भरपाई

भरपाई

गेल्या वर्षी अल निनोनं, नो नो म्हणत पळ काढला म्हणून बरं झालं. या वर्षी उशीरानं पाऊस आला, पाऊस वेळेत येईल असा क्लायमेटचा अंदाज होता, म्हणून अपुऱ्या पावसावर पेरणी कशीबशी आटोपली. जुलै महिन्यात आठ दिस ओत ओत ओतला. कोंब जमिनीतच कुसला. मोठ्या मुश्कीलीन पूना रोपं लावली,मध्यंतरी न्हाय म्हणायला चार दोन सरी पडल्या म्हणून शेत कसबस तग धरून होतं पण आता ऑगस्ट संपत आला तरी चार थेंब पडले नाही तस डोळ्यात पाणी भरून आलं. नारळी पौर्णिमा म्हटलं म्हणजे कोळी समाज दर्यावर त्याला नारळ द्यायला जाणार आणि खूप म्हावर मिळू दे आणि माझ्या धन्यावर तुझी किरपा राहू दे म्हणत नारळ अर्पण करणार हे ठरलेलं. दोन वर्षापाठी थोरला भाऊ गेला तेवापास्न राखी पौर्णिमेला कुठ जायाचं नव्हतं. तरीपण सणाच्या मुहूर्तावर चार सरी लागल्या नाहीत अस कधी झालं न्हायी. वावरात कुळपणी करतांना त्यानं सूर धरला न्हाई अस बी कधी बघितलं नाही. काय काय वस्त्यावर पिण्यासाठी टँकरन पाणी आणाय लागतं, आमच्या जिमिनीला पाणी हाये म्हणून तेवढी वाईट परिस्थिती न्हायी आली तर जिथपासून पाऊस पडं ना झालाय, झोप उडाली. आता वावराच कसं हुणार चिंता हायच की. शेतासाठी सोसायटीचं कर्ज काढलं फिटायच कसं?

वरून तापाय लागलं तस इवलाली रोपं धापा टाकाय लागली. ते बघून काळजात गलबललं. आडात थोडफार पाणी होतं ते टीपरीन काहाडलं आणि पिंपात भरलं. दोन पोरगी आणि धनी बादलीत पाणी घेऊन कोकोकोलाच्या बाटलीन त्या भेंडीच्या रोपायना चार चार थेंब घालीत होते. ती मरू नये म्हणून झगडत होतो. जीवाला गरमीन काहिली लागली होती. पर एकर भर प्लॉट बाटलीच्या पाण्यानं शिपाय वगुत लागणारच की. जिमीन गरम झाली. टाकलेलं पाणी पाच मिनीटात सुकाय लागलं. काय काय रोपं मर्दावानी फिरुन उठून उभी ऱ्हायली पर काय काय रोपायना जीवच नव्हता. उठाय ताकद नव्हती म्हणा. ते पाहून काळजाला पिळ पडला. माह्या पोरींन एका टोपलीत भाकर, कांदा आणि पाण्याची कळशी आणली होती. भाकर खाल्ली पण रोपाना पाणी न्हाय बगून पाणी प्यावं वाटना. भाकर घशाखाली उतरना म्हणून मंग दोन घोट घेतलं. धनी माझ्याकडे पाहून कसं नुस हसले, “शारदे पे की पाणी. पाण्या बिगर जेवलीस त ठसका लागलं की, जरा जपून पे, पाठी ऱ्हायलं त एखादं रोप जगल.”

सुकाळीचा येतो तेवा बदा बदा ओततो, सगळं वावर काळी सकट धुवून नेतो, आणि जिमिनीला पायजेल तवा अगदी ढिम्म हलना होतो. आडातलं पाणी किती दिस पुरलं? अशी नशिबाची परीक्षा घेणं बापाला शोभत का? या एकरभर जिमीनीच्या तुकड्यावर सहा डोकी पोसायची म्हंजे गंमत हाय होय! आता कोणाच्या वावरात कामाला जावं तर कामच न्हाई.

आज सणाची शाळला सुट्टी म्हणून दोनी पोरं मदतीला आली. उद्या ह्ये काम दोघांनी करायच म्हंजे लय अवघड, वेळेत भाकर तुकडा न्हाय दिला तर म्हतारं कावतं, ते बी काय करेल? पोटात भूकेचा आगडोंब पेटला की काय सुदरत न्हाई. जवारी अजुन उभी हाय पण पोटरं फुटाय लागली आणि ह्यो काळतोंड्या नक्की कुठ उलथला कळाय मार्ग नाही. अँग्रोवनची मानसं फोन घेई ना झाली. ती तरी काय सांगतील? आभाळात कुट बी ढग नंदरला न्हाई दिसत चार गोवऱ्या पेटवून बघाय पायजे.

ती मुश्कीलीने उठली. डोक्यावर पदर घेऊन सभोवती फिरून तीन पाह्यलं आणि नंदरला एक काळा कुट्ट ढग पळत येतांना तिला दिसला. तीन हात जोडले, त्या विठ्यांन माज ऐकलं, “धनी धनी लवकर हित या बगा बगा केवढा मोठा ढग आलाय.” ती ओरडत होती पण तीचा आवाज त्याच्या पर्यंत पोचत नव्हता. तिचे हातवारे पाहून तो जवळ आला ती हात वर करून दाखवीत होती तिथं आभाळाकडे त्याने पाहिल.आभाळात कुठेही काही दिसत नव्हतं. तो समजला डोस्क्यात पावसा बिगर काय बी न्हाय. डोस्क तापलया म्हणून भास होत्यात. त्याने तिला आधार देत खाली बसवण्याचा प्रयत्न केला, “शारदे लय थकलीस तू खोपीत घडीबर बस म्हंजे बरं वाटलं.” त्याने खोपीच्या दिशेने चालण्याचा प्रयत्न केला ,पण ती त्याच्या अंगावरच कोसळली.

दोन्ही पोरं धावत जवळ आली, “आई, आई ,नाना आई अस काय करती? तिघांनी मिळून तिला खोपीत नेली. बाटलीतलं पाणी तिच्या चेहऱ्यावर मारल तसं तिने डोळे किलकिले करून पाहिलं. “शारदे, घे, दोन घोट पाणी पी म्हंजे बरं वाटल.” तो तोंडात बाटलीच पाणी थेंब थेंब देईपर्यंत भणाणत वारा आला आणि खोप हवेत उडाली. बदाबदा पाऊस कोसळाय लागला. वाऱ्यांन खोपी बरोबर पोरबी न्हेली. त्याचा श्वास अवघडला. “यमुनेsss, हणम्याsss, यमुनेsss, हणम्याsss” पोर ओ देईनात,त्यानी शारदेकडे पाहिल ती डोळे उघडे ठेवून पहाते अस क्षणभर वाटलं, त्याने तीला गदागदा हलवली, ती प्रतिसाद देईना, त्याच्या लक्षात आलं भितीने ती दूरच्या प्रवासाला निघून गेली होती. त्याने हंबरडा फोडला पण घशातून आवाजच येईना. त्याने व्याकूळ होऊन हाक मारली, शारदे sss हवेतच विरलं. तो निपचीत तिच्या बरोबर पडला. मुलं दूर कुठतरी पडली होती. ती उठून उभी राहीली, खोपीच्या जागेवर थोडी पडझड दिसत होती. ती त्या पावसात नाना, नाना करत ओरडत आली. खोपीच्या जागेजवळ पोचली. तिथल दृष्य पाहून गोठून गेली, आई आणि नाना एकमेकांना घट्ट मिठी मारलेल्या अवस्थेतच होती. पोरांनी टाहो फोडला. “नानाs s s ,आईs s s,आईs s s नानाsss” दोनी पोरांना पोरकी करून दोघबी काळ्या आईच्या कुशीत निवांत पडली होती. पोरांनी टाहो फोडला पण त्या रानात ऐकायला कुणी बी नव्हतं. पावसान पिक वाचवण्याच्या मोबदल्यात दोन जीव भरपाई घेतले होते. कोकोकोलाच्या बाटल्या आडव्या तिडव्या पडल्या होत्या अन एक बाटली नानाच्या हातात घट्ट धरलेली होती.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

One thought on “भरपाई

  1. मिलिंद चव्हाण
    मिलिंद चव्हाण says:

    मस्त ,लय भारी

Comments are closed.