सूचनावही

सूचनावही

शाळेत असतांना सगळ्यात जास्त आतुरतेने आम्ही कशाची वाट पाहत असू? ती म्हणजे सूचना वहीची. या वितभर वहीने अनेकांना आनंदीत केले आहे. अभ्यासाच्या जाचातून थोडा दिलासा दिला आहे. ती वही घेऊन येतांना शिपाई काका दिसले की आमचा आळस कुठल्या कुठे पळून जाई. चेहरा फुलून येई. वर्गाच्या दिशेने शिपाई काका येतांना दिसले की आमची नजर त्यांच्या हाताकडे जात असे. त्या हातातच ती वही असे आणि मग आमच्या वर्ग शिक्षिका किंवा शिक्षक आणि दोघही नसतील तर मॉनिटर सूचना वाचून दाखवी, “उद्या गोपाळकाल्या निमित्त सुट्टी आहे आणि परवा..”, अस म्हटलं की आम्हाला परवाही सुट्टी असावी अशी आशा उत्पन्न होई, तोपर्यंत तो म्हणे, “शाळा नेहमीप्रमाणे भरेल.” आमच्या स्वप्नांचा विचका होई. शाळेत भेट द्यायला येणारे पाहूणे, परीक्षा वेळापत्रक, क्रिडामहोत्सव कार्यक्रम, झेंडावंदन, पिकनिक अशा अनेक सूचना या वहीतूनच आमच्यापर्यंत पोचत.

आता शाळा वर्षभराच परीक्षा, आंतरशालेय स्पर्धा, सुट्ट्या यांच नियोजन पालक आणि विद्यार्थ्यांना देते. त्यामुळे पालक अभ्यास,मोठ्या सुट्टीतील पिकनिक यांच नियोजन करतात. तेव्हा वर्ष नियोजन असला प्रकार नव्हता. जेवढे धडे, उदाहरण संग्रह संपतील त्यावर परीक्षा, हू तु तु, कब्बडी, खो खो, धावणे असल्या स्पर्धा असत. चालत नेता येईल किंवा फार तर एसटीने इतक्या अंतररावर शाळा सहल काढायची ज्याची वर्गणी दोन रुपये असायची. अर्थात ही सूचना वर्गात आली की आम्ही आईकडे तगादा लावायचो. वडिलांच्या मनात असेल तर पिकनिक. त्यामुळे जे काही असेल त्याचा आधार सूचना वहीच असे.

सूचना वहीत लिहीली जाणारी सूचना ही वळणदार आणि मध्यम आकाराच्या अक्षरात कुठेही न खोडता लिहीली जात असे, यासाठी शाळेतील एका शिक्षकाची निवड झालेली असे. ते अक्षर पाहिल्यावर आपलेही असेच अक्षर असावे अशी इर्षा आणि इच्छा मनी होत असे. या शिक्षकांकडे आदराने पाहिले जाई, कुठेही खाडाखोड न करता इतके सुबक लिखाण त्यांना कसे जमते? या बाबत नेहमीच उत्सुकता असे. त्यांच्यासारखे लिखाण करुनही पहात असू पण एखादी वेलांटी चुकीची दिली की बट्ट्याबोळ होई.तेथे पाहिजे जातीचे येऱ्यागबाळ्याचे काम नोहे हे पटे.

मुख्याध्यापकांनी, सूचना वहीत सूचना लिहायला सांगणे हा खर तर सन्मान पण सतत एकाच शिक्षकास सूचना लिहावी लागली तर ते काम त्याच उत्साहाने कोणताही शिक्षक करेल असे नाही याचे कारण इतर शिक्षक त्याची तुलना कामाचा बैल अशी करत. म्हणून खरे तर प्रत्येक शिक्षकाला आळीपाळीने हे काम सोपवावे आणि त्यांनी ते सुवाच्य लिहूनच पाठवावे म्हणजे त्यालाही वळण लागेल.

कधीकधी शाळेत शैक्षणिक उपक्रम असे, बाहेरच्या शाळेतील शिक्षक आमच्या शाळेत येणार असत म्हणूनही आम्हाला अकस्मिक रजा मिळे म्हणूनच ही वही म्हणजे जादुई चिराग होता. या सूचना वहीची आम्हाला प्रतीक्षा असे. अर्थात या वहीने आमचा अनेकदा पचकाही केला आहे. कधी शाळा निरीक्षक वर्ग तपासणीसाठी येण्याची सूचना येई. या सूचनेत दहा वीस उप सूचना असत.गणवेष स्वच्छ हवा, गृहपाठ पूर्ण हवा. वह्यांची पाठची पाने स्वच्छ हवी त्यावर काही स्वतः चा इतिहास लिहू नये, भुगोल, इतिहास यातील चित्रांवर अदाकारी करू नये, कोणत्याही पुस्तकात अनाठायी दाढीमिशा, डोक्यावर कलाकारी करून ऐतिहासिक व्यक्तींना ओंगळवाणे रूप देऊ नये, शाळेत निरीक्षकांनी विचारले तरच उत्तर द्यावे. वगेरे वगेरे आणि सगळ्यात दुष्टपणा पूढे असे. ‘शाळा तपासणी असली तरी पूर्ण तासिका होतील.’ खरे तर ही सूचना वाचून दाखवून आमच्या जखमेवर मिठ चोळण्याचा हा प्रयत्न योग्य नसे.

कधी असे वाटे की अशा सूचना वाचून दाखवणाऱ्या एखाद्या शिक्षकांची चांगलीच जिरवावी, त्यासाठी एका मोठ्या दादाने नामी उपाय सांगितला होता. शाळा तपासणी करतांना शिक्षक एखादा पाठ शिकवत असतील आणि निरिक्षकांनी त्याबद्दल प्रश्न विचारले तर एकाही विद्यार्थ्यांने उत्तर द्यायचे नाही. दादांनी सांगीतल्या प्रमाणे आम्ही ठरवत असू, साहजिकच निरिक्षक शेरा मारत, शिक्षकांना मुलांच्या बौध्दिक पातळीला येऊन शिकवणे जमत नाही, आणि शिक्षकांना त्या बाबत विचारणा होईल. मग ते शिक्षक आमच्यावरती डुख धरत. एखाद्या विद्यार्थ्यांची पाठ फुटूनच राग शांत होई.

कधीकधी मात्र एखाद्या हुशार वर्ग मित्र किंवा शाळेतील परिचित विद्यार्थी किंवा आवडत्या शिक्षकांचे निधन झाल्याची सूचना येई आणि ती सूचना वाचून झाली की आम्ही शांत उभे राहून त्यांना श्रध्दांजली अर्पण करत असू. अर्थात पुढील दहा मिनिटात वर्ग पूर्वपदावर येत असे. निधन झालेल्या शिक्षकांची शिकवण्याची पध्दत किंवा तासाचा कंटाळा आला तर अवांतर गप्पा मारता मारता पुन्हा विषयाकडे येणे आठवत राही. असे दुःखाचे क्षणही सूचना वही आणत असे. या वहीने कितीतरी बातम्या आमच्या पर्यंत पोचवल्या आहेत. शिपाई काकांचा मूड पाहूनच सूचना चांगली आहे की वाईट ते कळत असे. स्नेहसंमेलन, क्रीडा महोत्सव, बक्षीस वितरण समारंभ, शाळा पिकनिक या बाबत सूचना आली की वर्गात उत्साही,आनंदी वातावरण निर्माण होई. मग त्या सुचनेसंदर्भात आपापसात चर्चा सुरू होत असे म्हणून अशा सूचना मधल्या सुट्टीपूर्वी किंवा शाळा सुटताना येत असत.

क्रीडा स्पर्धा किंवा इतर आंतरशालेय स्पर्धा झाल्या की त्यांचा निकाल या सूचना वहीतूनच आम्हाला कळे, जे या स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकात येत, त्यांची नावे वाचून दाखवली जात. क्षणभर मान अभिमानाने ताठ होई. तेव्हा या वहिने जसे कटू क्षण आमच्या वाट्याला आणले तसे, गौरवाचे काही क्षण ही आम्हाला मिळवून दिले अस म्हणणे इष्ट ठरेल.

तो दिवस मात्र आजही आठवतो आहे ज्या दिवशी आमच्या आवडत्या शिपाई काकांच्या निधनाची सूचना आमच्या हेड बाईंनी वाचून दाखवली. आम्ही त्यांना बापू काका म्हणत असू ,आमच्या वाढदिवसाचे पहिले चॉकलेट या बापू काकांच्या हातावर दिल्याशिवाय आम्ही इतर कोणाला चॉकलेट वाटत नसू, पुढे,पुढे तर तो रिवाजच होऊन बसला होता. बापू प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देत. म्हणूनच त्यांच्या निधनाची बातमी ऐकली तेव्हा त्या सूचना वहीचा खूप राग आला, जणू त्या वहीमुळेच काका गेले.

त्या दिवस काही अगोदर ते शिपाई काका कसल्याशा आजाराने गैरहजर होते साहजिकच दुसरे शिपाई काका सूचना वही घेऊन येत म्हणून आम्ही काही मुलांनी चौकशी केली तेव्हा समजले त्यांना काही गंभीर आजर झाला आहे. दुर्दैवाने त्या वयात तेवढी समज नसल्याने आम्ही त्यांना अखेरच्या दिवसात भेटू शकलो नाही. त्या शिपाई काकांची आणि आम्हा मुलांची एक वेगळी दोस्ती झाली होती.

मधल्या सुट्टीची घंटा तेच वाजवत, पितळी घंटेचा लोलक धरून ती घंटा वाजवू लागले की आम्ही पहिलं तर दुरून ते हसतांना एखाद्या देवदूता सारखे भासत. घंटा वाजवण्याचे एक तंत्र असते, दोन ठोक्यात योग्य अंतर नसेल तर नाद मधुर येणार नाही. हे तंत्र त्यांना छान जमले होते.

खेळताना कोणी पडले, कोणाला जखम झाली तर आयोडेक्स, जखमेवर लावायचे आयोडीन, अर्थात लाल औषध त्यांच्याकडे असे आणि बरेचदा स्वतः काळजीपूर्वक लावत. आम्ही त्यांचीच मुले असल्याप्रमाणे वागवत म्हणून आम्हाला त्यांचा लळा होता. एखाद्या वेळेस हे लाल औषध लाऊन थोडे जोराने कण्हले, आई,आई गं केले की टीचर घरी जायला परवानगी देत असत. त्यामुळे या काकांशी आमचा स्नेह होता. धांदरटपणा केल्याने एखादी वस्तू हरवली किंवा विसरलो तरी काका सुरक्षित ठेवत त्यामुळे शिपाई काकांचे अकस्मिक निधन आम्हाला लागले.

कधीकधी शिपाई काका थकलेले असत आणि आमच्या वर्गावर ही सूचना वही देऊन मला म्हणत सर्व वर्गात दाखवून झाली की पुन्हा कार्यालयात परत आणून दे. ती वही दुसऱ्या वर्गात नेऊन देतांनाही झोंबझोंबी होई, नशिबाने ती आमच्या हातून कधी फाटली नाही.ती वही कोणाच्या हातून फाटली असती तर काय रामायण घडले असते ते आठवून पोटात गोळा येतो. ती वही दुसऱ्या वर्गात नेताना खूप आनंद व्हायचा, वाटायचं आपणच कोणी तरी मोठे अधिकारी झालो, त्या निमित्ताने इतर वर्गात फिरून यायला मिळे. मग आमची स्वारी दिमाखात ती वही उंदीर पकडावा तशी दोन बोटात नाचवत वर्गावर्गात फिरे. कधीतरी ती वही उघडून पाहण्याचा मोह होई. त्यात कोण लिहीत असाव हा प्रश्न मनात असे पण कोणी टीचर पाहतील म्हणून ती डेरींग केली नाही.

तेव्हा आमच्या काळात ही सुचना वही फार महत्त्वाची वाटे. या वहिने अनेकदा आम्हाला गोड बातमी देऊन आनंदी केले आहे. त्या आनंदाची फेड करणं शक्य नाही पण त्या आठवणींना उजाळा देण्यात कंजूसी का करावी.

आताच्या विद्यार्थ्यांना त्या सूचना वहीबाबत नक्की काय वाटते? कळायला मार्ग नाही. मुख्य म्हणजे, आज काल सूचना पालकांच्या मोबाईलवर येत असल्याने मुलांपेक्षा पालकच इनव्हाल्व असतात हेच खरे. ज्या दिवशी शाळा नसेल तेव्हा, मुलाला घाईघाईने उठवून तयारी करून द्यायची, त्याचा ब्रेकफास्ट पहायचा, त्याचे मोजे, बुट तयार ठेवायचे या सर्व कामास एक दिवस मम्मी,पप्पांना ब्रेक मिळाला तर मुलाची मॉम किंवा डॅड खूप खुश असतो. शिवाय आजोबांना स्कुल बस पर्यंत पोचवायचे नसेल तर पेपर निवांत वाचता येतो म्हणून ते ही खुश असतात. वर्ग सूचना वही गेली नाही तर तिने कात टाकली आणि ग्रुप मेसेजच्या स्वरूपात ती वावरू लागली इतकेच पण मुलांची गंम्मत मात्र निघून गेली. आमच्या पिढीने या वहीची खरी गंमत अनुभवली.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar