हे ही दिवस जातील
राजू तावातावाने गोपाळरावांशी बोलत होता, “बाबा, काय दिलत तुम्ही आम्हाला? कॉलेजला असतांना फक्त एक मोटरसायकल मागत होतो, ती ही तुम्हाला घेऊन देता आली नाही. आम्ही तुमच्याकडे कधी काही मागीतलच नाही. आज दहावी, बारावीच्या मुलांना त्यांचे बाबा चांगले रिस्टवॉच, रिबॉक शुज आणि मोटार सायकल सहज घेऊन देतातच पण त्यांच्या जवळचा मोबाईल सुद्धा तितकाच किमती असतो. ‘फक्त मुलं जन्मला घातली म्हणून काही कुणी बाप होत नाही! त्यांच्या गरजा काय आहेत, ते न सांगता ओळखता आलं पाहिजे बापाला. आता आम्ही स्वतःच्या पैशांनी वस्तू घेतो तरी तुमच्या डोळ्यात येतात . आम्हाला काही स्वातंत्र्य आहे की नाही. फाटक्या चपला घालून आम्ही ऑफिसमध्ये जावं का? “
मी त्यांच्याच वरती रहात असल्याने मला सगळं स्पष्ट ऐकू येत होते. राजू आपल्या जन्मदात्याशी असं बोलेल अस मला स्वप्नातही वाटले नव्हते. पण त्याच्या बोलण्यात अतिशयोक्ती नव्हती. मी पाहत होतो आमच्या शेजारी राहणाऱ्या फलटणकरच्या नुकत्याच कॉलेजला जाऊ लागललेल्या रोशनकडे ब्रँडेड कपडे, शुज, रिस्ट वॉच आणि बाईक तर होतीच पण त्यांच्या पाठीवर असणारी सॅक सुद्धा ब्रँडेड होती. त्याच्याकडे मोबाईल कसला होता तो मात्र मी पाहिला नव्हता. मुलगा इतक टोकाचं बोलला तरी गोपाळरावांनी मुलाला काहीच उत्तर दिलं नाही. त्यांच्या शिकण्याच्या वयात त्यांच्यावर आपण खरंच अन्याय केला आहे असे त्यांनाही कदाचित वाटत असावे.
राजू हा लहानपणापासून चुणचुणीत आणि हरहुन्नरी मुलगा होता, शाळेत तो नेहमीच पहिल्या पाच विद्यार्थ्यात असे, स्वतःचे प्रोग्रास कार्ड घेऊन मला दाखवायला घेऊन येई आणि शाबासकी घेऊन जाई. आमची ‘ही’ नेहमी त्याच्या हातावर काही तरी गोड घालत असे, कधीतरी काहीच नसले तर गुळाचा खडा हा ठरलेला असे. तो आमच्या घरी शाळेतील बक्षीस दाखवायला आला की नेहमी माझ्या आणि सौच्या पाया पडत असे. आम्हाला त्याचे कौतुक वाटत आले होते. घरात तसेच संस्कार होते म्हणूनच तो तसं वागत होता. आमची मुलेही इतकीच हुशार व्हावी असेच तेव्हा वाटत असे.
गोपाळरावांना त्याच्या हुशारीचे कौतुक तर होतेच म्हणून त्यांनी वेळोवेळी आपल्या फंडातून कर्ज काढून त्याच्या शिक्षणात कधीच काही कमी पडू दिले नव्हते. त्यानेही वडीलांच्या श्रमाचे चिज केले. शिष्यवृत्ती मिळवून त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केले आणि कँपस् इंटरव्ह्यूमध्येच त्याला जॉब मिळाला. गोपळरावांनी तेव्हा स्वतः आपल्या हाताने चाळीत पेढे वाटले. बहुधा आमच्या चाळीतील तो पहिला डिग्री इंजिनिअर म्हणून चाळीत राजूचा सर्वांनाच अभिमान होता.
पण काल राजूची ती मुक्ताफळ ऐकून मला मात्र धक्का बसला कारण गोपळरावांची आर्थिक स्थिती बेतास बात अशीच होती. तरीही त्यांनी राजूला इंजिनिअरींग शिकू दिले. ते एका खाजगी कंपनीत वर्कर होते. दोन मुली आणि राजू, वयस्कर आई वडील एवढ्या माणसांची जबाबदारी एकट्यावर होती. कस भागवणार बिचारे? तरीही त्यांनी राजूची गैरसोय होऊ दिली नव्हती. इतकेच काय दोन्ही मुलींची वेळेत लग्न करून दिली. त्यामुळे राजूवर कौणतीच कौटुंबिक जबाबदारी नव्हती. गोपाळरावांचा कंपनीचा फंड तो कशा कशाला पुरणार?
जवळपास राजूपेक्षा दोन चार वर्षे लहान दोन मुले मलाही होती. एक शिकून नोकरी करत होता तर दुसरा शेवटच्या वर्षाला होता. अद्याप तरी मुल मला काही कधी बोलली नव्हती पण राजूच्या बोलण्यातून मी मात्र धडा घेतला, एकदा मुल कमाऊ लागली की मुलांनी कसलीही खरेदी केली तरी आपण विरोध करायचा नाही. कधीतरी मुलं हेच शब्द आपल्या तोंडावर फेकून मारतील आणि आपली शोभा होईल,असे तेव्हा तरी मला वाटले.
चार पाच दिवसांनी गोपळराव एकटेच वाटेत दिसले तेव्हा मी त्यांची चौकशी करता करता, त्या दिवशी घडलेल्या प्रकाराबाबत घाबरत घाबरतच विचारले तर म्हणाले, “जाऊ दे रे विनायक, त्यात एवढं लक्षात ठेवण्यासारखं काही नाही. असे तर अधूनमधून नेहमीच घडते. खरे तर मीच त्या दिवशी करायची नव्हती ती चूक केली होती. गॅलरी झाडताना, तेथे ठेवलेल्या चपलांच्या स्टँडबाहेर अस्थाव्यस्त पडलेले अनेक शुज, सँडल स्टँडवर आवरून लावताना, ‘किती चपला विकत घेतल्या म्हणजे ह्या पोरांचे समाधान होईल?’ असे स्वतःशी सहजच म्हणालो. बहुदा राजूचे त्या दिवशी काही बिनसले असावे, त्याने ते ऐकले आणि त्याचा तिळपापड झाला. अन्यथा तो फारसे कुणाशी बोलत नाही.”
“अमेझॉन वर अधूनमधून सेल लागतो तेव्हा ते शुज स्वस्त मिळाले आणि त्याला ते ऑफिससाठी आवश्यक होते म्हणून ते त्याने स्वतःच्या पैशाने घेतले होते. त्यामुळे त्याला बोलण्याचा मला काहीही नैतिक अधिकार नव्हता. पण मी माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे बोललो आणि ठिणगी पडली. त्यात खरे तर माझीच चूक झाली.”
“गोपाळराव तरीही अस त्यांनी तुम्हाला बोलण योग्य नव्हते, तुम्ही तरी काय मौजमजा केली का? कमावले ते त्यांच्या शिक्षणावरच तर खर्च केले. दोन मुलींची लग्न केलीत. तुम्ही त्यांना भले मोटरसायकल किंवा मोबाईल नाही पण मुलींना ग्रँज्युएशनपर्यंत शिक्षण दिलेत राजूला इंजिनिअरिंग शिकवले तर खरे.” मी सहानुभूती दर्शवली.
“विनायक जाऊ दे रे , असे वादविवाद नेहमीच होत असतात मी काही मनाला लावून घेत नाही. आता मुले मोठी झाली आहेत, त्यांना प्रवासाचा त्रास होतो शिवाय चाकोरी बाहेर काम करावे लागते त्यामुळे त्रासलेली असतात, ती लवकर व्यक्त होतात. मुल लहान असतांना कधीतरी मी ही चुकीचा वागलो असेन. कळत नकळत त्यांच्या भावना तेव्हा दुखावल्या असतील, अपमान केला असेल. मुलं आपला अपमान कधी विसरत नाहीत. आज ते कमावते आहेत. मी त्यांना त्यांच्या खरेदीवरुन बोलणं योग्य नव्हते. माझी चूक मला समजली.”
“अहो गोपाळराव! काही झालं तरी मुलांनी वडीलांना बोलणे योग्य आहे का? तुम्ही काही मौजमजा केलीत का ? मुलांसाठीच राबलात ना ! वहिनींनीही मुलांसाठी खस्ता खाल्याच असतील ना? त्या का नाही समजावत मुलाला?
“मी मजा केली की नाही, हा प्रश्न उरतच नाही, विनायक, मी माझे कर्तव्य केले पण ते लहान असताना त्यांच्या छोट्या छोट्या गरजा मी पूर्ण करू शकलो नाही हे वास्तव आहे. शांता मुलालाही समजावते पण तिच्या मनातही त्यांचे बालपण आपल्याला नीट निभावता आले नाही याची रूखरूख आहेच. ती म्हणते कुटुंबाच्या जबाबदाऱ्या स्वतःच्या डोक्यावर घेऊन तुम्ही चुकच केली होती.तेव्हा आतातरी मुलांना त्यांची हौस मौज करू दे. तिच बरोबरच आहे म्हणा. आता मी त्याच्या खरेदी बाबत बोलणे टाळायला हवे होते तिथेच मी मार खाल्ला.
इतर मुलांचे आताचे राहणीमान पाहून आपल्याला ह्या गोष्टी त्या वेळी मिळाल्या नव्हत्या ही वस्तुस्थिती राजूच्या मनात खोलवर लपली होती. मी विषय काढल्याने तो त्वरित व्यक्त झाला इतकेच.
“राजू तुम्हाला बोलल्याचा तुम्हाला राग नाही आला. गोपाळराव किती कँज्यूअली घेता तुम्ही, मी असतो तर..” मी जरा तापूनच म्हटले. “काय केल असतत, जर तुम्ही माझ्या जागी असता तर? मुलाला मारलं असतं की शिव्या हासडल्या असत्या? आणि समजा तुम्ही हात उचलला म्हणून त्यांनीही हात उचलला असता तर , शोभा नसती झाली?” गोपाळरावांनी मलाच प्रतिप्रश्न केला.
मी विचार करू लागलो तेव्हा मलाही पटलं, माझी दोन्ही मुलं माझ्यापेक्षा हातभर उंच आणि चांगली तगडी होती, समजा तसेच काही घडले असते तर त्यांच्या पासंगाला मी पुरलो नसतो. खरंच शोभा झाली असती. तरीही मी त्यांना म्हणालो, “अहो गोपाळराव शब्दांत दम हवा, हात उचलण्याची त्यांची हिंमत होईलच कशी? “
ते वैतागले, “विनायक जे होऊन गेलं आणि आता माझ्या मनातही नाही ते पुन्हा उकरून काढून काय साध्य होईल. तू पुन्हा पुन्हा तोच मुद्दा का गिरवतो. मी उगाचच माझ डोक का तापवून घेऊ? तो आता सगळं विसरूनही गेला असावा. त्याच्या मनात तस काही नसावे. मी ही तेव्हाच सोडून दिले. आपली झाली तेवढी चर्चा पुरे आणि तुम्हाला माझी आगतिकता समजली असेल तर तुमच्या पुरतीच ठेवा उगाचच जाहिरात करू नका.”
ते रागावल्याचे माझ्या लक्षात आले, पण मला माझे लहानपण आठवले आमचे दिवसही खूप हलाखित गेले होते. तेव्हा कुटुंबातील संख्येवर बंधन नसल्याने मला सहा भावंडे होती. पूर्ण कबड्डी टीम घरात अवतरली नाही पांडुरंगाची मेहरबानी. वडील महानगरपालिकेत रस्ता स्वच्छता निरीक्षक होते. त्यामुळे घरात भाजी आणि अनेक वस्तू फुकट येत होत्या तरीही कपड्यांची वानवाच होतीच. वर्षातून एकदा दहा पंधरा मिटर कपडा आणला की त्यात सर्वांचे कपडे व्हायचे. इतर मुले आम्हाला’ बँडवाले’ म्हणून हाक मारायची, किती वाईट वाटायचे? पण त्याला उपाय नव्हता. तशाही परिस्थितीत आईने संसार रेटला आम्ही शिकलो आणि बहिणींची वेळेत लग्न झाली. मी ही योग्य वेळी वडीलांची अनुमती घेऊन घराबाहेर पडलो. वेगळा संसार थाटला. वडीलांना पेन्शन आहे त्यामुळे त्यांना मदत करण्याची वेळ आली नाही. पण आजही वडीलांपूढे बोलण्याची माझी प्राज्ञा नाही.
गोपाळराव मला समजावत म्हणाले, ” विनायकराव ,तेव्हा सगळ्यांची परिस्थिती सारखी होती. अनेक कुटुंबात भरपूर मुले होती. कोणी कोणाला हसण्याचा प्रश्न नव्हता. त्यावेळी गरीबी होतीच, त्या परिस्थितीच्या विचारांतून मी अजूनही बाहेर पडलेलो नाही, म्हणून आता जेव्हा दर दोन महिन्यानी मुलगा नवीन शूज, नवीन कपडे मागवतो तेव्हा राहवत नाही. तो कुरिअरवाला आला आणि त्याने दार वाजवले की माझ्या कपाळाला आठ्या पडतात. मी आजही चाळीस वर्ष जुन्या वातावरणातच वावरतो.
आम्ही दोन दोन वर्ष एकच सँडल वापरत होतो. आजही वापरतो. कपड्यांचेही तेच. कामावरचे आणी सणावाराला असे वेगळे कपडे कधी नव्हतेच आमच्याकडे. मुले आता दर महिन्या दोन महिन्यांनी कपडे विकत घेतात आणि पसंतीस उतरले नाही तर महीन्याभरात टाकूनही देतात. त्यांच म्हणणं, ऑफिसमध्ये तेच तेच कपडे घालून किती वेळा जायचे. पैसे फुकट चाललेत वाटून मला राग येतो मग होते वादावादी. आमची ही अनेकदा माझी समजूत घालते, पण ते लक्षातच रहात नाही. काळ बदलला त्याप्रमाणे आपण बदलायला हवे हे मनाला पटते पण कधीतरी अनावधानाने बोलून जातो.
आता ते सरावाचं झालंय , उगाच भांडण नको म्हणून मी अनेकदा काहीही उत्तर देत नाही. परवा तसेच झाले. चपलांचा स्टँड झाडता झाडता मी बोललो आणि वाद ओढवून घेतला. तो बरेच काही बोलला पण मी काहीच बोलत नाही पाहून शांत होण्याऐवजी तो जास्त भडकला. मला म्हणाला ,”आता का दातखिळी बसली? आहे का तुमच्याकडे काही उत्तर नाही ना, मग उगाचच येता जाता बोलू नका.”
विनायक आमच्यातील पूर्ण संवाद सौ ने ऐकला होता, खरे तर तिने मुलाच्या बोलण्याला लगाम घालायला हवा ह़ोता. पण आज मुलगाच संसाराचा बोजा उचलत असल्याने ती ही आगतिक आहे. माझी बाजू घेऊन एक शब्दही बोलू शकली नाही. तिची तरी काय चूक ऊगवत्या सुर्यालाच नमस्कार केला जातो.
आमची मुले शिकत होती तेव्हा घरातील आर्थिक परिस्थिती कशी होती? ते शांताला माहिती होते. आई वडील आणि बहिण, भाऊ यांची जबाबदारी माझ्यावर होती. बहिणींचे लग्न व्हायचे होते, वर संशोधन सुरू होते आणि बाबांचे दुखणे आणि त्यावर उपचार अधुनमधून सुरू ह़ोता. साहजिकच प्रत्येक महिन्याला मला उचल घेऊन घरखर्च भागवावा लागे मग मुलांचे हट्ट पुरवणे शक्यच नव्हते. अशा परिस्थितीत बहीणींची लग्न केली. मुलांचे शिक्षण केले.मुलींची जमतील तशी लग्न करून दिली. या पेक्षा काही करण्याची ऐपतच नव्हती. माझ्या सुदैवाने बहिणीला योग्य स्थळ मिळाले आणि ती सुखात आहे. तिच्या लग्नाच्याच वर्षी वडिलांनी जगाचा निरोप घेतला आणि त्या धक्याने आई वारली. लहान भाऊ समजूतदार होता. त्याने घरात वाटा न मागता तो स्वतंत्र झाला. मुलांच्या शिक्षणासाठी होती नव्हती ती पुंजी खर्च झाली. परंतु मुलांना ते समजतही नव्हते. नोकरी खाजगी होती, अगोदरच वेऴोवेळी फंड उचलला होता. मिळाले ते पैसे कर्ज फेडण्यात गेले. साहजिकच त्यांच्यासाठी काही राखून ठेवले नाही म्हणून मुले नाराज आहेतच. आता मी नोकरी करून काही कमवायचे म्हटले तरी या वयात मला कामावर ठेवणार कोण?”
“गोपाळराव आपल्या पिढीचे दिवस कसे गेले ते आपल्यालाच ठाऊक, मुलांना कळणारही नाही. वडीलांनी काढलेल्या रकमेची कर्जफेड आणि भावंडांची शिक्षणे करण्यात तारूण संपले. घरातून लग्नाच धोशा होता म्हणून लग्न केले. पण कुटुंबाचा खर्च आणि तुटपुंजा पगार मग शिल्लक राहणार कुठून? या मुलांना वेळीच त्याची समज दिली पाहिजे नाहीतर ती डोक्यावर नाही का बसणार? कदाचित तुमच्या मुलाचे ऐकून आमची मुलंही त्याचे अनुकरण करतील याचीच मला भिती वाटते.”
“विनायक चूक माझी होती, शिक्षा मला भोगली पाहिजे. तो कमावता आहे त्याचे निर्णय घ्यायला तो सक्षम असताना मी बोलणे अयोग्य होतै. माझी नोकरी संपल्यापासून घरखर्च तोच तर चालवतो, मग मला त्याला काही सांगण्याचा अधिकार पोचतोच कुठे? अजून त्याचे लग्न झालेले नाही. तोपर्यंत तो मौजमजा करणारच हे मी समजून घ्यायला हवे होते. तुझ्या मुलांच्या बाबतीत आजपर्यंत काही घडले नसतांना तू उगाचच बाऊ का करतो. माझी परिस्थिती पाहून शहाणा हो. विषय संपला.
आपणच संमजसपणे वागणे गरजेचे आहे, आपले जगून झाल्यानंतर त्यांच्या जीवनात उगाचच अडथळा बनून राहणे तसेही योग्य नाही. त्यांच्या आवडीनिवडी भिन्न असणारच हे समजून घ्यायला हवे. आपल्या तारूण्यात घडलेल्या गोष्टी सांगून त्यांच्या मनात दुराग्रह निर्माण करणे तसेही चांगले नाही.
भविष्यात हे घर दोन कुटुंबाना पुरणार नाही. आजतरी त्याला मुंबईत नवीन घर घेणे शक्य होणार नाही. त्याचे लग्न ठरले की गावी जाण्याचा मी निर्णय यापूर्वीच घेतला आहे. थोडीफार शेती आहे. दोन माणसांच सहज भागेल. माझ्या निर्णयाला शांता साथ देईल की नाही याचीच खात्री वाटत नाही ? बायकांच मन त्यांच्या संसारात गुंतलेल असत. एक एक वस्तू घेऊन तीने संसार जोडला आहे. मुले सोबत रहावी असे तिला वाटत असते. मुलांनाही तसेच वाटते की नाही? ते त्यांनाच ठाऊक. तेव्हा यापुढे माझ्या बाबतीत जे घडले त्याची वाच्यता नाहक कोणाकडे करू नको इतकीच विनंती.
गोपाळराव विनायकचा निरोप घेऊन निघाले आणि विनायकच्या मनात विचार आला, आपण जर मुलांच्या लग्नासाठी आपली पूंजी खर्च करून बसलो तर आज गोपाळराव ज्या परिस्थितीतून जात आहेत तिच परिस्थिती आपल्यावर ओढवेल. गोपाळराव त्या मानाने शांत स्वभावाचे आहेत म्हणून जमले, आपली विनाकारण शाब्दिक चकमक झालीच असती. या विषयावर पुन्हा गोपाळरावांशी बोलण्यात अर्थ नाही पण राजूशी एकदा बोललच पाहिजे. बापाने किती कष्ट केलेत याची समज त्याला द्यायलाच हवी.
एक दिवस तशी संधी त्यांना चालून आली ,राजू कामावरून परतत होता, जिन्यातच त्यांची भेट झाली, सेंट चा सुगधं त्याच्या भवती दरवळत होता, अतिशय रूबाबदार कपडे, चकचकीत शूज, डोळ्यावर गॉगल आशा पेहरावात तो दिसताच त्यांनी त्याला हाक मारली, “काय राजू? आज लवकर आलास का?”
“हो काका, आज आई बाबांच्या लग्नाचा ३५ वा वाढदिवस आहे . त्यांना चित्रपट बघायला न्यायचं आहे, त्यांच्यासाठी थोडी खरेदीही करायची आहे. आम्ही नेहमीच काही ना काही खरेदी करत असतो. त्यांना रेडीमेड कपडे मानवत नाहीत. आमच्या घरातील व्यापामुळे त्यांना स्वतःला कधी काही घेता आले नाही. आता मी कमावता झालो आहे तर…”
त्यांची खोली येताच तो निघून गेला. मी मात्र संभ्रमात आहे. खोलीकडे चालता चालता मी माझ्या मनाशी विचार करू लागलो, आपल्या वडिलांना कधीच मनासारखे जगता आले नाही, काही खरेदी करता आली नाही, ही समज असणारा राजू खरा की वडील काही तरी बोलले म्हणून त्यांना शब्दांनी जखमी करणारा राजू खरा.
मुले ताणतणावात असतात तेव्हाच जर त्यांना कोणी त्यांच्या मनाविरुद्ध काही विचारले तर क्षणातच त्यांचा उद्रेक होतो आणि तोंडावर ताबा नसल्याने काहीतरी पटकन निघूनही जाते पण याचा अर्थ त्यांचे आपल्या आई वडीलांवर प्रेम नसतं असंच नाही.
राजूच्या बोलण्यावरून मला प्रकर्षाने जाणवलं. माझ मन उगाचच नको त्या विचारांच्या जाळ्यात गुरफटलं होतं, मी गोपाळरावांना त्यांनी मुलाशी कसं वागावं याचा चुकीचा सल्ला देत होतो. त्यांनी तो ऐकला नाही म्हणून कुटुंब गैरसमजुतीतून वाचले. आज अचानक राजूची भेट झाली, त्याचे विचार ऐकले आणि माझ्या मनातील वादळ क्षमलं.
गोपाळराव नक्कीच माझ्यापेक्षा समजुतदार आहेत याची मला खात्री पटली. गोपाळरावांच कराव तेवढं कौतुक थोडं. गोपाळरावांच्या स्वगत बोलण्याबद्दल मुलांनी शब्द़ानी फटकारले तरीही ते शांत राहिले. मुलाच्या अपुऱ्या स्वप्नांची जखम अजुनही ओली असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी वाद घालणे टाळले. त्यामुळे घोघावणारे वादळ स्वतः शांत झाले.
कधीतरी मुलांच्या कलाने घेणं फार गरजेच असते, त्यांच्या मनातील गैरसमज वयानुसार कमी होतात.जेव्हा त्यांची स्वतःची कमाई सुरू होते आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या नसतात तेव्हा साहजिकच पैशांची उब त्याच्या बेजबाबदार वागण्याला कारणीभूत असते. कालांतराने आपल्या आवडीनिवडी जपताना पैसे कसे खर्च होतात हे लक्षात येते तेव्हाच आपल्या वयात बापाने हे कसे निभावले असेल? हा विचार सुरू होतो. तो विचारच मनाला पौक्तपणा देतो आणि बापाच्या जवळ घेऊन जातो. मुलांची बदलणारी मानसिकता अनुभवास येईपर्यंत संयम बाळगला म्हणून गोपळराव आपल्या मुलापासून दुरावले नाहीत. त्या दिवशी मुलाने स्वतःपैसे खर्च करून आई वडीलांना चित्रपट दाखवला, त्यांच्यासाठी खरेदी केली आणि रात्री बाहेर चांगल्या ठिकाणी लंच दिला तेव्हा गोपाळराव आणि पत्नी शांता भरून पावली.
समाजात बरीच कुटुंब आहेत ज्यांनी आपल्या तारूण्यात गरीबी अनुभवली आहे. पण नशिबवान तेच आहेत ज्यांच्या मुलांना आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाण आहे. समाजात घडून येणाऱ्या बदलामुळे आता पालकांच्या आज्ञेत ते नसतीलही, पालकांची तशी अपेक्षाही नाही. आपलेही पालकांप्रती कर्तव्य आहे याची मनाला समज आहे. केवळ संस्काराने मुले घडत नाहीत तर त्यांना येणाऱ्या बऱ्या वाईट अनुभवातून मुले घडतात, सावरतात. मित्रांनो तोपर्यंत सावरा, स्वतःच्या मनाला दिलासा द्या, ‘ हे ही दिवस जातील.’