सल
साठी पार केली की आपण संसारातून हळूहळू बाजूला होतो, मुलं मोठी झाली की त्यांचा निर्णय ते घेतात मग त्यांना काही सांगत बसू नये, सल्ला देऊ नये हे शहाणपण अर्थातच उशीराने, अनुभवाने येतं. आपण रिटायर्ड झालो की खरं तर त्या नंतर आर्थिक गती आधीच निम्म्या वेगावर येते, साहजिकच घरातला अधिकार स्वतः निम्म्यावर आणलेला अधिक चांगले. कुटुंबाला याची कल्पना आलेलीच असते, आपणही ते स्विकारावं हे बरं. स्पष्ट शब्दांत सांगायचे झाले तर आपण काही सांगण्याचा प्रयत्न केला तर नाराजीने मुलं ऐकवतातच, पण पुढे असेही म्हणतात, “बाबा,प्लीज! आता आम्ही इतकेही लहान राहिलेलो नाहीत की तुम्ही काही आम्हाला सूचवावे, सांगावे. आमचे निर्णय आम्ही घेऊ शकू.” कधीतरी हेच वाक्य आईलाही असतेच. बरेचदा आई तिच्या शिस्त आणि स्वच्छते विषयी जास्त आग्रही असते. मग तर खटके उडतातच. तरीही आई म्हणजे Forget and forgive. त्यामुळे तिच्या विषयी मुले लवकर निवळतात.
मुलांचे काळानुसार बरोबरच असते पण आपल्यातला ‘बाबा’, थांबायला तयार नसतो. गेले तीसपस्तीस वर्षे स्वतः च्या मनाप्रमाणे जगलेलो असतो. घरात पत्नीने आपला शब्द कधी खाली पडू दिलेला नसतो, त्यामुळे नाही म्हंटलं तरी मनात ती गुर्मी असतेच.
त्यामानाने त्यांची आई जास्त समजुतदार असते, नव्हे हुशार असते, तुम्ही आता सेवानिवृत्त झाला आहात हेच ती वेगळ्या शब्दात सांगते. ती म्हणते, “अहो, मुलं आता मोठी झाली आहेत, त्यांना सारखे सल्ले देत बसू नका. त्यांचे निर्णय ते घेतील, त्यांचे निर्णय चुकले तर त्यातून ते शिकतील. तुम्हाला कधी तुमच्या कुटुंबातील कोणी,काय कर, काय करू नकोस, सतत सांगत रहायचं का? नाही ना, तरीही तुम्ही मार्ग काढून यशस्वी झालात ना? मग तुम्ही त्यांची सतत का पाठ काढता? बरंवाईट आता त्यांनाही कळतं. तुम्ही वारंवार सांगत राहिलेलं त्यांना नाही आवडत. मग तुमचा आवाज वाढतो, शाब्दिक तोल जातो, या वयात मुलांनी तुम्हाला काही बोललेलं मला नाही आवडणार. माझी विनंती आहे प्लीज तुम्ही मुलांच्या प्रश्नांत डोक घालू नका.” यात गर्भितार्थ लपलेला असतो. आता मुलांना कुटुंब प्रमुखाची भुमिका निभावू दे.
मुलं आणि बाबा यांच्यात वाद उद्भवला तर तणाव वाढतो पण मुलं आणि आई यांच्यात वाद सहसा विकोपाला जात नाही. मुलं चुकली तर ती त्यांना समजावते, कान उघडणी करते, पण त्याचे मुलांना इतके वाईट वाटतं नाही, मात्र वडील बोलले किंवा वडिलांनी काही खोचक प्रश्न विचारला की मुलांचा अहंकार दुखावतो. हल्ली तर लहान मुलांना त्यांच्या अभ्यासाविषयी किंवा मित्रांविषयी विचारलं तरी ‘हर्ट’ होते मग कमावत्या मुलांना उगाचच नको ते प्रश्न विचारले तर कसं आवडणार? त्यांना त्यांची प्रायव्हसी नको का? मग कधीतरी वडिलांना उलट उत्तर देण्यापर्यंत मजल जाते. शाब्दिक तापातापी होते.
मुलं शिकत असतांना त्यांनी अनेकदा वडिलांचा नकार पचवलेला असतो. कधीतरी हातून काही चुकीचे घडले म्हणून मारही खाल्लेला असतो. वडिलांनी बोललेल मुलं सहसा विसरत नाहीत. संधी मिळेल तेव्हा, तुम्ही असं बोलला होतात याची आठवण करून देतात. वडील कधीतरी त्यांच्याशी तितकेच हार्श वागले होते याची जाणीव त्यांनाही स्वस्थ बसू देत नाही. मुले, आई काही बोलली तरी फार मोठा फरक पडत नाही, किंवा आईने बोललेलं मनावर घ्यायचं नसतं अस उमजून असतात. पण बाबा बोलले तर मनाला लागते. अगदी शैक्षणिक प्रगतीच्या बाबतीतही, मुलांनी कितीही गुण मिळवले तर अगदी सहजच बाबा कौतुक करत नाहीत, उलट काही ना काही सूचना करून मुलांना नाउमेद करतात. आईने केलेल्या कौतुकापेक्षा बाबाचे वा! शब्द ऐकण्यासाठी मुलं आसुसलेली असतात. दुर्दैवाने आम्ही बाप करंटे की हे समजून घेत नाही.
कुणास ठाऊक मुलाचे कौतुक केले तर मुल शेफारेल असे तर बाप बनल्यावर वाटत नसावे ना, किंवा त्यांचे कौतुक कधी न झाल्याने मुलांसाठी वडीलांचे कौतुकाचे शब्द हे टॉनिक असते हेच बाप लोकांना कळत नसावे. वडीलांच्या अशा छोट्या चुकीच्या वागण्याने मुले वाढत्या वयात बापापासून दुरावतात. ‘अभ्यास कर’ ची सूचना आपण सतत करतो, पण ‘चल आज आपण चेस चा डाव टाकू’ असे आठवी नववी नंतर बाबा म्हणत नाहीत. त्यामुळे यापूर्वी ग्रेट वाटणारा बाप गेला कुठे? हा सल मुलांना टोचू लागतो.
मुलांच्या प्रगतीबद्दल सतत बोलणाऱ्या बापाला, वाढणाऱ्या मुलांच्या अपेक्षा आताच्या परिस्थितीनुसार वाढल्याच असणार हेच समजून घ्यायला आपण बाप लोक कमी पडतो. आपल्या वेळेला परिस्थिती प्रमाणे pocket money संकल्पना नव्हती पण आजही ते तसेच आहे असे समजणे किंवा अतिशय अल्प pocket money देऊन, ‘तू घरून डबा नेतोस मग तुला पैसे लागतातच कशाला?’ असा वेडगळ प्रश्न विचारून आपण आपला संकुचित बाणा दाखवतो तिथेच मुलांना बाबा आवडेनासा होतो. आमच्या वेळी असे नव्हते हे पालुपद फार वाईट आहे आणि ते बाबांनी उच्चारूच नये असे आता मला वाटते.
ज्या चुका अट्टाहासी स्वभावाने आमच्या पिढीने केल्या त्याच चुका पुढील पिढीने करू नये. मात्र पैसे दिले तरी त्याचा योग्य विनियोग होतो ना? यावर लक्ष नक्कीच हवे. अडीनडीला त्याला पैसे कोणाकडे मागावे लागू नये हे जर आपल्याला कळत नसेल तर! तेव्हा आताच्या पालकांनी आतापासूनच जागरूक राहिले तर वडील आणि मुले यांच्या मनात सल राहणार नाही. ते नाते मैत्रीचे, प्रेमाचे, काळजीचे बनवणे हे सर्वस्वी आपल्या हाती आहे.
वडीलांनी एखादा अधिक उणा शब्द रागाच्या भरात उच्चारला तर मुले तितक्याच आवेशात विरोध करतात, त्यांच्या शब्दांचा अर्थ सांगून भविष्यात तो शब्द त्यांच्यासाठी वापरला जाऊ शकतो याची जाणीव करून देतात. यात त्यांची चूक नाही, आपल्याला संयम बाळगता येत नसेल तर? त्या तुलनेत त्यांचा आईशी असलेला वाद लवकर निवळतो याचे कारच आईचा सौज्वळ आणि प्रेमळ स्वभाव. माघार घेण्याची विसरून जाण्याची, माफ करण्याची वृत्ती. तिने तिच्या जन्मापासून खूप काही सोसलेल असते, निर्णय स्वातंत्र्य तर तिला नव्हते पण याची खंत करत ती बसली नाही. समोर आले त्याला सामोरी गेली.
आईने मुलांशी कसं वागावं? हे तिला कोणी सांगत नाही,सुचवत नाही, ते तिला उपजत असते. सृजनशील मातेचा स्वभाव तिच्या गर्भातून उमटतो, माता कितीही कमी वयाची असली तरी ती तिला गर्भ राहिल्यापासून त्याची जीवापेक्षा जास्त काळजी घेते. गर्भाच्या वाढीच्या काळात झोपेत चुकूनही गर्भावर ताण येऊ नये म्हणून रात्ररात्र पाठीवर झोपते. गर्भाची हालचाल सुरू झाली की एकांतात त्याच्याशी बोलते, त्याला एकट वाटू नये म्हणून त्यांच्यात संवाद सुरू होतो. बाळाला पाहताच तिला पान्हा फुटतो,तिचे स्तन आणि मन बाळाला स्तनपान करू देण्यास आसुसतात.
तिच्यातील मातृत्व हे केवळ बाळासाठी नाही तर तिच्या पतीसाठीही असतं. जेव्हा नवरा एखाद्या कारणाने हताश होतो तेव्हा आईच्या मायेने ती त्याला जवळ घेते,समजावते,” मी आहे नां, सगळ नीट होईल, तू फक्त हरू नकोस.” तिच्या शब्दांत असणारा ओलावा त्याला नवीन ताकद देते. नव्या उमेदीने दोघे एकत्र लढतात, ताकदीने संसार उभा करतात. मोठ्या वयातील मुलांसाठी तिचं ह्रदय सतत पाझरत असतं. तो स्वबळावर मोठा व्हावा, समाजात त्याला मान सन्मान मिळावा इतकीच तर तिची इच्छा असते. मुलगा कितीही मोठा झाला आणि तिच्या समोर बऱ्याच दिवसांनी आला,तर त्याच्या केसातून हात फिरवताना ती सहजच म्हणते, “बाळा किती रे रोडवलास?” तिच्या शब्दातील ओलाव्यात अजब ताकद असते, मुलगा कितीही मोठा सत्ताधीश झाला तरी तो मातेच्या पायाशी विनम्र होतो. ती करुणेची मूर्ती असली तरी मुलाच्या भल्यासाठी कणखर भूमिका घेऊ शकते, मुलगा चुकत असेल तर ती हक्काने बोलू शकते अगदीच चिडीला आली तर त्याच्या कानशिलात वाजवू शकते. त्या कृतीमागे तळमळ असते ती त्याच्या भल्याचीच. आईने मारले तरी तो अपमान मानत नाही.
जेव्हा मुलं आई पासून दूर जातात, मित्रांच्या संगतीला लागतात, त्यांच्या हातून चुकीची गोष्ट घडल्यास मुलं आईच्या नजरेला नजर देऊ शकत नाही आणि तिला तात्काळ कळते की आपलं पिल्लू कुठे तरी हरवलंय, चुकीच्या मार्गाने निघाले आहे.ती त्याला तात्काळ सुचवते, परावृत्त करते. मुलं शहाण असेल तर आईच्या कुशीत विसावून चूक मान्य करते. मित्रांनो आई तुम्हाला कधीच चुकीच्या मार्गाने जाण्यास प्रोत्साहन देणार नाही. पण दुर्दैवाने तिचे तुम्ही ऐकले नाही, तिच्या मतांचा आदर केला नाही तर तुमचे भविष्य अंधारात तुम्हीच लोटत आहात असे ठाम समजून चला.
आता आपणच ठरवायचं, स्त्रीला उगाचच कारुण्याची मूर्ती म्हणत तिला शक्तीहीन बनवायची की जिजाऊ, साने गुरुजींच्या कथेतील कणखर आई बनवायचं, हा निर्णय तुमचाच असेल. कोणत्याही तरूण जोडप्याने आपल्याला तरूण वयात ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्या आपल्या मुलांना द्यायच्याच, काही कसर ठेवायची नाही अस समजून मुलांचे लाड करायचे ठरवले तर त्याची परिणती भविष्यात काय होते? त्याचे उदाहरण म्हणजे नाशिकात घडलेला प्रसंग. अवघ्या सोळा,लसतरा वर्षांच्या मुलाला त्याच्या वडिलांनी काही लाखाची दुचाकी गाडी आणि पन्नास हजारांचे इतर किट दिले पण सारासार विचार द्यायला ते विसरले त्याची परिणती अपघातात झाली आणि मुलगा जीव गमावून बसला. आता आयुष्यभर आपण हे काय करून बसलो ही सल पालकांच्या मनास टोचत राहिल.
आज काही मुलांना गरजेपेक्षा अतिरिक्त pocket money मिळतो मग हे पैसे मित्रांसोबत चुकीच्या गोष्टींसाठी खर्च होतात. यातून कदाचित मुलांना चुकीच्या संगतीने वाईट व्यसन लागण्याची शक्यता असते. त्यामुळे पालकांनी दोघांच्या समन्वयाने आवश्यक तितकेच पैसे द्यावे. या पैशांचे तो काय करतो ते खुबीने आईने माहिती करून घ्यावे. अन्यथा या पैशाचा वापर व्यसनासाठी झाला तर भविष्यात त्या व्यसनातून त्यांना माघारी खेचणे अवघड होते. व्यसनाचा घट्ट विळखा मुलाभोवती पडतो आणि त्याचे आयुष्य वाया जायला आपणच जबाबदार आहोत हा सल आयुष्यभर मनाला छळत राहतो.
आताची आई,आई नव्हे ‘मम्मी’ होकार मिळणार याची हमी. आपल्या मुलाला महागडी खेळणी घेऊन देते आणि ते बाळ त्याचे क्षणात सुटेभाग बनवते. तेव्हाही त्याच कौतुक केल जाते मग त्या गोष्टींची त्याला सवय लागते. Constructive mind ऐवजी destructive mind च कौतुक करू नका. ते खेळण तोडतांना ते कस जोडायचे ते त्याला शिकवा.
खेळणं तुटल्यानंतर, “तुटू दे हं राजा मी तुला दुसलं घेऊन देईन.” म्हणता तिथेच तुमची म्हणजे मॉडर्न मम्माची चूक होते. पुढे पुढे हट्टाने महागड्या वस्तू मागून घ्यायची त्याला सवय होते. तुम्ही ती तातडीने खरेदी करून दिली की तो आणखी काही नवीन गोष्ट मागतो. मुलांना खेळणी वा अन्य गोष्टी देऊ नका असे मी म्हणत नाही पण त्या खेळण्याची काळजी घ्यायला शिकवा. भविष्यात ती विकृती बनू नये याची पोच आपल्याला हवी.
तेव्हा आपण आपल मुलं कस वाढवतो? त्याने फार मोठा फरक पडतो. आज जर त्याला सहज आणि सतत होकार आणि होकारच ऐकायची सवय जडली तर भविष्यात एखादा नकार पचवण्याची ताकद त्याच्याकडे राहणार नाही. तेव्हा तो निराशेच्या गर्तेत जाईल पण तुम्ही तेव्हा कदाचित असणार नाही. म्हणूनच थोडे सुजाण व्हा कधीतरी नाही, नको म्हणायला शिका तरच तो आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करायला शिकेल आणि याचे पुढे काय होणार? हा सल तुमच्या मनाला लागणार नाही.
संकर्षण कऱ्हाडे यांची, ‘आज म्हंटलं जरा जाब विचारावा’ ही आईची स्तुती करणाऱी कविता त्यांच्या सादरीकरणात ऐकतांना डोळे भरून येतात.” ती कविता ऐकता ऐकता आपणच आपल मन खंगाळून काढतो. खरंच की आपण आईचे फार मोठे गुन्हेगार आहोत. आपल्यासाठी आईने आपल्या जन्माअगोदर पासून ते आजवर किती खस्ता खाल्या असतील ते फक्त तिलाच माहिती. कदाचित ते ही तिने कधीच लक्षात ठेवल नसावं. नव्हे त्याची तिला गरजही भासली नसावी. तिला माहिती मुलांवर निर्व्याज प्रेम करणं. कदाचित कृष्णा आधी कृष्णाने सांगितलेला, ‘मां फलेषु कदाचन’ हा कर्मयोग तिला आणि तिलाच माहिती असावा, म्हणून तर कृष्ण खोड्या करत असतांनाही ती सुरवातीस म्हणते,”माझा कान्हा असं काही करणार नाही.” मित्रांनो तुमच्या माझ्या आईने आपल्याला वाढवताना किती दुःख सोसल असावे याची गणती करणेच अवघड.
आपण अर्धपोटी राहून तुम्हाला आणि तुमच्या वडिलांना आग्रह करून पोटभर खाऊ घालणारी आई समजून घेण्यासाठी आईच व्हावं लागतं ते पुस्तक वाचून किंवा कुणी सांगूनही कळण्या पलीकडचे असते. हे ती असतांना कळत नाही हेच तर दुःख आहे. मग, ‘प्रेमास्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई’ कविता वाचताना, कारूण्य रस ओतून कुणीतरी म्हणतांना डोळे डबडबून येतात. समोरच सगळच धुसर होतं मनात काही तरी दडलेल अचानक उफाळून येत,तेव्हा समजाव ह्रदयातली जखम अजूनही ओली आहे.
मुलांचा हट्ट पुरवतांना तिने कितीवेळा,बाबा किंवा कुणा इतर नातेवाईकांकडून अपमान सहन केला असेल? आपली चूक लपवतांना किंवा आपण केलेल्या चुकीसाठी बाबांनी मारू नये म्हणून कितींदा तिने तो फटका स्वतः झेलला असेल? आपल्याला शाळेच्या पिकनिकला जाता यावं म्हणून तिने कठीण प्रसंगी उपयोगी पडावेत म्हणून साठवून ठेवलेली पूंजी हसत हसत आपल्या पूढे केली असेल. आपण बाहेरून घरी भुकेले परतणार म्हणून तिने कित्येकदा भूक गिळून स्वतः तांब्याभर पाणी प्यायले असेल. या प्रसंगानंतरही आपण तिने सांगितलेले निमुटपणे ऐकलं अस कधी झालय का? नाईलाजाने ती आपल्यावर हात उगारते तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी उभे राहते याचे कारण ती स्वतःलाच प्रश्न विचारते माझे काय चुकले? मुलांना संस्कार देण्यात मी कुठे कमी पडले.
काही दुर्दैवी मुलांच्या नशिबी आईच प्रेमच नसतं, ती या जगात येण्यापूर्वीच आईने इहलोक गाठलेला असतो किंवा अतिशय लहान वयात आई दूरच्या प्रवासाला निघून गेलेली असते.त्या पोरक्या मुलांना आईचे प्रेम, तिची माया काय कळणार ? पण तिच मुल जास्त कृतज्ञ जीवन जगतात. सिंधुताई सकपाळ यांनी त्यांच्या बालसंगोपन केंद्रात ज्या अनाथ मुलांना आसरा दिला त्यांनी खूप चांगले शिकून त्यांचे ऋण फेडले. खरे तर तसेही आईचे ऋण फेडण्याची ताकद असणारा सावकार मुलगा अद्यापही जन्माला आलेला नाही हेच खरे. मुलांना आईच्या ऋणात राहण्यात धन्यता वाटली पाहिजे मात्र आईच्या शब्दांचा उपमर्द जाणूनबुजून होणार नाही इतके पथ्य त्याने पाळले तरी आई स्वतःला भाग्यवान समजेल.
कधीतरी आईवर घरातून वडिलांच्या व्यसनामुळे किंवा संशयी स्वभावामुळे झालेला अन्याय मुलांनी स्वतः पाहिलेला असतो, नवराच तिची हेटाळणी करत असेल तर तिने दाद कोणाकडे मागावी? न कळत्या वयातही मुलं हे पाहतात, ती बोच मनात खोलवर रुतलेली असते. साहजिकच वडिलांविषयी कडवटपणा मुलांमध्ये आला तर दोष त्यांचा नाही. पण तो सल त्यांचा काळजात कायमचा राहतो.
एखाद्या बाईचा नवरा कर्तव्यावर असतांना अपघाताने वारला तर त्या बाईच्या यातनांना थारा नसतो.पती हयात नसेल तर ती आई आणि तिची मुले ही कुटुंबावर भार आहेत अशा नजरेन सासरी पाहिले जात असेल तर त्यांच्या दुःखाला अंत नसतो. तेव्हा कौटुंबिक नात्यात जिव्हाळा नसेल तर ते शल्य कायमचे राहते.
फारच थोड्या आणि सुसंस्कारित कुटुंबात आईचा मान राखला जातो. तिला सन्मानाने वागवले जाते मात्र काही उच्चभ्रू शिकल्या सवरल्या कुटुंबात जेथे पुरुष प्रधान संस्कृतीचा पगडा असतो, घरातील कर्ती बाई अथवा घरची सून यांची अवस्था फारच बिकट असते. तिला कुटुंबात दुय्यम स्थान दिले जाते. तिच्या गरजांकडे दुर्लक्ष केले जाते. ती जखम, ती बोच तिच्या मोठ्या वयातही मनात भळभळत असते.
संकर्षण याच्या सोबत आई सावलीसारखी आहे. त्यामुळे तो आईला समोर आणूनच कविता म्हणतो. ज्याची बालपणीच संस्कार बैठक तयारीची झाली आहे. म्हणून तो आईची कविता म्हणतो तेव्हा शब्द आपोआपच सुचतात. ते ह्रदयाच्या गाभाऱ्यातून कधी दुःख तर कधी आनंद घेऊनच येतात. अर्थात सकर्षण कऱ्हाडेना ऐकताना प्रेक्षकांच्या डोळ्यातही अश्रूंच्या माळा ओथंबून येतात. त्या क्षणाला किंवा त्या क्षणापुरते, आपल्याला आपले,आईशी झडलेले संवाद आठवू लागतात.आईला रागापोटी नकळत वापरलेले शब्द आता खटकू लागतात, आपली पोरं आपल्या भावनांशी खेळू लागली, आपल्याला नकोसे वाटणारे कोडे घालू लागली, आपल्याला न जमलेल्या गोष्टीची उजळणी करू लागली की पोटात खड्डा पडू लागतो. ‘पेरले तेच तर उगवते.’ म्हण उगाचच आठवून जाते.
आपण लहान असेपर्यंत प्रत्येक सेकंदाला आईचा पुकारा करत असतो, तिच्याशिवाय आपले पान हलत नाही मात्र जस जसे शैशव संपते आपल्याला आई ही वस्तू पुरवणारी, सेवा देणारी दाई वाटू लागते. आपण मोठे झाल्याचा साक्षात्कार आपल्याला होतो. आईपेक्षा आपण जास्त शिक्षित आहोत अस वाटू लागतं. तिच्याकडे पैसे मागितल्यावर तिने पैसे नाहीत सांगितले किंवा अशाच एखाद्या गोष्टीसाठी नकार दिला की आपले पित्त खवळते. मग आपण सारासार विचार न करता तिला बोलतो किंवा अपशब्द वापरण्यास मागेपुढे पहात नाही.
एखाद्या ठिकाणी रात्री,अपरात्री जायला आईने विरोध केला म्हणून किंवा उशिरा घरी परतल्यानंतर खरडपट्टी काढली म्हणून किंवा आई, एक अमुक ड्रेस घालू नको म्हणत असतांना हट्टाने तोच ड्रेस घालून बाहेर पडल्यानंतर आलेल्या अनुभवानंतर मनात कडवटपणा येतो. आईच्या शब्दांवर, आई कोणतच स्वातंत्र्य देत नसल्याचा चढवलेला हल्ला किंवा अबोला किंवा घातलेला धिंगाणा उगाचच उशिरा आठवून जातो. मनात चर् होतं. या आठवणी मनाच्या कप्प्यात खोल रुतून बसलेल्या असतात. प्रसंगानुरूप त्या उचंबळून बाहेर येतात. आधी स्वतःशी मुक संवाद साधतात, मनाला पिसटून ,पिंजून काढतात.
जशी मुले मोठी होतात आईच्या वारंवार होणाऱ्या सूचना त्यांना त्रासदायक वाटतात. आईच्या निधनानंतर आपण ऐन भरात असतांना आईशी कसं वागलो? याची आठवण करून देतात, स्वतःला कबुली द्यायला भाग पाडतात. स्वतःचे चुकल्याची कबुली द्यायला लावतात पण कधीकधी उशीर झालेला असतो, जिच्याजवळ ते कबूल करायला हवे होते, ती तर दूरच्या प्रवासाला निघून गेलेली असते. मग डोळे पाणावतात, मुलं संवेदनशील असतातच, पण तरूण वयात आपले काही चुकते हेच मनाला पटत नाही.
कधीतरी आईला आठवते ज्या गोष्टींची आपण मनात इच्छा बाळगली होती ते काही घडलच नाही. आपल्याच बाबतीत नशीब अशी कठोर परीक्षा का घेते तेच तर तिला कळत नाही . कधीतरी तिचा आपल्या पतीशी यावर संवाद होतो. तो तिची समजूत घालतो. सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतील असे गृहीत धरणे हीच तर चूक आहे. मग एकांतात ती मन भरून रडते. आईचे भरून आलेले डोळे पाहिले की विचारतात, काय झालं ग? बरं नाही वाटत का? की कुणाची आठवण आली! काय सांगणार मुलांना? तेव्हा जोवर तुम्ही आपल्या आई सोबत असाल, वाद झडले तरी संधी मिळताच चूक मान्य करा, क्षमा मागून मोकळे व्हा. मतांतर असले तरी अंतर वाढू देऊ नका.
जर आई अचानक गेली आणि त्या दरम्यान भेट होऊच शकली नाही तर त्याचा सल कायमचा मनात राहतो. मन आतून पोखरले जाते. तरूण वयात आपल्या मनासारखे काही होतच नाही असे मुलाला किंवा मुलीला अनेकदा वाटते, त्या बद्दल ही मुले आईला घालून पाडून बोलायला कमी करत नाही. मुलाला वाटतं बाबांची ऐपत असूनही त्याला योग्य शाखेत किंवा मोठ्या कॉलेजला शिकवल नाही किंवा इंजिनिअरिंग, मेडिकल ला शिकू दिलं नाही. त्याला अपेक्षित बाईक किंवा कार घेऊन दिली नाही. किंवा तो सांगत होता तो महागडा मोबाईल घेऊन दिला नाही.
कधी कधी मुलगी आपल्या वडिलांवर आपलं लग्न गरीब कुटुंबात लावून दिलं म्हणूनही नाराज असते आणि त्याबद्दल ती तिच्या आईशी अबोला धरते. सणाला जावयाला चांगली भेट दिली नाही तरीही मुलगी नाराज होते. जर नवरा रागावून तिला म्हणाला तर ती माहेरशी संबंध तोडते. आपल्या कुटुंबाची आर्थिक क्षमता तिला समजून घेता येत नाही याचे दुःख पालकांना असते.
ती जेव्हा त्याच फेज मधून जाते तेव्हा मात्र तिचा तिलाच पश्चाताप होतो. तोवर आई स्वर्गवासी झालेली असते आणि त्तरीही मुलगी आपल्या माहेरी पाय ठेवत नाही. आईला आपल्याला काही सांगायच होत का? गेली तेव्हा शांतपणे जगाचा निरोप घेतला की मनात काही होतं? ती गेल्यानंतर काहीच तर कळायला मार्ग नसतो.त्यावेळेस मुलींनी पश्चाताप करून काय फायदा? मुलींनो तुम्ही स्त्री म्हणून जन्म घेतला आहे. आपल्या आईचे दुःख तिचा सल समजून घ्या.तुम्ही माहेरी असेपर्यंत तिच्या छोट्या मोठ्या कामात तिला मदत करा. दुःखात तिची आई व्हा
काही मुलंमुली मात्र निस्वार्थी बुध्दीने भेट घेण्यासाठी आलेली असतात. त्यांना फक्त तिची भेट हवी असते.आणखी काही,म्हणजे काहीही नकोच असते. त्यांच्या मनात मात्र दुरवरून धावत पळत येऊनही भेट झाली नसल्याची हुरहूर असते.
काही वर्षांच्या काळानंतर तिची पाळी असते, ती आई होते, मुलं लहान असेपर्यंत ती त्या मुलावर अपार माया करते,फक्त दोनच मुलं असल्याने त्याला किंवा तिला जरा जास्तच प्रेम देते. मुलगी असली तरी मुलाचे कपडे स्वतः पुढाकार घेऊन घालते, बापालाही आपली मुलगी मुलांच्या कपड्यात थोडी जास्त स्मार्ट वाटते, मग हा सिलसिला काही वर्षे चालतो, हळूहळू त्या लहान मुलीची मानसिकता तशीच बनते, आपण हाल्फ पॅन्ट किंवा तत्सम कपड्यात उठून दिसतो, चार चौघापेक्षा वेगळे दिसतो असा तिचा समज होतो.हळूहळू मुलगी मोठी होते आणि शरीर वाढू लागले की जे कपडे आधी सुंदर वाटत होते त्या कापड्यातून शरीर बाहेर डोकावू लागत.
मुलांचीच नव्हे तर प्रौढ माणसांची नजर तिच्या शरीराशी लगट करू लागते. आई,बाबा हे कुठूनतरी बघतात आणि अस्वस्थ होतात. ते मुलीला सांगतात पण तीच मत ठाम झालेलं असत,मी काय घालावं ? हा प्रश्न माझा आहे, लोक पाहत असतील तर त्याचा बाऊ मी का करू? मी काही त्यांना माझ्या शरीराकडे पहा म्हणत नाही. घरात वाद झडू लागतात,तिने तसे तोकडे वा मुद्दाम फाडून फॅशन केलेले कपडे वापरू नये असे सांगितले जाते पण पालकांनीच श्री गणेशा केलेला असतो, आता चक्र उलट फिरवणे अवघड असते.
आई कितीही रागीट असली कितीही शिस्तीची असली तर तिच्या ह्रदयात मायेचा ओलावा असतो म्हणून मुलगी जेव्हा रूसून तिच्याशी अबोला धरते तेव्हा सगळ्यात जास्त दुःख आईलाच होतं कारण मुलीच्या आशा, अपेक्षा यांना मोकळी वाट करून द्यावी असे तिलाही वाटतच असते पण समाज काय म्हणेल? या दडपणापोटी तिला काही गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतातच. त्यामुळे आई, मुलाच्या वा मुलीच्या असंख्य चुका पोटात ठेवते, सहसा त्याची वाच्यता नवरा वा घरातील जेष्ठ व्यक्तिकडे करत नाही. त्यामुळे आई आणि मुले यांच्यात विश्वासाचे एक अतूट नाते असते. मुलांच्या हातून घडलेल्या अनेक चुकीच्या गोष्टी अथवा घटना आई ओटीपोटात दडवून ठेवते. म्हणूनच मुलांना प्रेम करणारी,त्यांचे ऐकणारी,हट्ट पुरवणारी आई जास्त भावते.अर्थात तिच्याच नातेवाईकांकडून किंवा मैत्रीणीकडून तिच्या मुलासंबंधी काही उलटसुलट ऐकू येते तेव्हा मात्र ती कावरीबावरी होते. अर्थात तोपर्यंत मुलांची मतं पक्की झालेली असतात आणि ती आई वडिलांच्या कोणत्याही सल्ल्यास नकार देतात.
मुलं लहान असतांना जे संस्कार त्यांच्यावर करू त्या प्रमाणे मुल भविष्यात वागली तर दोष कोणाचा? या वयात मुले आई वडिलांच्या नियंत्रणात रहात नसतील तर.. अशा वेळी बाबांनी खंबीर भुमीका घेतली तर वाद, त्यातून घरातून परागंदा होण वा आत्महत्या असे प्रकार घडले तर दोष पुन्हा बाबाकडेच जातो की तो मुलांना समजून घेऊ शकला नाही.
संदीप खरे यांनी दमलेल्या बाबांची कहाणी ऐकवली असली तरी फारच थोड्या मुलांचे आपल्या वडिलांशी जवळकीचे नाते जुळते. बाप म्हणजे डोक्याला ताप, संकट ,असेच बहुतांश मुलांना वाटते. आईकडे थोडं रडगाणं गाईले, थोडा अबोला धरला, हट्ट केला की आई विरघळते, समजूत घालता घालता एखादी गोष्ट मान्य करूनच टाकते. पुरुष आपल्या निर्णयाशी खंबीर असतो, ठाम असतो, एकदा नकार दिला तर तो सहसा आपले मत बदलत नाही त्यामुळे तो मुलांमध्ये अप्रिय असतो.
पुरुषाला वास्तवाचे भान असते त्यामुळे तो सहसा भावनेच्या प्रवाहात वाहवत जात नाही. बाप कोणत्याही गोष्टी बाबत निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या परिणामाची व्याप्ती पाहतो. संभाव्य धोक्यातून तरून जायची शक्यता आजमवायचा प्रयत्न करतो. ठाम निष्कर्ष निघाल्यानंतरच तो निर्णय घेतो म्हणून मुलांचे आपल्या वडिलांशी भावनिक नाते कमीच असते. मात्र मुलांच्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी,मुलांच्या शैक्षणिक बाबींची पुर्तता करण्याची जबाबदारी ही वडिलांच्या शिरावरच असते. त्यामुळे आपली आर्थिक कुवत लक्षात घेऊनच बापाला आपल्या मुलांच्या मनातील योजनेला हिरवा कंदील दाखवावा लागतो.
आजकाल मुलांना शालेय शिक्षण सुरु असतानाच शाळेतील Online वर्गासाठी किंवा शिकवणीसाठी अँपल, नोट वन, सारखा ऍडव्हान्स मोबाईल, रिबॉक शूज हवे असतात. टँब हवा असतो . शालेय शिक्षण पूर्ण होताच लॅपटॉप आणि मोटर बाईक हवी असते. या गोष्टी माझ्या अवाक्यात नाहीत असे वडीलांनी सांगितले तर मुले आपल्या वडिलांची लायकी काढायला कमी करत नाहीत.
जोपर्यंत मुले लहान असतात आणि बाबा त्यांच ऐकत असतो, घरी येताच मुलाला उचलून घेतो, त्याचे लाड करतो,त्याला गोष्टी सांगतो, त्याच्यासाठी ओझेवाला बनतो, त्याला पाठीवर घेत कांदे बटाटे करतो किंवा त्यांना हवी असलेली खेळणी घेऊन देतो. बागेत फिरायला नेतो, त्याच भावविश्व बाबाच असतो. तेव्हा बाबा त्याच्यासाठी जादूची कांडी असतो. बाबा त्याच्या अवाक्यात असेल तसा त्याचा बर्थ डे साजरा करतो, त्याच्या मित्रांना बोलवून सेलिब्रेट करतो, गिफ्ट देतो. साहजिकच तोपर्यंत त्याचा बाबा Always great असतो.
पण मुलं मोठी होतात त्यांच्या अपेक्षांना पंख फुटतात, कधी शाळेतून काढलेली पिकनिक बाबाच्या अवाक्यात नसते आणि बाबा आई मार्फत त्याला नकार कळवतो, बाबाला त्याच पैशात संसारासाठी काही महत्वाच्या गोष्टी होऊ शकतात असे वाटते. कधीतरी त्याला नेहमीपेक्षा वेगळे शूज किंवा आणखी काही जे त्याच्या मित्राकडे असते हवे असते, बाबांकडून असे दोन तीन वेळा नकार ऐकले की बाबा त्याच्यासाठी वाईट ठरतो. मग मुलगा कधीतरी त्याबद्दल सहजच, “तुम्हाला मुलांना काहीच देता येणार नव्हते तर जन्म दिलाच कशाला?” असा कडक शब्दात निषेध नोंदवतात. साहजिकच पालक या बोचऱ्या शब्दांनी दुखावले जातात आणि त्यामुळे पालक आणि मुले यांच्यातील दुरावा वाढतो. मुलांनी वेळेवर अभ्यास करावा, चांगले गुण मिळवावे, उगाचच मोबाईलवर खेळत बसू नये या आशयाचे काही सांगितले तरी मुले वडिलांचे म्हणणे गांभीर्याने घेत नाहीत किंवा दुर्लक्षीत करतात.
त्याचा परिणाम व्हायचा तोच होतो, अशा वेळी आईची भूमिका फार महत्वाची असते, तिने सौम्य शब्दात आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि कुटुंबाच्या गरजा या विषयी मुलांना सांगून त्यांच्या मनातील अढी काढली पाहिजे. आई आणि बाबा दोघांचा सूर यासाठी सारखा असला पाहिजे, त्या ऐवजी पतीला लोकांची उदाहरणे मुलांसमोर देत पतीच्या मनाला दुखावणारे शब्द पत्नीने वापरले तर मुले आपली आई चांगली आहे आणि बाबांनाच आपल्याला मुद्दाम काही द्यावेसे वाटत नाही असे वाटते. मग बाबा व्हिलन ठरू लागतो. तेव्हा, बाबांनी मुलांनी मगितलेली प्रत्येक गोष्ट देणे त्याला होत शक्य नसले तरी त्यातून तोडगा काढत एखाद्या वेळेस मुलाच्या एखाद्या गोष्टीला होकार द्यायलाच हवा. मग त्यासाठी प्रायोरिटी बदलावी लागली तरी बदलावी याचे कारण तुम्ही जे काही कष्ट उचलता त्याचा अंतीम उद्देश कुटुंबाचा आनंद हाच आहे. ‘बाबा वाक्य प्रमाण’ न म्हणता एखाद्या वेळेस त्यांच्या कलाने सरप्राईज म्हणून एखादी गोष्ट केल्यास तुमच्या सकारात्मक वृत्तीची दखल मुले नक्कीच घेतील.
तेव्हा मुलांच्या सर्व अपेक्षांची पूर्तता करणे शक्य नसले तरी एखाद्या छोट्या गोष्टीसाठी होकार देऊन तुम्ही त्यांच्या काळजाची सल काही अंशी कमी करू शकता, नेहमीच्या बोलण्यात तुम्ही खुबीने तुमच्यावर असणाऱ्या जबाबदारीची आणि तुमच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव करून दिल्यास तुमच्या नकारा मागचे सत्य त्यांना कळेलच आणि त्यांच्या मागण्याचा ‘मंदार पर्वत’ होणार नाही.
तुमचा सततचा नकार हे कौटुंबिक कलहाचे आणि असमाधानी कुटुंबाचे कारण होऊ शकते. मुलांचा वार्षिक निकाल अथवा एखाद्या स्पर्धेतील यश सेलिब्रेट करण्याची परवडेल अशी पध्दत निवडून तुम्हाला मुलांच्या प्रगती विषयी झालेला आनंद व्यक्त करण्यात हयगय करू नका कारण त्यांच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींचे कौतुक होणे हेच त्यांच्या पुढील स्पर्धेसाठी अथवा परीक्षेसाठी टॉनिक आहे. तेव्हा त्यांच्या क्षमता बुस्ट करणे हे फक्त तुमच्या सकारात्मक वृत्तीवर अवलंबून आहे.
आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला ‘शापित गंधर्व’ होणे आवडेल की ‘यक्ष’ होणे आवडेल!
आपण पुढारलेले किंवा आधुनिक पालक आहोत हे दाखवण्याची स्पर्धा समाजात सुरू असते त्यामुळे मुलांसमोर नको त्या विषयावर जाहीर चर्चा करणे, आपल्या सांपत्तिक स्थितिचे प्रदर्शन मांडणे, सोशल मिडियावर एखाद्या नाजुक विषयावर मत मांडणे. घरात स्वतः कमी आणि आखुड कपड्यात वावरणे हे उद्योग पालकांनी केल्यास मुले त्यांच अनुकरण करणार यात शकांच नाही. म्हणूनच मुले मोठी होतांना मुलांसमोर कोणते विषय बोलावे आणि कोणते विषय बोलू नये, कोणते कपडे घालू नये याचे तारतम्य हवेच हवे.
भविष्यात ही मुले आपल्या सहचराशी कशी वागतील? त्यांच्यातील कौटुंबिक संबंध कसे असतील ते तुमच्या घरातील तुमच्या संवादावर अवलंबून असते. अगदी घराबाहेर फिरायला किंवा पर्यटन स्थळी गेल्यानंतर तुम्ही सामाजिक भान ठेऊन वागता की ही बंधने झुगारुन देऊन वागता यावरही तुमची मुले लक्ष ठेवत असतात. थोडक्यात तुम्ही त्यांच्याकडून तेव्हाच चांगल्या वागण्याची अपेक्षा ठेऊ शकाल जेव्हा तुमचे वागणे हे समाजासाठी चांगले असेल.
अनेक तरूण तरूणी आपल्या कार्यालयात, प्रवासात किंवा एखाद्या उपक्रमात होणाऱ्या ओळखीतून मैत्री करतात. मैत्री असते तोवर त्यांचे वागणे एकमेकांना खटकत नाही. घरी जेव्हा हा प्रकार समजतो तेव्हा पालक सावधगिरीची सूचनाही करतात. तरुण पिढी सूचना ऐकायला तयार नसतात उलट आता त्यांना चांगले वाईट कळते असे ऐकवतात. बरेच वर्षे मैत्रीचा प्रयोग सुरू असतो. कालांतराने ते प्रेमविवाह करतात आणि वर्षभरात डिव्होर्ससाठी अर्ज करतात किंवा एकमेकांच्या विरोधात दावा ठोकतात.
इतक्या वर्षांची घनिष्ठ मैत्री असतांना लग्नानंतर त्यांच्या सवयी, त्यांचे स्वभाव एकमेकांना का खूपतात? याचे एकमेव कारण possessive attitude. दोघे आर्थिक दृष्टीने स्वतंत्र असल्याने दोघांचा लवकरच अपेक्षा भंग होतो. म्हणून आपणच एकत्र कुटुंबात राहून कुटुंबाला समजून घेतले, वेळ दिला, एकमेकांचा सन्मान राखला तर अशी परिस्थिती निर्माण होणार नाही. Divorce घेऊन विभक्त झाल्यानंतर त्याचा सल आयुष्यभर बाळगण्यापेक्षा एकमेकांना समजून घ्या. मतांचा आदर करा,तुलना करू नका तर त्याला किंवा तिला appreciate करा.
अगदी छोट्या कुटुंबातही समोरासमोर बोलणे होत नसल्याने गैरसमज निर्माण होऊ शकतात. भिन्न आवड, जुन्या नव्या पिढीतील अंतर, जीवन पध्दतीमधील फरक किंवा दुसऱ्याच्या आयुष्यात नको तितका हस्तक्षेप असे काहीही कारण संबंध दुरावायला कारण ठरू शकतात. तेव्हा सजगतेने आणि प्रेमाने बोलून प्रश्न सुटेल असे पहा मग दुसऱ्या व्यक्तीला दुखावल्याची बोच मनात कायम राहणार नाही.
तेव्हा कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना आपल्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी होणार नाहीत पण त्याचा ‘सल’ बाळगत जीवन दुःखी करून काय फायदा? आपल्या नकारात्मक जगण्याचा परिणाम कुटुंबावर होणार यात शंकाच नाही. आपले दुःख साजरे करण्यासाठी इतरांना दुःखी करून आपल्याला काहीच फायदा नसेल तर तशा वागण्यास अर्थ नाही. तुमचे जीवन हाच तुमच्या मुलांसाठी आरसा आहे,आरसा स्वच्छ असेल तरच त्यात तुमच्या मुलांची प्रतिमा स्वच्छ दिसेल, तेव्हा आरसा डाग विरहित ठेवणे ही तुमची जबाबदारी आहे.आयुष्यभर आपल्या चुकीच्या कृतीचा कींवा शब्दांचा सल मनात बाळगण्यापेक्षा आजच मृदु शब्दात मनातील अढी सोडवून शांत व्हा.