मैत्री
प्रेम कोणी कोणावर करावं? कोणत्या वयात प्रेमात पडावं? याला उत्तर नाही. तरुण वयात ते होत तसे पन्नासी नंतरही किंवा अगदी साठी नंतरही प्रेम करणारे भ्रमर दिसतात. दिसायला खूप सुंदर असणाऱ्या व्यक्तीवर होत तसच ते अगदी सामान्य दिसणाऱ्या दोन स्त्री पुरूषांतही होतं. अगदी दोघांची आवड एक म्हणून, तर कधी एखाद्या प्रसंगात अचानक ओळख झाली किंवा मदत केली म्हणूनही. आधी ओळख, मग मैत्री आणि त्याचे परिवर्तन प्रेमात असेही होते. अगदी भिन्न प्रकृती किंवा आवड असणाऱ्या व्यक्ती प्रेम रज्जूनी बांधल्या जातात. पती किंवा पत्नी साथ सोडून गेल्यानंतर, साठ वर्षानंतर पुन्हा लग्न केल्याची अनेक उदाहरणे आहेत. फिल्म इंडस्ट्रीत तर अशी कित्येक उदाहरणे असतील. अगदी मुलीच्या वयाच्या स्त्रीच्या प्रेमात पडल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. तेव्हा कोणाची? कोणत्या वयात? कोणाशी कोणत्या उद्देशाने मैत्री होईल हे सांगणे किंवा त्याचा अनुमान लावणे कठीण आहे.
‘त्याचे’ तसे काही नव्हते पण अलीकडे त्याला थोडे एकटे एकटे वाटत होते.म्हणजे दोन्ही मुलं त्यांच्या अभ्यासात आणि मित्रांसोबत व्यस्त होती आणि पत्नी तिची कॉलेजमधील प्राध्यापक नोकरी त्यासाठी वाचन आणि तयारी यात व्यस्त होती. साहजिकच कार्यालयातून आल्यानंतर तोच तसा एकटा एकटा होता, मन नको तिथे धाव घेत होत. तो दर गुरुवारी समर्थ स्वामींच्या मठात न चुकता जायचा. तेव्हा तरी त्याच्या मनात काही नव्हते. मन थोड शांत व्हायचे, त्या वातावरणात प्रसन्न वाटायचे इतकेच.
मंदिरात अनेक भक्त यायचे. भक्तिभावाने तेथील सभामंडपात ध्यानस्थ बसायचे. ती ही त्याला तिथेच दिसली. का कुणास ठाऊक? त्याच्या मनात तिच्या विषयी ओढ निर्माण झाली. ते शारीरिक आकर्षण की आणखी काही त्याला माहिती नव्हते मात्र तो प्रत्येक गुरूवारची, तितक्याच आतुरतेने वाट पहायचा. त्याचे नेहमीच टापटीप रहाणे कोणालाही भुरळ घालणारे होतेच पण अलीकडे तो स्वतः ची जास्तच काळजी घेत होता आणि हेच रेशमाला खटकत होत.
हल्लीच त्याने पन्नाशी पार केली होती. पन्नाशीतही तो तरूण दिसत होता. चांगले कपडे, शम्मी कपूर सारखे बसवलेले केस, हलका परफ्यूम, चेहऱ्यावर प्रसन्न भाव यामुळे तो तसा सुंदर दिसत होता. दर गुरवारी संध्याकाळी तो ऑफिसवरून येतांना आवर्जून स्वामींच्या मठात दर्शनासाठी येत होता.तिथेच त्याची आणि तिची एक दोन वेळा भेट झाली. भेट झाली म्हणजे फक्त नजरानजर. तिच्या डोळ्यात त्याला समजुतीचे भाव दिसले, जणू डोळे हसले.
बहुदा ती दर गुरुवारी दर्शनासाठी याच वेळेत येत असावी. एक दोन वेळा त्याच वेळेत तिला मठात पाहून त्याला आश्चर्य वाटले, की आनंद, हे तो सांगू शकला नसता. पण मनाला कुठेतरी बरे वाटले. अजूनही हाक मारावी, किंवा तिची चौकशी करावी अशी ओळख नव्हती. ती फक्त गुरूवारीच येते की नेहमी याची खात्री करण्यासाठी तो एक दोन वेळा गुरूवार नसतांनाही तो मठात गेला. वेळेची चुकामुक होऊ नये म्हणून थोडा वेळ वाट पहात मठातच बसला, पण ती आली नाही. मग मात्र ती फक्त गुरुवारीच येते असा निष्कर्ष त्याने काढला.
एक दोन महिने झाले त्यांची ओझरती भेट होत होती, तो गालातच हसत होता. ती ही गालात हसत होती पण तिला काही विचारावे, निदान नाव तरी अशी त्याची हिंमत होत नव्हती. ती दिसायला सुंदर होती. निमगोरी पण आकर्षक गोल चेहरा, ओठावर हलकी लिपस्टिक, कोरीव भुवया, कानात छोटे इयरींग, कपाळावर छोटी टिकली, उजव्या बाजूस काना मागुन बाहेर आलेली एक लट आणि लांबसडक वेणी. अगदी गळ्याबरोबर असणारे मंगळसूत्र, ती पंजाबी ड्रेस किंवा साडी घालायची. कोणीही तिच्याकडे पाहावं इतकी सुंदर ती नक्कीच होती. तिचं ते रूप त्यान मनात साठवलं होतं असं त्याच्या प्रसन्न चेहऱ्याकडे पाहिल्यावर, म्हणवयास हरकत नव्हती.
म्हणजे हल्ली घरी गेल्यावर तो थोडा स्वतःत हरवल्या सारखा वाटायचा, ऑफिसमधून घरी पोचल्यावर कधीतरी बुट न काढता तो तसाच बसून राहायचा, तर कधी पत्नीने दिलेला चहा न घेता तो वाफाळता चहा थंड होईपर्यंत तसाच पहात बसायचा.
तीच हॉलमध्ये येऊन त्याला विचारायची,”अहो! कमाल झाली किती वेळ तुम्ही तसेच बसून आहात? चहा थंड झाला, तुमचं लक्ष कुठे आहे? थांबा गरम करून आणते.” तो तिच्याकडे पाहून हसायचा,”अग हो की! खरंच चहा थंड झाला. पण नको गरम करू, मी घेतो तसाच.” “नको नको, थंड चहा तसाच का प्यायचा? मी आहे ना घरात,आता गरम करून आणते.”ती चहा गरम करुन आणायची आणि त्याच्या समोर बसत म्हणायची, “भूक लागल्याय का तुम्हाला ? काही खायला आणू का?”
तो चहा घेता घेता हसायचा,” नको,नको आता काही खाल्लं तर जेवायला होणार नाही.” ती त्याचा चहा घेऊन होईपर्यंत त्याच्या चेहऱ्याकडे पहात बसायची. त्याला विचारावं की विचारू नये असं बहुदा तिला वाटत असावे.
“श्रीधर, एक विचारू का? ऑफिसमध्ये काही घडलंय का? नाही म्हणजे हल्ली तू पहिल्या सारखं काही सांगत नाही आणि तू थोडा स्वतःत हरवल्या सारखा दिसतोस म्हणून विचारते?” तो चपापला,चेहऱ्यावर काही भाव उमटू नये याची खबरदारी घेत म्हणाला, “मी ! हरवलोय !काही तरीच काय?ऑफिसमध्ये काय घडणार? रोजच्याच फाईल्स,रोजचंच काम.तुला अस का वाटतंय?” “श्रीधर, हल्ली पूर्वी सारखा तू ऑफिसमधून आल्यावर बोलत नाहीस की मला काही सांगत नाहीस, एक तर पेपरमध्ये डोकं घालून बसतोस किंवा फोनवर बघत बसतोस म्हणून मला तस वाटतं.”
तो तिच्या मांडीवर थोपटत म्हणाला,”अग ऑफिसमध्ये रोज रोज नवीन काय घडणार? तुला आपलं उगाचच तस वाटतं.”
“श्रीधर मी मानसशास्त्र विषय शिकवते, तो माझ्या आवडीचा विषय आहे. तुला नसेल सांगायच तर राहू दे पण तू हल्ली कुठेतरी हरवल्यासारखा वागतोस.म्हणजे आता आजुबाजुला मुल नाहीत म्हणून तुला विचारते, तू कोणाच्या प्रेमात तर पडला नाहीस ना?”
तो तिच्याकडे पाहून रागावला,”रेशमा, अग पन्नाशी कधीची ओलांडली, आता प्रेमात पडायच वय राहिलय का? अजून पाचसहा वर्षांनी आपली दुसरी इनींग सुरु होईल. तूला असा संशय का येतोय?” “का संशय येतोय? जरा स्वतःला विचार,किंवा अस कर जरा आरशासमोर उभा रहा आणि स्वतः चा चेहरा पहा, मग कळेल मी अस का म्हणते ते.”
श्रीधर चपापला, त्याची चोरी पकडली गेली होती, खरं तर अजून कशात काही नव्हतं, फक्त तिच्या बाबत त्याला काहीतरी वेगळ वाटत होतं, म्हणजे तिला पाहिलं की मनाला आनंद होत होता. तिलाही तसच वाटतं की नुसता भ्रम हे अजूनही ठरायच होत. अर्थात पूढे भेट झाली तर!
ती पून्हा त्याच्याकडे पहात म्हणाली,”अरे बोल की नुसताच माझ्याकडे पहात का बसलास? तिला आठवण्याचा प्रयत्न करतोस की तिची माझ्याशी तुलना करतोस?” तो गडबडला, तिने अचूक ओळखल्याने वैतागला, “रेशमा, तू कुठेतरी भरकटत चालली आहेस. सुतावरून स्वर्ग गाठण्यात तुम्ही मानसशास्त्र अभ्यासक नको तेवढे हुशार असता, पण माझ्या दुर्दैवाने अद्यापही तस काही घडल नाही. एवढं स्पष्टीकरण पुरे आहे असं मला वाटतं.”
ती म्हणाली,”माझं म्हणण चुकीच असेल तर राहिलं, पण का कुणास ठाऊक तू माझ्यापासून काही लपवतो अस मला पून्हा पून्हा वाटतंय.” आता त्याच्या रागाचा पारा चढला,”होय मी तुझ्यापासून काही लपवतोय अस समज, झालं समाधान, Now please leave me alone.”
ती उठली आणि आपली कामे आटोपायला निघून गेली. तो उठला आणि स्वतःच आवरायला गेला पण त्याच्या मनात मात्र वादळ घोघावत राहिलं, रेशमा केवढी हुशार आहे? कसं बरोबर आपल्याला तिने पकडलं! या वयात असले उद्योग आपल्याला का सुचावेत? आपल्याला काही लपवता येत नाही या बद्दलही त्याला राग आला. थोड्या वेळाने त्याने देवाला दिवा लावला, नमस्कार केला.मन शांत करायचा तो प्रयत्न करत होता.
एक मन म्हणालं, छा!आपण उगाचच तिच्यावर रागावलो तर दुसर म्हणालं, तिने तरी एवढ खोदून खोदून विचारायची गरज होती का? तोच त्याच्याशी झगडत होता. मन शांत होत नव्हतं. ज्या वयात मुलांनी प्रेम करायचं आणि त्यांनी कुठेतरी वाहून जाऊ नये किंवा चुकीचा निर्णय घेऊ नये यासाठी आपण त्यांची समजूत काढायची, त्यांच्यापाठी खंबीरपणे उभ रहायचं त्या वयात आपल्याला हे नको ते का सूचावं? ते ही स्वामींच्या मठात, कदाचित त्यांचीच काही योजना असावी. त्याचं त्यालाच हसू आलं, आपण सोईस्कर अर्थ काढतो आणि कुणावर तरी ढकलून मोकळे होतो.
त्यानी ठरवलं, तिला सांगून मोकळ व्हावं, म्हणजे उगाच मनाचा संताप होणार नाही. पण काय सांगणार? अद्याप तिच नाव माहिती नाही की काही बोलण झाल नाही. त्याच त्यालाच हसू आलं. रात्री मुलांसोबत जेवतांना त्याने त्यांच कॉलेज, त्यांच्या ऍक्टिव्हिटी यावर गप्पा मारल्या.
कधी नव्हे ते, “मी कॉलेजमध्ये फुटबॉल कॅप्टन होतो बर का! ” हे ही तो म्हणाला. मुलांना मोठं आश्चर्य वाटल. या पूर्वी डॅड कधी बोलला नाही मग आज अचानक! अजय म्हणाला,”डॅड या पूर्वी तू कधी बोलला नाहीस, तू खेळायचास म्हणून, आम्हाला मात्र नेहमी सांगतोस, Study first, don’t Forget your goal.”अगदी त्याची नक्कल करत बोलला.
तो मनमोकळा हसला. “अरे आज ठाकूर मैदानावर मुलं खेळताना पहिली आणि अचानक आठवलं. पण तुला सांगतो, पेनल्टी किक माझा फेव्हरेट होता,आमच्या कॉलेजला कितीतरी ट्रॉफी मी जिंकून दिल्या आहेत. ते काही असलं तरी आम्ही अभ्यासात कधी मागे नव्हतो बर का! ,उगाच नाही फायनलला, फर्स्ट क्लास फस्ट आलो.”
“Dad, but you were never satisfied with our Ninette, rather, you asked why not ninety five?” शर्वरी बोलली. “शर्वरी,आता स्पर्धा वाढली आहे, तू पाहिलंस ना ऑनलाइन मध्ये किती ऑपशन दिले होते, तेव्हा कुठे साठे कॉलेज मिळालं. Parents are helpless. They have to drive according to the situation.”
हळू हळू विषय नको तिकडे जाण्याची लक्षणं दिसू लागली तशी रेशमा म्हणाली, “खूप झाल्या गप्पा, जेवून घ्या, मुद्दाम मी उशिरा कुकर लावते, का? तर तुम्हाला गरमागरम जेवण मिळावं आणि तुम्ही उगाचच नको तिकडे विषय नेताय. तुमच्या डॅडला कधी काय आठवेल नेम नाही.”
“मम्मा, कधी नव्हे तो डॅड आमच्याशी गप्पा मारतोय तर तुझं काय जातंय? जेवण थंड झाल्याची कंम्पेंट आम्ही कधी केली का?” “तू नाही केलीस पण तुझ्या डॅडला थंड भात नको असतो, म्हणून सांगते. बर आता पुन्हा चर्चा नको,चला आटपा, मला भांडी आवरून उद्याच्या लेक्चर्सची तयारी करू दे.”
“मम्मा कमाल आहे तुझी, गेले पंचवीस वर्ष शिकवतेस तरी तुला नेहमी तयारी का करावी लागते?” “अजय,वर्षागणिक मानसशास्त्रीय भुमीका बदलत असते, आता हेच पहा तुझ्या डॅडला फर्स्ट क्लास मिळाला तेव्हा त्याच खूप कौतुक झालं असावं, पण मला फर्स्ट क्लास मिळूनही पोस्ट ग्रॅज्युएशनला कॉलेज ऍडमिशन मिळत नव्हतं,आणि तुम्हाला नाईनटी प्लस मिळूनही ना कौतुक झालं ना बक्षीस मिळालं, का? टक्केवारीचे संदर्भ बदलले. तेव्हा या बदलत्या परिस्थितीचा मुले, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक आणि समाजात कसे बदल घडून येतात ते अभ्यासणं आणि मुलांना समजावण फार फार महत्त्वाचे असतं.”
“मम्मा माझे मित्र म्हणतात, मानसिक शास्त्रात,कधीही ठाम भूमिका नसते, व्यक्ती निहाय ती बदलते खरं का?” अरे नेहमीच ते खरं नसत, पण प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृती आणि मानसिक ताण यानुसार त्याची भावनिक गरज भिन्न असते. त्याला कुणी समजून घेतलं नाही की तो एकतर एकलकोंडा होतो किंवा, हायपर होतो. तू ऐकलं असशील ना छोट्या छोट्या कारणावरून मुलं आत्महत्या करतात, तर मोठी माणसं एकमेकांचा जीव घेतात, हे अस निराशेच्या गर्तेत जाणं किंवा हिंसक बनणं की गोष्ट एक दिवसात नाही घडत. मनात विचारांची आंदोलन सुरू असतात ती अभ्यासण मानोसपचार तज्ञाला गरजेचे असते. ही माहिती केवळ नेट किंवा यू ट्यूब पाहून कळण शक्य नाही. विद्यार्थ्यांना माहिती देण्यापूर्वी ती पडताळून पाहणे गरजेचे असते.यासाठी माणसाचे वागणे आणि मनोवैज्ञानिक भुमिका समजून घ्यावी लागते. त्यासाठी हे संदर्भ ग्रंथ उपयोगी पडतात.”
“मम्मा हे अस सगळ वाचून तुझ डोकं भणभणत नाही? डोक्यात येणारे विचार समजून घ्यायचे, मागे एका चित्रपटात दाखवल होत की खून करण्याचा विचार मनात आला की मेंदूत हारमोन्समध्ये काय केमीकल चेंजेस होतात ते म्हणे फोरेन्सिक विभाग शोधू शकतो. खर असेल हे?”
“हो तर, मुळात नॉर्मल माणसात वेगवेगळे हार्मोन्स कसे काम करतात ते समजल तर तो अबनॉर्मल वागला की ह्या हार्मोन्सची पातळी वाढते, कमी होते की त्यात बदल होतो हे अभ्यासता येत. एखाद्या व्यक्तीला वेडा घोषित करण सोपं असत पण वेडा पाठची कारण जाणून घेणं आणि त्या स्थितीतून त्याला बाहेर काढण यासाठी अनुभव आणि अशा अभ्यासाची गरज आहे. मला वाटत तुला समजल असावं.”
“मम्मा तू अगदी बोअर करून टाकलं, तुझ्या लेक्चरला मुलं बसली तर ती कोमात जात असतील. मी पागल म्हणून तुला विचारलं. तू जागून हवी तेवढी पुस्तक वाच.”
श्रीधर हे सगळ ऐकत होता आणि त्याला ते पटतही होत. ती गुरुवारी दिसली की पूढचे काही दिवस त्याला झोपेत मध्येच जाग यायची. कधी ती जवळच असल्याचा भासही व्हायचा. रेशमाच्या या लेक्चरवर काही बोललं तर पून्हा ती त्याच्या शांत बसण्यावर किंवा बदललेल्या वागण्यावर नक्की घसरेल आणि मुलांसमोर आपल्याला काही सांगता येणार नाही म्हणून तो शांत होता.
या चर्चेत तिच जेवण थंड झालं. श्रीधर आणि मूल जेवून निघून गेली तशी ती विचार करू लागली, नक्की श्रीधर आपल्यापासून काही तरी लपवतो म्हणूनच तो आताही शांत होता. मगाशी त्यांनी नको तो विषय काढुन वेळ मारून नेला.
तिने सगळं आवरलं आणि ती बेडरूममध्ये आली. ग्रॅज्यूएशन साठी Erikson’s, Freud’s, Kohlberg’s , Reading Minds( Henrik Fexeus), Human psychology (Dr.Sarabjit Kaur), वर्तनाचे मानसशास्त्र(डॉ. शोभना अभ्यंकर) अशी कित्येक पुस्तके तिने अभ्यासली होती.अगदी अच्युत गोडबोलेंच “मनात”ही वाचून काढलं होत. विद्यार्थ्यांना शिकवताना माणसाचे वागणे आणि मानसिक किंवा सामाजिक दबाव या बाबत ती आवर्जून उल्लेख करी. आपणही एखादे पुस्तक लिहावे अस तिच्या सारख मनात येई पण घरच उरकता उरकता पुस्तक लिखाण मनातच राही.
कोणतीही व्यक्ती खोटं कधी बोलते ते कसं ओळखावं? या बाबत काही तर्क तिने स्वतः तयार केले होते. गेले पंचवीस वर्षे ती डहाणूकर कॉलेजमध्ये मानसशास्त्र शिकवत होती. अनेक चर्चा सत्रात ती भाग घेत होती.मार्गदर्शन करत होती. पीएचडीसाठी तिने तयारी केली होती, खूप पुस्तके वाचली होती. बऱ्याचदा तिच्या या वाचन वेडामुळे श्रीधर तिची वाट पाहुन झोपी जाई. श्रीधरच्या अशा वागण्याला ती ही जबाबदार होती. ती त्याला पुरेसा वेळ देत नव्हती. कॉलेज, घरचं काम आणि हा अभ्यास अस तीन आघड्यावर काम करता करता ती थकून जाई. तिचा नाईलाज होता.
तेव्हा तिच्यासाठी श्रीधरचं हे वागण काही नवीन नव्हतं, पण इगो हर्ट न होता ते समजावून घेणं तस सोप्पं नव्हतं. मानसशास्त्र यावर वर्गात लेक्चर्स देणं आणि प्रत्यक्ष घरातील पेच सोडवणं, कोडं उलगडण्याचा प्रयत्न करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे तिला स्वत:च्या मुलांबद्दल जाणवलं होत. श्रीधरच्या या अशा वागण्याला आपणच जबाबदार आहोत हे तिला समजत होतं म्हणूनच ती शांत होती. विचारांच्या तंद्रीत ती पुस्तके घेऊन नोट्स काढायला बसली पण श्रीधर आपल्या पासून नक्की काही लपवत आहे ह्या विचाराने ती तशीच बसून राहिली. श्रीधर बेडरूममध्ये आला तेव्हा त्यांनी तिला विचारलं, “रेशमा तुला बहुतेक नीज येते आहे, कितीतरी वेळ तू अशीच बसून आहेस मी मगाशी येऊन गेलो, तुला डिस्टर्ब नको म्हणून मी हॉलमध्ये बसलो होती. मुलं झोपली आता लाईट काढू का?” ती त्याच्या आवाजने सावध झाली.
“श्रीधर, काही म्हणालास का मला? मी नोट्स काढत होते.” तिच्या मांडीवर आय पॅड होता पण तो बंद होता. ती त्याच्याकडे पाहून हसली. “मूल झोपली का? काय विचारत होती?”
“काही नाही ग, त्यांची स्टडी टूर बंगलोरला जाणार आहे,त्यांना ऍडव्हान्स आणि parents consent हवा आहे.” “मग तू काय म्हणालास?” “Come On Reshma, तुला माहीत आहे मुलांच्या बाबतीत डिसीजन घेताना मी पाहिलं तुझं मत घेतो? मी म्हणालो मी तुमच्या मम्माशी बोलतो आणि सांगतो.”
“That’s good,पण स्वतः च्या बाबतीत डिसिजन घेताना तू मला अंधारात ठेवतो, Am I right?” “बर ,पून्हा तुला त्याच मुद्द्यावर यायच आहे का? तर ऐकं मी गुरूवारी मठात जातो तिथ “ती” मला दिसते.” ते ऐकताच ती सावरून बसली ,अब उट पहाड के निचे आया था। “ती? त्या तिला काही नावही असेलच!” “माझ ऐकणार आहेस की स्वतःच घोड पूढे दामटणार! ऐकणार असशील तरच मी सांगतो.” ती सावरून बसली,तिने बेडरुमचा दरवाजा पाहिला. तो लॉक होता. टेबलवर पाण्याचं भांड होत, त्यातून तिने एक घोट पाणी प्यायलं, त्याला दिल. तो म्हणाला,”No thanks.” मग त्याच्याकडे पहात ती म्हणाली, “हं सांग.” “तर ती पहिल्यांदा मला मठात दिसली त्याला दोन महिने झाले, त्या नंतर ती दर गुरुवारी मठात दिसते पण आम्ही कधीही एकमेकांना भेटलो नाही, तीच नाव काय विचारण्याचा प्रश्न आलाच नाही. पण ती माझ्याकडे पाहून smile देते अन मी पण…”
“बर पुढे” “पुढे तुझं कपाळ.” “श्रीधर, केवढा अरसिक तू, या दोन महिन्यात, म्हणजे आठ गुरुवार झाल्यानंतर तुला तीच नावही माहीत नाही. मग फक्त smile इतकीच प्रगती, छा! प्रेमाच्या बाबतीतही फारच “ढ” आहेस.”ती जोराने हसली.
“रेशमा, रेशमा प्लिज हसू नको,तू अशी हसलीस की मला भीती वाटते. Are you Ok? माझं काही चुकलं का?” श्रीधर कावराबावरा होत तिच्याकडे पहात म्हणाला. ती पुन्हा जोरात हसली,या वेळेस तिने श्रीधरच्या पाठीवर थोपटले, त्याच्या डोळ्यात पहात म्हणाली, “असा कसा रे नवरा ? साधी एक पोरगी पटवता येत नाही. बर ते जाऊदे, मला सांग दिसायला ती कशी आहे?” तो लाजला,”काहीतरीच काय?रेशमा तू माझी थट्टा उडवतेस ना? खर खर सांग?”आता तो थोडा भाऊक झाला होता. तिच्या लक्षात आलं,आता त्याला तिच्या मदतीची गरज आहे, त्याला चिडवून चालणार नाही. ती त्याचा हाता हातात घेत म्हणाली, Sorry Yaar, I don’t want to hurt you,खर सांगू, तुला ती आवडली ना मग कर ना मैत्री, हे बघ कुणाशी मैत्री करण काही वाईट नाही, ती काही शारीरिक ओढ नसते कदाचित मानसिक समाधान कदाचित भावनिक गरज. कदाचित मी तुला पहिल्या इतका वेळ देऊ शकत नसेन म्हणूनही तुला वाटत असावं.”
त्याने तिच्याकडे अविश्वासाने पाहिले, पण तिने मात्र त्याचा हात गोंजारत त्याला जवळ ओढले आणि ती कानात कुजबुजली. “Yes ,my Dear husband, I mean it. You are now in the second phase of your life and you may need someone to listen to you.”
तिचे ते आश्वासक शब्द त्याने ऐकले आणि तिला मिठी मारून तो रडू लागला, Reshma no one can understand me better than you, you are not just wife but a true friend, I don’t need anyone who is not familiar to me.”
“श्रीधर अगदी वेडा आहेस,आणि भोळाही, मला माहिती आहे तू माझ्या पासून काही लपवून ठेऊ शकणार नाहीस, In fact you were eager to tell me,I can read your face but still I will say if you like her, accept her as your friend and bring her home.”
श्रीधरला कळेना,आपली बायको शहाणी आहे की वेडी,जी स्वतःच सांगत होती की तुझ्या मैत्रीणीला घरी घेऊन ये. या घटनेला एक दोन महिने होऊन गेले. तो नॉर्मल माणसाप्रमाणे वागत होता. त्याच्या मनावरील ताण नाहीसा झाला होता. “कमाल आहे रेशमाची तिने चक्क मैत्री करायला होकार दिला.” तो स्वतःशी म्हणाला .नेहमी प्रमाणे तो मठात दर्शनाला जात होता आणि ती त्याला तिथेच भेटत होती.
एका गुरुवारी आश्चर्य घडल, तिच्या बरोबर तितकाच हँडसम माणूसही आला. त्या दोघानी दर्शन घेतलं. तो चोरून तिच्याकडे पहात होता. त्यानेही स्वामींचे दर्शन घेतले आणि तो बाहेर पडला. तर पाठीमागून तिने हाक मारली,अहो,शुक शुक,त्याने पाठीमागे वळून पाहिले तर ती दोघे त्याच्या दिशेने येत होती. तिनेच ओळख करून दिली,”हे माझे मिस्टर, अशोक पोतदार, आणि मी सानिका,आणि अशोक हे माझे मित्र.”
त्यांनी अशोक पोतदार यांच्याशी हात पुढे करून शेक हॅन्ड केला आणि तो म्हणाला,”मी श्रीधर वझे, टाटा फायनान्स मध्ये मॅनेजर आहे. बर झालं आपण भेटलात.” तिघे बोलत बोलत बोलत बाहेर पडले, पोतदार म्हणाले, “वझे साहेब पहिल्यांदा आपण भेटतोय तर कॉफी घ्यायला हरकत नाही. काय म्हणता?” तो मंदिराच्या पायऱ्या उतरून रस्त्यावर आला तर तिथे रेशमा उभी होती, ती पोतदार जोडप्याकडे पहात म्हणाली,”अग सानिका तू इकडे कुठे?” “सानिका हसली,आम्ही कॉफी घ्यायला बाजूच्या कॅफेत जातोय, By the way , meet my husband Ashok and here my good friend Shridhar Vaze.” त्याला खूप अकवर्ड वाटलं, ती त्याच्या बायकोच्या समोर त्याचीच, माझा मित्र म्हणून ओळख करून देत होती,आणि तिला काहीच वेगळं वाटतं नव्हतं.तो हसून म्हणाला, “सानिका,माझ्या मिसेसला तू ओळ्खतेस?”
“श्रीधर, तुझी मिसेस आली आहे का? मग तर फार बर होईल, पण ती कुठे आहे?” तो हसला,रेशमाकडे बोट दाखवून म्हणाला,”तू एवढा वेळ जिच्याशी बोलते आहेस तीच माझी मिसेस, मिसेस रेशमा श्रीधर वझे.” “Oh! Really, I can’t believe she has such a lovely personality. Shridhar you are very lucky to have a wife like her. Ashok Reshma is a very close friend of mine. She is a lecturer at Dahanukar college.”
अशोकने शेकहँंड करण्यासाठी हात पुढे केला तस रेशमाने हात पुढे करत Nice to meet you म्हटले. चौघे, मठा शेजारच्या “निवांत” कॅफेमध्ये गेले, कॉफी झाली तसा श्रीधर, अशोक पोतदार यांचा निरोप घेताना म्हणाला,”अशोकजी पुढच्या वेळेस दोघांनी आमच्या घरीच यायचं बर का, निवांत गप्पा मारू.”
पोतदार हसत म्हणाले,”आमची ही एकदा गप्पा मारायला लागली की किती वेळ जाईल याची खात्री नाही, तुम्हाला लंचलाच बोलवावं लागेल. कदाचित डिनर पर्यंत यांच्या गप्पा संपल्या नाहीत तर तुमची पंचायत व्हायची.” चौघे खळाळून हसले, पुन्हा नक्की भेटायचं ठरवून श्रीधर आणि रेशमा यांनी पोतदार दाम्पत्याचा निरोप घेतला तेव्हा सानिका श्रीधरचा हात हातात घेत म्हणाली,”कधी भेटायच मनात आलं तर विनासंकोच फोन करा.तुम्हाला भेटायला मला आवडेल.”
पोतदार यांनी श्रीधरला शेक हॅन्ड करत निरोप घेतला.”Ok friend आम्ही नक्की एखाद्या Sunday ला येऊ, तेव्हा मात्र कंटाळून घालवू नका म्हणजे झालं.” “पोतदार, हे काय आपल बोलण झाल! तुम्ही कधीही या आम्हाला तुमच स्वागत करायला आवडेल.”
श्रीधर रेशमाशी वाटेत काही बोलला नाही. घरी गेल्यावर मात्र तो रेशमावर रागावला, “रेशमा तू हे जाणीवपुर्वक केलस, खर ना? तू सानिकाशी स्वतः मैत्री केली, खर ना? काय गरज होती त्या सानिकाच्या नवऱ्याला तिथे बोलावण्याची? तुला हेच दाखवून द्यायचं होत ना की सानिकाचा नवरा handsome आहे आणि ती माझ्याशी मैत्री करणार नाही. मला वाटलं नव्हतं तू इतकी रुड वागू शकशील.” “झालं तुझं बोलून,की अजून काही तुला म्हणायचं आहे, मी सानिकाशी ओळख करून घेतली हे खरं आहे कारण तू ना सानिकाशी बोलू शकत होता ना सानिका तुझ्या मैत्रीचा स्वीकार करू शकत होती. जेव्हा तिला मी तिने एका माणसाला किती वेड लावले आहे हे सांगितलं तेव्हा ती म्हणाली,”मी कधीही त्या माणसाकडे मैत्री व्हावी या भावनेने पाहिलं नाही, तर कुठेतरी प्रेमभंग झालेला हा तरुण या सहानुभूतीने smile दिल. दुर्दैव, की त्या हसण्याला तो प्रेम समजला. असो मी त्याला नक्की भेटेन पण माझ्या नवऱ्यासमोर, त्याचाही गैरसमज होता उपयोगाचा नाही.”
त्या प्रमाणे ती मुद्दाम तुला भेटायला आली. नाहीतर तू गैसमजात राहिला असता यात दोघांची कोंडी झाली असती. आणि तू मात्र उगाचच रात्री जागत राहिला असतास. मला तुझं दुःख पहावंत नव्हतं म्हणून, अगदी नाईलाजाने मी हा निर्णय घेतला.आता मला आणि तुलाही दोन नवीन मित्र आणि मैत्रीण भेटली.” श्रीधर हसला, “हे मात्र खरं,पोतदार एकदम जॉली माणूस आहे. आणि handsome देखील.”
“श्रीधर तू काय कमी चालू आहेस का? बायको लक्ष देत नाही म्हणून सरळ मैत्रीण शोधायला लागला होतास.” तिनं मिश्किल नजरेने त्याच्याकडे पाहिले. तो लाजला होता. तसं ती पुन्हा म्हणाली,”लाजतोस किती छान,आणि काही म्हण तुझी निवड एकदम योग्य आहे,सानिका किती छान दिसते.” तो तिच्या गालावर हळू मारत म्हणाला, “रेशमा किती फिरकी घेशील पुरे की!”
ती हसली, “गंम्मत रे, तुला वाटतं ना हल्ली मी तुला वेळ देत नाही म्हणून? आज नक्की वेळ देईन मात्र माझ्या नोट्स पूर्ण होई पर्यंत झोपू नकोस हो!” दोघ एकमेकांना टाळी देत हसले. हा मैत्रीचा ऋणानुबंध नव्याने जुळला होता. आता श्रीधरला नवीन मैत्रीण शोधण्याची गरजच नव्हती.