बहूरूपी

बहूरूपी

काल अचानक वाटू लागले आपण आहोत निष्णात बहूरूपी
मुलगा, भाऊ, नवरा, वडील, आजोबा सगळी वठवतो खोटीच नाती

बहिण, आत्या, काकी, मावशी, मामी, नणंद, जाऊ, आजी भिन्न अभिव्यक्ती
प्रत्येकीचा वेगळाच दर्जा, कुणी प्रेमळ, कुणी खाष्ट, कुणी तुसडे प्रत्येकिची वेगळी निती

त्यांचे चातुर्य, त्यांची चाल, त्यांचे गुण अन रूप,त्यांचे प्रेम समजून घेण्याची सक्ती
कोणाला किती करावे जवळ अन कोणाला शब्दांत गुंतवत कटवावे याची त्यांना गती

माणसांच्या स्वभावाच्या अव्यक्त, अगणीत, असंख्य जाती
शोध घेतला तरी सापडेल का या भिन्न व्यक्तीमत्त्वात निती?

बालवयात प्रत्येकालाच प्यारी असते जन्मदात्री, जननी, आई
तिचंच धारोष्ण दूध पिऊन मोठे होता, ही त्या नियंत्याची इच्छा अन भलाई

तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते, तुम्ही औक्षवंत व्हावं पदोपदी म्हणते
ईडा पिडा दूर टळो म्हणत, तुमच्यासाठी भगवंताला साकडं घालते

पदरानेच तुम्हाला पुसते, वारा घालते अन तुमच्यासाठी अंगाई गाते
तुम्ही गुणवंत व्हावं, यशवंत व्हावं म्हणून तुपाचं निरांजन देवाला लावते

तुम्ही मोठे होता तेव्हा तुमच्या यशाने तिला आभाळही ठेंगण वाटते
मनाशी आठवा, तुम्ही गुणी व्हावं, चांगलं वागावं याशिवाय काय मागते?

मोठे होताच मात्र तुम्हाला तिसरच कुणी आवडत अन आई मागे पडते
ती तुमच्या वाग्दत वधूचही, पोटच्या मुलीप्रमाणे स्वतः ला विसरून सगळच करते

पत्नीचा चांगला नवरा होण्यास तिची कुठे तुम्हाला काही हरकत असते?
तुम्ही बहूरूपी, मुलाचा मुखवटा टाकून नवरोबा बनता ती गाली हसते

आता तुम्हाला दिसत नाही बहिण, नाही दिसत कष्टाने वाकलेला बाप
एकत्र कुटुंबातील फायदे सगळ्यांना हवेत पण नको जबाबदारीचा ताप

हसतं खेळतं घर, पहाता पाहत एकलकोंड बनतं अन शांततेत हळहळतं
आईच ती, हे सर्व पाहता तिच्या काळजात होत चरर् अन ह्दय तिचं तळमळतं

ती मुलाला एकांती सांगते, बाळा माझ्या सुनेला मुळीच दुखवू नको
तिला वेगळं रहावस वाटल्यास, आईमध्ये गुंतून तुझ सुख हरवू नको

त्याच्यातला बहूरूपी होतो जागा तो पकडतो तिच्या अचूक शब्दाचा धागा
बळेबळेच सांगतो, आई तुला सोडून मी कसा जाऊ तुझ्या चरणाशी माझी जागा

मुला आता तू माझा मुलगा असलास तरी तिचा प्रथम आहेस पती
तुझे कर्तव्य आणि कर्तृत्व यांची दिव्य मशाल आता तुझ्या पत्नीच्याच हाती

मी रूसणार नाही अन काही मागणारही नाही आई म्हणजे तुझ्या समईतील वाती
तुझ्या भाग्याचा मला नक्कीच असेल अभिमान आईला तुझ्या सुखाचीच परती

ते ऐकून त्याच्या मनातील बहूरूपी सुखावला अन आईच्या कुशीत विसावला
पहाता पहाता पत्नीच्या मोहजालात शिरला अन जन्मदात्रीपासून दुरावला

मित्रांनो आपण कितीही अवस्थांतर केले तरी आई ही आईच रहाते
तुमचे सुख, तुमची प्रगती, तुमचा धावता अश्वमेध ती स्वप्नातही पहाते

आईवर निस्सिम प्रेम करणाराही गरज भासताच तिचं काळीजही मागतो
बहुरूपी रूप बदलून कला सादर करतांना सांगा कधी का स्वतःचा उरतो?

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

2 thoughts on “बहूरूपी

  1. Bhosle R. B.

    छान कविता सर

    1. Mangesh kocharekar
      Mangesh kocharekar says:

      धन्यवाद, भोसले सर.

Comments are closed.