स्त्री जन्मा ही तुझी कहाणी भाग 3

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी भाग 3

भाग १ भाग २ येथे वाचा

मुला बापाचं कडाक्याच भांडण झालं. आदर्श म्हणाला, “शिवानीला पुण्यात न्हाय पाठवलं त पुन्हा घरला येणार न्हाई, मग रहा ऐकलेच बोंबलत.” आबा शांतपणे म्हणाले, ” शिवानी एकलीच घरला आली तेवाच मी समजलो. तु जो काय पराक्रम केलेला हाईस तो सुनबाईच्या जिव्हारी लागलेला हाये. नशीब तिन पोलीसात जाऊन तुझी तक्रार न्हाय केली. न्हाय तं नोकरीबी गेली असती.” “आबा जरा इचार करा, मी एकला गेलो तर लोक मला हसत्याल, नाव ठेवत्याल, तोंड दाखवाय जागा राहणार नाय.” “मंग मी काय करु? पुन्यांनदा त्या गरीब पोरगीला तुझ्या हातचा मार खाय पाठवू काय? लोकाची ठेव हाय ती. उद्या साहेबराव पवार आले तं मलाबी तोंड दाखवाय नगं” “मग मी काय करू म्हंता, मांडलेला संसार मोडून घरला आणू काय?”

“ते मला गा का इचारतो, तुच काय ते ठरीव, आता ती पुण्यात यायची न्हाय हे पक्क. तुज्या भैनीला बोलवून तुझे प्रताप सांगतो म्हणजे तिचा भाऊ किती गुणाचा हाये ते तिलाबी कळू दे.” दोन दिवस तो घरी होता पण त्याचा आईनेही मध्यस्ती करायच नाकारलं, त्याने शिवानीला वाईट वागणूक देऊन स्त्रीतत्वाचा अपमान केला होता. शिवानीने त्याच तोंडही पाहिलं नाही इतका धक्का तिला बसला होता. अभयसुद्धा बापाकडे जाईना. वाईट कर्माच फळ भोगावच लागत. तिसऱ्या दिवशी तो आबांना म्हणाला, “आबा माझा संसार तुमी मोडला, हे बरं न्हाई केलं “

आजुबाजूच्या बायकांना शिवानी परत आली म्हणून उगाचच चर्चेला विषय मिळाला. त्या आडुन आडुन चौकशी करत होत्या, सासूने नातवाला तिथली हवा पाळत नाही सांगून गप्प केलं. प्रत्येक बाई येताजाता लक्ष ठेवून बजा किंवा त्याच्या बायकोला विचारून पहात. शिवानी कोल्हापूरला आल्यापासून अस्वस्थ होती, तिने केलं ते चुक की बरोबर हेच तिला कळत नव्हते. तिची तब्बेत मात्र दिवसेंदिवस ढासळत होती. “पोरी आदर्शचा विचार डोक्यातून काढून टाक, समज तुझ लगीन झालच नव्हत”, आबांनी तिला खूप समजवाले. मात्र ज्याच्याशी आठदहा वर्षे संसार केला त्यानेच अस वागावं याने तिला मानसिक धक्का बसला होता.





दिवसेंदिवस ती अबोल झाली. सकाळी घरातील काम उरकली की एकांतात बसून रहायची. कधीकधी वेणीफणी करण्याची शुध्दही नसायची. तिची दशा पाहून सासू रागावली, “त्या काळतोंड्यासाठी तू दुःख कायला करून घेते. त्याला विसरून जा, आमी तुला एकली पडू देणार न्हाई. तू काळजी करू नग, तुझी काळजी आता देवाला.” “आई ,माझी काय वो चुक झाली, त्यानला अशी दुर्बुद्धी कशी झाली? मी तुम्हास्नी न्हाय बोलले, पुण्यात एक बाई हाय, तिच्याकडं ते जेवाय जातात, ते तिला आत्या,आत्या म्हंतात पण त्यांच वागण काय खरं न्हाई. मला तं तिचाच संशय येतो. तिनच मेलीन माझा संसार उस्कटला, मेलीच वाट्टोळ होईल.”

दिवस सरत होते. मे महिना सरत आला, तस शिवानीला अभयच्या शिक्षणाची काळजी वाटू लागली, गावाकडं आल्यापासून अभय हुंदडण्या पेक्षा कायबी करत नव्हता. शेवटी शिवानीच त्याच्यावर कावली. “बाप तसा छळतोय अन तू असा, म्होर शाळा शिकायची हाय का वावरात काम करांच ठरविलया?” आबांनी ते ऐकल आणि म्हणाले,” पोरी अभयची काळजी नग करू, आजुबाजुची पोरं खेळत्यात तो एकला अभ्यासाला बसल व्हयं, आठ दिसांनी मी तालुक्याला जाणार हायं, त्याच्या शिक्षणाची सोय करूनच माघारी फिरणार.”

आबांनी कोल्हापूर गाठून तेथील भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थेत नातवाचा प्रवेश यापूर्वी नक्की केला. शाळेत विद्यार्थी होस्टेल असल्याने वेगळी सोय करावी लागली नाही. पाचव्या इयत्तेतील मुलाला वेगळ्या शहरात एकटं ठेवण म्हणजे शिवानीसाठी आव्हान होते पण आता माघार घेऊन चालणार नव्हती. शाळा सुरु होण्यापूर्वी तिने त्याचा अभ्यास स्वतः घेण्याचे ठरवले.

जुनी पुस्तके आणून तिने अभयचा अभ्यास सुरु केला. अभयचे मित्र खेळत असतांना अभयला अभ्यासाला बसवणे आव्हानच होते. पण शिवानीने कंबर कसली होती. आता, घरातील कामे आवरून ती वेळ मिळेल तसा त्याचा अभ्यास घेई. गणित, विज्ञान आणि इंग्रजी यावर लक्ष देणे गरजेचे होते. शिवानी शिकली त्याला बरीच वर्ष झाल्याने अभ्यासक्रम बदलला होता. बऱ्याच गोष्टी ती पहील्यांदा वाचत होती. अभयने धडा वाचायला घेतला की त्याला प्रत्येक गोष्टीचा खुलासा लागे. प्रत्येक शब्दागणिक शंका असे. गणित विषय सुरू केला की तो कंटाळा करत असे.

विज्ञान शिकवतांना, एक दिवस प्राणी आणि वनस्पती यांच्यातील फरक लिहीतांना पुनरूत्पादन हा शब्द आला तेव्हा अभयने त्या विषयी तिला विचारले. “आई, पुनरुत्पादन म्हंजे काय गं?” त्याला कस काय समजवायचं ते न समजून तिची छाती दडपून गेली होती,पण तिने धिराने त्याला सांगितले, “हे बघ अभय, आपली मांजरी पिल्ल घालते, म्हैस रेडकु देते,देते की नैय. म्हंजे म्हशीला म्हशीच रेडकू, गाईला वासरु, मांजरीला दुसर मांजर आणि कुत्रीला कुत्र्याच पिल्लु होतं. झाडाच्या बी पासून नवीन झाड तयार होते, फांदी मातीत लावली तरी रूजते म्हणजे नवीन प्राणी किंवा वनस्पती निर्माण होतो, कळल का? यालाच शास्त्रीय भाषेत पुनरूत्पादन म्हणतात.” शिवानी पुस्तकात वाचून स्पष्टीकरण करतांना व्यवहारी उदाहरण देत असे त्यामुळे अभयला शिकायला मजा येत होती. तो झोपेतही अभ्यासाच काही बाही बडबडत बसे. एक दिवस तो म्हणाला कोंबडीच पिल्लू अंड्यातून भाहीर येत तस कुत्री, मांजरीच येत का? आजोबा सांगतात पिल्लं पोटातून बाहेर येतात. पण पिल्लू पोटातून बाहेर येतांना मी तरी नाही बगीतल म्हणून तुला इचारतो.” ती म्हणाली,” पिल्लाचा जनम कसा होतो कळायला तू थोडा न्हान हाईस , दमान घे, मोठा झालास की तुला खर काय ते कळल.” “पण तुच तर म्हणतेस नेहमी खरं बोलाव मग तुला खर सांगायला तुज काय जातयं, म्हैस रेडकू तोंडातून टाकती का?” ती त्याच्या अचरट प्रश्नांला कंटाळली, “लय शाणा बनू नको, जा खेळायला. काय बी इचारतो. मोठा झालास की आपणच कळलं म्हटलं तरी उगाच म्होर म्होरं इचारत बसतो.”
त्याच समाधान झाल नाही की तो तटुन बसे, “आज्जा म्हणतो आता आपली राणीम्हस गाबणी है, ती आता व्यायला आली की वासरू कस जन्माला येत तो मला दाखिवणार हाये.”



affiliate link

त्याने कोबंडा कोंबडीवर बसताना पाहिला होता, कावळा,चिमणी यांनाही तसे बसतांना पाहिले होते.घरातील कोंबडीच्या अंड्यातुन पिल्ले बाहेर येतांना त्याने पाहिली होती. म्हणून त्याच्या प्रश्नांची उत्तरे देणे शिवानीला अवघड झाले होत. थातुरमातुर सांगून त्याला गोंधळात टाकणे तिला योग्य वाटत नव्हते. कळेना या मुलाचं करायच काय? पिल्लाचा जन्म अंड्यातून होतांना त्यांनी पाहिला होता, म्हणुनच त्याचा मोठ्या प्राण्यांचा जन्म कसा होता हे जाणून घ्यायचा आग्रह दिसत होता. त्याची जिज्ञासा त्याला शांत बसू देत नव्हती.

अभयच्या शेजारचे काकांजवळ मोठा रेडा होता, तो खरतर म्हशींसाठी त्यांनी पाळला होता. काही गावकरी आपली म्हैस घेऊन त्यांच्या घरी येत आणि म्हैस फळली की दोनशे रूपये देऊन आनंदाने निघून जात. पण नंतर तो कुणाला आवरेना म्हणून त्यांनी त्याच्या मुसक्या बांधून त्याला बडवले.अभयने हा प्रसंग पाहिला आणि तो दुःखी झाला. शिवानीने कशीबशी त्याची समजूत घातली. डोळ्यांना दिसेल त्या प्रत्येक गोष्टीच त्याला स्पष्टीकरण हवं असे.

हा प्रसंग घडला नेमक त्याच दिवशी घरातली म्हैस व्यायला आली. शिवानीला ते समजलं तेव्हा तिने सासरे नको नको म्हणत असतांना पिल्लू कसा जन्म घेत ते दाखवायच ठरवलं. म्हैस वित असतांना अभयला ते दृष्य दुरून दाखवलं. म्हैस,थयथया नाचत होती,जोरजोराने ओरडत होती. आजी त्या म्हशीच्या तोडांवरुन हात फिरवत होती आणि अधुनमधून पेंडीचा तुकडा तोंडाकडे धरत होती. अभय म्हणाला, “आई, तिकडे बघ, म्हशीच्या शेपटीकडुं पिल्लू बाहेर येतय. तिला बिचारीला खूप वेदना होत आहेत.” अभय शिवानीशी बोलत असतांना, अचानक अभयला काहीतरी झालं आणि तिच्या हातातून तो निसटला आणि जमिनीवर पडला. तिने त्याला काखेत हात घालून उचललं आणि घरात आणून निजवलं.

कपाळावर तेल घालून त्याला थोपटले आणि त्याच्या बाजूला बसुन राहिली. ते पाहताच सासू तिच्यावर रागावली, “अग त्या एवढ्याशा पोराला असला प्रसंग कोणी दाखविते का? तुज त बाई डोस्कच बिघडलया, त्या पोराला काय झालं, त आदर्श तुला घरा बाहेर काडल हे निट ध्यानात घे. पुण्यात जाऊन लय शाणी झाली गं तू.”

“आई रोज तो मला विचारायचा, प्राण्यांचा जन्म कसा होतो? आबालाबी विचारल होत, काय सांगणार? म्हणून दाखवाव लागलं, एवढ्याशा मुलाला दाखवायला माझ काय डोक फिरलय का? पण हट्ट कराय लागला तं काय करू? कितींदा मारू तुमीच सांगा.” सासूकडे तिच्या प्रश्नाचे उत्तर नव्हते. सासूने त्याला उठवायचा प्रयत्न केला,”ये पोरा, उठ राणीच वासरू तुला बोलवाय आलं बग.” त्याने डोळे किलकिले करून पाहिलं,”आजी मला झोपू दे ना, मला त्या वासराची लय भिती वाटते, ते मरणार न्हाई ना,?”
“त्याला काय बी झाल नाय बग ,एकदम झ्याक आहे,चल उठ ते तुला बोलावते.” त़ो धडपडत उठला, आजोबा वासराला गरम पाण्यांने धुत होते. वासरु आजोबांचा हात चाटत होत. म्हस मात्र वासराला चाटत होती. त्याला मोठी गंमत वाटली.

“आई आपल्या राणी म्हशीला लय त्रास झाला असलं ना, विव्हळत होती. आपली आजी बी लय रडली. वासरू बघ कस उड्या मारतंय, आई मी जन्म होतांना तुला बी असाच त्रास झाला असलं ना? कसा गं सहन केला तु ? मला समद कळलय म्हशीच वासरू कुठून आलं ते. म्हणजे आपल्या मांजरीलाबी अशीच पोर होत असणार? म्हंजे सर्व प्राण्यांचा जन्म होतांना त्यांच्या आयांना लय त्रास होत असणार , खर ना?” तिच्या डोळ्याला धार लागली होती. तीने त्याला मांडीवर घालून थोपटलं”, होय माझ्या राजा, प्रत्येक आईला बाळाला जन्म देतांना असाच त्रास सहन करावा लागतो. तुला ते पाहूनच चक्कर आली तर जिला भोगावे लागते तिची अवस्था कशी असेल?” तो गोठ्यात गेला, तर म्हस आपल्या पोराला चाटत होती. स्वतःच दुःख विसरून नवजात बालकाच कौतुक करत होती.आपली आईपण अशीच प्रेमळ आहे, हे त्याच्या लक्षात आलं. एखाद्या गोष्टीचा अर्थ सांगण किती अवघड असते ते त्याला कळलं. तो घरात आला तर शिवानी रडत होती. त्याने तिचे डोळे पुसले, “आई नको ना रडू तुला आजोबा ,आजी रागावली ना. मीच हट्ट धरला होता म्हणून तू दाखवलं, मी आज्जाला सांगतो, आयची काय बी चुक नाय.” तो ते सांगायला आजोबांच्या शोधात पळाला.

म्हशीच्या वासराचा जन्म होताना तिने अभयला दाखवलं,ते योग्य केलं की अयोग्य हेच कळेना. एवढ्याशा मुलाला म्हशीची ती अवस्था आणि रक्तबंबाळ झालेला तो भाग पाहून काय झाल असेल त्याची कल्पना ती करू शकत होती. खर तर तो फार मोठा वेडेपणा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आजीने त्याला खरवस दिला, “घे पोरा,पोटभर खा, आता शेरात गेलास तर तुझा बा काय मुद्दाम विकत आणून खाया घालील काय? “आज्जी,मी अजिबात शहरात जाणार नाही, मग मी नाही शिकलो तरी चालेल.बाबा फार दुष्ट आहेत. आईची कायपण चूक नसतांना बाबा तिच्याशी वाईट वागले, तिला मारल.तू मला शहरात पाठवशील तर मी तुझ्याशी बोलणारच नाही. मला नको तुझा खरवस.” “बरं,तुला शहरात नाय जाचं ना, नको जावं पण बापाला दुष्ट म्हणू नये, देव पाप करतो.” “बाबा दुष्टच आहेत, त्यांनी आईला मारल, आन माझ्यावर बी हात उगारला, आईन मला जवळ घेतल तं तिच्या हातावर फटका बसला. बा मला नाय आवडत. मला खरवस बी नको, राणी म्हशीला लय त्रास झाला आणि आपण तिच चिकदूध लय चवीन खातो.”
“अरं पोरा, त्रास तं तुझ्या जन्मावेळेस तुझ्या आईला पण झाला, तरी बी तु तिच्या अंगावर पित होता की,तस नसतय ते. भोग कोणला चुकलेत काय? वेड्यागत करू नये.तुझ्या राणी म्हशीला ती बग पेज शिजतीया ती घालायची हाय. घालशीला ना? चल हट्ट करू नये बाळा.” बरच समजावल आणि खरवस भरवला तेव्हा कुठे अभयने तो खाल्ला.





शिवानी हल्ली प्रत्येक गोष्टीचा विचार करू लागली होती. विवाह झाल्यानंतर एकमेकांच्या संमतीशिवाय आणि एकमेकांना समजून घेऊन पती पत्नी जवळ आले तर संबधात आनंद मिळत असेलही पण जेव्हा विवाहित जोडप्यात अनैच्छिक लैंगिक संबंध येतो तेव्हा महिलेला यातनेशीवाय काहिच मिळत नाही. महिला किंवा पुरुष यांना एकत्र येण्यासाठी आधी मनोमिलन झाल तरच प्रणय आणि लैंगिक संबंध आनंदायी ठरेल. दोघांपैकी एकाची संबंध ठेवण्याची इच्छा नसतांना केवळ पती पत्नी म्हणून दोघ जवळ आले तर त्यातून ना आनंद मिळेल ना सुख. आदर्शने नवरा असल्याचा अधिकार गाजवण्याऐवजी मद्याच्या आहारी न जाता वाढदिवस म्हणून जवळ घेतले असते तर आज ही पाळी आली नसती.

जेव्हा स्त्रीच्या मनाविरुद्ध जुलमाने पुरूष किंवा पशूपक्षातुल्य नर सुख मिळवतो तेव्हा नेहमीचीच क्रिया असुनही दुःख होते. माणूस ते व्यक्त करतो पण प्राण्यांच काय? स्त्री तिची इच्छा नसेल तर संबंध नाकारू शकते तसे प्राणी असा संबंध नाकरू शकत असेल काय? इतर प्राणी जवळ येऊन लैंगिक संबधानंतर जसा अनिच्छेने नवीन जीव जन्माला येतो तसच माणसांच्या बाबतीत घडू लागल तर लग्नसंस्था किंवा गृहसंस्कार राहील का?

विचाराने तिच मन पोखरत होत. त्या दिवशी तो केवळ हक्क म्हणून जबरदस्तीने जवळ घेऊ पहात होता तेव्हा आदर्शच्या मिठीतही तिला सुरक्षित वाटलं नव्हतं. ज्या क्रियेने स्त्रीला गर्भारपणाच्या यातना बराच काळ सहन कराव्या लागतात. आपल्या नैसर्गिक वागण्याला मुरड घालावी लागते. मुख्य म्हणजे हे भोग पाठी लावणारा या यातनात नामानिराळा असतो. केवळ लोक म्हणतात म्हणून याला आनंद सोहळा म्हणता येईल का? मनस्थितीत आणि शरीर साथ देत नसताना सासू किंवा घरातील इतर महिला सांगतात म्हणून डोहाळे जेवणाचा घाट घालणे किती योग्य? स्त्री ने सातव्या महिन्यात केवळ रितीरिवाज म्हणून सातव्या महिन्यात ,शरीराच्या अवघड अवस्थेत ओटीभरण्याच्या कार्यक्रमास होकार का द्यावा. नवऱ्याने किंवा घरातील इतर जेष्ठ महिलांनी स्त्रीला गर्भ लिंग तपासणी करण्याचा आग्रह का धरावा.अनंत प्रश्न तिच्या भोवती फेर धरून नाचत होते. या प्रवासातून ती गेली होती.जो पर्यंत त्यातून आनंद मिळत होता, तिने या गोष्टीचा एवढ्या टोकाचा विचार केला नव्हता. पण आदर्शने नशेत ते घाणेरडं कृत्य केलं आणि तिला घृणा वाटू लागली.केवळ अभयकडे पाहून ती स्वतःला समजावत होती. जीवनात बरे वाईट प्रसंग आले तरी स्त्रीला धीराने तोंड द्यावेच लागते. तिच्यातील मायेचा ओलावा हा न दिसणाऱ्या झऱ्या प्रमाणे असतो.शिवानी ही असाच निर्झर होती जी आपल्या मुलांसाठी विचारांचा वारसा घेऊन जगत होती.अर्थात सासूसासरे यांची खंबीर साथ नसती तर तिला माहेर गाठावे लागले असते. इतका मोठा धक्का पचवून तिने माहेरी यातील कोणतीच घटना कळवली नव्हती कारण आबा पाटील यांची ती सून नव्हती तर मानस कन्या होती. त्यांची अब्रू हीच तिची अब्रू होती.

जिथपासुन हा प्रसंग अभयने पाहिला तो हळवा झाला, योगायोगाने त्यांची मांजरी तेव्हाच व्यायली, तिने चार पिल्ले घराबाहेर पडवीत घातली. दातात धरुन तीने पिल्लं आणली तेव्हा तो आईला म्हणाला,”आई बघ आपल्या,सगुणेन चार पिल्ले आणली.” ती इवलीशी पोर,दुधासाठी ओरडत होती, अजूनही त्यांचे डोळे उघडले नव्हते. अभय त्या पिल्लाला मांजरीच्या अंगावर दुध पिण्यासाठी लोटणार होता तेव्हा शिवानी म्हणाली, “ये पोरा त्यांना हात नाही लावायचा, नाहीतर मांजर त्यांना जवळ नाही घेणार.” “आई,म्हैशीला एकच रेडक झाल. मांजरीला तुला कस म्हाईती ,मांजरी अस वागती ते? “आर ! या गोष्टी हळूहळू पाहून समजतात,सगळ उगाचच कोणाला विचारायचं नाही. वेळ आपल्याला आपोआप शिकविते. मागे राणीनं वासराला जन्म दिला पाहीला का नाही अगदी तसंच.” अभयने तिला घट्ट धरलं, “आई तु फार चांगल समजावते.”

अभयला प्रसंगाने मोठं केलं. तो आता शहाण्यासारख वागू लागला. उगाच भलत्या शंका विचारत नाही आणि असले प्रसंग आले तर मुलांबरोबर थांबतही नाही. आता तो मोठा होत आहे. प्रसंगाने त्याला अकाली प्रौढ केलं आहे.कधीतरी त्याला वडिलांची आठवण यायची. ती म्हणायची, बाळा कधीतरी त्यांना नक्की समज येईल,आपली चुक समजेल आणि ते पुन्हा घरी येतील.

दारावरून कोणतही वाहन गेलं तर, तिला आदर्शची आठवण यायची, लग्न झालं तेव्हा तेव्हा तो भरल्या अंगाचा रूबाबदार गडी होता. पोलीस कट केसांमध्ये सैन्यात असलेल्या जवानाप्रमाणे दिसायचा. दर महिन्याच्या सात आठ तारखेला न चुकता येऊन दोन दिवस राहून जायचा. त्या दोन दिवसात ती त्याच जमेल ते सर्व करायची.आणलेले कपडे धुवून ठेवण, त्याच्यासाठी ठेचा, चटणी तयार करण, त्याच्या जवळून शहराची माहिती घेण.त्याला समोर बसून पोटभर जेवू घालण आणि रात्रीला मोठा तांब्याभर दूध हट्टान प्यायला लावणं. हे अस ती गेले आठ वर्षे करत होती. सुट्टीचे दोन दिवस पाखरा सारखे उडून जात. पुन्हा राखण लागे, दुसऱ्या महिन्याची आठ दहा तारीख येईस्तोवर मनात स्वप्नांच वादळ घोघावत राही. काय ग्रहदशा फिरली अन
शहरात गेली. स्वप्न पुर होण्याआत दैवानच मात दिली. गेले दोन वर्ष वाट बघून बी तो न्हाईच आला. पोटच्या पोरासाठीच मनावर दगड ठेवून ती दिवस घालवत होती.





गेले दोन वर्ष अभय तालुक्याच्या वसतिगृहात राहतो आहे. शिवानी दर पंधरा दिवसांनी त्याला भेटायला जाते. जातांना त्याला आवडतील त्या वस्तू घेऊन जाते. इतरांचे आई बाप भेटायला आलेले बघीतले की तिचे डोळे भरून येतात. अभयचे शाळेत कौतुक होते पण त्याचे वडील शाळेत कधीच भेटायला येत नाहीत याबद्दल सर्वांना आश्चर्य वाटत. तिला नाईलाजाने खोटं सांगाव लागतं, ते सैन्यात असुन वर्ष दोन वर्षांनीच येतात. अभयला इतरांच्या आधीच सर्व कळतं. जेव्हा त्याला शाळेतून बक्षीस मिळत तेव्हा त्याला आपल्याला बापाची माया मिळाली नाही याच दुःख होत. मात्र आबा मुलाची आठवणही काढत नाहीत, कदाचित ते तिच्या नकळत आपल दुःख जड मनान पचवत असावेत. नवरा हयात असुनही ज्यांच्या वाट्याला सुख येत नाही त्याचं ती प्रतिनिधित्व करते पण ती बाहेरून खंबीर आहे कारण तिचं दुसर स्वप्न आकार घेत आहे.

अभय आईवर अतिशय प्रेम करतो. तो हळवा आहे. आपल्या आईला दुःख देणाऱ्या वडिलांचा त्याला राग आहे म्हणून तो कधीही आपल्या वडिलांचा उल्लेख करत नाही. प्राण्यांवर तो जास्त प्रेम करतो. आपल्याला काय होत ते प्राण्यांना सांगता येत नाही. म्हणूनच त्यांच्या भावना समजून घ्याव्यात अस त्याला वाटतं आणि त्याला ते जमत सुध्दा. त्याला त्यांची न बोलली जाणारी भाषा कळते सुध्दा. त्याच्या ह्रदयात एक हळवी आई वास्तव्य करत आहे.

“ती” माणसाची असो की प्राण्यांची, तिच्या पाठी दैवाने जास्त भोग लावले आहेत. जास्त दुःख दिलं आहे. हेच दुःख अन्य कोणाच्या वाट्याला येऊ नये म्हणून ती सावधपणे माया करते. पक्षीणी आपल्या पिल्लांना दुरवरून आणून दाणे भरवते, हरीणी प्रसंगी अन्य श्वापदाच भक्ष होते पण आपल्या पाडसाला वाचवते. गाय ,म्हैस आपल्या वासरासाठी पान्हा चोरून ठेवते. “ती” आपले भोग कोणालाही दोष न लावता भोगते. कोणाला न दुखवता जगते. पक्षी असो की प्राणी त्यातील स्त्री लींगी सभासद हा कुटुंबातील सदस्यांची जास्त काळजी घेतो हेच वास्तव आहे. खर तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीनी स्त्रीला समजून घेतल तर तिच जगण सुसह्य होईल. अभयला आईच दुःख कळल आहे, इतरांना ते कळाव हाच त्याचा आग्रह, ती आपल्या कुटुंबासाठी शंभर टक्के योगदान देऊनही तिला कुटुंबात आणि समाजात मानाच स्थान दिले जात नाही. हिच वास्तव शोकांतिका. अगदी सुशिक्षित कुटुंबातील स्त्री सुध्दा आजही मुक्त नाही. काही स्त्रिया आपल दुःख चेहऱ्याआड लपवतात तर काही दुःखात वाहून जातात. शिवानी दुःख पचवून मुलासाठी खंबीरपणे उभी आहे.

भाग १ भाग २ येथे वाचा.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar