सुखाचा आभास

सुखाचा आभास

सुखं साठवता आलं असतं तर? गरज पडेल तेव्हा कोणाला उचलून देता आलं असतं तर? पण सुखाचा संचय करता येत नाही. ते वाऱ्यासारखं असतं, त्याचं अस्तित्व काही क्षण टिकतं. जेव्हा समोर असत तेव्हाच जाणवतं नंतर त्याचा आस्वाद घेता येईल याची खात्री नाही. जसं ओंजळीत पाणी दीर्घकाळ साठवता येत नाही, हवेची झुळूक फार काळ टिकत नाही, अगदी तसंच सुखाचं असतं. ते किती काळ सोबत करेल हे नाही सांगता येत.

काही महिन्यांपूर्वी गरीब आफ्रिकन मुलांचे उद्योग पाहिले. ज्या गोष्टी त्यांच्याकडे नाहीत त्या आहेत अशी कल्पना करत ती मुले मस्त जगत होती. मस्त एन्जॉय करत होती, हसत होती खिदळत होती. कुणी तुटके स्लिपर घेऊन गिटार वाजवण्याची नक्कल करत होते तर कुणी त्याच चपलेवर मोबाईल स्क्रीन स्वाईप करत होते. आपल्याकडे या गोष्टी नाहीत याची त्यांना खंत नव्हती. नक्कल करायलाही अक्कल लागते हे त्यांची कृती पाहून पटले. त्यांचा व्हिडिओ ज्यांनी कुणी गंम्मत म्हणून किंवा जाणीवपुर्वक बनवला असावा त्यालाही माहिती नसावे की ती कलाकृती समाजातील व्यंगावर अचूक बोट ठेवता ठेवता किती जणांचे मनोरंजन करत होती. कुठेतरी वाचलं होतं की दुसऱ्या व्यक्तीवर विनोद करणे फारसे अवघड नाही पण स्वतःतील व्यंगावर बोट ठेवणे आणि विनोद निर्मिती करणे अवघड. देशपांडे यांना आणि राजकपूर यालाही प्रेरणा चार्ली चॅप्लिन जवळून मिळाली असावी म्हणून देशपांडे हलके फुलके विनोदी लिहीत होते आणि राजकपूर त्याच कृती आपल्या चित्रपटात स्वतःवर करून हास्य निर्माण करत होते.

देशपांडे यांची, ‘वाऱ्यावरची वरात’ काय, किंवा राजकपूर यांचा, “मेरा नाम जोकर” किंवा लक्ष्मण देशपांडे यांचं वऱ्हाड निघालं लंडनला हे नाटय, स्वतःवर कोट्या निर्माण करून हसायला लावणाऱ्या अस्सल ताज्या साहित्यकृती होत्या. आजही त्या नवीन पिढीला हसवतात. त्यांच्या कलाकृतीतून स्वतःची किंवा दुसऱ्या व्यक्तीची फजिती झाली आणि करमणूकही म्हणून श्रोते आणि प्रेक्षक आनंदाने टाळ्या वाजवत होती. आहे त्या गोष्टीत समाधान आणि आनंद मानण्यात जुनी पिढी मश्गुल होती म्हणूनच त्यांचे चेहरे उजळलेले होते.

आता आपल्या मुलांना त्यांच्या मित्रांकडे किंवा मैत्रीणीकडे असेल तोच मोबाईल हवा असतो, तसलेच शुज किंवा जर्सी हवी असते. ती घेऊन देण्याची आपल्या पालकांची ऐपत आहे की नाही याच्याशी त्यांना देण घेण काहीही नसतं. केवळ मित्राकडे आहे म्हणून मला हवे हा अट्टाहास किती योग्य, पण कौटुंबिक परिस्थितीचे वास्तव समजून घेण्याची कुवत नसली की हातून चुकीची कृती घडते.

कोणाचे अनुकरण आपण करण्याची गरजच काय? सलमान किंवा शाहरुख एखादी गोष्ट करतो म्हणून ती करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे गंगू तेली आणि राजा भोज गोष्टीतील फजिती. तेव्हा आभासी जगात वावरण्याचा खुळा प्रयत्न करणे म्हणजे मानसिक आत्महत्या.

कोणीतरी फेरारी गाडीने ये जा करतो किंवा अनिल अंबानी चार्टर विमानाने ये जा करतो म्हणून तीच स्वप्न मनाशी रंगवणे सामान्य माणसाला शक्य होईल का? चित्रपटात स्टंटमन जे स्टंट करतात त्यांनी तो स्टंट करण्यापूर्वी हजारदा सराव केलेला असतो, तो येऱ्यागैऱ्या मुलांनी करून पाहणे जीवावर बेतेल की नाही याचा विचार कोणी करायचा?
सुख मिळवण्यासाठी कोणतीही आव्हानात्मक अनैसर्गिक कृती करून पाहण्याची खुमखुमी कधीच सुख मिळवून देणारा नाही तर जीव संकटात टाकेल.

ग्रामीण भागात सोई सुविधांचा अभाव. गरीबी म्हणून लोक गावाकडे नाराज आहेत पण शहरात काही वेगळं आहे का? तिथे आजही लोक झोपडपट्टीत दाटीवाटीने राहतात मिळेल ते काम करून जगतात. केवळ धन असेल तरीही सुख मिळत नाही हे माहिती असूनही लोक गैरमार्गाने पोत्यातून धन साठवतात. कधी गादीवर पसरून त्यावर झोपतात ते सुरक्षित राहावे यासाठी यंत्रणा नेमतात. तरीही साठवलेल्या धनामुळे असुरक्षितता येतेच. म्हणजे सुखी संसार करता यावा म्हणून धन आणि धन कोणी चोरून नेईल म्हणून सुरक्षितता. मग पैसे किंवा धन आहे म्हणून सुख मिळाले का? उत्तर नाही असेच आहे.

तेव्हा रामदास स्वामी यांच्या मनाचे श्लोक,आठवा , ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे? स्वये तुझ्या मना तु विचारूनि पाहे’ हेच खरे. आम्ही समजतो आहोत की अंबानी सुखी आहे किंवा अदानी सुखी आहे, खरं तर तस काहीच नाही. त्यांच्या विविध औद्योगिक प्रकल्पात रोज अनेक उलाढाली होत असतात. एखादा उंचावर असलेला शेअर अचानक गाळात जातो किंवा एखादी अतिशय महत्वाच्या ठिकाणी विकत घेतलेली जागा, कायद्याच्या कचाट्यात सापडून तेथील काम ठप्प होते. किंवा कुटुंबात अचानक व्यावसायिक किंवा व्यवहार कलह निर्माण होतो. त्यांच्या डोक्याला किती भुंगे एका वेळेस पोखरत असतील ते कदाचित त्यांनाही माहिती नसावे. पण अँटलिया इमारत,
त्या वास्तुत असणाऱ्या सुविधा, काम करणारे कर्मचारी, त्यांचे वेतन, इमारती वरील हेलीपँड हे सगळ ऐकून आपणही तेथील साधनांच्या सुखाची स्वप्ने रंगवू लागलो तर!

मित्रांनो आभासी जगात, लोक काही आज वावरत नाहीत. ‘साला मै तो साब बन गया.’ अमिताभचं गाणं आणि त्यातील नृत्य आविष्कार आपण पहिला असेल. किंवा काच काम करणाऱ्या करीमची दिवसा उजेडी स्वप्न रंगवण्याची कथा ऐकली असेल, म्हणून म्हणतो आभासी जगात जगणं तितकेसे सोप्पे नाही.

किती साड्या, किती ड्रेस, किती चपलांचे जोड, किती artificial jewellery, किती bank balance किती गाड्या असले म्हणजे एखादी मुलगी किंवा स्त्री आनंदी राहू शकेल? तिच्या गरजेला काही मर्यादा असेल का? या साधनाने तिच्या मनास शांती मिळेल का?

‘आणखी’ चा हव्यास कुणाचा संपेल का? आपण जर कुणाशी तरी तुलना करतच राहिलो तर कितीही अमर्याद साधने तुमच्याकडे असली, कितीही धन तुमच्याकडे साठले तरी मनाला तृप्ती आणि समाधान मिळणार नाही. याचे कारण समाधान नावाची कुपी ही शेवटी तुमच्या जवळच आहे. त्या कुपीत थोडं अत्तर असलं किंवा जास्त अत्तर असलं तरी येणाऱ्या सुगंध तितकाच येणार याची तुम्हाला माहिती हवी. कस्तुरी मृगाला कस्तुरी कुपी त्याच्या कपाळावर आहे हे जसे समजत नाही अगदी तस्स आपलं होत. घरात समाधानी पत्नी,हसरी मुलं आणि काळजी घे म्हणणारे आई बाबा असताना वेगळं सुख शोधत फिरवंस वाटणं म्हणजे कर्मदारिद्रीपणा.

तुमच्याकडे असलेले धन वाटता येईल पण फक्त धन मिळाल्याने एखादी व्यक्ती सुखी होईलच असे सांगता येत नाही. मी सुखी आहे की आनंदी? हे माझं मला ठरवावं लागतं. तुमच्या जवळ सर्व भौतिक उपभोग्य वस्तू असतील पण शारीरिक व्याधी असेल किंवा मनात स्वतःच्या भवितव्याची किंवा स्वतःच्या अगदी जवळच्या व्यक्ती बाबत चिंता असेल तर तुम्हाला साधनं आणि पैसे तुम्हाला सुख देऊ शकणार नाही.

सुख मिळावे किंवा सुखी राहता यावे यासाठी आयुष्यभर धन जमा केलं पण ते धन स्वतःसाठीच वापरले किंवा धन कमी कमी होत जाऊन आपण निश्कांचन होऊ म्हणून वापरलच नाही तर सुख कसे मिळेल? रग्गड धन आहे पण ते कोणीतरी चोरून नेईल ही चिंता असेल तर त्या धनाचा ना स्वतःला फायदा ना कोणा अन्य व्यक्तीला. पण तुमच्याकडे आहे ते धन तुम्ही स्वतःच्या गरजांसाठी किंवा कोणा व्यक्तीची तातडीची गरज भागवण्यासाठी वापरले तर ते योग्य कारणी खर्च होईल त्याने त्याची गरज भागली तर तो आनंदी होईलच पण तुम्ही कोणा व्यक्तीची गरज भागवू शकल्याचे समाधान तुम्हाला मिळेल आणि त्या समाधानातून आनंदही मिळेल.

तेव्हा तुमच्याकडे असणारा जमीनजुमला, संपत्ती ही जोपर्यंत वापरात येत नाही ती तुमच्याकडे आहे याची इतर व्यक्तींना असुया वाटेल पण त्याचा आनंद होणार नाही. जर तुमच्या जमिनीवर कोणी लागवड करत असेल आणि त्यामुळे त्याचं कुटुंब सुखी होत असेल तर तो आनंद तुम्हाला नक्कीच समाधान देईल. अर्थात तुमची मनोवृत्ती परोपकारी असली तरच ते समाधान मिळेल. अन्यथा माझ्या जमिनीवर ते मजा मारत आहेत अशी भावना तुमच्या मनात उत्पन्न झाली की त्यातून मत्सर किंवा तिरस्कार जन्म घेईल आणि तो तुम्हाला शांत बसू देणार नाही मग सुख कसे लाभेल?

तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाचे तेच आहे. खूप वाचन केले. मोठ मोठ्या पदव्या प्राप्त केल्या पण जे काही मनात आहे. जे काही तर्क तुम्ही मनाशी मांडले आहेत ते कोणाला सांगितलेच नाहीत. कधी लिहिले नाही कोणाला वाचायला दिले नाहीत तर काय उपयोग? जे ज्ञान तुमच्याकडे आहे ते गरजवंताला दिलेच नाही. तुम्ही मिळवले ते ज्ञान खरच कामाचे आहे की नाही याची पडताळणी, शहानिशा केलीच नाही तर ते ज्ञान काय कामाचे? जो पर्यंत तुमच्या ज्ञानाचा वापर तुम्हाला स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी करता येत नाही किंवा समाजातील प्रश्नांची उकल करण्यासाठी वापरता येत नाही तो पर्यंत तुम्ही स्वतःला कितीही विद्वान समजलात तरी राजमान्यता मिळणार नाही. समाजात मान मिळणार नाही. मग ते ज्ञान तुम्हाला किंवा कुणाला सूख कसे बरे देईल? आपल्या ऋषीमुनींना आयुर्वेद चांगला कळत होता, शल्यचिकित्सक म्हणून ते माहीर होते. काही ऋषींना पाण्यावर चालण्याची विद्या अवगत होती किंवा विमान तंत्र अवगत होतं. क्षणभर मानून चालू हे सर्व सत्य आहे पण त्यांनी आपल्या शिष्याला यातील काही शिकवल नाही आणि त्यामुळे त्याला संकटात या विद्या वापरताच आल्या नाहीत तर तो गुरूवर कसा विश्वास ठेवेल?

काही कुटुंबाच्या मालकीच्या हजारो एकर जमीनी होत्या. मालक स्वतः कसत नसल्याने हळूहळू त्या कुळांनी ताब्यात घेतल्या. आपण मालक आहोत, जमिनदार आहोत या खोट्या अहंकारापाई पुढील पिढीने जमीन विकून मौजमजा केली. फारच थोड्या जमिनी शिल्लक राहिल्या. कष्टाची सवय नाही तेव्हा केवळ जमीन जुमला असून भागत नाही तर त्या जमिनीची योग्य देखभाल झाली तरच त्याला किंमत आहे. तेव्हा असलेल्या जमिनीवर फक्त मालकी हक्क गाजवत ती पडीक ठेवायची की तीला कोणाच्या चरितार्थासाठी देऊन त्याचे आशीर्वाद घ्यायचे हा विचार सर्वस्वी व्यक्तीवर अवलंबून आहे. दुसऱ्या व्यक्तीच्या सुखात आपण सुख मानणं हे सुध्दा सुखवस्तू माणसाचं लक्षण आहे.

माझ्या सातबाऱ्यावर चारशे एकर जमीन आहे पण ना मी तिची लागवड करून उपभोग घेत ना अन्य कुणाला उपभोग घेऊ देत अशी स्थिती असेल तर जमीनदार असुनही मी मनाने निश्कांचनच आहे. जी संपत्ती ना स्वतःच्या उपयोगी पडत, ना कोणा अन्य गरजुला वापरता येत तर तिच्या असण्याला अर्थ काय? काही घरात वयाने पोक्त असलेली व्यक्ती फक्त शरीराने तिथे रहाते पण ना कोणत्याही कौटुंबिक समारंभात सामील होत ना कुणाच्या आनंदाने आनंदी होत तर ती व्यक्ती मृतवत आहे असे म्हणावे लागेल. तेव्हा उच्चशिक्षीत किंवा मोठ्या पदाची झुल पांघरून घरात अलिप्त वावरायच की सर्वसामान्य लोकांमध्ये सहज मिसळून त्यांच्या सुखदुःखात सामील व्हायच ते तुमच्यावर आहे. शिष्ट असा शिक्का तुमच्यावर बसण तुमच्या सामाजिक दर्जाला शोभणारे नाही. आभासी आकडेवारीत जगायचे की प्रत्यक्ष त्या साधनांचा वापर होतांना पाहून आनंदीत व्हायचे आपल्यावर आहे.

मोठाली घरं, घरातील गाद्या गिरध्या, फर्निचर आणि साधन म्हणजे घर नव्हे. ज्या घरात माणसांचा निवास आणि आवाज असतो. ज्या घरात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत साध्या पद्धतीने पण दिलखुलासपणे केलं जातं. जेथे लोकांच्या मदतीसाठी हात उत्सुक असतात तेच घर गजबजले असतं. तेच घर लोकांच्या स्मृतीत राहते.आमच्या सफाळ्यात पन्नास वर्षांपूर्वी दादाशेट नावाचे सद्गृहस्थ रहात होते. त्यांच्या शेतावर आणि घरी अनेक कामगार कामाला होते. दूधदुभते होते आठवड्यात दोन वेळा मोठ्या प्रमाणात ताक बनवले जाई आणि गावातील गरीब लोकांना त्याचे वाटप होई. आठवड्यात दर रविवारी कामगारांचे साप्ताहिक वेतन वाटप होई. गजबज असे. त्यामुळे घर खेळते असे.

तेव्हा कोणत्याही कुटुंबचा नावलौकिक वाढतो तो त्या घरात इतर लोकांचे कसे स्वागत होते त्यावर. तुमच्याकडे खूप काही आहे पण देण्याची दानत नसेल तर उगाचच तुमच्याकडे कोणी का फिरकेल ?

पुर्वी असा समज होता की ज्याच्या दारासमोर चपलांचा ढीग दिसेल तोच खरा श्रीमंत, कारण लोक कोणत्या ना कोणत्या कारणाने त्याच्याकडे येतात याचा अर्थ तो लोकांच्या उपयोगी पडतो. त्यांची गरज भागवतो. म्हणून तो माणूस श्रीमंत नसला तरी समाधानी असतो. त्याला माहिती असते की माझ्यावर काही प्रसंग उद्भवला तर माझे हेच मित्रमंडळ धावून येईल. म्हणून सुख मिळवायचे असेल तर पैसे जोडत बसण्यापेक्षा माणसे जोडा. कमावलेला पैसा संपू शकेल मैत्री नाही.

आपल्या घरात पूजा, होम, गृहप्रवेश असा धार्मिक विधी असतांना पुरोहित हा विधी शास्त्रोक्त आणि हसत खेळत करत असेल. या विधी मागचा भावार्थ समजावून सांगत असेल तर तुम्ही त्यांनी न मागतही अधिकची दक्षिणा त्यांच्या हाती ठेवाल, त्याच वेळेस आपल्याला योग्य दक्षिणा मिळाली याबाबत पुरोहित समाधानी असतील तर त्याचा एकत्र परिपाक म्हणजे गुरुजी किंवा पुरोहित मनापासून आशीर्वाद देतील आणि तुम्ही केलेल्या धार्मिक विधीचा तुम्हालाही आनंद मिळेल. अपेक्षा नसतांना तुमच्या मदतीसाठी कोणी धावून येतो तेव्हा तुम्हाला झालेला आनंद अवर्णनीय असतो. अपेक्षा ठेऊनही कोणी मदत केली नाही तर अपेक्षाभंग झाल्याचे दुःख तितकच गहिरे असते.

आपण अपेक्षा आपल्या घट्ट नात्याच्या माणसाकडून किंवा घट्ट मैत्री असलेल्या मित्राकडूनच ठेवतो म्हणूनच या अपेक्षाभंगाची मानसिक जखम पीडा देऊन जाते. ज्याच्या बद्दल मनाला खात्री असते तोच जर प्रातारणा करत असेल तर…

तेव्हा सूख मागून मिळत नाही जर तुमच्या नशिबी एखाद्या व्यक्तीच प्रेम असेल तर न मागताही तुम्हाला भरभरून मिळते. प्रत्यक्षात आपण पाहतो काही पुरूषांना त्यांची लायकी नसतांना खूप सुंदर, खूप प्रेमळ पत्नी मिळते किंवा त्यांनी जीवनात अनेकदा चुका करूनही पत्नी त्याला समजून घेते. त्याच्या चुका पोटात घालून ती त्याला सावरत रहाते, त्याने चांगले वागावे, स्वतः ला सावरावे यासाठी मनधरणी करत रहाते. रवींद्र महाजनी असो की धर्मेंद्र ते जसे आहेत तसे स्विकारूनच त्यांच्या पत्नीने साथ ,सोबत दिली. अगदी सामान्य माणसाच्या आयुष्यात अशी घटना घडत असते तिच त्याला अनेकदा सावरत असते.
वाईट दिवस आले तेव्हा रवींद्र महाजनी यांच्या पत्नीने नोकरी केली आणि मुलांना शिकवले. कधीतरी रवींद्र महाजनी यांना घबाड मिळेल या खोट्या आशेवर त्या जगल्या असत्या तर मुलाच यश पहायला राहिल्या नसत्या.

घरारील कुटुंब प्रमुख स्वतःचे लाड करून घेण्यात तो आकंठ बुडाल्यामुळे त्याला हे कळतही नाही की आपण आपल्या पत्नीवर अन्याय करत आहोत. तिने त्याला मनापासून स्विकारल्यामुळे त्याचे चुकले तरीही ती त्याची बाजू सावरून धरते. साहजिकच त्यांच्या सहजीवनाचा रेशमी बंध घट्ट होतो. सुख हे मानण्यात आहे हे तिने स्विकारल आहे म्हणून तिला त्याच्या वागण्याचा त्रास वाटत नाही. ती त्रास करून घेत नाही. किंबहुना त्यांनी मोठ्या मनाने सगळं स्विकारलेलं असत. अशा विशाल मनमोकळ्या मनाच्या बायकाच Forget and forgive असा पोक्त विचार करून कुटुंब सावरत असतात.

कौटुंबिक अडचणींवर मात करूनही काही माणसे दैदिप्यमान यश संपादन करतात, कोणत्याही अडचणींचा बाऊ न करता ते सातत्यपूर्ण प्रगती करत समाजात स्वतःचे स्थान निर्माण करतात. प्रत्येक वळणावर ते नव्या आव्हानाचा समाचार घेत नवीन उंची गाठतात साहजिकच यश त्यांना हुलकावणी देऊ शकत नाही. अशा गुणसंपन्न माणसांच कौतुक करायला नियतीला लोटांगण घालावच लागते.

काही कुटुंबातील महिलाना आपले मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य देखील नसते. मात्र दागदागिने, शृंगार, उंची कपडे आणि कामासाठी महिला उपलब्ध असतात. सणावाराला घराच्या मोठेपणासाठी, साज शृंगार याचा योग्य वापर करून ती आपले दुःख लपवते. पती, सासरे किंवा घरातील जेष्ठ महिलांकडून जो मनाचा मोठेपणा आणि मानाचा दर्जा दिला जावा अशी तिची अपेक्षा असते तो तिला दिला जात नाही. मग घरात साधन असतील,श्रीमंती असेल पण मनस्वास्थ नसेल तर आनंद कसा मिळेल आणि समाधान कसे मिळेल ?

जी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य वेतन आणि सोयी सुविधा उपलब्ध करून देते. त्यांच्या आरोग्याची काळजी घेते. त्यांच्या कौटुंबिक गरजेच्या वेळी त्यांना आर्थिक किंवा अन्य मदत करण्याची सूचना आपल्या अधिकाऱ्यांना देते त्या कंपनी बाबत प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या मनात योग्य आदर असतो. त्या कंपनीत प्रत्येक कर्मचारी आपले उत्तम देण्याचा प्रयत्न करतो. कंपनीची उन्नती व्हावी यासाठी प्रत्येक कर्मचारी कामाची वेळ पाळून, कंपनीच्या किंचितही मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतात.मग वीज वापर असो की साधन समुग्रीचा वापर आणि बचत.

ज्या कंपनी आपल्या उत्पादन कार्यक्रमात कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन बाजारात होणारे चढउतार आणि कंपनी
व्यवस्थापनावर त्याचा होणारा परिणाम या बाबत खुल्या वातावरणात चर्चा करतात. अडचणीवर तोडगा काढणे सुलभ होते. गरज भासल्यास कर्मचारी आपल्या वेतनात काही कालावधीकरिता कपात करू देण्यासही तयार होतात. यातूनच कंपनी आणि कामगार यात एक सकारात्मक नाते निर्माण होते जे कंपनीच्या वाढीसाठी प्रेरक ठरते.

सुखसमाधान आनंद या गोष्टी,व्यक्ती किंवा कुटुंब, स्थिती, काळ, आजूबाजूचे सामाजिक वातावरण, यानुसार बदलत असतात. तुम्ही जेथे निवास करता तेथील वातावरण तणावाचे असेल, तेथे सुविधांचा अभाव असेल तर तुमच्या जीवनात त्याचा तणाव निर्माण होईल. केवळ पैसा कोणत्याच व्यक्तीला आनंद देऊ शकत नाही. तर तुमचे समाजातील आणि कुटुंबातील स्थान, तुमचा मित्र परिवार, तुमचा परिवार त्यांचे शिक्षण, त्यांना असलेल्या चांगल्या सवयी किंवा व्यसने या प्रत्येक गोष्टीचा परिणाम कुटुंबातील प्रत्येक सदस्यांवर होत असतो. कुटुंबात एक व्यक्ती जरी मानसिक दृष्टीने अपरिपक्व असेल, समजूतदार नसेल व्यसनी असेल की कायमच अपंगत्व आलेली असेल तर कुटुंबाची अधोगती होण्यास वेळ लागणार नाही.

हल्ली नवी मुंबई, मावळ, पूणे, नगर, नाशिक येथे अनेक गोल्डमन आहेत. अंगावर दोन दोन किलो दागिने वगवतात. गळ्यात चार पाच पदरी चेन. हातात ब्रेसलेट, कड, दोन्ही हातांच्या बोटात अंगठ्या. हे वैभव दाखवण्यासाठी मोठ्या हॉटेलमध्ये मित्र परिवारासोबत मोठ्या फोर व्हिलरमधून जातात. सोबत बाऊन्सर बाळगावे लागतात. मी किती श्रीमंत आहे दाखवण्याचा अट्टाहास. समजा अचानक एखाद्या गुंडांनी किंवा ज्यांना तुम्ही संरक्षक म्हणून नेमलं आहे त्यानेच तुमच सोन लुटून नेण्याचा प्रयत्न केला तर? मग तुमच्या मदतीला कोण येणार? कोयता गँग ने तुमच्या घरावर दरोडा टाकला तर? तेव्हा श्रीमंत असाल तरी प्रदर्शन करण्याची गरज नाही अन्यथा बाका प्रसंग उद्धभवण्याची
शक्यताच अधिक.

तेव्हा सुख हे मानण्यावर आहे सुखाच्या शोधात धावून सुख मिळणार नाही तर ज्या गोष्टी माझ्याजवळ आहेत पण इतरांकडे नाहीत त्यांना अल्पकाळात किंवा अल्पकाळासाठी त्या गोष्टी दिल्या तर ते आनंदात काही क्षण घालवतील. त्यांच्या चेहऱ्यावर आलेले हसू हाच आपला नफा आहे. त्यांच्या डोळ्यात बदलणारी छटा हे ईश्वराचे हास्य आहे. ते प्रसन्नपणे हसले म्हणजे आपल्याला आशिर्वाद मिळाले असे मानावयास हरकत नसावे.

आजकाल स्ट्रेस दूर करण्यासाठी लोक वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी जातात किंवा त्यांना कुणीतरी व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जातो. काही एक्सपर्ट समुपदेशन करतात. या समुपदेशनाची मोजून फी द्यावी लागते. एवढे करूनही त्यातून ते नक्की सावरतील याची ते हमी देतीलच असे नाही. हा स्ट्रेस कुठून आला? कशामुळे निर्माण झाला. आपल्या क्षमते इतकेच आपल्याला मिळणार आहे किंवा आपली क्षमता आपल्याला हळूहळू वाढवावी लागणार आहे. प्रगती शिक्षणातील असो की नोकरीतील ती ग्रज्युअली वाढत असेल तर ते धोकादायकच आहे. तेव्हा क्षमतेपेक्षा अधीक आणि झटपट मिळवण्याचा ध्यास, त्यासाठी वाट्टेल ते करण्याचा प्रयत्न, त्या टप्प्यावर पोचता येत नाही याचे दुःख आणि दूःख हलके करण्यासाठी व्यसनाची सवय हे सगळे टप्पे आहेत विनाशकारी.

तेव्हा हव्यास धरणार असाल तर तुमच्या हातून कोणती सामाजिक काम पार पाडता येतील जी समाज उपयोगी असतील त्याचा धरा. ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण सुविधा, आरोग्य सुविधा, पिण्याच्या पाण्याची सोय यासाठी काहीतरी करा. त्यांना स्थानिक पातळीवर रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी काही करा. तेथील विद्यार्थ्यांना फक्त एक दिवस, तुमच्या वाढदिवसाला खाऊ वाटून त्या मुलांच्या डोळ्यातील आनंद अनुभव घेऊन पहा.एखाद्या पडक्या जागेवर किंवा बोडक्या डोंगरावर तुमच्या मित्रांच्या साह्याने वृक्ष लागवड करून दोन चार वर्षे त्यांना नियमित पाणी मिळण्याची व्यवस्था करून त्यांच्या वाढलेल्या सावलीत बसण्याचे सुख अनुभवून पहा. तेव्हा खोट्या सुखाचा पाठलाग करू नका, ते सतत दूर पळताना दिसेल. आभास हा अभासच असतो तो सत्यात उतरणे अवघड आणि क्लेशदायक असतं.

आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे पाहायचं असेल तर शहाराबाहेरच निसर्गउद्यान, त्यात रमणारी मुलं आणि संध्याकाळी हवेत विहारणारी फुलपाखरे आणि गगनात भरारी मारणारे पक्षी पहा. शहरात दिसणाऱ्या उंच इमारती, रस्त्यावर पळणाऱ्या चकचकीत गाड्या, श्रीमंत माणसाच्या घरातील ५६ इंच फ्लॅट एलईडी टीव्ही किंवा आणिक काही हा सगळा पैशाचा खेळ आहे पण त्या मागे दबलेले अश्रू किंवा हुंदका कदाचित तुम्हाला दिसणार नाही, समजणार नाही, तेव्हा आभासी सुखाच्या शोधात फिरून आपले आनंदी जीवन वाया घालवू नका.

कोणतीही ट्युशन न लावता तुम्ही सत्तर टक्के गुण मिळवता तेव्हा तुमच्या आई बाबांना झालेला आनंद त्यांच्या डोळ्यात पहा. तुम्हाला स्वतः च्या प्रयत्नाने मिळालेली नोकरी आणि तुम्ही तुमच्या आईकडे दिलेला तुमचा पहिला पगार घेताना तिला झालेला आनंद वाचा. तुम्हाला जेवताना टोपात भाजी नसतांना ती भांड्याचा आवाज होणार नाही अशा बेताने ती वाढते आणि तिची कृती तुम्हाला कळली नाही तेव्हा तिचे डोळे चमकतात तेव्हा तिला झालेला आनंद पहा.

मित्रानो किती पक्क्वान्न खाल्ली यापेक्षा ती वाटून सर्वांनी खाल्ली याचा आनंद वेगळा असतो. वाटण्यात सूख आहे, एकटं खाण्यात नाही हे समजलं तर आभासी सुखात आपण रममाण होणार नाही. तेव्हा काही व्यक्ती किंवा कुटुंब सुखी असल्याचं भासवतात, दाखवतात त्यावर भुलून माझ्या नशिबात हे नाही म्हणत, दुःखी होऊ नका. तर कित्येक कुटुंबाकडे दोन वेळचे पुरेसे अन्न घेण्याची कुवत नाही त्या तुलनेत आपल्याकडे पुरेसे आहे याचे समाधान माना. सूखाच्या शोधात गैरमार्गाने दुःख पदरी घेण्यापेक्षा मी सुखी आहे हे स्वतःला बजावा आणि आनंदी रहा. तोच सुखी राहण्याचा फार्म्युला आहे.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar