मन वढाय वढाय भाग 3

मन वढाय वढाय भाग 3

भाग १भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा.

मिनल दिसायला प्राजक्तापेक्षा सुंदर तर होतीच पण मनमोकळी होती. ती तितकीच मनाने प्रेमळ असेल का? हे सांगणे अवघड होते. त्याच्या मनात विचाराचे थैमान सुरू होते. मन थऱ्यावर नव्हते. त्याचा हॅम्लेट झाला होता, To be or not to be, शटल धडधडत येऊन थांबली तशी त्याची विचार शृंखला तुटली. तो गाडीत चढला. अवघ्या अर्ध्या तासाच्या मिनलच्या सहवासात आपले मन भरकटले, त्याला स्वतः चा राग आला. दोन थोबाडीत मारून घ्याव्या असेही वाटले. ही तर प्राजक्ताशी  प्रातारणा  होती. ‘दो फूल एक माली’ , त्याला ते शक्य नव्हते. त्याच्या बाबतीत कोणतीही घटना घडली की त्याचा चेहराच सांगून जायचा. हे प्राजक्ताला समजले तर ती कशी रिअँक्ट होईल? हे आठवून तो गांगरून गेला.

दिवाळीची सुट्टी हा हा म्हणता संपली, त्याने बऱ्यापैकी अभ्यास केला होता. प्रत्येक विषयांची पुढील दोन दोन प्रकरणे वाचून त्याच्या नोट्स काढल्या होत्या. जो भाग समजला नव्हता त्याला underline करून ठेवली होती. क्लास सुरू झाला, अद्यापही दोन विद्यार्थी आले नव्हते. मॅडमनी उपचार म्हणून दिवाळी सुट्टी कशी एन्जॉय केल्याचे विचारले? प्रत्येकाने आपण कुठे गेलो? काय पाहिले?  या विषयी सांगितले.

विलास म्हणाला, “मी मस्त गावात मित्रांसोबत फिरलो, क्रिकेट खेळलो. थोडा अभ्यास केला.” प्राजक्ता त्याच्याकडे पाहून हसली, तुम्ही नक्की मित्रांसोबतच फिरलात ना? ” क्लासमधली सगळी मुलं हसली, त्याला थोडे शरमल्यासारखे वाटले तरीही तो म्हणाला, “मैत्रीण सोबत आली असती तर मी नाही म्हटलं नसते. पण तिलाही तसे वाटले पाहिजे ना! मला वाटते तसेच घडणार नाही ना?””  ती मनातून चरकली, हा उघडपणे असं कसं बोलू शकतो?  “बरं बरं jok appart आपण नवीन प्रकरण सुरू करू.” ती त्याच बोलणं तोडत म्हणाली.

मॅडमनी नवीन प्रकरण ‘Price and pricing structure’, सुरू केले. Price ची  व्याख्या कशी कराल ? विचारत प्रत्येकाचे मत जाणून घेतले. मग त्या म्हणाल्या ” price is amount of money or goods  expected, required or given in the exchange of products or services.”  त्या म्हणाल्या कधीकधी आपण वस्तूची किंमत पैशात देतो तर कधीकधी आपण अन्य वस्तूच्या स्वरूपात देतो. जसे ग्रामीण भागात  आपण मासे विकत घेतले तर पैसे देतो किंवा तेवढ्या मुल्याचे धान्य देतो. विदर्भात एखाद्या माणसाला कामाला बोलवले तर रोख पैशांऐवजी धान्य देतात. 

मग मॅडमनी pricing structure या विषयी सांगितले, आपण घेतलेल्या वस्तूच्या प्रतिवरून तिची किंमत ठरते. ती वस्तू कोणत्या घटकांपासून बनली आहे? तिची खासियत काय आहे? ती किती वर्षे टिकेल वगैरे. आपण किती खरेदी करतो यावर किंमत ठरते. तुम्ही रिटेल आणि होलसेल शब्द ऐकला असेल. अर्थात वेगवेगळ्या वस्तुच्या बाबतीत वेगवेगळे गुणधर्म पडताळून पाहावे लागतील. मॅडमनी अनेक उदाहरणे दिली, मुलांनी शंका विचारल्या. क्लास ला चार पाच महिने झाले होते त्यामुळे मुले मोळकेपणे प्रश्न विचारत होती. त्या दिवशीचा वर्ग संपला. 

मुले बाहेर पडली, विलासही घाईघाईने बाहेर पडला. त्याच्या डोक्यात विचार आला,  प्राजक्ताने ज्या अर्थी स्वतः विषय काढला त्या अर्थी मी मिनलच्या घरी गेलो होतो हे तिला कळले असावे. त्याच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. पुढील तीन चार दिवस तो क्लास अटेंड करत होता मात्र चुकूनही आपल्या शंका विचारत नव्हता. क्लासमध्ये ब्लॅक बोर्डकडे पहायचेही तो टाळत होता. हे तिच्या लक्षात आले पण तिने तसे जाणवू दिले नाही. त्याला थांबवले नाही की काही विचारले नाही. त्या आठवड्याचा तो  शनिवार होता, विद्यार्थी उठून गेले,तो ही जात होता इतक्यात त्याला पाठीमागून हाक ऐकू आली.,  “विलास, विलास इथे ये..” तरीही पाठी वळून न पाहता तो दोन चार  पावले पुढे गेला. ” विलास तुला ऐकू आलय याची मला खात्री  आहे, आधी इथे ये, तुझ्या मनात काही…” तो पाठी फिरला,” प्राजक्ता, मी चेष्टेचा विषय आहे का? तू त्या दिवशी मुलांसमोर मला अस का म्हणालीस? मी कुठे जातो यावर तुझा काही आक्षेप आहे का?” “हे बघ विलास तू कुठेही गेलास तरी  मला, तुला विचारण्याचा काही अधिकार नाही हे मान्य पण तूझी मिनलशी भेट झाल्यानंतर तू मला एकदाही भेटला नाहीस किंवा तिच्या भेटीबद्दल बोलला नाहीस, याचा मला राग येणे स्वाभाविक नाही का?”

“छान म्हणजे या पूढे मी कोणत्याही मुलीशी बोललो किंवा तिला भेटलो तर तुला स्पष्टीकरण द्यावे लागणार का?  तू त्याचा चुकीचा अर्थ काढणार असशील तर! ” “मला इतकेच म्हणायचे होते तू तिच्या भेटीनंतर पहिल्या सारखा मनमोकळा माझ्याशी बोलला नाहीस,  मी काय समजायचे ?” “प्राजक्ता तू निर्मळ मनाची आहेस अस मी समजत होतो, माझी आणि मिनलची भेट अचानक झाली. तिने मला बोलावले म्हणून मी तिच्या घरी गेलो. थोडा वेळ गप्पा मारल्या आणि परत आलो. तिला मी पुन्हा भेटलेलो नाही. ही गोष्ट सांगण्यासारखी आहे असे मला वाटले नाही. एखाद्या मित्राने मला बोलवले असते तरीही मी गेलो असतो . इतक्या छोट्या छोट्या गोष्टींवरून तू संशय घेणार असशील तर बोलणेच खुंटले.”

त्याच्या बोलण्यात तिला प्रामाणिकपणा दिसला, ती थोडी शांत झाली. “हे बघ विलास ,जर मिनलशी तुझे काही घेणे देणे नव्हते तर माझे इतकेच म्हणणे आहे की मिनलची आणि तुझी भेट झाली हे तू मला सांगायला हवे होतेस. तू ते आजपर्यंत मला सांगितले नाहीस हे काही योग्य नाही.” “बरं तुझा त्यामुळे गैरसमज झाला असेल तर मी क्षमा मागतो, पण अशा फालतू गोष्टीमुळे तू डिस्टर्ब होत असशील तर आपण एकमेकांपासून दूर राहिलेले बरे.”   विलास फारसे काही न बोलता निघून गेला. तो बाहेर पडला आणि त्याला प्राजक्ताच्या विचारांचा संताप आला. क्षणभर मिनलच्या सौंदर्याची भुरळ त्याला पडली होती हे खरेच होते, पण जेव्हा त्यांनी गांभीर्याने विचार केला तो मिनलला विसरून गेला होता. पण प्राजक्ता मात्र तितकेच घेऊन नाराज झाली होती. प्राजक्ताने स्वतः त्याची मैत्री स्विकारली होती आणि आता लगेचच ती अधिकार गाजवू लागली होती.

पुढील दोन दिवस तो क्लासला गेला नाही, अर्थात नियमित क्लासला येणारा मित्र का आला नाही? हा प्रश्न क्लासमधील इतर विद्यार्थ्यांना पडलाच. मॅडम विद्यार्थ्यांना  म्हणाल्या, “गेले दोन दिवस पेडणेकर क्लासला आलेला नाही, तो  कॉलेजला येतो का? तो बरा आहे ना? ” एक विद्यार्थ्यीनी जागेवरूनच म्हणाली, “मॅडम बहुतेक तो कॉलेजला येतो. मी पाहिलय त्याला. “ प्राजक्ता सावध झाली, म्हणजे ह्या मुलीचे लक्ष ही विलासकडे आहे तर, तिच्या मनात नकळत येऊन गेले.

क्लास सुटला तसे एका विद्यार्थ्यांला बोलावून  ती म्हणाली, “माझा निरोप त्याला सांग, उद्या मी बोलावलंय.” 

त्या विद्यार्थ्यांने सावंत मॅडमचा निरोप दुसऱ्या दिवशी त्याला दिला. “सावंत मॅडम तुझ्या बद्दल चौकशी करत होत्या. तू क्लासला का आला नाहीस?” “नाही तसे खास काहीच कारण नाही,त्या शिकवत आहेत ते  प्रकरण  मी सुट्टीत  केले , मला समजले आहे,  म्हणून नाही आलो, उगाचच वेळ वाया जायला नको. त्या वेळात मी दुसरा विषय करू शकेन असे मला वाटले.  मी आज येणार आहे, तेव्हा भेटेन.” तो नेहमीपेक्षा लवकर क्लासला गेला, रूम बंद होता. तो परत फिरणार तो ती आली, तिने त्याच्याकडे चावी दिली. त्याने दार उघडले तशी ती त्याच्या मागोमाग  आत शिरली. 

“एवढा तू माझ्यावर रागावला आहेस? माझा राग येणं समजू शकते पण म्हणून कोणी क्लास बंक करते का? त्यामुळे त़ो टॉपिक तू मिस करतो आहेस,  इतर मित्र त्याचा कसा विचार करतील सांगता येईल का?” तो तिच्यावर वैतागला, “मला कुणाशी काही घेण देण नाही, तुझाच माझ्यावर विश्वास नसेल तर रोज तुझ्या समोर येऊन तू  त्याच नजरेने पाहणार असशील तर अभ्यासात मन लागेल का?  तुलाही मी घुमा बसलो तर शिकवता येईल का?  तू डिस्टर्ब नाही का होणार ? त्यापेक्षा न आलेलेच बरे.  मित्र गेले उडत, मी जगाची पर्वा करत नाही. पण तू अशी वागशील असे वाटले नव्हते.”

“Sorry, very sorry, I promise, माझं चुकलच, मी उगाचच संशय घ्यायला नको होता. पण तूच अस अर्ध्यावर सोडून दिलेस तर माझे काय होईल कधी विचार केला आहेस का? की फक्त स्वतःच्या कोषातच राहणार आहेस?” “तू ठिक आहेस ना? Still we are teenagers . आपले अजून कशातच काही नाही, मी तुला कोणताही शब्द दिलेला नाही. उगाचच गैरसमज करून घेऊ नको. we are just friend, am I right?”  “म्हणजे माझ्याबद्दल तुला काही वाटत नाही?  तर मग  माझ्यासाठी फूलं का आणलीस, माझ्याकडे रोखून का पाहतोस? खरं खंर सांग माझ्या बद्दल तुला काहीच वाटत. नाही का? ” 

त्याने तिच्याकडे पाहिले, तिचे डोळे भरून आले होते. तो काही बोलला नाही. इतर विद्यार्थी येण्याची वेळ झाली होती. तो आपल्या जाग्यावर जाऊन बसला.  इतर मुले आली, तो शांत बसला होता. काही जणांनी त्याला हात मिळवत, “कुठे होतास? बरं नव्हते का?” विचारले,  त्याने थातुरमातुर उत्तर दिले. प्राजक्ताच्या वागण्याबद्दल तो बैचेन होता. ती डायरेक्ट विषयाला भिडत होती. त्याने जाणीवपूर्वक अभ्यासात मन गुंतवले. मनाला लागलेली आग हळूहळू थंड होत होती. 

त्या दिवसानंतर हळूहळू सगळे सुरळीत झाले. मनातील विषादाचे ढग विरून गेले. पहिल्या सारखे दोघेही एकमेकांना समजून घेऊ लागले.  त्याने FY.Bcom ला चांगले गुण मिळवले. तो स्वतःच्या प्रगतीबद्दल समाधानी होता.  तिला ते इतर विद्यार्थ्यांकडून समजले. तिने त्याचे बोलवून अभिनंदन केले.

“Congratulations ! तू स्वतः मला भेटायला आला नाहीस. सेकंड क्लास मिळवून पास झालास हे दुसऱ्या कुणी सांगावं म्हणजे! “ तो क्षणभर काही बोलला नाही, मग हलकस स्मित कळत म्हणाला, “मला Second class मिळाला , ही सांगण्यासारखी गोष्ट आहे का?  मला माझीच लाज वाटत होती, क्लास लावूनही फारसे चांगले मार्क मी मिळवू शकलो नाही.”

“विलास आधी तुला आपण पास होऊ असेही वाटत नव्हते, आता तू.Second class मिळवून पास झालास, That’s great success, we must celebrate it.” तिचे ते आश्वासक विधान ऐकून त्याला बरे वाटले. Prajakta Thanks. मला वाटलं तू रागावशील, म्हणशील, ‘कसला अभ्यास केलास, I was not expecting this poor marks.’ 

ती इवलसं हसली, “विलास अजून तू तुझ्या प्राजक्ताला ओळखलेल नाहीस,इथे ये, तुझा हात माझ्या हातात दे. त्याची कंपनं काय सांगतात ते ऐकं” ती त्याच्या जवळ सरकली तिने भेट म्हणून स्वतः त्याच्या मनगटावर HMT घड्याळ बांधले. तो गडबडला, “हे काय, खरे तर मला depression मधून बाहेर काढल्याबद्दल मी तुला काही प्रेझेंट द्यायचे तर तूच…”

“अरे ही तुझ यश सेलिब्रेट नको का करायला? भविष्यात तुला वेळ पाळण्यासाठी हे उपयोगी पडेल.  तू स्वतः कमाई करायला लागलास की मी दामदुप्पट वसूल करणायच आहे.” ती हसतच म्हणाली. 

त्याला काही बोलता आले नाही, आज तरी त्याला घरून  मिळणारे महिना पन्नास रूपये त्यालाच पुरत नव्हते. तो तिला कुठून काही  घेऊन देणार? पण आज तिने स्वतः त्याच्या मनगटात घड्याळ बांधले. तिच्या कमाईचे बरेच पैसे तिने त्याच्यासाठी खर्च केले होते. तिच्याबद्दल त्याच्या मनात प्रेम दाटून आले. त्याला तिच्या प्रेमाची उब जाणवू लागली. प्राजक्ता “Thanks प्राजू , पण मी पास झालो ते तुझेच क्रेडीट आहे. “ 

“मुळीच नाही, मी शिकवले असले तरी मेहनत तू केलीस त्याचा हा परिणाम आहे. “ ती फार गोड हसली. अजूनही त्याचे मनगट तिच्या हाती होते. विलास हा हात मी कायमचा तुझ्या हाती द्यायला उत्सुक आहे. यापुढे जास्त मेहनत घे. तू यशस्वी होऊन स्थिरस्थावर होशील तेव्हाच माझ्या जीलनाला अर्थ मिळेल.”

तिचे आभार मानायला त्याच्याकडे शब्द नव्हते, कितीतरी वेळ ती त्याचा हात आपल्या हाती ठेऊन त्याला न्हाहाळत होती.  “प्राजक्ता, मी निघू ना, कोणी अचानक आले तर! “ ती पुन्हा तशीच गोड हसली. त्याने तिचा हात अलगद सोडवून घेतांना त्याचं चूंबन घेतलं. शरीरातून एक गोड लहर शीरशीरत गेली.

अधूनमधून त्याची एखादी कविता, एखादा लेख काँलेजच्या  वाङमय मंडळाच्या बोर्डावर झळकू लागला. प्रत्येक कविता ही आशयपूर्ण असे. कधी विराणी तर कधी वात्रटिका तर कधी प्रेमकथा. त्याची अभ्यासातही हळूहळू चांगली  प्रगती होऊ लागली होती आणि त्याच क्रेडिट तो तिलाच देत होता. 

महाविद्यालयात त्याच्याकडे इतर विद्यार्थी आणि प्रोफेसर एक आदर्श विद्यार्थी म्हणून पाहू लागले. तिचा याला अधिक आनंद होता. तिच्या सहवासात तो फुलत होता. त्याची शेरोशायरी फुलत होती. अलीकडे लहर आली की तो तिच्यावर एखादी कविता करून एखाद्या पुस्तकातून तिला पोचवत होता. 

विद्यालयाच्या सांस्कृतिक कट्ट्यावर तो लेख लिहू लागला त्यात कधी लघुकथा तर कधी एखादी वात्राटीका बोर्डावर झळकू लागली. कधीकधी तो तिच्यावरती रचलेली कविता वाड्मय मंडळाच्या बोर्डावर चिकटवून टाकी. या उपद्व्यापामूळे त्याला बरेच मित्र  ‘प्रेमकवी’ म्हणू लागले होते. वार्षिक स्नेहसंमेलनात त्याने दोन, तीन प्रेमकविता सादर केल्या. त्या सर्वांना खूप आवडल्या. त्याचा भाव फारच वधारला होता. अलीकडे  प्राजक्ता त्याला कविराज म्हणून हाक मारे, मग त्यांचं भांडण ठरलेलं असे. कधीकधी आठवडा आठवडा अबोला चाले. ती त्याच्यासाठी कॉलेजमध्ये डबा घेऊन यायची, दुसऱ्या एखादया मैत्रिणीला सांगून डबा त्याला देई. 

त्याने आता फारच मनावर घेतले. तो झपाटून अभ्यास करू लागला. तिच्या क्लासला येण्यात त्याला संकोच वाटू लागला. तो स्वतःच अभ्यास करू लागला काही डिफिकल्ट वाटले तर तो सरळ.तिच्या घरी भेटून त्याची शंका निरसन करून घेत असे. कॉलेजमध्ये त्याच्याशी मैत्री करायला अनेक मुली उत्सुक होत्या,त्यात मिनलही होतीच. 

तो चार हात राखून मुलींशी बोले, त्यावरून काही मुली त्याची टर उडवत. पण त्याने ठाम ठरवले होते की काही झाले तरी प्राजक्ताशी प्रातारणा करायचची नाही. सेकंड इयरला देखील त्याने  चांगले गुण मिळवले. तिची फायनल परीक्षा संपली तशी ती मोकळी झाली. आता त्याची भेट घेणे ती समजून उमजून टाळू लागली. त्याच्या करिअरच्या आड येण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती. त्यानी  ग्रँज्युएशन लास्ट इयरला जाणीवपूर्वक दुसरीकडे क्लास लावला. तो कधीतरीच तिला भेटत होता, पुढे काय करणार या बाबतीत त्यांची चर्चा होई. दोघे अधुनमधून भेटत असतात हे तिच्या आईच्या नजरेतून सुटले नव्हते.

एक दिवस आईने मुलीला याबाबत विचारले तेव्हा आरंभी तो माझा आवडता विद्यार्थी आहे. त्याच्या अडचणी मी सोडवते त्यामुळे तो मला अनेकदा भेटतो असे प्राजक्ता म्हणाली होती. पण एक दिवस तिच्या आईला तिच्या  पुस्तकात त्याच्या हस्ताक्षरातील  एक कविता मिळाली, त्या खाली तुझाच. Vk अस लिहिले होते. तो विलासच असावा याची आईला खात्री पटली. तिने तो कवितेचा पेपर मुद्दाम तिच्या अभ्यासाच्या टेबलवर दिसेल असा  ठेवला. 

प्राजक्ताने तो पेपर तेथून उचलला मात्र त्या बद्दल आई किंवा बहिणींशी काहीच बोलली नाही.  प्राजक्ताची चोरी आईने शिताफिने पकडली होती. आईने तिला बोलवून त्याबद्दल विचारले. “प्राजक्ता तुझ्या वहित मला एका चिटोऱ्यावर ही  कविता मिळाली. तुझ्यासाठीच त्याने लिहिली आहे हे तरी मान्य करशील ना?” तेव्हा तिने  नाईलाजाने  आईकडे कबुली दिली. आईने तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.” “प्राजक्ता खुळ्या मुली, तो तुझा विद्यार्थी होता, त्या अर्थी तो तुझ्यापेक्षा वयाने लहानच असणार यात मला शंका नाही. आपल्या समाजात अशा संबधाला मान्यता नाही. आपल्या कुटुंबावर टीका होऊ शकते.”

तिने आईची समजूत घातली की, “आई, मुळातच तो माझ्यापेक्षा  वयाने लहान आहे हे कोणाला माहिती असण्याची शक्यता नाही. समजा कोणाला भविष्यात समजले तरी मला त्याच्याशी देणेघेणे नाही. तो खूप चांगला मुलगा आहे. तो मला मनापासून आवडतो. आमचे विचार जुळतात, तो मला समजून घेऊ शकतो . तो स्थिरस्थावर झाला की आम्ही लग्नाचा विचार करू. सध्यातरी या विषयी उगाचच कोणाला काही सांगू नकोस. अगदी बाबांनाही यातल काही कळता उपयोगी नाही.माझ्या निर्णयामुळे त्यांना त्रास नको. वेळ येईल तेव्हा मी स्वतः त्यांना ते सांगीन.”

आईला मात्र ते पटेना, ती निक्षून तिला म्हणाली, ” प्राजक्ता तुझा निर्णय पक्का आहे तर बाबांना ते समजलेच पाहिजे, जर ही गोष्ट बाबांना बाहेरून कळली तर ते तुलाच नव्हे तर मलाही घराबाहेर हाकलून देतील. तेव्हा वेळ पाहून मी त्यांच्याकडे विषय कसा काढायचा ते पाहिन, त्या आधी तू त्याला बाबा घरी नसताना बोलावून घे. मला त्याच्याशी बोललच पाहिजे. तुमच्या बाबत आपल्या नातेवाईक मंडळीत समजले तर ते तुझ्या बाबांना भंडावून सोडतील. तुझ्या बहिणी भविष्यात तसेच वागल्या तर त्यांना बोलता येईल का? तू चुकीचा पायंडा पाडते आहेस असे मला वाटते “ 

त्याची परीक्षा तोंडावर आली होती त्यामुळे प्राजक्ताने आईचा निरोप त्याला न देणे स्वाभाविक होते. त्याच्या अभ्यासात व्यत्यय यावा असे तिला मुळीच वाटत नव्हते. प्रत्येक पेपरपूर्वी ते डिस्कशन करत होते आणि त्याचा फायदा त्याला होत होता. या परीक्षेत नेमका मिनलचा सिट क्रमांक त्याच्या ब्लॉकमध्ये आला आणि त्यांची अनेकदा भेटही झाली  पेपर विषयी चर्चाही झाली. पण आधीचा अनुभव असल्याने त्याने प्राजक्ताला मिनलच्या भेटीविषयी सांगितले. तशी ती हसली, “तू अगदीच वेडा कसा? मला माहिती आहे की तू मला सोडून आता कोणाचाही विचार करू शकणार नाही. तू तिच्याशी निर्धास्त  बोल. माझी मुळीच हरकत नाही.”

विलासला तिच्या या बदलेल्या भुमिकेचे आश्चर्य वाटले, दोन वर्षांपूर्वी आपण मिनलकडे काही वेळ थांबलो तर हिने आकांडतांडव केले होते,आज ही स्वतः मिनलशी बोलायला सांगते इतका आत्मविश्वास आला कुठून? पण त्याने तिचे म्हणणे हसण्यावारी नेले आणि तो म्हणाला,” प्राजक्ता मी तुझ्या पूर्ण आहारी गेलोय असच तुला वाटतयं का? तस असेल तर ते अर्ध्यसत्य आहे. गेल्या दोन वर्षात मी एकदाही संयम सोडलेला नाही. त्यामुळे तुझ्या रूपाचा मी  दिवाणा नाही हे लक्षात घे. पण तू जो आत्मविश्वास मला दिला आहेस त्याची भरपाई मी कशानेही करू शकणार नाही, म्हणून मी तुला माझी प्राणसखी मानतो त्यात शारीरिक सुखाची कुठेही अभिलाषा नाही.”

त्याचे अतिशय प्रामाणिक उत्तर ऐकताच ती गोड हसली. विलास कधीच, मी सुंदर असल्याचा दावा केला नाही आणि तसा माझा गैरसमज नाही पण माझे मन आता आरसपाणी आहे त्यात तू उतरून पाहिलेस तर तुला फक्त तू आणि तूच दिसशील. आता तू त्याचा स्वीकार करायचा की नकार द्यायचा ते सर्वस्वी तुझ्या हाती आहे. मी तुझ्यावर हक्क सांगणार नाही पण दुसऱ्या कुणाचा विचारही करणार नाही.”

ते ऐकताच विलासने तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला. ती अलगद दूर झाली. “थोड्या वेळापूर्वी तू स्वतःला संयमी म्हणालास अन लगेचच… मी तुझीच आहे पण त्यासाठी तुला स्वतःला सिध्द करावे लागेल, तो पर्यंत हे फुल टवटवीत ठेवणं ,अस्पर्श ठेवण हीच कसरत तुझ्यासाठी आहे. लवकरच परीक्षा संपेल. तेव्हा तुला  आईचा  निरोप आहे. तू तिला भेटावे, माझ्यापेक्षा तिला आपल्या दोन मुलींची काळजी अधिक आहे.”

शेवटचा पेपर संपला त्याच दिवशी तो तिच्या घरी भेटीसाठी गेला. तिच्या आईने त्याचे स्वागत केले. चहापाणी झाल्यानंतर तिची आई त्याला म्हणाली. “दोन वर्षांपूर्वीच मी तुमच्या दोघांच्या बाबतीत अंदाज बांधला होता. म्हणूनच मी तेव्हा तसे बोलले होते. हिचे बाबा थोडे जुन्या विचारांचे आहेत. ते सरकारी कचेरीत काम करत असल्याने सहज कोणत्याही गोष्टींना होकार देत नाहीत. तुमच्या बाबतीत कोणतीही स्पष्टता नसतांना ते ही रिस्क घेणार नाहीत. तुमचे या विषयी काय मत आहे? तुम्ही हिच्या बाबांची समजूत पटवून  देऊ शकाल? तुम्हाला विश्वास आहे?”

“काकू, तुमचे म्हणणे मी ऐकले, मी आज शेवटचा पेपर देऊन मोकळा झालो आहे. ह्या क्षणाला मी एका दडपणातून मुक्त झालो. आता माझा जीवनाशी खरा संघर्ष सुरू होईल. प्राजक्ताचा माझ्या मेहनतीवर विश्वास असेल तर ती तोपर्यंत थांबेल पण कुटुंबाचा विचार करता तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही योग्य तो निर्णय घेऊ शकता. आज माझे भविष्य मला माहिती नसताना मी कोणतेही खोटे आश्वासन देऊ शकत नाही. प्राजक्ता  समजुतदार मुलगी आहे. तिचे हित कशात आहे तिला कळते.मी प्राजक्ताच्या बाबांना ही गोष्ट समजावून देण्याचा प्रश्नच नाही कारण त्यांचा स्वभाव मला परिचित नाही. मी एवढेच सांगेन प्राजक्ताचा मी तिच्या मदतीबद्दल ऋणी आहे.”

त्याने प्राजक्ताच्या आईचा निरोप घेतला, “काकू मी निघतो ,माझे विचार तुम्हाला पटले असतील तर ठिक आहे. माझी विनंती एवढीच आहे की, लग्न ही घाईघाईने करण्याची गोष्ट नाही. मी स्थिरस्थावर झालो की स्वतः प्राजक्ताचा हात मागण्यासाठी येईन तोवर हा विषय वाढवून तिला संभ्रमात टाकू नका. आज तीचा क्लास उत्तम सुरू आहे. त्यावर लक्ष केंद्रित केले तर ती उत्तम शिक्षिका होईल. येतो मी, माझ्याकडून काही चुकले असल्यास मला क्षमा करा.”

प्राजक्ताचा ट्युशन क्लास आता जोमाने सुरू झाला होता. पुर्वी ती एक बँच घेत होती आता ती दोन ,तीन बँच घेऊ लागली होती  आणि अद्यापही विचारणा होतच होती.आता तिला जास्त तयारी करावी लागत होती. तीस विद्यार्थ्यांच्या सराव उत्तर पत्रिका तपासणे, त्यांचे कुठे चुकले ते समजावून सांगणे यात ती पूर्ण थकतही होती.

M.com करणे तिला  शक्य होते पण मग क्लासमध्ये वेळ देता आला नसता. तिच्या वडीलांनी तिला पोस्ट ग्रँज्युएशन करण्याचा सल्ला दिला होता पण दोन बहिणींचे शिक्षण होणेही गरजेचे होते  त्यामुळे तीने उच्च शिक्षणाचा विचार सोडून दिला. आता दोघं दर चार आठ दिवसांनी एकमेकांना भेटत होते. त्यांच्या भेटीत शारीरिक आकर्षण असले तरी तरीही अद्यापही त्यांनी मर्यादा सोडली नव्हती. तसेही तेव्हा पालघरमध्ये कुठे निवांत भेटता येईल अशी जागाच नव्हती. कधी केळवा बिच तर कधी आर्यन मैदान रस्ता, तर कधी सातपाटी रस्ता असे ते फिरत,  तेव्हाही कोणी परिचित भेटला तर! ही भिती मनात सतत होतीच.

त्याने  रेल्वेच्या मुंबई मंडळ क्षेत्रात , क्लेरीकल पोस्टसाठी एप्रिल महिन्यात लेखी  परीक्षा दिली होती. तो त्याच्या निकालाची वाट पहात होता. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तो पास झाल्याचे त्याला समजले, पंधरा दिवसांनी त्याचा  इंटरव्ह्यू होता. त्यासाठी त्यांनी psc ची पुस्तके आणली. रेल्वे मधील काही लोकांशी ओळख काढून त्यांचे मार्गदर्शन घेतले.  

DRM ऑफिस ला त्याची पाच अधिकाऱ्यांनी मुलाखत घेतली. आठवड्याभरात त्याचा निकाल आला. तो सिलेक्ट झाला होता. अद्यापही मेडिकल होणे बाकी होते. शारिरीक दृष्टीने तो फिट होता तरीही धाकधूक होतीच. दोन आठवड्यानी मेडिकल झाली. त्याचे पत्र त्याच्या हाती मिळाले. आता पर्यंत सर्व मनाप्रमाणे झाले होते. लवकरच तो रेल्वे सेवेत रुजू होणार होता. त्याला  पहिल्यख प्रयत्नात शासकीय नोकरी मिळाली हेच मोठे भाग्य होते. 

आता त्यांचे कार्मिक प्रशिक्षण सुरत येथे होणार होते. ही बातमी प्राजक्ताला कधी सांगू असे त्याला झाले होते. ग्रँज्युएशन पूर्ण होता होताच तो रेल्वे बोर्डाची परीक्षाही  पास झाला होता , त्याच्या कुटुंबासाठी ही गोष्ट महत्त्वाची होती. अजूनही या नात्याबद्दल त्याने घरी सांगितले नव्हते.एकदा नोकरीत  स्थिरस्थावर झालो की मगच सांगणे योग्य असे स्वतःशी ठरवल्याने तो निवांत होता. दादाला नोकरी लागली म्हणून भाऊ मात्र आनंदात होते. वडीलांना तर मुलगा क्लार्क म्हणून रूजू होणार याचा आनंद होता. 

ट्रेनिंगला जाण्यापूर्वी तो प्राजक्ताला भेटला, त्याच्या  यशाबद्दल  दोघांनी सितला देवीच्या मंदिरात जाण्याचे ठरवले.  तिने देविची ओटी भरली.  दोघे एकत्र पाया पडली. त्या दिवशी समुद्राच्या किनाऱ्यावर पहिल्यांदा ती त्याच्या मिठीत विसावली. त्याने तिचे चुंबन घेतले. “प्राजक्ता,आज मी खूप आनंदात आहे, नशीबाने माझे ऐकले, आता आपला मार्ग मोकळा झाला. तो तिचे पुन्हा पुन्हा चुंबन घेत होता,ती त्याला प्रतिसाद देत होती. त्याचा उन्माद वाढत होता,तो तिला अधिक जवळ घेऊन कुरवाळू लागला तशी ती रागावली.

“विलास, विसरलास तुझी प्रतिज्ञा, काय करतोस तू? आपण मर्यादा ओलांडून चालणार नाही.” तो हिरमुसला,” दोन तीन वर्षे वाटच तर पाहिली, कधी तुझ्याशी चाळा केला का? पण आता लवकरच आपण प्रेमरज्जूनी बांधले जाणार आहोत तर थोड जवळ घेतले तर काय फरक पडणार आहे?” “माझ्या राजा,अजूनही आपलं  लग्न झालेल नाही, तो पर्यंत तुला  मोह आवरत नसला तरी मला वाहवून चालणार नाही, तरीही तुझी इच्छा मी पूर्ण केली ज्यात मलाही आनंद मिळाला,तुझ्या मिठीत जे सूख मी अनुभवले त्याची प्रतीक्षा मलाही होती. या पूढे जाऊन चालणार नाही. एका कुलीन घरातील मी मुलगी आहे. कोणतीही चुकीची गोष्ट करून आई बाबांची अडचण वाढू देणार नाही. मला दोन बहिणी आहेत. सोन्या इतके वर्ष थांबलास तसा आणखी थोडा  थांब. तुझे ट्रेनिंग संपवून येईपर्यंत मी आई बाबांना राजी करते. त्यानंतर लवकरच आपण एक होऊ,  अगदी  रजिस्टर लग्न करून तू  मला नेलस तरी मला चालेल. “

हिरमोड झाल्याने त्याला तिचा प्रचंड राग आला होता, पण तिचे म्हणणे अगदी योग्य होते, जर बेसावध क्षणी  काही घडले असते तर तिच्या कुटुंबाला तोंड दाखवायला जागा राहिली नसती. तो तिच्या मांडीवर तोंड घासून रडला, Prajakta I am very sorry, I have lost my control and  crossed my limit. I must thank you,  that you stopped me from this naunsence. Hereafter I will not give you a chance to complaint against me. निघतांना दोघ शांत पण तृप्त होती, त्यांची नाव भरकटण्यापूर्वी किनाऱ्यावर सुखरूप पोचणार होती. 

तो तीन महिन्यांनी ट्रेनिंग संपवून ड्युटीवर जॉईन झाला त्यानंतर पंधरा दिवसांनी प्राजक्ताची  संमती घेऊन तो  तिच्या  वडीलांच्या भेटीसाठी  मिठाई घेऊन गेला.   होणाऱ्या सासऱ्यांना त्यांच्या प्रेमा बाबत, स्वतःच्या नोकरी बाबत, तस्सेच घरची परिस्थितीची माहिती दिली. “काका, मला लग्नाची मुळीच घाई नाही,  पण आम्ही कधी  एकत्र दिसलो तर  समाजात चर्चा होऊन प्राजक्ताची  तुमच्या कुटुंबाची बदनामी होऊ नये यासाठीच मी  तिचा हात तुमच्याकडे मागतो. तुम्ही खात्री बाळगा मी तिला सूखात ठेवेन. “

बहुधा प्राजक्ताच्या आईने आपल्या होणाऱ्या जावयाची पूर्ण कहाणी त्यांना सांगितली होती. त्यांनी विलासला  सांगितले, “तुमच्या आई वडीलांना सोबत आणले असते तर बरे झाले असते. नवऱ्या मुलाने असे स्वतः येऊन स्वतः ची ओळख करून देणे किती योग्य? त्यातून तुमचे वय लहान, आम्ही तुमच्या प्रमाणिकपणावर विश्वास कसा ठेवावा?”   तेव्हा तो स्पष्ट म्हणाला, “माझे वडील रेल्वेत साध्या पदावर नोकरी करतात. त्यामुळे माझ्या निर्णयाच्या विरोधात ते नाहीत. आईला मी कल्पना दिलेली आहे.” 

“विलासराव तुमची मुलीला मागणी घालण्याची पध्दत  मला आवडली नाही. घरात मोठी माणसे असताना  असे एकट्याने येऊन मुलीला मागणी घालणे किती योग्य? मला आमच्या कुटुंबातही या सोयरीकी बाबत सांगायला हवे. समाज आम्हाला नावं ठेवील.” प्राजक्ताच वडील म्हणाले. “ठिक आहे, मी तुमच्या कानावर घातले. तुमची संमती असेल तरच होकार द्या. उद्या आम्ही दोघे एकत्र कुठे जात असलो आणि कुणीतरी तुमचे कानावर घातले तर ते योग्य होणार नाही, म्हणूनच आपली भेट घेणे गरजेचे आहे. “

त्याचे म्हणणे ऐकून ते पाठीवर थाप मारत म्हणाले. “जावयबापू मला तुमचा खरेच अभिमान आहे, तुम्ही स्वतःचे निर्णय घ्यायला सक्षम आहात हे पाहून खरेच आनंद होतो. फक्त आम्हाला तयारीसाठी थोडा अवधी द्या. आम्हाला तुमचे घर पाहू दे, तुमच्या आई बाबांची भेट घेऊ दे मग रितसर आपण करू. “

त्याच महिन्यात प्राजक्ताचे आईबाबा त्याच्या वडिलांना भेटून गेले. खरेतर रेल्वेची खोली तिही अडगळीची. एवढ्या अडचणीत आपल्या मुलीला संसार करण्यासाठी पाठवणे त्यांना पटेना,  त्यामुळे ते फारसे समाधानी नव्हते.पण प्राजक्ता ठाम होती. तिने सांगितले की “ बाबा, विलास आणि मी आता लहान नाही, आम्ही तुम्हाला हेवा वाटेल असा संसार करू. तुम्ही फक्त आमच्या डोक्यावर हात ठेऊन आशिर्वाद द्या.”

विलासचे वडील आणि विशेषतः आई समजुतदार होती. मुलगी शिकली सवरली आणि कमावती असल्याने  विरोधाचा प्रश्न नव्हता. त्यांची रेल्वेची रूम छोटी असल्याने भाड्याने खोली घेऊन त्याने स्वतंत्र घर थाठावे यासाठी विलासच्या आईची हरकत नव्हती हे ऐकून प्राजक्ताची आई विहीणीबाईंवर खुश होती. 

अखेर पंधरा दिवसांनी वैदिक पध्दतीने लग्न झाले. सप्तपदी झाली तेव्हा पुरोहितांनी जोडप्याला सर्व जेष्ठांच्या जोडीनेच पाया पडून आशिर्वाद घ्यायला सांगितले तेव्हा दोघांनी जमलेल्या दोन्हीकडच्या जेष्ठ मंडळींच्या पाया पडले.या तरुण जोडप्याला आशिर्वाद देतांना सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

त्यानंतर पुरोहितांनी प्राजक्ताला विलासच्या पाया पडायला सांगितले तेव्हा विलासने तिला मध्येच थांबवले आणि तिच्या पाया पडत मोठ्याने तोच म्हणाला, “शरण्ये त्रंबके गौरी नाररायणे नमोत्सुते.”

ते ऐकून सर्वच सर्द झाले. पण पुरोहित एकदम आनंदी झाले. ते  म्हणाले मी लावलेल्या विवाहातील हा पहिला विवाह आहे ज्यात एका स्त्रीचा योग्य सन्मान तिच्या पतीनेच केला. मला खरोखरीच आनंद झाला आहे. प्रत्येक कुटुंबाला आपल्या पत्नीची योग्यता  वेळीच समजली तर  संसारात दुःख उरणार नाही. हे ऐकून थोड्या वेळापूर्वी अचंबित झालेले नातेवाईकांनी टाळ्याचा कडकडाटाने    आनंद व्यक्त केला.  प्राजक्ता मात्र कानकोंडी झाली. तिला कळेना की या वेड्याला कसे समजवावे. लोक काय म्हणतील. तिने डोळ्यांनी त्याला दटावण्याचा प्रयत्न केला. 

दोन वेडे जीव एकत्र आले. ती त्याच्या कूशीत विसावतांना कानात कुजबुजली तुज संग प्रित लगाई सजना,सजना ओ… . त्याने तिला मिठीत घेत चुंबनाचा वर्षाव केला पुढचे ती बोलू शकली नाही. 

                              —-     समाप्त   —-

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *