कॅलिफोर्निया ते शांघाय
कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, चाकरमान्यांनी होती मुंबई व्यापली
बदक, रंगारी चाळ, भिवंडीवाला, कासीम अशा अनेक चाळी बहुमजली
दहिहंडी, गणपती, शिवजयंती, उत्सव, कधी भंडारा माणसे अशी गुंतली
संकटात जाती धावून मदतीस, लोभ न राग, अशी मनाने होती चांगली
दाखवले कुणी त्यांना गाजर, वाढवतो पगार, गर्जना आसमंती घुमली
स्वभाव फारच भोळा, ऐकून नेत्यांचं भाषण, यांची बुध्दी रात्रीत फिरली
दिली त्यांनी संपाची हाक,अन सगळीच मेंढरं कळपाने त्यात शिरली
पाहतापाहता महिना सरला, घरातील दाणागोटा सरला, यांची पुरती जिरली
उपाशीतापशी पोरं, थकलेलं भाडं, वाण्याचं बिलं,यांची हिंमत हरली
होत्याचे नव्हते झाले, भरले हात रिते झाले, जगण्याची शाश्वती न उरली
सरली गजबज, गिरणगाव रितं झालं, काहींनी गावाची वाट धरली
काही मात्र जिद्दी, धम्मक होती त्यांनी, वडापावची गाडी काढली
काही फारच बिचारे, ते झाले सिक्युरीटी त्यांनी अवघड वाट सोडली
बारा तास ड्युटी अन हाती चार पाच हजार, सारी स्वप्ने मनात गाडली
काहींना खुणावती उपनगरे, खोल्या विकून त्यांनी नवीन नाती जोडली
त्यांनी दिली साद, करू कोकणचे कॅलिफोर्निया, मुबंईचे शांघाय
म्हणाले, मुबंईकरा, तू चाळीतील खोली विक, अन जा खुप लांब
तुझ्यासाठी दिवा, डोंबिवली, टिटवाळा, बदलापूर स्वस्त, स्वच्छ, छान
चाळीवर होतील टॉवर, जिम, मॉल, बार, हेल्थ क्लब, येतील हस्ती महान
तुला शक्य नाही येथे राहणे, येथील खर्चाने कासावीस होईल पंचप्राण
झोपडीभोवती उघडी गटारे, रस्ते अरुंद, सर्वत्र पसरते येथील घाण
गिरणी संपली, रोजगार तुटला, अशिक्षित तू, सांग काय करशील काम?
पळून गेले नेते तुमचे, नोकरी संपली, कोणाकडे न आता गाठीला दाम
उपयोग सांग काय झाला तुला, केलास वाकूनी दादा-भाईस सलाम
भाईगिरीने झालास तू गुंड, परी तू घरीदारी बदनाम
ना कोकणचा कॅलिफोर्निया झाला, ना झाली मुंबई शांघाय, तू मुबंई दिली दान
शिकलास यातुनी, हव्यास संपवे माणसास, हा तर कुसंगतीचा परिणाम
नेते झाले मोठे, करुनी गोळा, मते विकती, त्यानी थाटले रोखीचे दुकान
जखमेवर तुझ्या मीठ चोळती, तू पक्ष कार्यकर्ता नव्हे त्यांच्या दारी गुलाम
किती झेलल्या लाठ्या काठ्या, मुबंई माझी म्हणशील परी तू कोसो दूर लांब
वेड्या, जगात कोणी कुणाचे नाही, तुज येताना पाहून भाऊ पळाला लांब
नेते, युनियन न मदतीस आले, मित्रही पाठ फिरवून गेले, भोग एकला परिणाम
रक्त जाळले साच्यावर,कपडा विकुन श्रीमंत मालक, तुझ्या वाट्यास घाम
विसरून जा तु कटू स्वप्न, घे भरारी, नवी उभारी, मी हरलो नाही सांग
जिंकून झुंज पराभवाची, गाठ भव्यता आकाशाची रहा उभा नेटाने ठाम
affiliate link