उतरण

उतरण

आताशा झोपेच समीकरण निटसे जुळत नाही
का असे होते? तेच तर कधी कधी कळत नाही
कोणाला पाहून मन तळमळेल खरे वाटत नाही
दुःखी प्रसंग पाहून हळहळावे मनाला पटत नाही

कोणी सहज बोलले तरी जीव गुदमरून जातो
काय प्रतिक्रिया द्यावी कळत नाही शब्दच खातो
कोणाला दुःख कळू नये म्हणून मी एकांती गातो
जे बोलून दुखावेल कोणी ते शब्दच पिळून पितो

कित्येक घटनांचे साक्षीदार, मन करत होते हमाली
किती काय ठेवावे लक्षात? काय काढावे निकाली
काही समज, गैरसमज, तर काही शत्रूच्या दुष्ट चाली
पुसून करावी पाटी कोरी तर प्रेमळ जखम अजून ओली

मित्राची वा मैत्रीणीची जोवर असते निर्मळ सोबत
विचार जुळले नाहीत तरी कुठेही जात नाही वाहवत
मोजून मापून बोलण्याचा नसतो प्रश्न, बुद्धी घेते हरकत
योग्य आणि नेमक मांडताना शब्द मदतीला येती धावत

मन विषण्ण, खदखद मनाची खंत कुणालाच नाही सांगत
तारूण्यातील गमती, करारी स्वभाव उगा नाही आठवत
पण आठवते आईची माया, प्रेमळ शब्द, बालपण येते रांगत
वाटले तरी भडाभडा बोलू नकोस मी मलाच राहतो कळवत

पण यातील कशाकशाचीच आठवण मी आता काढत नाही
घरातील कोणत्याच व्यवहारात उगाचच लक्षही घालत नाही
कोणी लवकर उठले तरी उठण्याचा आटापिटा करत नाही
आता माझ्या चालीनेच मी जगतो, कशासाठी करावी मी घाई

आता घालवतो मस्त वेळ मित्रांची भरवतो रोज मैफिल
छान छान घालतो जिन्स टी शर्ट येतो तारूण्याचा फिल
मारतो राजकारणावर गप्पा, पहातो चोरून छान रिल
टपरीवर खातो भजी, मारतो कडक चहा, जगतो खुश दिल

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *