माझा धनी

माझा धनी

सांजावला दिस, गायीगुरे गोठ्याकडे, धनी परतला नाही, काळजात धडधडे
रोजंदारीचे काम त्याला, कधी झाडावर चढे, कधी तासतो चिरे गिरवी कष्टाचे धडे

कमरेला त्याच्या आकडी, त्यामध्ये कोयता, कानाला कधी विडी,
कधी तोंडात पान विडे
कधी तासतो अंगण, बांधतो वृंदावन, हाती येता पैसे भरे मन, आणी पोरांना लाडू खडखडे

गावाकडे जुने घर, ना पलंग ना सोफा, असाच जुना माझा खोपा तरी जीव माझा जडे
कधी नेतो बाजाराला, घेतो सर्वांना कपडे, नाही त्याच्यासाठी काही परी मला जरीकाठाचे लुगडे

धा गुठ्यांची वाटणी, त्यात खंडीभर भात, चार महिन्यात सरते
चालावे कसे गाडे?
शेती नावावर यांच्या, नाही फुकटाचे रेशन, खोटे करूनी जगावे
यांचे मन नाही वेडे

उठूनीया सकाळी गायीची धार काढे, शिंपतो झाडे पेडे, कष्टाचे कधी न त्याला वावडे
म्हणे घेईन स्कुटर, झिजवतो सध्या जोडे, चार मैलाचे अंतर, पायास त्याच्या भगदाडे

घरी म्हातारा-म्हातारी, त्यांना औषधाची जोड, झाली अधू नजर
एकलाच बडबडे
म्हातारीला कंबर दुखी, देते दाबून तिंदा, लक्षात काही राहेना, रोजच ती तोंड सोडे

पोरे जातात शाळेला, बाई शिकवती धडे, भिंती ठेवल्या लिहून बाप उगाचच ओरडे
त्यांना शिकवावे वाटे, वेळ जातो कुठे कळेना? काम कसे सरेना
रोजचं पडे कोडे?

चार भावांच्या पाठीवर, धन्याचा जन्म, सारे उडूनी गेले, यांच्या पायात घातले खोडे
दिरांची मुले शहरात, गती शिक्षणात, झेडपीची शाळामाझ्या मुलांच्या नशिबी खेडे

सणवाराला भरे घर, वाटे भावांचा आधार, चार दिसांची दिवाळी
सुखाचे जणू स्वप्न पडे
चार पैसे खर्चून जाती, म्हातारीच्या नोटा हाती, उरली बाकी वाण्याची, धनी झिजवतो जोडे।

घरासाठी त्याचे कष्ट, दिन रात राबतो, सांजचा बसुनी, झाडूसाठी
झावळी तोडे
घरधन्याला दे आयुष्य, त्याच्या कष्टाला दे हात, भगवंता दारी तुझ्या मी घालते साकडे।

असा माझा रांगडा धनी, त्याला भजनाची आवड, महाशिवरात्रीला पिंडीवर घाली कावड
नाही कष्टाचे भय मनी, नाही कुणाचा दुस्वास ध्यानी, राबूनी घालतो संसाराची सांगड।

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *