मैफिल

मैफिल

नाना बोडस, अभय नाडकर्णी, दादा सामंत, अस्लम शेख, संतोष पवार, कृष्णन अय्यर, दाजी पाटील आणि व्हिक्टर फर्नांडिस हे सर्व सह प्रवासी मिळून ग्रुप बनला होता. कधी बोडस तर कधी नाडकर्णी कल्याण रिटर्न यायचे त्यामुळे डोंबिवलीला ग्रुपला हमखास जागा मिळायची. गेले कित्येक वर्षे त्यांचा ग्रुप आणि मैत्री अबाधित होती. दरम्यानच्या काळात डोंबिवली होम प्लॅटफॉम बांधला गेला. डोंबिवली व्हिटी लोकल सुरू झाल्या तरी त्यांची मैत्री अभंग राहिली. आज अचानक बोडस गेल्याचा मेसेज कोणीतरी टाकला आणि तिसरा रविवार असूनही ग्रुपने ठरल्या वेळी भेटायच ठरवलं. तसं नाना बोडस निवृत्त होऊन वीस बावीस वर्ष जगला होता. पण ग्रुपचा तो सिनियर सदस्य होता. गेले कित्येक वर्षे दुसरा आणि चौथा रविवार आणि साडेदहाची भेटण्याची वेळ त्यांनी कधी चुकवली नव्हती. पूढच्या म्हणजे चौथ्या रविवारी बोडस नसणार ही भावनाच मनाला पटत नव्हती.

बापट आता ग्रुपमध्ये नव्हता पण बापटच्या मुलीच्या लग्नाला सर्व चिपळूनमध्ये सुट्टी काढून चार दिवस जाऊन आले. तेव्हा बापटच्या म्हाताऱ्या वडिलांना वाटलेलं समाधान त्यांच्या डोळ्यात सगळ्यांनी पाहिलं. ना त्यांनी कोणाची जात विचारली ना धर्म, मैत्रीला कसला धर्म आणि जात. बोडस गेल्याचा मेसेज नाडकर्णीने बापटला केला आणि वेळ काढून बापट त्यांच्या घरी भेटायला गेला.

हा ग्रुप कसा बनला त्याचा किस्सा बोडस ऐकवत. एकदा बोडस आणि सामंत धावत्या लोकलमध्ये चढले आणि एकत्र एकाच सीटवर बसण्याच्या प्रयत्नात बोडस सामंतच्या मांडीवर बसले. सामंत त्यांच्यावर डाफरला, “ओ, मांडीवर काय बसताय?” असं म्हणत सामंतनी बोडसना लोटून दिलं. बोडसनी त्याला ओढून काढण्याचा प्रयत्न केला. लोक आरडा ओरड करू लागले तसा दोघानाही चेव आला. मग शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. लहान मुलं भांडतात तशी,कोणी आधी सीटकडे पाहिलं,कोण आधी सीटवर बसलं यावरून वादावादी झाली. शेवटी निर्लज्ज माणसाच्या नादी मी लागत नाही असं म्हणत बोडस दोन सीटच्या मध्ये उभे राहिले. सामंतला काय वाटलं कुणास ठाऊक? त्यांनी भांडुप येताच बोडसना स्वतः उठून जागा दिली.त्यानंतर दोन तीन दिवसांनी पुन्हा त्याच कंपार्टमेंटमध्ये दोघांची भेट झाली. बोडस हसले. असं दोन चार वेळा झालं आणि ते पक्के मित्र बनले.
डोंबिवली आणि डोंबिवलीकर आणि त्यांच वागणं सगळ अजब गजब त्या वागण्याचा अर्थ काढण्याच्या फंदात कोणी पडू नये.

त्या प्रसंगानंतर एक एक डोंबवलीकर त्यांना जोडला गेला त्यात कल्याणचे बापट आणि पवारही आले आणि पहाता पाहता त्यांचा कधी ग्रुप झाला ते त्यांना कळलं देखील नाही , हे मुबंईत वेगवेगळ्या ठिकाणी कामाला होते, त्यांना जोडणारा दुवा होता तो म्हणजे ही लोकल.
त्यांची मुबंई वरून परतायची वेळ वेगवेगळी होती पण जातांना मात्र कसोशीने ते एकाच डब्यात चढत. बसायला जागा मिळाली तरी बुड घट्ट न ठेवता दुसऱ्याला बस रे! म्हणतं. गाडी लेट झाली की कधीतरी चुकामुक होत असे. मग मोठ्याने हाक मारून त्याची जाग घेत आणि “अरे इकडे ये, इथे ठाण्याला सीट होते आहे.” असं मोठ्या आवाजात निमंत्रण देत. आणि त्याला प्रतिसाद म्हणून मग बोडस असो की पाटील त्या भरगच्च डब्यातून अख्खी गाडी पालथी करून आवाजाच्या दिशेने येत. आपल्यामुळे इतर प्रवाश्यांना त्रास होतोय याची जाणीव तेव्हा नसे.

गर्दीतुन वाट काढतांना घामाघूम होत ते ग्रुप मध्ये पोचले की जाणवे, शर्टाला कितीतरी चुण्या पडलेल्या असत आणि ते ज्या बाजूने वाट काढत आले त्यांनी मागून आय माय काढलेली असे पण ह्यांना मात्र आपण ग्रुप मध्ये परतलो ह्याचा आनंद. बरं प्रत्येक जण वेगवेगळ्या हुद्यावर आणि वेगळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेला असुनही ही मैत्री टिकून होती.बसायला सीट मिळो वा न मिळो ते कोणत्याही विषयावर बोलत. डोंबिवली मधील रस्ते, डोंबिवली पुर्व पश्चीम ब्रीज नसल्याने होणारी अडचण, पश्चिमेला मासळी मार्केट पासून सुरू होणारे भले मोठे गटार, मच्छी मार्केट मधून येणारा वास, मिळणारे महाग मासे,कुलकर्णींचा आकाराने लहान झालेला वडा, मुंबई महानगरपालिका निवडणूक, आणीबाणी ते अमेरिका-रशिया शीतयुद्ध कोणताही विषय वर्ज्य नव्हता. प्रत्येकाला चर्चेत हिरीरीने भाग घ्यायला आवडे आणि मग वाद झडत. प्रत्येकाचा काही ना काही वेगळा विषय असायचा, जसा अभय नाडकर्णी इंदिरा आणि आणीबाणी यावर तुटून पडायचा. तर सामंत महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराविषयी बोलला की दाजी पाटील त्याचं कस चुकीचं आहे यावर मोठ्या आवाजात बोलायचा.अस्लम त्याच्या अब्बाजाननी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊनही त्यांना स्वातंत्र्य सैनिकांची पेन्शन मिळत नाही सरकार कस भेदभाव करत यावर तो भरभरून बोलायचा. नाना बोडस गोग्रास वाडी, तांदूळ बाजार, गणेश मंदिर, बावन्न चाळ, जोशी हायस्कूल, चोळे पॉवर स्टेशन आणि भोपरला मिळणारी ताडी अशा कित्येक आठवणी सांगायचे. रविवारी सकाळी यातील काही जण बाजारात खरेदीसाठी दिसायचे. जमलंच तर आनंदाश्रम किंवा अन्य ठिकाणी चहा व्हायचा. आयरेत सगळीकडे हिरवंगार दिसायचं. दाजी पाटीलची ओळख सांगून सामंत स्वस्तात वाडीतली भाजी घेऊन यायचा.

डोंबिवली ट्रेन सुरू झाली आणि डब्यात चढताना होणारे कष्ट कमी झाले. तोवर अनेकांची कौल पडली होती.कोणी निवृत्तीच्या वाटेवर होते तर डायबेटीस, ब्लॅड प्रेशर, हार्ट ट्रबल असे पाहूणे काही सन्माननीय लोकांच्या शरीरात ठाण मांडून बसले होते.अस्लमचा फॅक्टरीत काम करतांना हात गेला होता. तो आता सुपरवायझर म्हणून काम करत होता.

पहाता पहाता ग्रुपचा सिनियर सदस्य बोडस मंत्रालयातून अव्वल क्लार्क म्हणून रिटायर झाला. ग्रुपने त्याची रिटायरमेंट गाडीतच सेलिब्रेट केली. बापट आणि पवार यांची भेट होत नव्हती तरी त्यांना मेसेज करून बोडसांच्या रिटायरमेंट बद्दल कळवले. ते आवर्जून डोंबिवली लोकलला आले. ग्रुपकडुन त्याला शाल, श्रीफळ आणि भेट म्हणून एक छोटी ट्रँव्हलर बँग घेऊन दिली. गाडीत नाश्ता झाला. सर्वांच्या नजरा या कार्यक्रमाकडे लागल्या होत्या. बोडसने चहा फराळाला रविवारी घरी बोलावले.

आता ग्रुपची जबाबदारी दाजी पाटीलकडे गेली,कारण तो ही स्थानिक रहिवासी. रविवारी ग्रुप बोडसांच्या घरी बुके घेऊन गेला. त्यांच्या सौ ने सर्वांच स्वागत केल.बोडसने सर्वांची लक्षात राहील अशी ओळख करून दिली. अगदी पहिल्या लोकल भेटीचा किस्सा सांगितला. सामंत तो प्रसंग ऐकून लाजला. त्याने बोडसच्या पाठीवर थाप मारत.” वहिनींच्या समोर आता काय आमचे कपडे उतरवणार का?”अस मार्मिक विचारलं. छान खेळीमेळीच वातावरण तयार झालं. वहिनींनी सर्वांना पोटभर शीरा, जिलेबी, वडा, नारळीपाक खाऊ घातला. अख्ख कुटुंब ग्रुपच्या सरबराई करीता सज्ज होतं. बोडसचा सर्वांनी मनापासून निरोप घेतला तेव्हा तो म्हणाला, “आता रोज भेट होणार नाही पण दर पंधरा दिवसांनी एकदा सकाळी गणेश मंदिराकडे भेटायला हरकत नाही, भेटायचं का? जो पर्यंत आपण जीवंत आहोत नियमितपणे जमल नाही तरी भेट टाळायची नाही.”
बोडसच म्हणण सगळ्यांना पटलं. हे सांगताना बोडसचे डोळे भरून आले तेव्हा सामंतने जाऊन त्याला मिठी मारली, “मेल्या पुरूषासारखो पुरूष असान रडतस काय? भेटीचा ठरला मां, ठरला म्हणजे ठरला.”

तिथपासून दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी भेट सुरु झाली ती आजतागायत सुरू होती. ग्रुपमध्ये प्रत्येकजण आपल सुख-दुःख शेअर करायचा.आपआपल्या घरातील सुखाचे क्षण याच बाकड्यावर इतर मित्रांचं तोंड गोड करून सांगायचा.मुलाला प्रमोशन मिळालं, मुलगा परदेशी जातोय असे प्रसंग चहाच्या कटींग
सोबत सेलिब्रेट व्हायचे. चार वर्षांपूर्वी दाजी पाटीलची घरवाली गेली तेव्हा ग्रुप त्याच्या आयरेतील घरी भेटायला एकत्रच गेला होता. सामंतचा एकुलता एक मुलगा दोन दिवसांच्या आजारात वारला तेव्हा सामंत बोडसांच्या मांडीवर डोक ठेऊन ढसाढसा रडला होता. तो नुसता ग्रुप राहिला नव्हता तर ते मनाने जोडलेले एक कुटुंब बनले होते. व्हिक्टर नाताळ नंतर नक्की केक आणायचा आणि सांगायचा “व्हेजिटेरियन है यार, बिनधास्त खा लो, मुझे पता है तुम लोग एग पसंद नही करते.” मैत्रीत कधी धर्म आला नाही.

बोडस वडिलकीच्या नात्याने अनेकदा इतरांना चांगल तेच सांगायचा. वर्षातुन एकदा, दोनदा ते पिकनिकला जायचे. जुन्या गाण्याची मैफल जमायची, महम्मद रफी, मन्ना डे, महेंद्र कपूर, तलत मेहमुद, किशोर यांची जुनी फर्माईश होत गाणी म्हंटली जायची. ड्रिंक घेतल की गाण्यात रंगत यायची मग, ये दुनिया ये मैफिल, आयेगा, आयेगा आनेवाला, ऐ दुनिया के रखवाले तेरी दर्द भरी, हमे तुमसे प्यार कितना, पत्थर के सनम, आदमी मुसाफीर है,तेरी दुनिया मे आके अशी कितीतरी गाणी म्हटली जायची. बापट मधून मधून जेवण गार होतयं अशी आठवण करून द्यायचा. समोरचा ग्लास आणि चखना संपलं की हळूहळू नशा हाबी व्हायची. रमत गमत जेवण उरकलं की पथारी पसरून झोपी जायचे. सर्व कधीतरी घेणारे असल्याने, अंदाज असा नव्हता, कुणाला दोन पेगच जास्ती व्हायचे, त्या नशेत तो काहीही बोलून जायचा. कुणीतरी म्हटलं आहे एकदा दारूने शरीराचा ताबा घेतला की माणूस डुक्कर होतो. बापटमुळे कोणी दोन तीन पेगच्या वर जात नव्हते. सामंत डेरींग करून बिअर प्यायचा हीच बातमी मोठी.

घेतल्यानंतर कोण कस वागलं त्याचे किस्से आठवडाभर पुरायचे. बापट पिकनिकला आला तर चखना चरायचा, पण मैत्रीच्या शपथेनंतरही तो कधी अगदी बिअरलाही शिवला नाही. शिवला नाही ते एक अर्थी बरचं झालं, कोणी तरी सर्वांची काळजी घ्यायला हवाच होता. सगळं लिमिटमध्ये असायचं पण तरी कुणाला चढण्यापूर्वी बापटच, पुरे, पुरे करायचा. त्याला न पिताच चढायची.उगाचच ग्रुपवर डाफरत बसायचा. “रांडेच्यानो फक्त प्यायला आलाय की काही बोलाल.” ही शिवी देऊनही कोणी मनावर घ्यायंच नाही, मनावर घ्यायला ते मोकळे नसायचे,हातात ग्लास आणि तोंडी गाणं. काही असो पण पिकनिकला गंमत यायची सगळी बंधन तुटून पडायची.खाजगी गोष्टींची वाच्यता इथच व्हायची. आपला साहेब हलकट आहे, सेक्रेटरीला बोलवून उगाचच पायाला पाय लावत बसतो, याचा शोध दोन पेग पोटात गेल्यानंतर बोडसला लागायचा.

कधीतरी अय्यर आणि सामंतमध्ये जुंपायची. सामंत उगाचच अय्यरची फिरकी घ्यायचा आणि उगाचच त्याच्या ग्लासमध्ये ओतण्याच नाटक करायचा. तापट डोक्याचा अय्यर त्याला शीव्या घालायचा. त्यांच भांडण सोडवताना नाकी दम यायचा. या भांडणात चार दोन तमीळ शब्द सगळेच शिकले. आठ पंधरा दिवसांनी कधी राजकरणावरून ग्रुपमधील कोणाचीतरी लठ्ठालठ्ठी व्हायची, दोन दिवस एकमेकांशी बोलण बंद असायच अन मग अचानक काही फालतू जोकवर दोघे खळखळून हसायचे, एकमेकांना टाळी देत पॅच अप करायचे. सगळच बाष्कळ, सगळं अल्लड.

आज बोडसच्या निधनाच्या बातमीने सगळे हेलावून गेले होते. क्षणभर सगळे स्तब्ध होते. ती काही सार्वजनिक शोकसभा नव्हती. सगळ्यांच्या मूक भावना एकमेकांना कळत होत्या.डोळ्यात अश्रू होते. ही कोंडी फुटायची कशी? असे वाटतं असताना सामंतला हुक्की आली आणि तो म्हणाला,”बोडसना भेटायला मी जाणार आहे, तुमच्यापैकी कोण येणार का? “

अय्यरने त्याच्याकडे रागाने पाहिलं तस तो म्हणाला,”मी बोडसच्या घरी त्यांच्या फॅमिलीला भेटायच म्हणतोय, स्वर्गात नाही. स्वर्गात तो एकाच सीट वरून पुन्हा भांडेल, त्याचा काय भरोसा?” व्हिक्टर हसत म्हणाला, “सामंत साला तुला स्वर्गात कोणी घेईल का?”सामंत म्हणला, “स्वर्गात जायचा सोप्पा रस्ता आहे,एक पेग मारला का आपोआप जायला होतं, कोणी नेण्याची वाट का बघायची?”

चर्चा नको तिकडे जाते पाहून अभय नाडकर्णी ओरडला, “यार आपण जमलोय कशाला आणि करतोय काय? या सामंतला थोडी जास्त अक्कल ईश्वराने दिल्याय. बोडसच्या घरी भेटायला जायच असेल तर तातडीने जाऊ.” मग लगोलग ते बोडसच्या घरी जाऊन आले कोणीच काही बोलत नव्हतं. सगळ्यांना ते जड गेलं. अखेर वहिनींच बोलल्या, “एकही दिवस असा गेला नसेल की त्यांनी ग्रुप मधील कुणाची न कुणाची आठवण काढली नाही. खूप संसारी होते, शिस्तबद्ध जीवन जगले.तुम्ही सर्व भेटायला आलात त्यांच्या आत्म्याला समाधान मिळेल.” या अशा प्रसंगातही शब्दाविना कळले सारे शब्दांच्या पलिकडले म्हणावस वाटत याला काय म्हणावं. निघतांना पून्हा म्हणाल्या, “ते देहाने गेले तरी मनाने याच घरात आहेत घर टाकू नका.” सर्वांचे डोळे पाणावले.

अस्लमच्या बेगमंच हॉस्पिटलमध्ये निधन झालं तेव्हा याच बाकड्यावर सगळे भेटले होते. अस्लमने बेगमच्या मृत्यूनंतर लदोन महिन्यात वयाच्या पन्नासाव्या वर्षी पुन्हा निकाह लावला आणि त्याची पार्टी जाहीर केली तेव्हा हसावं की रडावं हेच ग्रुपला कळेना. अभय नाडकर्णी गंमतीने शेखला म्हणाला होता,”यार अस्लम, तू बुढ्ढा हो गया अब दुसरी शादी क्यो कर रहे हो?”
तर अस्लम म्हणाला,”मेरे खातीर थोडी ना कर रहा हू, यार, बेगमके चार बच्चे है,उन्हे कौन देखेगा, उन्हे नही देखुंगा तो बेगमको जहनुम मे भी शांती नही मिलेगी.” त्याच वाक्य पूर्ण होण्या पुर्वी फाटक्या तोंडाचा सामंत म्हणाला, “यार तेरा कुच भरोसा नही, दुसरे बिबीके बच्चे देखनेको तू तिसरा निकाह भी कर लेगा.”

गणेश मंदिरा बाहेरील बाकडा दर दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी कधी खळाळून हसत होता. तर कधी दुःखात बुडत होता. कधी कटिंग सोबत एखाद्या रविवारच्या ट्रिपच नियोजन करत होता तर कधी कुणाच्या घरी प्रासंगिक भेट देण्याच निश्चित करत होता. करोना काळात सामंत आजारी पडल्याची माहिती मिळाली पण त्याला जाऊन भेटणे शक्य नव्हते. सगळ्यांनी साठी ओलांडली होती आणि संसंर्गाचा धोका अधिक होता तो अत्यावस्थ ऋग्णशय्येवर असून त्याला मदतीची गरज आहे कळताच येथे भेटायचं ठरवूनच त्याच्यासाठी मदतीची रक्कम जमा करून त्याच्या खात्यावर जमा केली. या मदतीबद्दल कोणी चकार शब्द काढायचा नाही असं याच ठिकाणी ठरले. करोना गेला आणि सारे काही सुरळीत झाले. सामंतने एक दिवशी सगळ्यांच्या गूगल पे अकाऊंटवर पैसे पाठवून दिले. सगळे संतापले,दाजी पाटीलने पुढच्या रविवारी त्याची जाहीर खरडपट्टी काढली, “सामंत भडव्या तू आपल्या मैत्रीवर थुंकला आहेस. हे बरं नाही केलंस. एवढा पैशाचा माज बरा नव्हे.”

सामंतने सर्वांची जाहीर माफी मागितली आणि म्हणाला,”सॉरी यार, मी माझ्या मिसेसला सांगत होतो पण ती म्हणाली आपल्याला वेळेला त्यांनी मदत केली,आता आपल्याकडे पैसे आहेत मग मित्रांचे दिलेले बरे, चूक झाली माफी असावी.” विषय संपला, सामंतने सगळ्यांना आलिंगन देऊन विषय संपवला. सामंत करोना नंतरच्या वर्षी रिटायर झाला. याच बाकड्यावर त्याच्या सेंड ऑफ पार्टीची डेट ठरली. त्याच्या घरी एक रविवारी सगळे मित्र जमले.कोकणी पदार्थांची रेलचेल होती, आंबोळी, खापरोळ्या, काळ्या वाटण्याची आमटी आणि वडे, ऐलापे. ते पदार्थ पाहून अय्यर खूश झाला, “ये हमारा आयटम तुम लोग कैसे बनाया?”

सामंतला त्याची गंमत करायची लहर आली. म्हणाला
“मेरी वाईफ कन्नड है इस लिये सब उधरका आयटम बनाती है.” अय्यर म्हणाला,”तुम्हारा लव्ह मेरेज है क्या?” ते ऐकून सगळे खो खो हसले. सामंतची बायको बाहेर येत म्हणाली,”मै कोंकणी हू इनको हसी मजाक करनेकी आदत है। आप खाके बताना, ठिक हुवा है या नही.” सामंतनी मुलाला बोलावून ओळख करून दिली.
तो नुकताच जॉबला लागला होता. त्यांनी थोड्या गप्प मारल्या. ग्रुपने आणलेली भेट मिसेस सामंत यांच्या हाती दिली. मुलांने ग्रुपचा फोटो काढला. निघताना सामंत म्हणाला, “मुलगा सेटल झाला की गावी जायचं म्हणतोय. तिथे चार दिवस पिकनिक काढा. पहा कोकण कस आहे ते.” दाजी पाटील म्हणाला, कोंबडी वडे ताजे मासे घालशील तर ठीक. हे मद्रासी खाणं आमी कमी खातो.” सगळे मनमोकळे हसले. सामंत म्हणाला, “या तर खर. एप्रिल मे मध्ये आलात तर आंबे, फणस खायला मिळतील.” दाजी पाटील म्हणाले, “ती गोव्याची फेणी मिळेल का? कशी लागते ती बघायची आहे.” गप्पा संपत नव्हत्या पण अय्यर म्हणाला, चलो “मुझे अय्यपा मंदिर जाना है, मै निकलता हू.” मग सर्वांनी सामंतचा निरोप घेतला. सामंत बिल्डिंग खाली सोडायला आला. सर्वांना मिठी मारत त्यांनी निरोप घेतला. अजूनही दुसऱ्या आणि चवथ्या रविवारी भेट होते. तीच वेळ तोच बाकडा पण हळूहळ ग्रूपमधील संख्या कमी होऊ लागली आहे. न जाणो कधी तरी बाकडा एकाकी असेल जुन्या आठवणीत रमतांना बाकडा स्वतःशी बोलू लागला तर अनेकांचे अनुभव, हितगुज तो लिलया सांगेल. त्यालाही कुणाची तरी सोबत हवी असते. कदाचित दुसरे कुणी येतीलही पण तीच मैफल जमेल याची काय खात्री.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar