहंकार
कोण मोठ्या घरचे, घरंदाज? शंका नकोत मनी, नको विषयांचा आजार

लग्न मनोमिलन, परस्परांचे मन दर्पण, प्रेम हे तर्पण, त्यास हवी निष्ठेची धार
काय गमावले, याचा विचारच नको हा नव्हे नफ्यातोट्याचा व्यापार

देऊनच द्यावा तृप्तीचा ढेकर, दिल्याने दसपट प्राप्त होते, मग कशास नकार?
गोडीगुलाबीने, अडचणीत द्यावी खंबीर साथ, उघडेल यशाचे महाद्वार

कोणत्याही विषयावर करा मनमोकळी चर्चा, नको संशय वा शाब्दिक वार
नसे संपत्ती, पदाचा वा अधिकाराचा बडेजाव तेथेच योग्य फुलतो संसार

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar