स्त्री जन्मा ही तुझी कहाणी भाग 2
अभयचही तसंच झालं होतं. खाली खेळायला गेला की हाक मारून बोलवल्याशीवाय घरी परतण्याची आठवण नसे. उशीरा येण्याबद्दल रागावल तर म्हणे, “आई शाळंला सुट्टी हाय तरीपण मी इंग्लिशचा अभ्यास करतो. बाकीची पोर त्यो बी करत न्हाई. तो घरात आला की मित्रांबद्दल सांगत बसायचा. बोलता बोलता, त्या ईमारतीखाली दोन तीन कुत्रे असल्याचे त्याने आईला सांगितले. तिने त्या भटक्या कुत्र्यांजवळ जाऊ नको म्हणून त्याला तंबी दिली. तरीही दुसऱ्या दिवशी तो कुत्र्यांसाठी चपाती घेऊन गेला. हळूहळू त्या कुत्र्यांशी त्याची मैत्री झाली. आता रोज मुलं त्याला बोलवायला यायची. तो ही त्यांना गावाकडच्या गंमती जमती सांगायचा. त्याच्या बोलण्याचे, सांगण्याचे मुलांना कुतुहल वाटायचे. त्याच्या बोलण्यात त्याचे कुत्रे, मांजर, खारूताई,
पोपट, साप, फुलपाखरे यांचा उल्लेख असायचा. मांजर शिकार करण्यासाठी दबा धरून कशी बसतात त्याबद्दल तो सांगायचा. कुत्रे रानातून शिकार कशी पकडतात याचा उल्लेख असायचा. त्या मुलांना मोठी गंमत वाटायची.
रविवारी आदर्शने त्यांना सारसबाग दाखवली, पर्वतीवर घेऊन गेला, पेशव्यांची समाधी दाखवली. तिथली भेळ खाऊ घातली. त्या स्टॉलवरचा माणूस त्याच्या वडिलांना साहेब पैसे नका देऊ म्हणाला, ऐकून त्याला आश्चर्य वाटलं. त्यांनी पुस्तकाच्या एका दुकानातून काही वह्या विकत घेतल्या. एका दुकानातुन त्याचा युनिफॉर्म कमी पैशात मिळाला. बसमधून प्रवास करतांना कंडक्टर त्याच्या वडिलांना रामराम करत होते. घरी आल्यावर त्यांनी आईला विचारलं, “सर्व लोक बाबांना रामराम करतात, पैसे घ्यायला नको म्हणतात,अस का? उद्या मी इंस्पेक्टर झालो तर मला पण लोक रामराम करतील का?”
“आरं अभय तुझा बाबा इंस्पेक्टर हाये, त्यानला समदे लोक भितात. त्यानला लय लोक ओळखतात म्हणून रामराम करतात. पण तुझ्या बानं सर्वांना पैसे दिले ते तु बगीटल ना? हरामाचं कोणाच काही घेऊ नये. बाबांच स्वप्न हाये, त्यानला तुला मोठ साहेब बनवायचं हाये त्यासाठी लय शिकाव लागतं, परीक्षा द्यावी लागते. उद्या तू मोठा होऊन पोलीस खात्यात सायेब झालास तर तुलाबी मान मिळल पण कोणाकडून काही फुकट घेऊ नये. गरीबांना लुबाडू नये. तस केल तर आपला मान रहात नाही म्हणूनच तुझा बा कोणाजवळून कधी काही फुकट घेत नाहीत.”
ते ऐकून अभयला आपल्या वडीलांबद्दल अभिमान वाटू लागला. आता आदर्श ड्यूटी संपवून आले की चहापाणी होताच त्याला इंग्रजी पुस्तक वाचायला शिकवत, तिसऱ्या इयत्तेत त्यांची A,B,C,D आणि काही मुळ शब्द झाले होते. तरीही त्याला अक्षर जोडून शब्द वाचतांना खूप अडचण वाटत होती. तो पत्नीला म्हणाला. शिवानी गावी त्याचा अभ्यास घेत होतीस नव्ह मग याला वाचायं का येय ना? पुन्हा गावी जाण्या अदोगर त्याला हे पुस्तक हळूहळू वाचता आलं पाहिजे. ती तुझी जबाबदारी.” ती रागावली,” गावाकडं तुमच्या घरातली काम करायला बाई माणूस ठेवलं होत का? दिसभर काम सरना, दुपारी पाठ टेकवाय मिळल तर शपथ, आता येळ हाय तर घेईन की अभ्यास.”
शिवानी सातारलाच बारावी पर्यंत शिकली होती. लवकर लग्न झाल्यानं तिच शिक्षण अर्धवट राहिलं होत. तस इंग्रजी फार काही येत नव्हतं तरीही आता शिवानी रोज त्याला पुस्तकातील एक एक धडा वाचून दाखवत होती.कठीण शब्द लिहून त्याचे उच्चार लिहून देत होती.तीन रेघांची वही आणली होती.त्यात तो स्पेलींग लिहून प़ाठ करत असे.
“अभ्यास केलास तरच खाली खेळायं जाता येईल” अशी अट घातल्याने तो ही समजुतदारपणे वागत होता.पुण्यात येऊन आठ दहा दिवसच झाले होते.पण त्याने लवकर सुधारणा केली होती. मित्रांमध्ये आता तो बऱ्यापैकी शुद्ध बोलू लागला होता.
इथे आल्यापासून शिवानी टापटीप राहू लागली,आदर्श अधुनमधून तिच्यासाठी मोगरीचा गजरा आणे. अभय लवकर झोपला तर तो तिला आग्रह करे,आता त्याच जवळ येणं वाढल होत. अभय खेळायला गेला असतांना तिने एक दिवस त्याला त्या बद्दल सांगितले,”तुमच हल्ली हे अस जवळ घेण जरा जास्तच वाढलय, इतक्यात आपल्याला दुसर मुल परवडणार नाही, तुम्ही तर काहीच काळजी घेत नाही, मला आता हे नकोस वाटतयं, त्यातून अभय कधीही उठतो, आता तो मोठा झाला आहे. तुम्हाला नसेल पण मला लाज आहे तेव्हा वाटेल तेव्हा यापुढे मला गृहीत धरू नका.”
तो तिच्या बोलण्यावल रागावला,”शिवानी, तु बी कमाल करते अदोगर तुझी महिना महिना भेट होत नव्हती, माझं काय म्हणणं बी नव्हतं पर आता तु घरात असुनबी न्हाय म्हणशील तं काय उपेग!” “म्हंजे बायको फक्त सोबत करायलाच पायजे का? तिला काय हवं,काय नको कंदी विचारलेल आठवत का ? लग्न झालं त्याला आठ वर्ष झाली, काय काय घेऊन दिलत? कुठ कुठ नेवून आणल सांगशीला का? ” “तू काय माझा हिशोब घेतेस वय? न्हाय जमलं, घरच काय कमी केल वयं, विहीरीवर मोटर बशीवली, घरात पाणी घेटल. खर्च काय कमी हायत व्हय. पर आता परवा नेऊन आणलं की. तुला काय बरं वाटत,काय नको ते इचारायला मी तुझ्या विचारानं चालतो की काय? माझी इच्छा होईल तेवा मी तुला जवळ घेणारच, तु कशी नाही म्हणती ते मी बघतोच.” ते ऐकून ती रागावली,”म्हणजे तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करणार आहात का ?तुम्ही पोलीस खात्यात आहात,तुम्हाला अस बोलण शोभत का?” आदर्शच डोक काम करेनास झाल,तिच मनगट धरत तो म्हणाला, “काय चुकल माझं, तू लग्नाची बायको हायेस,तुझ्याकड मागायचं नायतर काय”
“काय बोलताय ते कळतय नव्हं,समजा मी नाय म्हणाली तर काय करणार आहात माझ्याशी? त्याने तिला जवळ ओढत हात पिळला, “शिवानी, मला उगाच तापवू नको माझं डोस्क फिरल त लय वाईट होईल बग”
तीने सोडवून घेण्याचा प्रयत्न केला त्याने हात आणखी घट्ट धरला, तिच्या खांद्यातुन कळ आली,”आई गं ,तुमाला मला मारायचचं हाय ना ,मारा जीव शांत होईस्तोवर मारा. मला वाटलं होत,आपला नवरा पोलीस खात्यात हाय, बरं वाईट काय ते त्याला कळतं ,तर दुसऱ्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याची त्याच्या मानसन्मानाची जाणीव असल. मला वाटल नव्हते की तुमच्या खाकी कपड्याआड एक स्वैराचारी आणि न्युनगंडान पछाडलेला तरूण लपला असल. आतापर्यंत आपल्या मुलासाठी सगळ सहन केल यापुढे नाही.” तीच भाषण ऐकून तो संतापला,त्याने तिच्या कमरेत लात घातली ती विव्हळली. “खर बोलल का झोंबत पण जगाला कळू दे वर्दीतला माणूस पण राक्षस असू शकतो.”
affiliate link
खेळ संपवून अभय आला तेव्हा घरातील शांतता पाहून तो मनातच घाबरला,आज आई बाबाच नक्की भांडण झालेल दिसतयं, “आई ,बाबा आज लवकर घरी आलेत का? आज सगळ शांत शांत का वाटतय?” “काही नाही रे, तू खेळून आलास ना,जा स्वच्छ हात पाय धू ,देवाच म्हण.मग आपण इंग्रजीचा अभ्यास करु.”
हळूहळू दोघांमधला संवाद कमी झाला. तो अधुनमधून जेवणावरून,कपडे स्वच्छ धुतले नाहीत म्हणून तर कधी स्वतःचे घड्याळ,पट्टा, जागेवर सापडत नाही म्हणून मोठ्याने ओरडत बसे.ती शांतपणे त्याच्या वस्तू शोधून देई. अभय बाबाला काही सांगायला गेला तर आदर्श त्याच्यावर डाफरत असे.तिच अभयची समजुत काढी.एवढ सगळ सहन करूनही ती दिवस ढकलत होती.मुलापासून या गोष्टी लपवत होती.
अभय तिला विचारत असे,”आई, हल्ली बाबा असा का वागतो? ना जवळ घेत, ना काही सांगत.त्यांचा सायेब बाबावर रागावलाय काय ?
“बाळा इकडे ये, बाबांना ऑफिसमध्ये भरपूर काम असत ना म्हणून ते तुझ्याशी बोलत नाहीत. मी आहे ना! सांग तुला काय हवं, अभयने काही सांगतील आणि आदर्शच्या ते कानी पडलं की आदर्श ती गोष्ट निमूट दुसऱ्याच दिवशी आणून देई. असे बरेच दिवस गेले.शिवानीला वाटलं नवऱ्याला झाल्या गोष्टीबद्दल पश्चात्ताप झाला असावा, तो चांगला वागत होता.
एक दिवस आदर्श गजरा घेऊन आला, मिठाईचा बॉक्स सोबत होता. अभय नेहमी प्रमाणे खेळायला गेला होता.आदर्श तिच्या मागे उभा रहात म्हणाला,”शिवानी माझी चूक झाली मला मान्य आहे,मी तुझ्याशी असं वागायला नको होत, कधी कधी माझ्यातील पुरुष जागा होतो,त्याला जे हवे ते मिळालेच पाहिजे असे वाटते पण ते चुकीचे आहे हे मला पटलयं. यापुढे मी तुझ्याशी नीट वागेन याची हमी देतो.आज आपल्या लग्नाचा नववा वाढदिवस आहे.आज पासून हा राग,रूसवा सोडून दे. तू सांगशील ते मी ऐकेन.”
शिवानी हसली,” वा आधी लाता घालायच्या आणि मग माफी मागायची, तुम्हा पुरूषांची ही रीत बरी आहे. त्या दिवशी माझं काय चुकलं? हेच सांगत होते ना , तुम्ही आता दहा वर्षांच्या मुलाचे वडील आहात,थोड संयमाने वागा. दिवसा ढवळ्या तुम्ही लहान मुलासारखा हट्ट केलात तर कस चालेल? प्रेम ओरबाडून मिळवण्याची गोष्ट नाही हे का समजून घेत नाही. यापुढे घरात उगाच त्रागा करायचा नाही. अभयच्या वयाचा विचार करा. तो जे प्रश्न विचारतो ते तुमचेही आहेत हे समजून घ्या.”
तो पाठीमागून आला आणि तिला मिठी मारत कानात कुजबुजला, ” होय गं माझे राणी ,तू शहरात येऊन नको तेवढी शहाणी झाली आहेस.मी मात्र गावंढळच राहिलो, यापुढे मी तुझ ऐकेन. तुला तक्रार करायला जागाच ठेवणार नाही. प्लीज आज तरी नाही म्हणू नकोस आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे.”
आता एवढी मनधरणी केल्यावर ती तरी काय म्हणणार, तीने चेहरा स्वच्छ धुतला,पावडर, टिकली लावून तीने स्वतः ला आरशात पाहिले. आपल्या लग्नाचा वाढदिवस लक्षात ठेवून त्याने गजरा आणला त्याचा तिलाही आनंद झाला होता.
affiliate link
ती तयार होत म्हणाली, “चला, पण अभय कधीपण येऊ शकेल हे लक्षात घ्या.”तो हसला तेव्हा तिला त्याच्या तोंडाचा वेगळाच वास आला,ती रागावत म्हणाली,”तुम्ही आज दारू पिऊन आलात.आज लग्नाचा वाढदिवस आणि तुम्ही दारू..” तिचं वाक्य पुर्ण होण्यापूर्वीच त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला. त्याने तिला ओढत पलंगावर नेल आणि तो चक्क दिवसाच तिच्यावर जनावरासारखा तुटून पडला. ती असाहाय्यपणे दारूचा उग्र वास आणि त्याच ते वागणं सहन करत राहिली. दारावर थाप पडली आणि लगोलग अभयची हाक ऐकू आली तेव्हा ती सावध झाली पण तिच्यात उठण्याचे त्राण नव्हते. तो मात्र काहीच घडले नसावे अशा अविर्भावात कपडे ठिकठाक करत खुर्चीत बसला.
ती कशीबशी उठली आणि पलंग निट करून तिने दार उघडले. अंतरवस्स्त्र भिजली होती. नवऱ्याने तिचे लचके तोडत तिला लुटले होते.तिचा तो थकलेला आणि अस्थाव्यस्त चेहरा पाहून अभय घाबरला. “आई काय झालं,तू अशी का दिसतेस?तुला बाबांनी मारल का?”
तिने त्याला जवळ घेतले,”नाही रे पिल्ला, आज मला माझ्या सौभाग्यानेच दगा दिला मी मातीमोल झाले.” “बाबा, तुमी आईला का मारलं? मी गावी गेलो का तुमच नाव आज्जाला सांगणार हाये.तुमच्या सोबत मला नाय ऱ्हायच, तुमी लय वाईट वागता.” आदर्श अभयवर ओरडला, अभय sss जा हातपाय धु, जास्त लाडात येऊ नको, तुझ्या आईला मी मारलं, लय तोंड चालवल तं तुला बी मारीन.” त्या दिवशी तिने जेवण केलच नाही, अंगात त्राण नव्हत, तो बाहेर जाऊन जेऊन आला. येतांना पार्सल घेऊन आला. “अभय यात भाजी, भाकर हाये,आई न तू खाऊन घ्या.” अभय जाग्यावरून हललाच नाही.ती तर हमसून हमसून रडत होती. अभय तिच्या शेजारी बसून रडला असावा,त्याचे डोळेही सुजले होते. आदर्श पुन्हा ओरडला, “अभय! ऐकायला येतय का नाही, ते पार्सल उघड आणि खाऊन घे.”
अभयने लक्षही दिल नाही. आदर्श, ओरडत अभयजवळ आला,”कान फुटलेत का?खा म्हणतो ना,शिवानीने अभयला स्वतः जवळ ओढून घेतल.आदर्शने अभयला मारलेला फटका तिला लागला ,ती कळवळली.
दुसऱ्या दिवशी तो उशीराने उठला, घरात कोणाचीच जाग नव्हती, तो दार उघडून बाहेर पहायला गेला.तेथेही कोणाची जाग नव्हती. त्याने घरात शोध घेतला,चपले पाहिली ,ती जाग्यावर नव्हती. त्याच्या पाया खालची वाळू सरकली. शिवानीने जीव तर दिला नसेल.शेजारी काय विचारणार? कालचा प्रताप शेजारच्या कुटुंबाला नक्कीच कळला असावा. त्यान कशीबशी तयारी केली. रीक्षा करून त्याने एसटी स्टँड गाठला,सकाळची बस जाऊन अर्धा तास झाला होता. पोलीस स्टेशन गाठून कंपलेंट करावी,तर काय सांगणार हा प्रश्न होताच.त्याने पुन्हा आजुबाजूच्या विहिरीवर शोध घेतला,अभयच्या शाळेजवळ,मंदिरात कुठेच त्यांचा ठावठिकाणा नव्हता.
शिवानी आणि अभय सकाळी चोरपावलांनी घराबाहेर पडले. बस स्टँड गाठेपर्यंत तिच्या जीवात जीव नव्हता. तिने रात्री घडलेल्या प्रसंगातील काही भाग वगळून ,तुझे बाबा रात्री दारू पिऊन घरी आले होते आणि काही कारण नसतांना त्यांनी मला मारझोड केली हे सांगितले.आता आपण गावीच जायचं, गावच्या शाळेतच शिकायचे.काही झाले तरी पुन्हा पुण्यात यायच नाही. ते ऐकून अभय खूश झाला. अभय गावी जायला उत्सुक होता.जस पुणं पाठी पडल आणि झाडे झुडपे, शेतीच काम करणारे कामगार दिसू लागले.शेतात काम करणाऱ्या लोकांना तो उगाचच हात हलवून टाटा करत होता.
लवकरच तो त्याच्या हक्काच्या घरी पोचणार होता.टॉमी , जिमी त्याला पाहून किती खुश प्रवासानंतर ते आठवून तो स्वतःशी हसला. चार तासांच्या प्रवाअरंतर गावी पोचले. तिथे थोडी खरेदी करून ते ऑटो पकडून घरी गेले.
त्यांना पाहताच आबांना आश्चर्य वाटलं,”अरे अभय,तुझा बाबा काय पाठी राहीला होय!” “आजोबा,आम्ही दोघंच आलो,बाबा नाही आले.” “कमाल हाय तुमची,तुमाला दोघांना यायला कस जमल? त्यो का नाही आला?” आजी , आजोबांना ओरडली, “अवो, आधी त्यानला घरात तं येउद्या, मग सावकाशीन त्यानला इचारा की काय इचारायच ते.”
अभयला पाहून कुत्रे त्याच्याशी खेळण्यासाठी भुंकू लागले, त्याला आश्चर्य वाटलं अरे पंधरा,वीस दिवसात जीमी आपल्याला विसरला की काय? तो जवळ आला तस त्याच्या लक्षात आलं,आजोबांनी कुत्रे बांधून ठेवले होते.त्यांनी कुत्र्यांची साखळी सोडली तसे कुत्रे अंगावर खेळू लागले. त्याच्या पोटावर पाय देऊन टॉमी उभा राहिला.त्यांनी रागाने एक तडाखा लागवल्यावर कुत्रा दूर पळाला. आई रागावली,”अरे अभय आल्या आल्या कुत्र्यांबरोबर का खेळतोस?आधी कापड बदल.”
आजोबा नातवाची बाजू घेत म्हणाले,”सुनबाई अग किती दिवसांनी त्यांची भेट होत्याय,खेळू दे.” शिवानी रागावून म्हणाली, “आबा तुम्ही कमाल करता जरा नातवाचा शर्ट बघा, कुत्र्यांनी पंजा लावून कसा केला?” आजीनी दोघांना चहा दिला. शिवानीकडे पहात म्हणाली,”आमच्या पोराला तुम्हास्नी सोडाय वेळ नव्हता की काय, तू एकली कशी आली?” “आई, माझा अगदी नाईलाज झाला,म्हणून घर गाठलं.” “अग सुनबाई ,अस इपरीत झाल तरी काय? मारहाण केली की काय त्या काळतोंड्यानं!” “आई, तुमी विचारू नगा ,मी सांगतबी न्हाय,मला सांगाय पण लाज वाटते. झाकली मुठ झाकलीच राहिल तं बरी.”
आजीनी नातवाला जवळ घेऊन चौकशी केली. “पोरा तुझ्या बा च न आईचं काय झालय तुला ठाव हाय का ?” “न्हाय बा,पर काल सांच्याला मी खेळून घरी आल्तो त आई रडत होती, काल बा पिऊन घरी आला होता,माझ्यावर बी कावला. रात्री आम्ही उपाशीच निजलो.सकाळची पयली एसटी पकडून घरला आलो.”
सासूने आग्रह केला म्हणून शिवानीने तिला पुण्यात घडलेल्या घटनेपासून ते रात्री दारू पिऊन घातलेल्या धिंगाण्या विषयी हातच काही न राखता सांगितले.
सासूने ते आबांना सांगितले. आबा भडकले, “येऊ दे की त्याला घरला, लय माज आलाय होय, बाद झवली त्याची पोलीसाची नोकरी, सुनबाईवर हात उचलतो व्हय, ते हातच तोडून टाकतो. च्या मायला आख्खी हयात गेली पर कारभारणीला कंदी हात लावला न्हाई, अन यो पुण्यात नोकरी कराय काय गेला,समदी व्यसन लावून घेटली.” शिवानी आता आश्वस्त झाली. तिला माहिती होत,तिचा नवरा घरा बाहेर पोलीस असला तरी आबांपुढे त्याच काय बी चालत न्हायी.
दुपारी शिवानी सासूबरोबर गप्पा मारत बसली होती.तर अभय बाहेर खेळत होता.आबा नेहमी प्रमाणे त्यांच्या आरामखुर्चीत झोपले होते.आजीने अभयला बोलावून विचारले, “ए पोरा, शहरात काय काय गंमती जमती केल्या काय सांगशीला की न्हाय, अभयने आपल्या नवीन मित्रांची नावे सांगितली, म्हणाला, “आजी तिथे माझे लय मित्र हायेत. आम्ही ईमारतीजवळ असलेल्या कुत्र्यांबरोबर खेळायचो पण ते खूप मस्तीखोर आहेत. सारखे एकमेकांच्या पाठीवर उड्या मारत बसतात.ये आज्जे अस ते का करतात गं?” ती म्हणाली, “आरं ते काही पाळलेले कुत्रे न्हाईत त्यामुळे त्यांना शिस्त नाही, आपले कुत्रे तस करतात का? भटके कुत्रे लय वात्रट कुत्री दिसली की खेळाय जातात अन मंग काय बी करत्यात. त्यो त्यांचा खेळच हाये.”
“हो ,तसच असेल पण मग ते कुत्रीच्या पाठी कुठेही वेड्या सारखे पळत का सुटतात?” “अरे, त्यांनला काय आपल्या सारखी बुद्धी हाय का? कायबी करत्यात झाल.” “अग आज्जी,मी पाहिलयं ना कुत्रा कुत्रीच्या पाठीवर चढून सारख तिला लोटत होता.थोड्या वेळाने ते एकमेकात अडकले होते. सारखे सुटायला धडपडत होते.मग आम्ही दगड मारून त्यांना पळवून लावलं.,”
आजी काय समजायच ते समजली, अरे पोरा तु शाणा हाईस की खुळा आपण त्यानला दगड मारू नये. त्यानला लागलं तर? तस कराय देवच त्यानला इच्छा देतो.” सासू त्याला काय सांगते ते शिवानी ऐकत होती. तो आणखी काही तरी विचारेल म्हणून ती मुलाला ओरडली,”अभय ss, अभय ss आधी इथे ये, बास कर तुझ कुत्रे पुराण. जा स्वच्छ हातपाय धू आणि पर्वचा म्हण.”
सुनेच ऐकून सासू हसली, “बाई,बाई धा ,पंदरा दिवसात शेरातल्या मानसावानी बोलाय लागली.अभय बी तसच बोलाय लागला. शेरात गेल्यावर मानसं बदलत्यात ऐकलं होत ,आज पटलं.”
शिवानी शिकली सवरली होती सासूचे उपरोधिक बोलण ऐकून तिला हसू आलं. वाढणाऱ्या मुलांना समजावण किती कठीण असत ते तिने अनुभवले होते. आदर्श सारखा पोलीस खात्यात काम करणारा जबाबदार माणुस जर श्वापदा प्रमाणे वागत असेल तर घरच्या कुत्र्यांची काय कथा! आदर्शच्या वागण्याचा तिला तिटकारा आला होता.एखाद्या दिवशी अभयने आदर्शचा उद्योग पाहिला असता आणि आठवण झाल्यानंतर आपल्याला विचारल की बाबा रात्री तुला काय करत होते गं, तर आपण काय उत्तर देणार? विचारांच्या तंद्रीत ती वाहवत गेली.तिची तिलाच लाज वाटली. शी, आपणही नको तो विचार झटकून टाकू शकत नाही.”
आदर्श पुण्यावरून गावी आला आणि दुसऱ्या दिवशी तिला उठायला उशीर झाला तर सासूच संशयाने तिच्याकडे पहायची. तिला सारख लाजल्या सारख वाटायचं. दिवेलागणीला रीक्षा येऊन दाराशी थांबली, आदर्श लगबगीने उतरला आणि घराच्या दिशेने आला. दोन्ही कुत्रे जोराने भुकू लागले.तस आबा बाजाला म्हणाले, “एवढ्या सांच्याला कोण आलय बघ र बाजा.” “मालक, धाकले धनी आलेत.”आदर्श घरात पाय ठेवण्यापुर्वीच ओरडला,”शिवानी बाहेर ये,शिवानी बाहेर ये.”
ती येण्यापूर्वीच आबा बाहेर आले,”कशापायी आरडाओरडा चाललया? हे धर्मा पाटलांच घर आहे.” “आबा,मी आदर्श आलोय,शिवानी आणि अभय मला न कळवताच घरातून निघाले आहेत, इथे आलेत का?” “छान ! तुझ्या बरोबर पुण्यात रहायला नेल होत ना,ते काही कारणास्तव इथे निघून आले आणि तुला माहितही नाही. पोलीस खात्यात काम करतो की हमाली करतोस?”
m”आबा माझ ऐकून तर घ्या.” “काय पराक्रम करुन आलायसा तर ऐकून घेऊ, बायकोवर हात उगारायची तुझी हिमंत कशी झाली. उद्या पोरगीन आडात घालून घेटल असत त बापाची गावात शोभा नसती का झाली.” “आबा,थोड चुकल माझं पण ,एक डाव ऐकून त घ्या.” “आरं लेकाच भविष्य सुदराय नेल होत,पण माझ्या सुनेच आविष्य बरबाद कराय उठलास, तिचा बा आला त त्याला काय सांगू,तू माझा पोरच न्हाईस, माझ्या डोळ्याम्होर राहू नग.”
आबा कमालीचे संतापले होते.त्याला काय बोलावं ते सुचेना.
“आबा,मी चुकलो पुन्यांनदा न्हाई अस होणारं, मी शिवानीची माफी मागतो.” “आर माफी मागण्यापरास, माणसा सारखा वागं, आता ती कंदी बी पुण्यात न्हाईच याची, माझ्या नातवालाबी होस्टेलवर ठेवून शिकवन पण तुझ्या दारावर तो बी न्हाई याचा.” आदर्शने आबांची माफी मागीतली पण जो व्यवहार त्यांनी शिवानीशी केला होता,ती प्रचंड संतापली होती. खर तर ती पोलीस कंप्लेंट करणार होती केवळ आबा म्हणाले म्हणून ती शांत राहिली. आदर्शने शिवानीची माफी मागीतली पण आता दोघांचा प्रवास विरुद्ध टोकाला सुरु झाला होता.
अभयने तिची खूप समजूत घातली पण शिवानीने पुण्याला यायला नकार दिला . अभयला ग्रामीण भागात शिकवून ती मोठ करण्याचा तिने निश्चय केला होता.
क्रमशः