प्रथम तुज पाहता

प्रथम तुज पाहता

मित्रांनो, १५ ते ३० वय हे वय असं असतं की या वयात मुलं आणि मुली यांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन्स उच्च पातळीवर असतं म्हणूनच या वयात तरूण तरुणींना आपल्या कामवासनेला आऊटलेट शोधावासा वाटतो पण मुलं हे विसरतात की कामवासना म्हणजे प्रेम नव्हे परिचय नसतांना एखाद्या मुली अथवा मुला विषयी आकर्षण वाटणे ही कामभावना असते, ते निव्वळ शारीरिक आकर्षण असते पण शारीरिक आकर्षण ओसरल्यानंतर त्या व्यक्ती बद्द्ल वाटणारी ओढ, येणारी आठवण, भेटता न आल्याची खंत, त्या व्यक्तीची काळजी यातून प्रेम जन्म घेतं. आपल्या मनातील मुग्ध भावना आपल्या मित्र,मैत्रीणीपर्यंत पोचविण्यासाठी व्हॅलेंटाईन डे याचा उपयोग केला जातो. एखादे गुलाबाचे फुल किंवा भेटवस्तू दिल्याने गहजब करण्याचे काही कारण नाही, खरेतर तो प्रेम व्यक्त करण्याचा सभ्य मार्ग आहे. त्यामुळे अनामिक ओढीतून मुलं मुक्त होतात. अंतर्मुख होतात. कधी कधी स्वतःच्या कृतीने त्यांना हसू येतं. कदाचित त्या व्यक्ती विषयी वाटणार आकर्षण नंतर राहातही नाही. वाटणारी ओढ आणि हुरहूर व्यक्त करण्यात नक्कीच हरकत नाही. एकमेकांना सोबत करणे, विशेष प्रसंगी आलींगन देणे, प्रेमाने स्पर्श करणे यातून काम भावना पूर्ण झाल्याचा आभास होतो किंवा कामभावनेचा निचरा होतो. परंतु एकमेकांच्या तोंडाला रंग फासणे, जबरदस्तीने तिच्या शरीरावर काही लिहिणे, किस घेणे हे प्रकार अयोग्य आहेत. या प्रकाराने तिचा मानभांग किंवा विनयभंग झाल्यास मानसिकता दोलायमान झाल्याने ती कोसळू शकते. तेव्हा एखादी मुलखाची सुंदरी दिसल्यास “ती पाहताच बाला कलेजा खलास झाला.”अस वाटणं यात नवल नसलं तरी सौंदर्याची फार तर मनातच तारीफ करावी पण कुणाच्या अंगचटीला जाणं, उगाचच छेडछाड करणं योग्य नव्हे.

वासना ही अनैच्छिक स्नायूंद्वारे निर्माण होते त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे फक्त संयमानेच शक्य होते. रानटी समाजात अनेक गीते ही लिंगवाचक शब्दांत गुंफलेली होती. अग्नी पेटवून त्या भोवती फेर धरून नाचताना कामोत्तूक भावना चेतवण्यासाठी ती म्हटली जात, पण मित्रांनो आता आपण जंगली जीवन जगत नाही. आपण स्वतःला सुसंस्कृत समजतो म्हणूनच अशा गोष्टींबद्दल सामाजिक बंधन पाळणे आपल्या हाती आहे. दुसऱ्या व्यक्तीचा आदर राखत आणि त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यांचा आदर करत प्रेम व्यक्त करणे खचितच पाप नाही. पराशर आणि सत्यवती यांचा मुलगा व्यास आपल्याला माहित असेल पण या गोष्टी उभयतांच्या इच्छेने घडल्या. हिडिंबेने भीमास स्वतःला पुत्र प्राप्ती होईपर्यंत स्वगृही ठेवले होते अर्थात या गोष्टी इच्छेने घडल्या आणि त्याही पुराणात, यापैकी काय खरं आणि काय खोटं याची शहानिशा शक्य नाही.



affiliate link

तर ज्याच्या नावानेआजचा डे साजरा केला जातो त्या व्हॅलेंटाईन, ह्या ख्रिस्ती संता बाबत बरेच समज गैरसमज समाजात आहेत. तिसऱ्या शतकात रोममध्ये क्लोडियस व्दितीय या राजाने एक फतवा काढला ज्याचा आशय असा होता की अविवाहित माणूसच सैनिक म्हणून चांगली सेवा बजावू शकतो, त्यामुळे सैन्यात फक्त अविवाहित मुलांची भरती करावी. राज्याला शुर सैनिक मिळावेत म्हणून तरूण मुलांच्या लग्नावर त्याने बंदी घातली.व्हँलनटाईन या संतांनी राजाच्या या फतव्याला विरोध करत तरूण प्रेमिकांची लग्न धार्मिक कार्यक्रमात लावून दिली.

प्रेम ही ईश्वराची देणगीच आहे अस व्हँलनटाईन याने समाजाला सांगायला सुरवात केली त्यामुळेच क्लोडियस व्दितीय संतापला व त्यांनी व्हँलनटाईन याला कैद केले. तेथे तो सहकारी कैद्यांशी प्रेमळ वागत होता. त्यांच्या अडिअडचणीत मदत करत होता. त्याच वेळेस तो जेलरच्या बहिणीच्या प्रेमात पडला. कदाचित त्याच्या चिथावणीने कैदी बंड करतील, त्याच्या या प्रेमळ स्वभावामुळे कैदी बिघडतील असे वाटून इतरांवर दहशत बसावी म्हणून राजाने व्हॅलेंटाईन याला फाशीची शिक्षा द्यायची ठरवली, फाशीच्या आदल्या दिवशी व्हॅलेंटाईन याने जेलरच्या बहिणीला पत्र लिहिले आणि आपल्या प्रेमभावना व्यक्त करतांना त्याचा शेवट, “Your Valentine” असा केला.
१४ फेब्रुवारी २७० मध्ये त्याला देहांताची शिक्षा दिली म्हणून १४ फेब्रुवारी या दिवशी Valentine Day साजरा केला जातो.

त्याच्या मृत्यू नंतर २००वर्षांनी रोम ख्रिस्त-कँथलीक झाला आणि व्हॅलेंटाईन यांच्या सन्मानानार्थ १४ फेब्रुवारीला व्हँलनटाईन डे साजरा करायला सुरवात केली. चावसर या कवीने या दिवसाला प्रणयरम्य प्रेमाचे रूप दिले ज्यात दोन प्रेमीक गुप्तपणे आपल्या प्रणय भावना व्यक्त करत असत. रोममध्ये फेब्रुवारी महिना हा ल्युपर्सिया सण हा वसंत ऋतू आगमनाचा आणि निसर्गातील प्राण्यांच्या समागमाचा काळ समजला जातो.पक्षी एकमेकांना कुंजन करून आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न करतात, आपल्याकडेही वसंतात कोकीळ नादमधुर स्वरांनी तिच्या प्रियकराला बोलवत असते अगदी तसेच किंवा वसंत पंचमी साजरी होते तितक्याच उत्साहात रोममध्ये हा सण साजरा केला जातो.

ल्युपर्सिया या सणात एका खोक्यातून एका मुलाची व एका मुलीची चिठ्ठी काढून बॉयफ्रेंड- गर्लफ्रेंड ठरतात. हा सण इतका पॉप्युलर झाला की पाहता पाहता त्याला आताचे स्वरूप प्राप्त झाले. मुले, मुली एकमेकांना आपल्या प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी गुलाब किंवा भेटवस्तु देवू लागले. अर्थात या दिवसाला केवळ प्रणय उत्सुक युगल एकमेकांना गुलाब देऊन आपले प्रेम व्यक्त करतात असा चुकीचा अर्थ काढला जातो. प्रत्यक्षात कोणीही कोणाला गुलाब द्यावा, अगदी दोन वयोवृद्ध व्यक्ती एकमेकांना गुलाब देऊन किंवा एकत्र भेटून प्रेम व्यक्त करू शकतात.त्यात फक्त शारीरिक आकर्षणाचा भाग असतोच असे नाही. अर्थात इतकी वैचारिक प्रगल्भता ज्यांच्याकडे नसते ते याचा स्वतःला सोयीस्कर अर्थ घेतात.



affiliate link

गंमतीचा भाग असा की आपल्या भारतातही नळ- दमयंती, हिरा-रांजा कृष्ण-राधा, सलीम उर्फ जहांगीर-अनारकली, बाजीराव-मस्तानी, लैला-मजनू असे अनेक प्रेमवीर होऊन गेले. प्रेम भावनेवर कित्येक नाटके लिहिली गेली,वसंतसेना, भावबंधन,मृच्छकटिक, प्रेमसन्यास, याची यादी संपणार नाही.शरदचंद्र चटोपाध्याय यांच्या देवदास कादंबरीवर आधारीत देवदास या चित्रपटात नायक प्रेमाची सर्वोच सीमा गाठताना चित्रित केलं आहे. प्रेयसीला भेटता येणार नाही हे समजल्यानंतर तो दारूच्या आहारी जाऊन सर्वनाश ओढवून घेतो. दिलीप कुमार आणि त्यानंतर शाखरुख खान यांनी यातील भुमीका अजरामर केली. यातील माधूरीची भुमीका कोण कसे विसरू शकेल? तेव्हा प्रेमाचा आविष्कार आपल्या मराठी रंगभूमीला आणि चित्रपटांना नवीन नाही.एक दुजे के लिये चित्रपट आला तेव्हा बऱ्याच तरुण मुला मुलींनी वासू – सपना जोडीसारखं आपलं जीवन संपवले.कमल हसन याची उत्कृष्ट भूमिका असलेला चित्रपट पाहूनही अस जीवन संपवून टाकू नये हा आशय घेण्या ऐवजी कित्येक मुलांनी प्रेम असफल झालं म्हणून स्वत:चेजिवं संपवले.

अनारकली चित्रपटात,अकबराचा मुलगा सलीम उर्फ जहांगीर, नाचणाऱ्या अनारकलीच्या प्रेमात पडतो, अनारकलीचा नाद सोडावा म्हणून अकबर तिला हवे तितके पैसे घे, दागीने घे पण हे शहर सोडून निघून जा सलीमचा नाद सोडून दे असा हुकूम करतो, पण अनारकली सलीमच्या प्रेमात आकंठ बुडालेली असते ती जाण्यास नकार देते प्रेमाचा महिमा अपार आहे त्यापुढे धन दौलत कवडीमोल आहे म्हणून जेव्हा अकबराच्या विनंतीला अनारकली ठोकरते, “जब प्यार किया तो डरनाक्या? प्यार किया कोयी चोरी नाही की छुप छुप आहे भरना क्या? असं म्हणून प्रेम किती उत्कट असत ते दाखवून देते म्हणून अकबर अनारकलीला भिंतीत चिरडून मारतो असे दाखवले आहे. १९५५ मध्ये दिलीपकुमार याने सलीमची भुमीका अजरामर केली.

मिरेन कृष्णावर विशुद्ध प्रेम केले मात्र आम्हा भारतीयांना पाश्चिमात्य लोकांचे अनुकरण करण्याची एवढी हौस की आम्ही व्हॅलेंटाईन याची पुण्यतिथी Lovers day, प्रेम दिवस म्हणून साजरा करायचे ठरवले. बर हा संदेश बारामाही देण्या ऐवजी १४ फेब्रुवारीलाच का द्यावा? तर या दिवशी व्हॅलेंटाईन याला फाशी देण्यात आले म्हणून. आपल्या भारतात अशा प्रेमवीरांच्या शेकडो जोड्या असतांना आम्हाला सोयीस्कर व्हॅलेंटाईन आठवतो याला काय म्हणावे? तुमची तारुण्यातील ऊर्जा योग्य उद्देश समोर ठेऊन वापरा.

पाश्चिमात्य देशात valentine day प्रथम पासून साजरा होत आहे, तिथे सोळा ते अठराव्या वर्षी डेटवर जाण प्रचलीत आहे ते आम्ही सहज स्विकारलं पण तिथे वयाच्या अठरा वर्षानंतर मुलं स्वतंत्र होऊन स्वतःच्या कष्टावर जगते, आपल्या श्रीमंत पालकांपासून वेगळ व स्वतंत्रपणे राहून मोठी स्वप्न पहात ती सत्यात आणण्यासाठी झटते, प्रसंगी शिक्षण सुरू असतांना वेटर किंवा त्यापेक्षा हिन कामही करते इथं तस प्रत्यक्षात इथे अस कोणी वागेल का? किंवा पालक अस कोणतही काम आपल्या पाल्याला करू देतील का? हेतू इतकाच, पाश्चिमात्य लोंकांची जीवनशैली स्विकारताना त्यांच ध्येयाप्रति असणार Devotion, Desire, Dedication, Determination आम्ही घेणार आहोत की नाही? की त्यांची कमरेखाली घसरणारी वस्त्र प्रावणे , जंक फूड, ड्रिंक, डेटिंग, लिव्ह इन रिलेशन, अशा उथळ गोष्टी उचलणार आहोत. ते ध्येयाने झपाटून जसे शोध लावतात, किंवा समाजासाठी जीव ओतून काम करतात. त्यांच्या जवळून शोध, सामाजिक कार्य, उत्कृष्ट लिखाण याची प्रेरणा घेणार की पौगंडावस्थेत नको त्या गोष्टींच्या आहारी जाणार? हाच खरा प्रश्न आहे.





दोन दिवसांपूर्वी एक वाहिनीवर “प्रपोज डे” साजरा करताना मुलांनी आपसात केलेल्या मारामारीचे चित्रण दाखवले, तेव्हा आम्ही आमची संस्कृती गहाण टाकून हे नको ते चाळे करण्यास का सरवलो आहोत? हेच कळत नाही. नक्की पालक म्हणून आपण कुठे कमी तर पडत नाही ना? अशी शंका आल्या शिवाय राहात नाही. चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री, अभिनेते जे फाटके कपडे घालून देह प्रदर्शन आणि उत्तान हाव भाव करतात त्याचं आजच्या तरुणांना आकर्षण का वाटत आहे? तेच कळत नाही.

आपली समाज माध्यमे TRP वाढवण्यासाठी इतक्या खालच्या थरावर गेली आहेत, इतकी बिघडली आहेत की काय दाखवावे आणि काय दाखवू नये याचा विधिनिषेध त्यांनी ठेवलेला नाही. कोणी आत्महत्या करत असेल तर त्याला वाचवण्या ऐवजी त्याच शूट करून वाहिनीवर दाखवतील आणि म्हणतील सबके आगे, सबसे तेज. किंवा एखादा गावगुंड एखाद्या मुलीची अब्रू लुटत असेल तर त्याचा व्हिडिओ काढून तिचीच अब्रू का? आणि कशी? लुटली गेली याची मुलाखत घेऊन त्वरित दाखवतील कारण ते आहेत सबसे आगे, सबसे तेज. त्यांच माणुसकीशी काही देण घेण नाही. उल्हासनगर येथे इयत्ता नववी मध्ये शिकणाऱ्या रिंकू पाटील हिला पेट्रोल टाकून जाळण्यात आलं होतं याची आठवण लोक विसरले की काय हेच कळेना?

कालच एक महिलेला पेट्रोल टाकून जाळल्या बद्दल नागपूरच्या विशाल तरूणाला मरेपर्यंत कारावासाची शिक्षा झाली. एक तर्फी प्रेम प्रकरणाला काळी किनार आहे, मिळालं नाही तर हिसकावून घ्या ही सडलेल्या मेंदूची विकृत कृती आहे. याची सुरवात या प्रपोज डे सारख्या मूर्ख विचाराने होत असते. प्रेम ही शुद्ध कोमल भावना आहे ती व्यक्त करतांना जोर जबरदस्ती केली जात असेल किंवा होत असेल तर ते खचितच योग्य नाही. शाळा कॉलेजमध्ये , रोज डे, सारी डे, टाय डे, चॉकलेट डे सुरू झाले आहेत तेच मुळात कधी कधी गंभीर रूप धारण करतात, मुलीने गुलाब घ्यायला किंवा चॉकलेट घ्यायला नकार दिला तर तिचा पद्धतशीर पाठलाग केला जातो,तिला उपरोधिक बोलले जाते तिचा मानसिक छळ केला जातो. म्हणूनच अशा प्रथांना वेळीच आळा घातला पाहिजे. या डे विरुद्ध राज ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी मोहीम उघडली होती परंतु आमची तरुणाई इतकी वेंधळी झाली आहे की त्यांनी राज ठाकरे यांना प्रेमातील व्हिलन ठरवून टाकले.

आज विविध माध्यमावर कितीतरी Love Stories दिवसभर सुरू असतात, एक एक हिरो दोन दोन मुलींच्या प्रेमात पडलेला किंवा दोन दोन हिरोईन एका तरुणाच्या प्रेमात पडलेल्या दाखवतात. तो किंवा ती आपल्याला मिळावी म्हणून षडयंत्र रचतात. कुठे आहे प्रेमातील कोमल भाव? ह्या सिरीयल आधी आया पाहतात आणि मग त्यांची छोटी मुले ही मुले वर्गात ही स्टोरी एकमेकांना सांगतात. चौथ्या इयत्तेतील मुले माध्यमावर दिसणारी या गोष्टी चवीने पहात असतील तर शिल्लक काय राहिले?

व्हॅलेंटाईन दिवसाला हातभर नव्हे तर संपूर्ण शरीरभर प्रेम संदेश लिहिणारे आणि लिहून घेणारे मनापासून एखाद्या व्यक्तीच्या संकट काळात मदतीला धावून जातील का? समजा त्यांचे तसे खरे प्रेम असेलही पण मग अस भर बाजरी, रस्त्यात जाहीर प्रदर्शन करण्याची गरज आहे का? जेव्हा हा प्रकार लहान मुले पाहतात त्यांच्या बालमनावर कोणते संस्कार होणार? म्हणून मिंत्रानो स्वतःच्या भावनांना आवर घाला. कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं आणि कोणत्या गोष्टींना नाही याचं तारतम्य जर आपण बाळगल नाही तर एक दिवस भर रस्त्यात अब्रूचे धिंडवडे तुम्हाला उघड्या डोळ्याने पहायची वेळ येईल हे नीट ध्यानी घ्या. व्हॅलेन्टाईन यांना हे नक्कीच अभिप्रेत नसणार. प्रेमाच्या इतका उथळ आविष्कार त्याला नक्कीच मान्य होणार नाही.

मिंत्रानो अजूनही वेळ गेलेली नाही.या रंगा ढंगातून बाहेर पडा, नको त्या विकृत संस्कृतीला जन्म देऊन पिढीच वाटोळं करू नका. आपल्याकडे बरेच सण आहेत त्यात प्रेम संदेश आपल्या नातेवाईक मंडळीना, मित्राला, मैत्रिणीला देता येतो, पाडवा आहे, दसरा आहे, होळी आहे अजूनही प्रादेशिक सण आहेत पण कमी कपड्यात वावरून आणि अंगाचा कॅनव्हास बनवून त्यावर उथळ संदेश लिहून प्रेम व्यक्त करणं हा अगदी उथळपणा झाला.आपलं शरीर ही सार्वजनिक मालमत्ता बनवू नका कोणताही संत महात्मा मुलांना असा चुकीचा संदेश देणार नाही तेव्हा व्हॅलेन्टाईनच्या नावाने आम्ही शुद्ध मैत्रीला चुकीचं रूप का बरे द्यावे? तेव्हा प्रथम तिज पाहता जीव वेडावला अस वाटल, तरी वेडे चाळे न करता तुमच्या आचरणातून तुम्ही तिला जिंकून घेऊ शकता.

माझ्या सर्व चिरतरुण मित्रमैत्रीणींना या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मैत्री दिवस साजरा जरूर करा पण शुद्ध मनाने त्याला वासनेचं आणि सक्तीच गालबोट न लागता हीच सदिच्छा.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

4 thoughts on “प्रथम तुज पाहता

  1. Sachin Shinde

    खूप छान!!

  2. Kaustubh Vivek Thakur
    Kaustubh Vivek Thakur says:

    एकदम बरोबर लिहीले आहे👌

  3. Sandeep Nagarkar
    Sandeep Nagarkar says:

    खूप छान👍

    1. Kocharekar mangesh
      Kocharekar mangesh says:

      अभिप्रायाबद्दल नगरकर सर, कौस्तुभ ठाकूर ,सचिन शिंदे यांना धन्यवाद

Comments are closed.