एका स्वातंत्र्य सेनानीचे आंदोलन

एका स्वातंत्र्य सेनानीचे आंदोलन

“कुठे आहे बंदूक? मला द्या, हा मी निघालो,शत्रूच्या छाताडावर नाचून गोळ्या घालूनच येतो.” एवढं त्वेषाने बोलेपर्यंत त्यांना दम लागला आणि ते खुर्चीत कोसळले. समोर बसलेली आम्ही मुले एकदम शांत झालो. नक्की काय झाले ते कळेना. कोणी त्यांना वारा घालत होत, कोणी लिंबूपाणी भरवत होते तर, कोणी अहो देशपांडे सावध व्हा, सावध व्हा, उठा, उठताय ना! अशी हाक मारत होते.

आमच्या शाळेत दर शुक्रवारी शेवटच्या दोन तासिकांना सांस्कृतिक आणि सामाजिक समज असा कार्यक्रम होत असे. दर शुक्रवारी कधी कोणी लेखक, कधी सरपंच तर कधी एखादे गरीब वस्तीतील डॉक्टर या कार्यक्रमास पाहूणे म्हणून यायचे. समाजातील समस्या आणि त्यांचे खारीचे योगदान या विषयी सांगायचे. आमच्या गावात दहा ते बारा स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून ताम्रपट मिळाला होता. तो ताम्रपट कसा असतो. दिसतो कसा ते आम्हा विद्यार्थ्यांना कळावे म्हणून आजच्या कार्यक्रमात एका स्वातंत्र्य सैनिकाची भेट असा विषय होता. या सर्व कार्यक्रमाच नियोजन विद्यार्थी करत. शिक्षक त्यांना वक्ता सूचवत आणि विद्यार्थ्यांनी त्यांना पत्रव्यवहार करावा असा उद्देश असे. आज त्याचसाठी देशपांडे सरांना आमंत्रित केले होते. एकोणिसशे बेचाळीसच्या चले जाव आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांना जमावबंदी आदेश मोडल्या बद्दल आणि ब्रिटीश सत्तेविरुद्ध उठाव केल्याबद्दल, तीन महिने कारावास घडला होता. त्याअर्थी ते स्वातंत्र्य सैनिकच होते.

जेव्हा शाळेच्या फलकावर शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमाच्या वक्तांचे नाव लिहीले गेले तेव्हा सर्वांनीच आश्चर्याने तोंडात बोटे घातली. “आयला,पाहूणे कोण तर आपले देशपांडे सर, कस शक्य आहे? देशपांडे सर स्वातंत्र्य सैनिक?” मुलांची कुजबुज सूरू होती. कारण कित्येक क्रांतिकारकांची वर्णने ददेशपांडे सरांच्या तोंडून ऐकताना त्यांच्या शरीर शैष्ठवाबाबत वर्णन ऐककतांना आमच्या दंडाच्या नसलेल्या बेडक्या फुगल्या होत्या. पण देशपांडे सर आणि स्वातंत्र्य सैनिक! कस शक्य आहे? असे प्रत्येक विद्यार्थ्यांला वाटत होते.





सरांची देहयष्टी अतिशय किरकोळ होती त्यामुळे सरांनी आंदोलनात सहभाग घेऊन काय केले असावे? हा प्रश्न खरं तर माझ्यासह सर्वांना होता. तरीही सर आजच्या कार्यक्रमाचे वक्ते होते हे सत्य होतं. त्यांना कार्यक्रमाच्या सुरवातीस शाळेतील आदर्श विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात असलेल्या फुलांचा आणि पानांचा गुच्छ करुन त्यांना दिला होता. गमतीचा भाग म्हणजे मुलांनी त्यांनी आणलेला ताम्रपट हात लावून पाहिला. काही भावुक मुल ताम्रपटाच्या पायाही पडली.

तर सरांची “स्वातंत्र्य सैनिक” ही नव्याने ओळख झाल्यावर त्यांच्याविषयी आदर वाढला आणि आम्ही त्यांच्या जीवनाचा अधिकचा शोध सुरू केला तेव्हा कळले त्यांना दोन मुली आणि एक मुलगा होता. मोठी मुलगी डि.एड. करून शिक्षिका होण्याच्या पायरीवर होती तर लहान मुलगी आणि स्वतंत्र बाण्याचे चिरंजीव शैक्षणिक पायरी हळूहळू चढत होते. स्वातंत्र्य सैनिकांच्या घरात जन्म घेतल्याने तिनही मुले स्वतंत्र बाण्याची होती. मुलगी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन शिक्षिका झाली आणि प्रेमविवाह करून तिने ती स्वतंत्र बाण्याची आहे हे वडिलांना दाखवून दिले. स्वातंत्र्य सैनिकाचं रक्त नसानसात दौडत असल्याने तिने स्वतः निर्णय घेऊन आपले खानदान दाखवून दिले.

दुसऱ्या मुलीने तिच्याच पावलावर पाऊल ठेवत, “हम भी कुच कम नही.” म्हणत वडिलांना धक्का दिला. आमच्या मुलींच्या निर्णयाला मी कसा पाठिंबा देतो हे दाखवण्यासाठी त्यांनी “आम्ही बिघडलो तुम्ही बि घडाना” हा लेख स्थानिक दैनिकात लिहीला. अर्थात त्या लेखाचे तेव्हा, धोपट मार्ग सोडून वेगळ्या मार्गाने जाणाऱ्या बाणेदार मुलांनी स्वागतच केले. त्याच वेळेस त्यांच्या पालकांनी या स्वातंत्र्यविराच्या अविचारी मतांची चांगलीच हजेरी घेतली. आपल्या मुली चुकीच्या मार्गाने गेल्या आता आमच्या मुलांना हा मास्तर नको तो मार्ग दाखवून भडकवत आहे पालकांनी तक्रार केली पण “क्रांतिकारक विचार घरात रूजवले तरच क्रांती घडते.” अस म्हणे देशपांडे सरांनी हेडसर यांना वेळीच ऐकवलं त्यामूळे हेडसरांनी त्यांना मोकळ सोडलं आणि पालकांची समजूत घातली. अशा प्रकारे देशपांडे सरांच्या स्वतंत्र वृती बद्दल माहिती गावात पसरली. पाहता पाहता सर गावातील विविध कार्यक्रमात सहभागी होऊ लागले.

तेव्हा गावात सोई सुविधांची वानवा होती. अविकसित अशा आमच्या गावी ठराविक रेल्वे गाड्यांनाच थांबा होता, परिणामी या गाड्या काही कारणास्तव लेट झाल्या की येथून मुंबई येथे कामावर जाणारे कर्मचारी वेळेत पोचू शकत नसत परिणामी त्यांना कामावर पोचण्यास उशीर होई किंवा अति विलंब झाल्यास रजा टाकावी लागे. यावर काही उपाय करुन नियमित कर्मचाऱ्यां दिलासा द्यावा असे पत्र रेल्वे विभागीय मंडळाकडे वारंवार पाठवूनही त्यांनी दाद घेतली नाही त्यामुळेच लोकांनी सरांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचे निश्चित केले. आंदोलनाची वेळ ठरली सकाळच्या वेळेत आधी फ्लाइंग राणी नंतळ राजधानी एक्स्प्रेस ह्या दूरून येणाऱ्या आणि महत्त्वाच्या गाड्या होत्या. सरांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह रेल्वे ट्रॅक गाठला, घोषणा सुरू झाल्या. “देशपांडे सर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है।” हळूहळू बघे ओरडू लागले. इंजिन गरम झालं. देशपांडे सरांना जोश आला, ते मुठी आवळत म्हणाले, “मित्रांनो आम्ही ब्रिटिश सरकार सारख्या जुलमी सत्तेकडून स्वातंत्र्य खेचून घेतलं. आपल्या गावासाठी फास्ट गाडीचा थांबा मिळवल्याशीवाय शांत रहाणार नाही. कोणीतरी नारा दिला प्रवासी संघटनेचा विजय असो. बघ्या लोकांनी साथ दिली. प्रवासी युनियन झिंदाबाद.”





आंदोलन तस शांतपणे चालू होत पण रेल्वेच्या दोन्ही ट्रॅकवर स्टेशन पासून काही अंतरावर दोन मेल एक्सप्रेस आल्या आणि रूळावर लोक बसले असल्याने सिग्नल नव्हता म्हणून थांबल्या. लोकांनी उगाचच त्या गाडीच्या दिशेने दगड भिरकावले. त्यातील काही दगड रेल्वे डब्यावर आदळले. गाडीतील प्रवाश्यांनी पटापट दार खिडक्या बंद केल्या. उगाचच भीतीचे वातावरण निर्माण झाले. गाडीतील लोक भीतीने उगाचच ओरडत होते.कोणीतरी खोडसाळपणा केला. रेल्वे ट्रॅक वरील दगड स्टेशन ऑफिसच्या दिशेने भिरकावला. हळू हळू आवाज टिपेला पोचला. “रेल्वे आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची” बघे जमू लागले. गोंधळ वाढत गेला. थांबलेल्या गाडीत गोंधळ वाढला.

थोड्याच वेळात पालघर येथून आर.पी एफ ची तुकडी आली. त्यांनी निदर्शने करणाऱ्या आंदोलकांची धरपकड सुरू केली. देशपांडे सरांच्या भोवती आंदोलकांनी कोंडाळे केले होते. आर.पी.एफ अधिकारी पुढे झाले आणि त्यांनी देशपांडे सरांचे मनगट धरण्याचा प्रयत्न केला. त्याच्या त्या मोठया हातात सरांचे मनगट म्हणजे ऊसाचे कांडच. कोणी तरी ओरडले, “हमारे लीडर को मत छुना.उनको कुछ हुवा तो जिम्मेदारी आपकी.” बोलाफुलाला गाठ पडली. सर ट्रॅकच्या खडीवर धडपडले आणि आर.पी.एफ च्या हातातून सुटून पडले. आर.पी.एफ ने त्यांना पुन्हा धरण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी त्यांची शुद्ध हरपली. कोणीतरी उगाचच
ओरडले. आर.पी.एफ.नी सरांना मारलं, सगळे त्या आर.पी.एफ. वर धावून गेले, “अरे मैने कुछ नही किया, वो खुद गिर गये, मै तो उन्हे उठा रहा था| तो सांगण्याचा प्रयत्न करे पर्यंत जमाव हिंसक बनतो की काय अशी स्थिती बनली. कोणीतरी देशपांडे यांच्या चेहऱ्यावर पाणी मारले. ते सावध झाले.पुन्हा आवाज घुमला. “देशपांडे सर तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है.” आर.पी.एफ.समजला इथे एकट थांबणे योग्य नाही त्याने शिटी फुंकली, पाहता पाहता अनेक पोलीस धावत आले. पांगापांग झाली.

आर.पी.एफ.सरांना स्टेशन मास्टर केबिनमध्ये घेऊन गेला.त्यांना लिंबू सरबत पाजले. त्यांनी त्यांच्या खिशातील निवेदन स्टेशन मास्तर यांना दिले. कोणीतरी दोन तीन फोटो कॅमेऱ्यात क्लिक केले. स्टेशन मास्तर स्वतः देशपांडे सरांना बाहेर सोडायला आले. सर विजयी थाटात बाहेर आले. स्टेशन मास्तर म्हणाले. “भाईयो,मैने देशपांडे सर से आपकी प्रवासी संघटन का निवेदन ले लिया है,और जल्द ही मै आपका निवेदन हमारे आर.एम.ओ साहब को भेज दुंगा मेरी आपसे कोई दुश्मनी नही मै आप सभी को विनती करता हू कृपया हमे सहयोग दे।”

आंदोलन स्थगित करण्यात आले. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात आंदोलनाची बातमी छापून आली. त्यात देशपांडे सरांचा ट्रॅकवर पडलेला फोटो छापला होता. गावात ज्यांना माहिती नव्हते, ते ही म्हणू लागले.असा नेता पाहिजे. जेव्हा या विषयी माहिती शाळेच्या मुख्याध्यापकाना मिळाली. त्यांनी देशपांडे सरांना बोलावून समज दिली. “सर, हे क्रांतिकारी समाज सेवेच भूत डोक्यातून घालवा नाहीतर नोकरी गमवायची पाळी येईल. तुम्ही शासनाचे वेतन घेता. तेव्हा शासनाच्या विरोधात विद्रोह केल्याबद्दल तुमच्यावर कारवाई का करू नये? अशी नोटीस बजावण्यात येईल हे लक्षात घ्या. दरमहा वेतन मिळते ते बंद झाले तर कुटुंब लोक पोसणार नाहीत.”

ते ऐकताच सर विनंती करत म्हणाले, “सर, खर तर मी आंदोलनात भाग घेणार नव्हतो पण अगदीच गळ घातली म्हणून नाईलाज झाला, मी खात्री देता पुन्हा असे नाही होणार. तेव्हा ते नोटीसच तेवढ राहूद्या.” हेडमास्तर म्हणाले,”देशपांडे सर,अस कस राहू द्या म्हणताय? काल वर्तमानपत्रात बातमी छापून आली आहे ना! उद्या शिक्षण निरिक्षकांनी विचारल तर काय सांगू?”





सरांचे धाबे दणाणले, या वयात नोकरी गेली तर पुन्हा नोकरी कोण देईल मग कुटुंबाचं काय!अखेर सरांनी सामाजिक सन्यास घेतला. तिथपासून
देशपांडे सरांच्या आंदोलनाची चर्चा होत असते आणि सर उपहासाचे बळी ठरत असता त्यानंतर ज्यांच्या शिरावर सरकारी नोकरीचा भार नाही अशा राजा सारख्या लोकांनी हे आंदोलन यशस्वी केले. काही गाड्या मेल गाड्यांचे थांबे गावाला वाढवून मिळाले पण देशपांडे यांच्या आंदोलनाची चर्चा होतच राहीली.

या गोष्टीला तब्बल चाळीस पंचेचाळीस वर्ष लोटली. आरोग्यासाठी काही करावे या हेतूने काही करावे म्हणून संघर्ष समिती उभी राहिली आणि आठवणींचा बुरखा फाडत मन भुतकाळात शिरले. पाहता पाहता आठवणींचा हा प्रवास देशपांडे सरांच्या स्मृती जागृत करून थांबला. आज गावात लोकल दौडते पण लोकसंख्या वाढली असूनही जिल्हा परिषदेच्या हॉस्पिटलचे सुविधा इस्पितळात रूपांतरण झालेलं नाही. आज युवापिढी जास्त जागरूक आहे. सुसज्ज हॉस्पिटल मिळावे यासाठी संघटीत लढा सुरू आहे त्याला यश मिळाले तर ती देशपांडे यांच्यासाठी श्रद्धांजली ठरेल.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar