गुंता

गुंता

सतरा अठरा वर्षावरील मुलगा उंडगताना दिसला की, ‘तुला कसली चिंता आहे का? मस्त खातोपितोस आणि मजा करतोस.’ असे उद्गार आपण मुलांसाठी सहजच वापरतो. रागाच्या भरात आपण बोलून जातो. मुल लहान असेपर्यंत पालकांच्या काही अपेक्षा नसतात पण पंधरा सोळा वर्षांचा मुलगा अभ्यास न करता उगाचच वेळ वाया घालवू लागला की आपल डोक तापतंच. ज्या वयात मन लावून अभ्यास करायचा त्या वयात नाक्यावर उभे राहून गप्पा मारणाऱ्या आणि उगाचच टवाळकी करणाऱ्या मुलांचा कुणालाही राग येणारच. पण ते एकत्र येऊन नक्की काय करतात हे जोपर्यंत माहिती नाही आपण शेरेबाजी करणे योग्य नाही. म्हणून उचलली जीभ आणि लावली टाळ्याला हे योग्य नाही.

‘रम्य ते बालपण’ किंवा ‘लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा ठेवा’ हे आपण साहित्यिकांच्या तोडंच वाक्य ऐकलय पण काही मुलांच्या बाबतीत परिस्थितीने त्यांच बालपण कुरतडून टाकलेल असते. आज शहरातून रस्त्यावर भिक मागणारी मुल दिसतात, त्यांचे पालक कोण? माहिती नसते. काही लहान मुलं शहरातील छोट्या हाँटेलमध्ये कपबशा धुण्याच काम करतात. काही बुटपाँलीश करतात. तर काही मुलं चक्क पाकिटमारी करतात. मुलं अशी का वागतात? कोण त्यांना अस वागायला भाग पाडते? एका वाक्यात उत्तर आहे परिस्थिती किंवा नियती.

जी मुले अनौरस म्हणून जन्माला येतात किंवा काही कारणाने घरापासून दूर राहतात, त्यांच्यावर कोणतेही कौटुंबिक संस्कार नसतात. त्याचा झगडा हा पोटाचा असतो. मग ही मुले झटपट स्वतःच पोट भरण्याचं साधन स्वतः शोधतात. पुढे जास्त स्मार्ट बनतात. अशाच अनौरस, अनाथ मुलांचे बाँस बनतात, रँकेट चालवतात. शक्य असेल ते अवैध काम करतात. त्यांना माहिती असते पकडे गेलो तर सलाखोंके पिछे सडना पडेगा। पण तोवर व्यवहारी ज्ञान येत. ‘काय द्या आणि चला ‘ त्यांना कळत. हा गुंता त्यांनी निर्माण केलेला असतो आणि तो सोडवतात देखील तेच. पण कधीतरी आणखी कोणाच्या तरी हातातल खेळण बनतात आणि मग त्याचे नाही ऐकले तर मामला खतम्.

काही वर्षांपूर्वी दादरच्या ब्रिजखाली समाजाने नाकारलेल्या अशा भटक्या मुलांसाठी सामाजिक संघटना शाळा चालवत होती. प्रचलित शिक्षणापेक्षा या मुलांना जगण्याची कला शिकवणे गरजचे होते, याच उद्देशातून अक्षर ओळख आणि आरोग्य शिक्षण याबद्दल त्यांना मार्गदर्शन करतांना, या मुलांना विविध कला शिक्षण दिले जात होते. रस्त्यावर सिग्नलला उभे राहून भिक मागण्यापेक्षा कौशल्ये शिक्षण देऊन स्वावलंबी बनवणे हा या संस्थेचा उद्देश होता. बरेचदा हाऊस किपिंग ते प्लंबर अशी छोटी छोटी कामे करण्यासाठी आपल्याला योग्य व्यक्ती मिळत नाही. जर या मुलांना या प्रकारचे शिक्षण दिले आणि अर्थातच कामही संघटनेच्या माध्यमातून मिळवून दिले तर चोरीमारी न करता पोट भरण्यात ते यशस्वी होतील आणि त्यांना पूढील रस्ता मिळेल.

तुम्ही आम्ही ज्या काळात वाढलो,गरीबी तर होती पण आव्हान नव्हते. म्हणजे खरे तर आपल्या लहानपणी सामान्य किंवा सर्वसाधारण कुटुंबात सारखीच परिस्थिती होती. पालक मुलांच्या शिक्षणाबाबत फारसे जागृत नव्हते. मुले शाळेत गेली तरी पालकांना ती कोणत्या इयत्तेत आहेत? माहिती नसे, वार्षिक निकाल लागल्यावर मुलगा किंवा मुलगी पास झाली यावर पालक समाधानी असत त्याला किती टक्के गुण मिळाले? यापेक्षा त्याचे वर्ष वाया गेले नाही यावरच ती समाधानी असत. त्यामुळे सर्व मुले शाळेतील अभ्यास शाळेत आणि फार तर गृहपाठ घरी करत. उरलेला वेळ हा मित्र, मैत्रिणी खेळण्यात व्यतीत करत. पालकांना टेन्शन नव्हते आणि मुलांना तर नव्हतेच नव्हते. फारच तर एखादा विद्यार्थी त्याच वर्गाची वारी करायचा पण त्याला आपल्याला कोणी टोमणे मारतील हसतील याचे टेंशन नसायचे. पालकांना वर्ष वाया गेले याचे दुःख असले तरी त्याचा पाया कच्च्या राहून वरच्या वर्गात टाकून काय उपयोग ? असे म्हणत पालक स्वतःचे समाधान करायचे.

तेव्हा पालकांना मुलाच्या जन्माबरोबर कोणत्या शाळेत प्रवेश घ्यायचा?CBSE, ICSE, SSC हा प्रश्न पडत नव्हता. हे पर्याय उपलब्ध नव्हते. एकदा झेडपीच्या शाळेत मुलांना प्रवेश घेतला की ती गावातील एकुलत्या माध्यमिक शाळेत शिक्षण पूर्ण करून मोठ्या गावातील किंवा तालुक्यातील कॉलेजमध्ये पालक सांगतील त्या शाखेत प्रवेश घेऊन आपले पुढील शिक्षण पूर्ण करत. एखाद्या ठिकाणी नोकरी करू लागत. आता सारख्या एंट्रन्स परीक्षा नव्हत्या, कोटाला पाठवण्याची गरज नव्हती, लाखो रूपये फी भरण्याचे टेंशन नव्हते. टोफेल, गेट ,जीआर ई स्पर्धा परीक्षा नव्हत्या. त्यामुळे मुलांना रेसच्या घोड्यासारखे धावावे लागत नव्हते. मुले टेंशन घेऊन आत्महत्या करत नव्हती. घरून टार्गेट नव्हते. मुलाचे किंवा मुलीचे लग्न जुळवल्यानंतर मानापमान नाट्य नव्हते. हुंड्यासाठी छळ नव्हता. मुलगी झाली म्हणून सुनेला माराहाण नव्हती. जीवन साधे सरळ होते.

आता शासन पाठ्यपुस्तके फुकट वाटते,काही महानगरपालिका पाठ्यपुस्तके, वह्याच नव्हे तर अगदी दप्तर, रेनकोट, सायकल आणि माध्यान्ह भोजनही फुकट वाटते. पण म्हणून अभ्यासात प्रगती झाली, मुलं गुणी झाली अस झाल्याचे ऐकिवात नाही. प्रगती झाली असलीच तर कोणताही मोबाईल सहज हाताळण्याचे कौशल्य सर्व मुलांमध्ये आले आहे. तेव्हा कोणत्याही सवलती वा लाभ मिळत नसताना मुलं शिकतच होती. यातूनच डॉ. आंबेडकर, शास्त्रज्ञ जयंती नारळीकर, शास्त्रज्ञ डॉ. माशेलकर, अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव आणि असेच कित्येक नामवंत घडले. तेव्हा दुर्दैवाने घरात एखाद्या अपंग मुलाने जन्म घेतला तरी पालक त्यासाठी विशेष शाळेची चौकशी करण्यासाठी प्रयत्न करतीलच ही शक्यता कमी होती. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना केवळ दैवावरच विसंबून रहावे लागत होते. तेव्हा या विद्यार्थ्यांसाठी विशेष शाळा नव्हत्या. आज रोटरी सारख्या सामाजिक संस्था आणि शासनही, शारीरिक अपंगत्व असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काम करत आहे. अर्थात ती सामाजिक जबाबदारी आहेच. शारीरिक विकलांग विद्यार्थ्यांसाठी आरक्षण सोय आहे.

आजच्या पालकांना चिंता आहे ती मुलाच्या प्रवेशाची. अगदी बालवर्गातील प्रवेशासाठी पालकांचा इंटरव्ह्यू घेतला जातो, लहानग्या मुलाचा इंटरव्ह्यू घेतला जातो. या लहान मुले अनोळखी व्यक्तीच्या समोर आली की घाबरतात मग बालवाडी व्यवस्थापक, तुमचे मुलं काही बोलत नाही, आम्ही त्याला प्रवेश देऊन दुसऱ्या मुलाची संधी का नाकारावी? साधा सरळ प्रश्न, तुमची दांडी गुल. मग पालक गयावया करतात आणि व्यवस्थापक निर्लज्जपणे डोनेशनची मागणी करतात. पालक नाईलाज म्हणून डोनेशन देतात तेव्हा कुठे प्रवेश मिळतो. त्या डोनेशनचा आकडा हा शाळेच्या रँकवर ठरतो आणि रँक त्या शाळेतील सुविधांवर ठरते. प्रवेश मिळाल्याने प्रश्न सुटत नाहीत तर सुरू होतात, प्रथम त्याला शाळेत कोणी सोडायचे यावर काथ्याकूट होते. ज्यांच्या घरात आजोबा, आजी नाही, त्यांच्यासाठी हा प्रश्न गहन ठरतो.

खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेची वह्या पुस्तके, ड्रेस, स्कुल बँग कुठून घ्याव्यात शाळाच ठरवते. आज प्रत्येक शाळेची विद्यार्थी वाहतूक व्यवस्था आहे. अशा प्रकारे खाजगी शाळा पालकांची लूट करत असते. त्या वाहनापर्यंत पालकांना आपल्या मुलाला आणून सोडावे लागते. या मुलांना त्या वाहनात कशी ट्रीटमेंट मिळते व कधीतरी काय होते ते हळव्या आईबाबाच्या वाचनात आले तर मग जबाबदारी आणखी वाढते.या मुलांच्या आई बाबाला आपल्या कार्यालयात वेळैवर पोचायची टांगती तलवार असतेच. लोकल वेळेवर असणे, त्यात चढायला मिळणे या गोष्टी आल्याच.या वेळेस काहीही होऊ शकते.

प्रवेशानंतर पालकांना मुलाच्या अभ्यासाची चिंता सुरू होते. तो अभ्यासात पाठी राहू नये म्हणून सतत सजग राहावे लागते. मुलांचा अभ्यास कोणी घ्यायचा यावरून वाद होतोच. त्यात मुलं शार्प असेल तर प्रश्न नसतो पण आकलनशक्ती कमी असेल तर पती पत्नीत ब्लेम गेम सुरू होतोच. प्रत्येक पालकाचे लक्ष आपल्या मुलांकडे असतेच पण आपल्या मित्र किंवा मैत्रिणीच्या मुलाला किंवा मुलीला किती गुण आहेत याकडे जास्त लक्ष असते. त्यामुळे मुलांना सतत स्पर्धा करावी लागते. शर्यतीत बैल पळण्यासाठी त्याची शेपटी पिरगळली जाते किंवा त्याला टोचले जाते तसे पालक मुलांना सतत शाब्दिक बाणाने टोचत असतात. तर कधीतरी पालकांच्या रागाचा पारा फुटला तर मुलाला मार ही पडतो.

खाजगी शिकवणी वर्गात मुलीला पाढे आले नाही म्हणून बेदम मारल्याची बातमी वर्तमानपत्रात आली होती. याचा अर्थ खाजगी शिकवणी घेणारे शिक्षकही पालकांच्या दबावाखाली असतात. “मुलामध्ये प्रोग्रेस दिसत नसेल तर आम्ही तुम्हाला एवढी फी का द्यावी? ” पालकांचा प्रश्न असतो. अन्यथा खाजगी शिकवणी वर्गातील शिक्षिकेचे त्या लहान मुलीशी कोणतेच वैर नसते. दुर्दैवाने त्या शिक्षिकेला अशा मुलांना कसे हाताळावे त्याचा अनुभव नसतो. मुलांचे वय वाढले की शरीरात स्त्रवणारी हार्मोन्स आपला करीश्मा दाखवतात मग मानसिक गुंता वाढतो. मनाला नको त्या गोष्टींच आकर्षण वाटू लागते. अर्थात हा गुंता दिसतो तितका सोप्पा नसतो त्यासाठी समन्वयकाची गरज असते. शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांना त्यांचे प्रश्न कळतीलच असे नाही. पालकांनी त्यांचे शाळेचे दिवस आठवून पहावे म्हणजे ते आपल्या मुलांच्या मागे काय भोग लावत आहेत? ते सहजच कळेल.

मुलांना चिंता आहे, असंख्य विषयांचा अभ्यास करण्याची, स्पर्धेत टिकून राहण्याची, अपेक्षित यश मिळाले नाही तर पालकांच्या प्रश्नांच्या भडिमाराची. आपल्या कुटुंबातील नातेवाईकांची, त्यांनी अभ्यास कसा चाललाय? हा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर काय द्यावे याचीही. आपल्या मित्रांच्या तुलनेत आपण चांगले गुण न मिळवल्याने आपले मित्र आता फटकून वागतील याची भिती मनात असतेच. तेव्हा मुले प्रेशरखाली जगत असतात. त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या मनातील भीती घालवणे पालकाचे काम आहे. जर त्या ऐवजी आपण मुलांवर उगाचच शरसंधान करत गेलो तर तो आत्मविश्वास गमावून बसेल.

अगदी चवथी आणि आठवी इयत्तेच्या स्कॉलरशीप परीक्षा, बोर्ड परीक्षा, उच्च शिक्षण प्रवेश परीक्षा यात चांगले गुण मिळवावे याचे सतत टेंशन या मुलांना असते.नेहमीच मुलं ही गोष्ट आपल्या घरी सांगू शकत नाही याचे कारण त्याला आपल्या घरातील संघर्ष दिसत असतो. तेव्हा लहान मुलांनाही चिंता असते हे मान्य करा.

ज्या कुटुंबात पती पत्नीत विसंवाद असतो आणि काही गोष्टींवरून कधीकधी भांडणे होतात,अशा कुटुंबातील मुले तणावाखाली असतात. ती प्रत्यक्ष बोलली नाही तरी पालकांचे भांडण झाले की त्या दोघांमध्ये जे काही घडते त्याची ती मुक साक्षीदार असतात. कदाचित त्यांच्या मनावर याचा खोल परिणाम होऊन ती अंर्तमुख होतात, डिप्रेशनमध्ये जातात. गिरीश ओक यांच्या कन्येबाबत, ‘गिरिजा ओक’ बाबत हेच तर घडले होते. आता तुम्ही मुलांना कसली चिंता आहे? असे नक्कीच म्हणू शकणार नाही.

आजच्या संगणक युगात तरुण पालकांना मुलाच्या जन्मापासूनच चिंता सुरु होते. त्यामुळे काही तरूण जोडपी मुलांचा विचार करतही नाहीत. लग्न झाल्यानंतर जोडपे आपल्या घरगुती गरजा पूर्ण करत कौटुंबिक प्लँनिंग करुनच मुल जन्माला घालतात. त्यामुळे अपत्याचा जन्म होईपर्यत ते दोघेही तिशी किंवा पस्तीशी पार करतात. पूर्वी मुलांचा जन्म अगदी सहजच घरीच होत असे. आज बदलेल्या सामाजिक व्यवस्थेत अपत्याचा जन्म घरीच होणे हे अडाणीपणाचे लक्षण मानले जाते. वाढत्या वयातील बाळंतपणात गुंतागुंत निर्माण होऊ शकते त्यामुळे नामचित हॉस्पिटलमध्ये पत्नीच्या प्रसूतीसाठी नाव घालण्यापासून ते तिची दर आठवड्यात, दर दोन महिन्यांनी विविध प्रकारची डॉक्टर तपासणी, सोनोग्राफी इत्यादी करणे अत्यावश्यक समजले जाते. या सगळ्या गोष्टींच्या खर्चाचे दडपण जोडप्यांवर असतेच.

प्रसुती, पूर्ण महिने भरल्यानंतर होणे अणि मुलं पुरेशा वजनाचे आणि पूर्णतया निरोगी असणे आवश्यक असल्याने डॉक्टर काळीजी घेतात. यावर जन्मदात्या जोडप्याचा पूर्ण भर असतो. दुर्दैवाने बाळंतपणात काही बाधा आली तर होणारा खर्च अचानक वाढतो आणि नियोजन फसते मग त्या जोडप्यावर ताण तर असणारच. एखाद्या जोडप्याला नैसर्गिकपणे मुलं होत नसेल किंवा बाळंतपणात काही अडचण आली किंवा सोनोग्राफी केल्यानंतर जन्मानंतर बाळात काही व्यंग असण्याची शक्यता आढळली, तर होणारा खर्च हा कित्येक लाख रूपये होतो आणि तितकी आर्थिक तरतूद नसेल तर पालक मेटाकुटीला येतो.

सध्या प्रचलित व्यवस्थेत, मुलाचे बारसे किंवा नामकरण विधी, वाढदिवस, घरच्या घरी करण्याऐवजी मोठया हॉलवर आणि थाटामाटात करण्याकडे कुटुंबाचा कल असतो. मग आर्थिक नियोजन आणि त्याची चिंता आलीच. तेव्हा लग्न केल्या नंतर तो केवळ विधी नाही तर ती जबाबदारी आहे याचे भान बाळगणे गरजेचे ठरते. शहरातील कुटुंबाच्या गरजा आणि शिक्षण व त्यासाठीचा खर्च यामुळे दोघांनी नोकरी करणे आलेच.मुंबई किंवा अन्य मोठ्या शहरात राहतांना तुम्ही स्वतःपुरते जगू शकत नाही, तुम्हाला तुमच्या स्टेट्स चा विचार करून समाज काय म्हणेल याचा विचार करत जगावे लागते.

यात आनंदाची गोष्ट आयटी क्षेत्रातील काही तरुणतरुणींना ‘वर्क फ्रॉम होम’ ची सुविधा असते, तिथे त्यांना थोडी सूट मिळते आणि आपल्या अपत्याकडे लक्ष देता येत. इतर जोडप्यांना मात्र बाळ जन्मल्यावर एक तर सहा महिन्यात डे केअर सेंटर चा आधार घ्यावा लागतो किंवा दोघापैकी एकाला, बहुदा आईला मुलाच्या संगोपनासाठी नोकरी सोडावी लागते. त्यामुळे मुलं झाल्याचा आनंद नीट उपभोगता येत नाही कारण गरजेतून आर्थिक विवंचना सुरू होते.

मग त्या मुलांचे शिक्षण, गुणवत्ता टिकवण्यासाठी धडपड, सुट्टीतील प्रवास किंवा पर्यटन, त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक तरतूद इत्यादी गोष्टींची आखणी करता करता जीव मेटाकुटीला येतो. मग उभयतात अधूनमधून वाद, मतभेद, भांडण ओघाने आलेच. पण तरीही दोघांचा धागा आता मुलांचा विकास, त्यांच्या गरजा हाच असतो. मुले लहान असेपर्यंत ती पालकांच्या विचाराने वागतात पण जशी ती मोठी होतात आणि बाहेरच्या जगाशी त्यांची ओळख होते. मित्रमैत्रिणी मिळू लागतात, त्यांच्या गरजा वाढतात. त्याची पूर्तता करणे पालकांना शक्य झाले नाही तर मुले या गोष्टीसाठी हट्ट करतात. प्रसंगी भांडतात. कधीतरी त्यांच्या छोट्या गरजांची पूर्तता तुम्ही न केल्याचा पाढा वाचला जातो. तुम्ही संभ्रमात पडता.

तुम्ही कशीबशी तरतूद करत मुलांचे शिक्षण दर्जेदार संस्थेत होण्यासाठी पूर्ण प्रयत्न करता पण मुलांना पंख फुटल्यावर आणि पहिल्यांदा घराबाहेर मुक्त वातावरणात जगायला मिळाल्यानंतर अनावधानाने चूका होणारच. ज्याचा परिणाम त्यांची गुणवत्ता घसरण्यावर किंवा चुकीच्या दिशेने त्यांची पावले पडल्याचे तुम्हाला कळते तेव्हा तो मोठा धक्का असतो. त्याला कसे समजवावे हा ही प्रश्न असतोच. एकतर तो तुमच्यापासून सत्य लपवतो किंवा ती गोष्ट तुम्हाला उशिराने कळते.

मुलाची प्रगती योग्य होत नसेल किंवा मुलाला लर्निंग डिसेबिलीटी असेल तर जोडप्यात विसंवाद निर्माण होतो. दोघेही एकमेकांना दोष देतात, आधिचा वांशिक इतिहास तपासला जातो. भांडणे होतात कधीतरी प्रकरण घटस्फोटापर्यंत जाते. साहजिकच मुल आधीच संकटात असते आणि पालकांचे भांडण झाले तर ते बिचारे घाबरून जाते. त्याचा दोष काय? हेच त्याला कळेनासे होते. तेव्हा दोघांनी ऐकमेकांना धिर देत सामंजस्याची भुमीका घेऊन यावर उपाय शोधणे गरजेचे असते.

आताच्या काळात तर पाच सहा वर्षांच्या मुलांवरही रागवता येत नाही, इतकी ती संवेदनशील असतात. तुम्ही एखादी गोष्ट करू नकोस म्हटले तर त्याचे कारण त्यांना सांगावे लागेल आणि ते त्यांना संयुक्तिक वाटले नाही तर तुमचे म्हणणे ते मान्य करणार नाहीत. तुम्ही एखाद्या गोष्टींवरून त्यांच्यावर रागावलात तर ते तुम्हाला मी जेवणार नाही, होमवर्क करणार नाही किंवा शाळेत जाणार नाही म्हणून मोकळे होतील. त्यांच्यावर हात उगरण्याचा प्रश्न येणारच नाही कारण त्यापूर्वी ते आकांडतांडव करतील आणि आपले शेजारी काय म्हणतील? ही चिंता तुम्हाला असल्याने तसे करण्यास तुम्ही धजावणार नाही. मारणे तसेही अमानुष खरे तर डोळ्यांचा धाक हवा. पण आता मुलं पालकांना गांभीर्याने घेत नाहीत त्यामुळे तो प्रश्न उरतच नाही.

तुमच्या बालपणी तुम्ही काय केले? तुम्ही तुमच्या पालकांचे कसे ऐकत होतात? तुम्ही तुमच्या पालकांच्या धाकात कसे वाढलात? तुम्ही कशी काटकसर केलीत? तुम्हाला कौटुंबिक गरिबीमुळे कसा संघर्ष करावा लागला? या गोष्टी मुलांना वारंवार ऐकवल्या तर मुले या गोष्टी ऐकणार नाहीत किंवा या परिस्थितीला तुमचे पालक जबाबदार होते हे तुम्हाला ऐकवून मोकळे होतील. तुमच्या जीवनातील संघर्ष किंवा रडकथा ऐकण्यात त्यांना मुळीच स्वारस्य नाही. तेव्हा मुलांना तुमच्या कुटुंबाचा इतिहास ऐकण्यात काही रस नाही हे लक्षात घ्या.

तुम्ही तुमची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत असूनही काळजाला भोक पाडणारी भाषा तुम्हाला मुलांनी वापरली तर? मुलांचे वय जसे वाढते त्यांची विचार करण्याची पद्धत बदलते. म्हणूनच मुलांच्या वाढत्या वयानुसार त्यांच्याशी संवाद साधतांना तुम्हाला काळजी घ्यावीच लागेल. विशेषतः आर्थिक स्वावलंबी झालेल्या मुलांशी कसे वागावे याचा तुम्ही विचार केला नाही तर ते तुमच्या सन्मानाला ठेच पोचवू शकते. जोवर तुम्ही पालकाच्या भुमिकेत असता आणि तुमच्या घरातील सदस्य आर्थिक गरजांसाठी तुमच्यावर अवलंबून असतात तोपर्यंत ते तुमचा शब्द झेलण्यास तयार असतात. किंवा जाहीरपणे व्यक्त होत नाहीत.

मात्र मुले आर्थिक स्वावलंबी झाले की तुम्ही त्यांच्या मताविरुद्ध बोललेले शब्द त्यांना शस्त्राप्रमाणे टोचू लागतात, म्हणूनच या मुलांच्या बाबतीत तुमच्या जीभेवर ताबा हवा. ती आता काहीही ऐकून घ्यायला लहान मुले राहिलेली नाहीत याचे भान आपल्याला जपलेच पाहिजे. तुम्ही आता त्यांचे पालक राहिला नाहीत याची समज स्वतःला द्या. तुम्ही तुमच्या पन्नाशीत जेवढे वेतन घेतले नसेल तेवढे पॅकेज ते वयाच्या पंचविसाव्या वर्षी घेतात साहजिकच त्यांच्या गरजा ह्या त्यांच्या स्टेटसला शोभतील अशा असणार हे मनाला बजावले तर मानसिक त्रास होणार नाही. तुम्ही कशी काटकसर केलीत त्याची उदाहरणे देत राहिल्यास तुमच्यातील गैरसमज वाढण्याची शक्यता अधिक.

मुले लग्नाच्या वयाची झाली की पालक मुलांच्या मागे, “लग्न कधी करतोस?” चा धोशा लावतात. पण मुलांची प्रायोरिटी वेगळी असते. त्यांना मित्रमैत्रीणींसोबत हुंदडायचे असते. आपल्या अपुऱ्या गोष्टी पूर्ण करायच्या असतात ज्यात ट्रेकिंग, पिक्चर्स, टूर्स, क्रिकेट एका ना दहा गोष्टींची मजा अनुभवायची असते. साहजिकच मुले पालकांचे म्हणणे ऐकण्याच्या मुडमध्ये नसतात. रजेच्या दिवशी मुले घरी नसतातच. मग आई वडिलांच्या मागे टुमण लावते. अर्थात घरात आई बाबाची चिडचिड सुरू होते. वाद होतो.

घरात लग्नाविषयी काही विषय काढला की मुल अबोल होतात. पालकांना कळत नाही, हे अस का? त्याचे बाहेर अफेअर्स तर नाही ना? त्याची मित्रमैत्रीण दुसऱ्या धर्मातील, जातीतील नाही ना? अशा विविध शंका यायला लागतात. आपल्या जवळच्या नातेवाईकांतर्फे मुलांचे कान टोचून पाहतात, पण विशेष प्रगती होत नाही. वय वाढू लागते आणी पालकांची चिडचिड वाढते. थोड्या बहूत प्रमाणात हाच सीन सगळीकडे असतो. मुलांना स्वतःला, त्यांना कसा जोडीदार हवा ते ठरवता येत नाही. त्यातून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करेल अशी व्यक्ती दृष्टीपथात दिसत नाही. अशावेळी घरी उशीरा येणे.न जेवताच झोपणे ,पालकांशी संवाद न साधणे असे विचित्र वागणे सुरू होते.

पालक मुलानीमुलीनी कुठे काही ठरवले का? याचा शोध घेतात. ते समजले नाही की पालकांची चिडचिड होते. मग कधीतरी मुलगा वा मुलगी आपल्या अडचणी सांगतात. करिअर करण्यासाठी लागणारा वेळ, जॉबमध्ये समाधानकारक ग्रोथ नसल्याने येत असलेली अडचण. यावर पालक निरूत्तर होतात. वय ओलांडून गेले की स्थळ येणे आपोआप बंद होते. पालकांची चिंता वाढत जाते. खरे तर आता मुले सावध होतात, मेट्रोमनी सारख्या साईटवर रजिस्टर करून काही हाती लागत नाही. तारुण्याच्या कैफात केलेल्या चूका त्यांना कळतात. आपण योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्याने झालेली हानी त्यांनाही कळू लागते पण आता बरेच पाणी वाहून गेलेले असते. झालेली चूक मान्य करण्यास मन तयार नसते. जीवनात जसे घडेल असा मनी अंदाज बांधलेला असतो तोच चुकतो.

मुले पालकांना त्यांच्या समाधानासाठी, तुम्ही उगाचच काळजी करू नका,आमची जबाबदारी घ्यायला आम्ही समर्थ आहोत म्हणूनही सांगतात. पण नेहमीच ते खरे असेलच असे नाही. केवळ आपल्या विवंचना पालकांना त्रासदायक ठरू नयेत असे त्यांनाही वाटतच असते. विसपंचवीस वर्षांपूर्वी घरातील जेष्ठ व्यक्ती आपले भाऊबहिण वा मुले यांनी कसे वागावे? काय शिकावे? नोकरी कुठे करावी? याबाबत निर्णय घेत असत. काळ बदलला असल्याने आज मुले स्वतः आपल्या शिक्षणाची दिशा ठरवतात, तुमचे काम हे फक्त त्याच्या पाठीशी आर्थिक आणि मानसिक पाठबळ उभारण्यापुरत असावे. त्याच्या निर्णायात तुम्ही हस्तक्षेप करणे योग्य नाही. आपला विकास करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे.

आताच्या तरूण जोडप्यांना आपल्या मित्र परिवारात नेहमी वावरावे लागत असल्याने त्यांना जास्त जागरूक रहावे लागते. अनेकदा बोलता बोलता कुटुंबाची विचारपूस होते, त्यात पतीचा किंवा पत्नीचा जॉब, मुलांची शाळा, सासरची माणसे या बाबत सहजच विचारणा होते. तुमच्या घरातील एकूण परिस्थिती उत्तम किंवा योग्य असेल तर तुमच्या बोलण्यात ते आवर्जून येते. मग मुलांची वर्गातील रँक, ऍक्टिव्हिटी असे सगळे विषय खुलवून सांगितले जातात. पण तुमच्या कुटुंबात काही डिस्पुट असेल, जसे कुटुंबातील विसंवाद, मुलांचे रखडत चाललेले शिक्षण, कुटुंबातील आजार किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे व्यसन तर मग त्यांची परिस्थिती अकवर्ड होते. बरे रोजच एकत्र प्रवास करत असल्याने मित्राला किंवा मैत्रीणीला टाळता येत नाही आणि धडपणे खरे सांगताही येत नाही. कुचंबणा म्हणजे तरी काय? माहिती असुनही व्यक्त होता न येणं, मनाचा कोंडमारा.तेव्हा आपल्या बढाईने समोरचा दुखावला जाणार नाही याची काळजी घ्या.

तुम्ही स्वतः कितीही जबाबदारीने वागलात तरी जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीने जबाबदारीने वागण्याची अपेक्षा करता तेव्हा ती चुकच ठरते. तुम्ही कसे वागता? काय काम करता हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण तुम्ही दुसऱ्या व्यक्तीने तसेच वागावे ही अपेक्षा करणे चुकीची ठरते. त्यामुळे तुमच्या अपेक्षांचे ओझे कोणाच्या माथी मारणे योग्य नाही. तुम्हाला ज्या गोष्टींची प्राथमिकता वाटते तशीच ती इतरांना वाटावी हेच योग्य नाही. तुमच्यासाठी असणारा एखाद्या गोष्टीचा संदर्भ दुसऱ्या व्यक्तीसाठी योग्य नसेलही. त्यामुळे तुमची कृती तुम्हाला कितीही योग्य वाटली तरी तीचे समर्थन करणे किंवा त्या कृतीची अपेक्षा दुसऱ्या व्यक्तीकडून बाळगणे टाळणे योग्य.

आजकाल कोणी कोणासाठी त्याग करत नाही, तुम्हाला जी गोष्ट योग्य वाटली, करावीशी वाटली म्हणून तुम्ही ती केली. त्यासाठी शारीरिक श्रम घेतले किंवा पदरचे पैसे खर्च केले, स्वतःच्या गरजा सीमित ठेऊन त्या गोष्टीसाठी पाठपुरावा केला. तू तुमचा चॉईस होता, त्यामुळे आता त्याची वाच्यता करू नये अशी अपेक्षा असते..त्यामागे तुमचा हेतू कितीही चांगला असला तरीही त्याची जाहीर वाच्यता होऊ न देणेच योग्य.

मानवी स्वभाव हा विचित्र असतो, तुम्ही जसे वागता, बोलता किंवा कृती करता त्याचा अर्थ कोण कसा घेईल? हे सांगणे अवघड आहे.तिस चाळीस वर्षांपूर्वीचे संदर्भ आता मुलांना किंवा इतर तरूणांना देऊन उपयोग नाही. तुम्ही तेव्हा जसे वागलात ती त्या काळाची गरज होती. तुम्ही पहिल्या किंवा दुसऱ्या पिढीत जगत होता. तुमच्या कुटुंबाच्या प्राथमिक गरजांसाठी तुम्हाला झुंजावे लागले काटकसरीने जगावे लागले पण तुमच्या कामाचे तास निश्चित होते. तुम्हाला अचानक कामावरून कमी करण्याची भिती मनात नव्हती . गरजा सिमित असल्याने दडपण कमी होते. आजची परिस्थिती एकदम भिन्न आहे. ज्या गोष्टी तुमच्या काळात चैन वाटत होत्या त्या गोष्टी आज गरजेच्या बनल्या आहेत. त्यामुळे तुमचे कष्ट तुमची चिंता वेगळ्या प्रकारची होती आजच्या पिढीच्या गरजा तुम्हाला अवाजवी वाटणे शक्य आहे पण आजच्या पिढीची ती गरज आहे.

नव्या पिढीची नोकरी मिळवताना, ती टिकवतांना किंवा हाईक मिळत नाही म्हणून नोकरी बदलतांना दमछाक होत आहे. त्यांच्या गरजा काळानुसार वाढणारच त्याबद्दल तक्रार करून किंवा विरोध करून तुम्ही फक्त त्यांच्या मनातून उतरणार आहात. तेव्हा मुलांना सतत प्रश्न विचारू नका,त्यांना ते रूचत नाही. या गुंत्यात पालकांनी किती अडकून घ्यायचे ते ठरवले पाहिजे.

आजच्या पिढीला प्रत्येक गोष्टीचे सेलिब्रेशन करावेसे वाटते, मग परीक्षेत पास होणे असो, जॉब मिळवणे असो, जॉबची अब्रॉड संधी मिळवणे असो किंवा स्वतःचा, आपल्या जोडीदाराचा वाढदिवस हॉटेलमध्ये जाऊन सेलिब्रेट करणे असो. एकमेकांपासून घटस्फोट घेणे असो, ती त्यांची सामाजिक गरज बनली आहे. आज जर मैत्रिणींनी तिला बर्थ डे विश केला तर ती दुसऱ्या दिवशी तिला तुम्ही बर्थ डे कुठे सेलिब्रेट केला? नक्की विचारेल, तिने काय उत्तर द्यावे? ‘आम्ही ना काल घरीच पार्टी केली.’ हे उत्तर तिच्या मैत्रिणीला अपेक्षित नाही. आताची पिढी स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यासाठी किंवा आपल्या स्टेटसला जपण्यासाठी जास्त जगत आहे. मग तुमची मुले याला अपवाद कशी असणार? वर्षभरात किंवा सुट्ट्यांमध्ये ती कुठेही गेली नाहीत तर त्यांचे मित्रमैत्रीणी त्यांना विचारतील या भितीपोटी ते आर्थिक तरतूद नसतांना क्रेडिट घेऊन जाऊन टूरवर येतात. प्रवासाचे फोटो शेअर करतात. जगाबरोबर चालण्याशीवाय, वेग पकडण्याशीवाय त्यांना पर्याय उरत नाही.

तुम्ही खरंच स्वातंत्र्यात जगत आहात का? की आपली पत्नी/ पती, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्या अपेक्षांचे ओझे घेऊन गुलामगीरीच्या मानसिकतेत जगत आहात? जरा स्वतःला विचारा तुम्हाला कळेल हा गुंता गेल्या कित्येक वर्षात सुटलेला नाही. जोपर्यंत तुम्ही लहान होतात, तुम्हाला थोडे बहूत स्वातंत्र्य होते. त्यानंतरच्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध निर्णय घ्यावा लागला. आपण मागे राहू म्हणून, समाज काय म्हणेल म्हणून, घरातील जेष्ठ व्यक्तींची किंवा पतीपत्नीची इच्छा म्हणून तुम्हाला काही गोष्टी मनाविरुद्ध जाऊन कराव्या लागल्या, याची बोच तुम्हाला आहे पण ते व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला नाही.

शहरातले सोडा ग्रामीण भागातही वेगळे काही नाही,जिल्हा परिषद शाळेत राम नाही अस म्हणत परिस्थिती नसताना मुलं मोठ्या खाजगी शाळेत घालण्याची अहंमअहिका गावाकडे सुरू आहे. आपल्या शेतकरी पतीची ऐपत आहे की नाही हे न पाहताच आग्रह करून मुलांना सिबीएससी शाळेत घालणारी माता पुढील वर्षभरात फी भरताना मेटाकुटीला आलेला बाप आणि शाळेतून नाव कमी करणार म्हणून भयभीत झालेली मुल हे समिकरण प्रत्येक छोट्या शहरात दिसेल.

तेव्हा सामाजिक स्थान मिळवण्याच्या उद्योगात घरदार वाहून जाण्यापूर्वी विकास म्हणजे इंग्रजी शिक्षण नाही हे समजून घ्या. मनात विकास, पुढारलेपण याचा नको तो गुंता झाला तर सुटणे अवघड होईल. गावात चार जणांनी आले लावले म्हणून मी अख्खं वावर आल्याचे पिक घेण्यात शहाणपण नाही हे समजून घ्या. अन्यथा टनांनी आले विकूनही घर चालवणे अवघड होईल. कोणाचेही अंधानुकरण हे धोकादायकच असते हे कळण्यासाठी शिक्षण नको तर शहाणपण हवं.

माझी ऐपत नसताना शेजारी बंगला बांधतोय म्हणून मी शेत विकून बंगला बांधणे आणि बंगल्याला शोभेशी गाडी घेण्याचा अट्टाहास कुठे घेऊन जाईल? ते ओळखायला शिका. आपल्या मुलांचे लग्न थाटात व्हावे हा विचार चुकीचा नाही पण ऋण काढून हळदीचा कार्यक्रम, गाव जेवणावळ, मद्याची सोय आणि डीजे याने नक्की काय साध्य झाले? तुमची पत वाढली असा समज असेल तर अगदी चूक लोक सुग्रास जेवण जेऊन मांडवाबाहेर पडल्यानंतर लगेचच त्यावर प्रतिक्रिया देण्यास मोकळे होतात. मुख्य म्हणजे हे लक्षावधी रूपये खर्च केल्यानंतर तुमच्याकडून समोरच्या लोकांची अपेक्षाही वाढते आणि ही अपेक्षा पूर्ण करता आली नाही तर? त्याचे गंभीर परिणाम मुलीला भोगावे लागतात. मग हा गुंता कधीच सुटत नाही, दुर्दैवाने तुमच्या मुलीच्या आयुष्याचे काही बरेवाईट झाले तर ते शल्य तुमच्या मनाला शांती देईल का?

मनात असे असंख्य गुंते वागवत आपण जगत असतो. चेहऱ्यावर असणारे भाव लपवत जगणे सुरू असते. मनाचा कोंडमारा सहन होईनासा झाला की मानसिक व्याधी निर्माण होतात, कदाचित व्यसन जवळ केले जाते आणि गाडी उतारावरून कधी कोसळली तेच कळत नाही. काही गोष्टी कोणाला सांगताही येत नाहीत. तुम्ही समाजापासून जी गोष्ट लपवू पाहता ती आपोआपच उघड होते मग बदनामीची भीती आणि त्याचा दुर्दैवी शेवट.

हे टाळण्यासाठी मनावर स्वतःचा ताबा हवा. शिक्षण असो वा नोकरी वा तुम्ही करणार असलेला व्यवसाय वा उद्योग त्यामागे ठाम विचार हवा. आपली रिस्क घेण्याची क्षमता तपासून घ्या. आपले रिसोर्स किती स्ट्रेच होऊ शकतात याचाही अभ्यास करा. प्लॅन बनवताना शॉर्ट टर्म गोल आणि लॉंग टर्म गोल निश्चिय करा. त्यासाठी तुमच्याकडे काय योजना आहे? आणि ती किती प्रॅक्टिकेबल आहे? याचा विचार करा.

नवयुवकांच्या जगण्याच्या कल्पना भन्नाट असतात. लग्न कसे करावे याची योजना असते, ऐंगेजमेंट, प्री वेडींग शूट, हनीमून, विकेंड, मंथएंड, बर्थडे या बद्दल अपेक्षांची यादी मोठी असते. कदाचित दोघांची ऐपत स्वप्नांची भरारी पेलणारी असली तरी लग्नानंतर येणाऱ्या प्रसंगासाठी नियोजन असेलच असे नाही. प्रत्येक गोष्ट क्रेडिटवर किंवा डाउनपेमेंटवर मिळते हा फंडा डोक्यात फीट असतो पण संसार प्रत्यक्षात सुरु केल्यानंतर समोर येणारे प्रॉब्लेम आणि मर्यादा लक्षात येऊ लागतात. मग दोघांमध्ये धुसफूस वाढते, गैरसमज दृढ होतात. तू मला समजून घेत नाहीस असा आरोप दोन्ही बाजूंनी होऊ लागतो आणि कदाचित गैरसमज वाढल्यास काही महिन्यात किंवा वर्षभरात वेगळं होण्याची संधी दोघे शोधू लागतात.

हा गुंता हळुवारपणे सोडवण्यासाठी कौटुंबिक सल्लागार मदत करू शकतात, पण तुम्ही तुमचा इगो दूर ठेऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले तर. ज्यांचे घरून फारच लाडात कोडात दिवस गेलेले असतात आणि लग्नानंतरही त्यांना गृमिंग केले जाते, त्याची केस क्रिटिकल असते. लग्नानंतर, तुम्हाला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे आणि त्याच बरोबर दुसऱ्याला समजून घेण्याची जबाबदारी आता तुमच्यावर आहे हे स्वतःला बजावले तरच तुमचे प्रश्न सहजपणे तुम्ही सोडवू शकाल. तेव्हा जीवनात अडचणी येणारच काही अचानक काही तुम्ही स्वतः निर्माण केलेल्या त्यातून मार्ग काढून पुढे जाण्यातच शहाणपण आहे.

आयत्या वेळेस कोणते प्रश्न निर्माण उपस्थित होऊ शकतात? आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी तुमची योजना काय असेल? त्याची चाचपणी करा. गुंता मनाचा असो की नात्याचा किंवा व्यवसायिक व्यापाचा तो जेवढ्या लवकर लक्षात येईल आणि तुम्ही तातडीने लक्ष देऊन सोडवाल तितके योग्य. अनेक वर्ष संसार केल्या नंतरही पती पत्नीच्या नात्यातही गुंता होऊ शकतो मग जीवनात असे कितीतरी प्रसंग येऊ शकतात की पूढे रस्ताच दिसत नाही, मन निराश,हताश होते, ती वेळच येऊ नये म्हणून गुंता होणार नाही असाच आचार, व्यवहार हवा. दुर्दैवाने तशी वेळ आलीच तर शांतपणे निर्णय घेता यावा यासाठी मनाचा निर्धार हवा. तेव्हा गुंता प्रेमाचा असो की अभिमानाचा वा अहंकाराचा तो सावधपणे हातळणे हेच शहाणपणाचे आहे. बोटातील अंगठी काढताना बोटाला इजा होऊ न देण्याची काळजी तुम्ही आजपासून घ्याल ही अपेक्षा.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *