सावळे सुंदर
मी पणाचा पडदा सारीता मी दूर
पाहिला श्रीहरी भोळा माझिया समोर ॥
झाली भेटाभेट सरले अंतर
माझिया मनाचा नाचू लागे मोर ॥
पाहिले मी डोळा रुप ते सुंदर
सावळा तो विठ्ठल दिसे मनोहर ॥
सतेज ते डोळे, हासती दिसती निष्पाप
विठूराय माझा अवघीयांचा मायबाप ॥
दूरदृष्टी सावळ्याची कटीवर हात
तुळशीच्या माळा गळा हरी, हरे ताप ॥
कपाळी भरला अबीर बुक्का
श्रीहरी पांडुरंग भावाचा भुकेला॥
जोडुनीया हात भजले अंतरी
मिटुनिया डोळे पाहिला श्रीहरी ।।
कटी पितांबर, अंगावरी शेला
विठूराया माझा भक्तीचा भुकेला ।।
घालून लोटांगण धुतले चरण
प्रभुच्या अंतरी पाहिले ह्दयान ।।
अलौकिक रुप दिपले डोळे
हरपून गेलो पाहून विठ्ठले ।।
दर्शन मिळाले धन्य पंढरी
उठाठेव माझी, पाहे श्रीहरी ।।