समेट
शांता शिससाट कणकवली नगावे येथून लग्न होऊन तिरवड्यात जुवेकरांच्या घरी सुन म्हणून आली. लग्न करुन आलेल्या प्रत्येक मुलीला नवीन घरात आपले कसे होणार ही चिंता असतेच. जर मुलीला कामाची सवय नसेल किंवा माहेरी लाडाकोडात वाढली असेल तर प्रारंभी थोडे जड जाते पण यथावकाश मुली नवीन घरातील रितीरिवाज समजून घेतात. शांताचे वडिलही मुंबईत कामाला होते मात्र त्यांनी बिऱ्हाड मुंबईला हलवलं नव्हतं त्यामुळे गावाच्या रितिभाती तिला माहिती होत्या. माप ओलांडून ती घरी तिरवडे येथे आली. घरी तिचं सासरकडून स्वागत झालं. दिसायला ती तिच्या जावांपेक्षा उजवी होती याचे दोन्ही दिरांना कौतुक होत.
जुवेकरांच घर एकत्र कुटुंब होतं. दोन दीर मुंबईत रहात होते, एक बेस्ट मध्ये तर दुसरा मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये कामाला होते. तिचा नवरा मात्र घरी शेती पहात होता. सातआठ एकर भात शेती, दहावीस माड, शे शंभर काजू कलम आणि हापूस कलमही होते. एकंदरीत शेखरच चांगल चाललं होतं. घरी बैलजोडी होती तरीही दोन्ही भावंडांनी लहान भावाला ट्रॅक्टर घेऊन द्यायच कबूल केलं होतं. मुंबईकर मंडळींची अपेक्षा असते की गावाकडे त्यांचा मान राखला जावा. त्यांचं आणि मुलांचं कोडकौतुक व्हाव, त्या बदल्यात ते गावच्या भावाला आर्थिक मदतीसाठी नेहमीच तयार असतात. दोन्ही भाऊ मुंबईवरून येतांना घरात नवनवीन वस्तू आणत होते. परततांना वडिलांच्या हातावर आणि भावाला खर्चासाठी पैसे देत होते. भाऊही त्यांना पिकलेल कडधान्य, नारळ, उकडे तांदूळ देत होता. आंबे तयार झाले की कुरिअरने पेट्या पाठवत होता. सगळं कस चांगले चालले होते.
सणावाराला भाऊ सहकुटुंब गावी यायचे तेव्हा जावांच्या अंगावरील दागिने आणि त्यांचा रूबाब पाहून शांताच्या मनात सारख यायचं की आपल्या नवऱ्याने शेतात खपण्यापेक्षा मुबंईत नोकरी करावी, खोली घ्यावी. म्हणजे आपलेही दिवस पालटतील. दर वेळेस जावांच्या अंगावर
नवनवीन दागिने पाहून तिचा तिळपापड व्हायचा. आपला नवरा मुंबईत असता तर? या ‘तर’ नेच तिच्या मनात ठिणगी पेटवली. आपल्या नवऱ्यावर अन्याय झाला आहे अस सतत अलीकडे तिला वाटू लागलं.
दिर गावी आले की त्यांच्या बायका स्वयंपाकाला मदत करायच्या पण धुणी भांडी तिला करावी लागायची. तिचा नवरा भाऊ सांगितील ते ऐकायचा. ते मुंबई वरून येतील तेव्हा त्यांना आणायला रिक्षा घेऊन जायचा. त्यांच्या बॅग स्वतः उचलायचा हे पाहून तिला वाईट वाटायचे. तिच्या मुलांना दिर कधी नवे तर कधी मुलांचे चांगले कपडे, खेळणी आणायचे, त्यामुळे तिला जास्त टोचणी लागायची. गणपतीला तिचा नवरा डोक्यावरून गणपती आणायचा, त्या मूर्तीची पसंती तिच्या दिरांची किंवा त्यांच्या मुलांची असायची असायची. आपला नवरा सांगकाम्या आहे. मोठ्या भावाचं सगळ ऐकतो हे तिला पसंत नव्हते.
आपला नवरा शहरात असता तर आपण ही रुबाबात राहिलो असतो. आपल्या नवऱ्याला दिरांचे ऐकावे लागले नसते. आपल्या मनासारखा गणपती आणता आला असता. ती कधीमधी नवऱ्याला सांगायची, “अहो ऐकलास काय? व्हयत्या शेतीत वरीसभर खपून कायएक भागणा नाय,,काय व्हया नको झाला तर थोरल्या भावशिकडे हात पगळुचो लागता त्यापेक्षा मुबंईत कामाक रवलास तर आपलो पोरगो मुंबईत मोठया शाळेत शिकात. तुम्ही खोली घेईसर मी हय रवान. साधी खोली असली तरी चलात पण मुंबईत जावया.”
नवरा शांताची समजूत काढत असे, “गो! तु खुळी की काय? काय सांगतय ता ऐकं, बोंबटत फिरू नको. आपल्या मुलांच्या नावावर बँकेत शिक्षणासाठी मी पैसे ठेवलेहत. तुका दागीने केले त ता दिसण्यात येतला, जरा दम काड उद्या पोरा कामाक लागली की तू सांगशीत तसले दागिने तुका करूया. दर वर्षाक काजी बाजारात घालतव, गारपा सलीम चाचाक देतवं ते पैसे घरात आणणय नाय, तेवा पैशांची चिंता करू नको. तू म्हणतस मुंबईत जावया, पण नोकरी काय वाटेवर सांडली हा?,कसली नोकरी गावतली, शिपायाची? माझा शिक्षण लय नाय, नोकरी कोण देईत? लग्नापूर्वी सांगलव ना की मुलगो शेतकरी हा, फसवून लगीन करूक नाय मां. आपण मुंबईत गेलव तर आऊस, बापूस एकटे पडतीत, त्यांका कोण बगीत?”
शेखरच ऐकून ती नाराज व्हायची. “माका काय ठाऊक तुमच्या घराकडे मोलकरीण म्हणून राबवून घेतलास ता? पण तुमी सांगतास ह्या खरा मां, म्हणजे आपल्या पोरांच्या शिक्षणासाठी कोणाकडे हात पगळून नको ह्या तरी खरा मां?” “गो आयशीच्यान ,खरा ताच सांगतय, जरा धीर धर, आता थोरलो नववीत आणि ता सातवीत म्हणजे दोन तीन वर्षा रवलीहत. मी काय सांगलय ता तुझ्याकडे ठेव, बोंब मारत फिरा नको.तुझ्या घोवाक डोक्या नाय असो तुझो समज आसा. पण बगीत रव. भाऊस शिकले असले तरी व्यवहारीक शाणपण माकाव आसा.” “ता खरा पण तुमच्या आवशीबापशीची काळजी माका घेवची लागता. उद्या त्यांका जास्त नजा होय झाला तर तुमचे भाऊस त्यांची सेवा करतीत काय? आयुष्यभर हय खपान तुमका काय गावतला? उद्या बापाशीपाठी तीन वाटे झाले तर चार कोपरेव वाट्याक येवचे नाय माझ्या पोरानी कोणाच्या तोंडावर बघूचा?”
तो बायकोवर वैतागला, “ह्या बग दोन्ही भाऊस वाटणीचा कधी बोलूक नाय, तु उगाच माझ्या डोक्यात नको तो विषय भरून देव नको. उद्या तशीच येळ इली त माझे हात पाय मजबूत आसत, माका काय नाय दिल्यानी तर धंदो करीन कायेव करून पाँट भरीन तू उगीचच तोंड चाळवा नको .”
अधुनमधून नवऱ्यामागे तीचे टुमणे सुरु होते. सासऱ्यांनी ऐकल तेव्हा आधी तिची समजूत घातली “गो तो शिकलो नाय त्याचो दोष दुसऱ्या भावशिक कित्याक? हय रव, म्हणान मी कधी त्याका सांगूक नाय. आज चलत रवलो तरी माका चिंता नाय. पुन्हां बोललस त सांगून ठेवतय!”
तिचा पारा गरम होता. कधी नव्हे ती सासऱ्यांना म्हणाली,”तुमची म्हातारपणी सोय जाऊक व्हयी म्हणान त्यांका घरी ठेऊन घेतलास. त्यांच्या आयुष्याची वाट लागली.” मग मात्र दादा जुवेकर रागावले, आधी मुलाला शिव्यांची लाखोली वाहिली, तिच्या कुळाचा उद्धार केला. तिला झुडतार म्हणून शिवी दिली. मुलांनी बापाची खूप समजूत काढली पण त्यांना तिच्या बोलण्याचा प्रचंड राग आला. बाप म्हणाला, “तूझ्या घोवाक घेऊन चलत रवं, मुंबईत नशीब काडुक जातलास ती जावा. माझ्या मागे भांडण करून वेगळेचार करण्यापेक्षा खय ती जाऊक लाग. माझी नातरा खय जावची नायं.”
शेखर बायकोवर रागावला, तिच्यावर हात उगारला,तसे तिने भोकांड पसरले, “मारा, मारा माका,जगून उपेग तरी काय? दिसभर राबतय पण कोणाक काय आसा? कधी कौतुकान माझ्यासाठी काय घेतलास? माझ्या मुलांच्या भल्याचा ता मी बोलतय.” दादा मुलावर रागावले,”खुळावलस काय? बायकोवर हात कसो उगारतस? आम्ही कुळवाडी काय रे? शेजारी हसतीत, हातभर करून गावाक सांगतीत. सावर, तिका एकटीक काय ती बडबड करूं दे.”
थोड्या वेळाने शांता गुपचूप पाठल्या पडवीत निघून गेली, शेखरला आता भिती वाटू लागली, आजपर्यंत त्याने तिच्यावर हात उगारला नव्हता, न जाणो तिने संतापाच्या भरात काही वाकड पाऊल उचललं तर!
त्यातच निमित्त झालं. थोरल्या भावानी, गोपाळने बेस्ट जास्त सर्व्हिस झालेल्या कामगारांना लाभ देऊन व्हालंटरी देत होती म्हणून व्हालंटरी घेतली आणि तो गावी आला. घराच्या मधला खण त्याने त्याच्या मुंबईवरून आणलेल्या सामानाने अडवला. त्यातील अडगळ वाटणारे सामान त्याच्या बायकोने दुसऱ्या खोलीत टाकले. तो कमावता होता, यापूर्वी त्यानी वेळोवेळी घरासाठी मदत केली होती, बापाने मोठ्या मुलाला विरोध केला नाही याने लहान सुन नाराज झाली. “मोठ्यांका काय तो मान, आमची जागा खेटराकडे.” आडुन आडुन ती बोलू लागली.
घरातील स्वच्छतेवरून काही महिन्यांनी जावा जावात वाद होऊ लागले. थोरली लहान जावेला बोलू लागली. शांतेन शेखरला सांगीतलं, “थोरली बरोबर माझा जमाचा नाय, जेवातेवा पाणउतारो करता, मी काय बसून खातंय? तूमी कायेव करा, मामांका सांगा आमका वेगळा बिऱ्हाड करून देवा. झालाच तर मी मांगरात रवान पण एकाच घरात रवाक माका जमाचा नाय. तिच्या हाताखाली काम करूक मी काय मोलकरीण आसय? सारखी घालून पाडून बोलता. इतके वरीस तुमच्या आवशीची सेवा केलय तरी तिचीच बाजू घेशात काय?”
त्याने समजुत काढण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ, खरं तर त्यालाही ते पटत होते. वहिनी बारीकसारीक कारणांवरून तिला बोलत होती. शेवटी एक दिवस शेखरने आपल्या वडिलांना शांताचे म्हणणे सांगितले. वडिलांनी मोठ्या मुलाकडे विषय काढला. त्याने, मी बायकोला समजावतो पण कुटुंब विभागल तर काय तोटे होतील ते सांगितले. मधला भाऊ मधुकर गणपतीला आला तेव्हा पुन्हा विषय झाला. त्यानेही शेखरची समजूत काढली म्हणाला,
“इतके वर्षा एकत्र रवलवं, आता वेगळेचार केलो तर गावकरी तोंडात शाण घालतीत. दादा जुवेकरांचे झिल वेगळे झाले गावभर सांगित फिरतीत. दोघींनी समजून घेऊक व्हया. वहिनी रागावर इलिहा म्हणून तसा म्हणता पण तूच विचार कर, इतक्या वर्षात तुका काय कमी पडला?” त्याला पटत होत पण बायको इरेला पेटली होती.
शांता सासऱ्यांना म्हणाली,”मामानु इतक्या वर्षात मी कोणाची गजाल काढलय काय? थोरली सारखो माझो पाण उतारो करता. आम्ही इतक्या वरीस घरदार, मेरधार, झाडपेड राखलवच ना? बसून तर खाऊक नाय, थोरले भाऊजी आपल्या मुलांची सोय करून गावी इले, मूला कामाधंद्याक आसत, मधल्यांची मोठा शिक्षण घेतत, आमच्या नशिबी काय हा? आम्ही सर्वांची उष्टी, खरकटी कित्याक म्हणान काढुची?” सासरे वैतागले,”गो विचारानं बोल, इतकी वर्षा नुसत्या शेतीवर दिवस निघाले काय? दिरांची मदत होती म्हणानच तुझा जमला मां, थोरलीचा ऐकाक नको काय? ती तुका मोठ्या बहिणीच्या जाग्यावर, थोडा समजान घे.”
ती धुसफूसत निघून गेली. शेवटी तीनही भावांनी एकत्र बसून विचार केला. शांताच्या वडिलांना बोलावून त्यांच्या समोर रुजवात घातला. रहात घर लहान भाऊ आणि आई वडील यांना द्यायच ठरलं.मोठ्या भावाने नवीन घर बांधायच ठरवलं. मधल्या भावासाठी घर बांधण्यासाठी जागा सोडून दिली. शेतीचा मोठा भाग लहान भावाच्या वाटणीस दिला.
आई वडिलांची जबाबदारी लहानग्या भावाकडे आली.
शांताला ते समजल तस ती म्हणाली,”मामामामी कायमचे आमच्याकडे रवाक इले तरी माझी अडचण नाय,इतके वरीस त्यांचा केलय यापुढेव करीन. त्यांचे, सगळे डाग दागीने आमच्याकडे रवाक व्हये. त्यांचा औषध पाणी कशाच्या जीवावर करतलव, न पेक्षा प्रत्येक भावानं तिन तिन महिने पोसाया. म्हणजे त्यांका एकीकडला खाऊन कंटाळो नाय येवचो.”
आता पर्यंत हो ला हो म्हणत मान डोलवणारे शांताचे वडील ताडकन उठले,काय होतय कळायच्या आत त्यांनी मुलीवर हात उगारला. “निच, बापाच्या वयाच्या दादांची तीन तीन महिने वाटणी करूया म्हणायची तुझी हिंमत कशी झाली. आजपासून तुला मी मेलो. उद्या तुझे भाऊही आमची वाटणी करतील तुला चालेल का? चांगले कुटुंब बघून तुला यांच्या पदरात घातली तर बापाच्या नावाला काळीमा लावतेस?”
दादा जुवेकरांनी त्यांना शांत केले. तो प्रकार पाहून गोपाळची बायको बाहेर येत म्हणाली,माझ्यामुळे भांडण झालं ना? आम्ही पुन्हा मुंबईला जातो. तिला एकटीलाच घरात राहू दे. शांताकडे पहात म्हणाली, लहान बहीण समजून प्रेमाने बोलते, माझं साधंसरळ बोलण तुला लागलं असेल तर माफ कर.” तसा गोपाळ बायकोवर रागावला, “तुझ्या तोंडावर लगाम नाही म्हणून हे घडलं, तुझी सततची शिस्त, हे इकडे का ठेवलं? ते तिकडे का ठेवलं? हा काही ब्लॉक नाही, घर तुझ एकटीचं नाही. उगाच भांडण करून तमाशा कशाला? तू मोठी आहेस तर मोठ्या बहिणी प्रमाणे प्रेमाने वाग. सारख दुसऱ्याला शिकवण्याची गरज नाही. त्यांनाही देवाने अक्कल दिली आहे” ती थोडी वरमली, पण नवऱ्याकडे मोठे डोळे करत म्हणाली, “म्हणजे मीच चूक करते असा तुमचा समज आहे की काय, कमाल आहे घरात कोणी चुकलं तरी बोलायला नको. ठीक, तोंड मिटून राहीन मग तर समाधान झालं ना?”ती हे नाराजीने म्हणत होती हे स्पष्ट होतं.
“शांता ! आजपासून तुला ही काही बोलली तर मला सांग. गेल्या शंभर वर्षात कोणी वाटण्या केल्या नाहीत आणि यापुढे जुवेकरांच्या घरात वाटण्या होणारही नाहीत. मी घरामागे दोन खोल्या काढतो म्हणजे तिची शिस्त आणि ती.” गोपाळ म्हणाला. ते ऐकून शांता ओशाळली,भावोजी तुम्ही उगाचच ताईंका बोलतास कदाचित माझीव चुक असात. मी नाय म्हणणयं नाय, पण ताई टायमा टायमाक माका सांगीत रवतत, ह्या हय ठेव नको, कचरो निट काढूक नाय, पुन्यांदा काड, भांडी घासलस पण खरकटाच रवला. सारख्या सांगत रवल्यावर राग येतलोच ना? घरात कामा काय कमी हत? शाण भरणा, चुलीक लाकडा काढणा, कपडे, भांडी, गुरांका पाणी, सगळी कामा करीसर माका वेळ पुरणा नाय आणि ताईंका येऊन जाऊन स्वच्छता दिसता. जेवण रांधून वाढणा वेगळा आणि भायली कामा वेगळी.”
सरिता, शांताच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, “शांता, चुकलच माझं, मी मुंबईत राहीले त्यामुळे मला घराच्या बाहेरही खूप काम असतात हे जाणवल नाही. आज पासून मी घरातील कोणतीच तक्रार तुला करणार नाही. उद्यापासून मला शेण कस भरायच शिकव, मी सुध्दा तुझ्या कामात तुला मदत करेन मग तर झालं.अग एवढ्या तेवढ्या कारणावरून कोणी घर मोडतं का?”
तिच्या आश्वासनाने शांताने माघार घेतली आणि ती घरातील काम करायला निघून गेली. सरिताला वेळीच समज आली आणि घर एकसंध राहिलं. अर्थात हे वादळ वरवर शांत झाल असलं तरी सरिताचा इगो दुखावला गेल्याने भविष्यात ते कोणत वळण घेईल सांगता येणार नाही. मित्रांनो कोणाच्या कामाला कमी लैखण योग्य नव्हे. मुंबईत चारशे चौरस फुटात संसार करण आणि गावच्या शेती, गुरेढोरे, स्वच्छता यासह संसार करणं फारच वेगळे.
आज काल शहराच्या गजबजाटाला कंटाळलेले शहरी लोक म्हातारपणी गावाकडे स्थलांतरीत होतात, पण त्यांनी, विशेषतः महिलांनी हे लक्षात ठेवल पाहिजे की गावाकडील व्याप वेगळे असतात. इथे शेती कामाच्या व्यापात घरातील स्वच्छता पाहणे शक्य नसते. अस्ताव्यस्तपणा त्यांच्या अंगवळणी पडलेला असतो. त्यांना स्वच्छतेचे विशेष कौतुक नसते. मात्र तेथे येणाऱ्या प्रत्येकाची उठबस इच्छा नसली तरी करावी लागते. वेळ नसला तरी घटकाभर त्याच्याशी बोलावं लागत. सणावाराला काही द्याव लागत तरच ते आपल्या कामाधंद्याला येतात. गावाकडील मंडळींना हे सुत्र कळलेल असत आपल्या हे पचनी पडत नाही.
आपल्याला वाटतं हा अनाठायी खर्च आहे. पण या व्यापातून कुणाचीच सुटका नाही, अन्यथा एकट पडायला होतं. गावातील लोकांचा असाही समज असतो की मुंबईकर जीवाची मुंबई करतोय याच कारण त्यांच्याकडे पैसा आहे. काम केल्याशिवाय पैसे येणार नाहीत मग मुंबई असो की गाव हे दोघांनी समजून घेतल पाहिजे.म्हणून गावाकडील माणसांनी मुंबईकडील लोकांवर “फुकटची भपकेबाजी सुरू आहे.” अशी शेरेबाजी करू नये. मुंबईत आजुबाजूच्या चार चौघांसारख रहावं लागतं. दादा जुवेकरांच्या कुटुंबात शांताला हेच वाटत होतं, जावेने नमत घेतलं म्हणून पेल्यातल वादळ बशीत शांत झालं. समजुतीने घेतलं तर मार्ग सापडतो. गावची माणसे हुशार असतात, शिकली नाही तरी व्यवहार चातुर्य असत त्यामुळे चार पैसै जपून ठेवणं त्यांना कळत. शेखरने हुशारीने आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे वाचून ठेवले होते. भविष्यात त्याला आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी भावाकडे हात पसरावा लागू नये याची तरतूद त्यांनी केली होती. हे व्यवहारी शहाणपण उपजतच त्याच्याकडे होतं. त्याला हे ठाऊक होतं की भावांची आपल्या संसाराला मदत आहे आणि गावच्या व्यवहाराबाबत भाऊ काही विचारत नाहीत म्हणूनच तो मुलांच्या भवितव्यासाठी चार पैसे ठेऊ शकला.
गाव, कोकण असो की विदर्भ किंवा पश्चिम महाराष्ट्र, ‘घरोघरी त्याच परी.’ शहरातील भावांनी आणि त्याच्या पत्नीने हे लक्षात ठेवावं, गावाकडील भाऊ,भावजय आणि त्यांची मुले यांना कमी लेखणे किंवा त्यांची वारंवार तुलना करणे अयोग्य आहे. ते टाळलं तरच तुमच गावी स्वागत होईल, चार दिवस तुम्हाला आनंदाने गावी रहाता येईल. तुमचा वडिलोपार्जित हक्क आहे म्हणून तेथील भावाच्या संसारात प्रमाणापेक्षा हस्तक्षेप केला नाही तरच तुमचे स्वागत होईल. भाऊ अथवा काका यांच्याशी संघर्ष टाळला, शेरेबाजी केली नाही तरच तुमच म्हातारपण आनंदी जाईल. तुलना करणं टाळता आलं तर दोन्ही कुटुंबाना सुखाने रहाता येईल.
बरेचदा गावाकडच्या मंडळींना वाटत की शहरातील भावंडे मजा मारतात मात्र वास्तव तस नसतच, शहराच्या ठिकाणी न दिसणारे अनेक खर्च आहेत, त्या मानाने गावाकडे कमी खर्च आहेत. त्यामध्ये तुलना करून घरात फुट पाडण्यापेक्षा दोन्ही भावांनी समजुतीने घेतल तर जगण सोपं होतं. आता हे ही खरच आहे की कधीतरी निसर्ग दगा देतो आणि शेतीतून नगण्य उत्पन्न येतं पण शहरातील समजुतदार भाऊ किंवा काका अशावेळी पाठीशी भक्कम उभे राहतात म्हणूनच निभावून नेता येत. महिला स्वतःच्या संशयी स्वभावामुळे सारखी तुलना करतात पण घरातील पुरुष समजुतदार असेल तर मार्ग काढतो. शांताच्या मनातील संशय सासऱ्यानी दूर केला म्हणूनच शांता आणि सरितात समेट झाला अन्यथा दादा जुवेकर यांना तीन तीन महिन्यांनी घर बदलून राहाव लागलं असतं.