ती वाट जंगलाची
माझ बालपण सुंदर खेड्यात गेलं, जुन्या मराठी चित्रपटात दाखवतात तसं. विहिरीवर हात रहाटही गावात होते आणि शेताला पाणी शेंदण्यासाठी बैल किंवा रेड्याने चालवायचे रहाट किंवा मोटही होती. सकाळ मर्फी रेडिओवर लावलेल्या मराठी भक्तीगीतांनी व्हायची आणि सायंकाळी दिवेलागणीच्या वेळी घरात पर्वचा म्हणून. दिवसाची सुरेल सांगितीका झाली की दिवस संपत असे.रात्री कंदिलाच्या उजेडात वाचन लिखाण व्हायचे आणि रात्र गडद होण्यापूर्वी सर्व निद्रेच्या आधिन व्हायचे.
पहाटे आजूबाजूच्या परिसरातून कोंबड्यांची बांग ऐकू यायची आणि पूर्वेला तांबड फुटण्यापूर्वी पक्षी किलबिलाट करून सुर्याच्या आगमनाची वर्दी द्यायचे. कुंभार कावळा कुठेतरी ओरडायचा आणि आई त्या देव कावळ्याचा आवाज येईल त्या दिशेकडे पाहून नमस्कार करायची आणि म्हणायची त्याच्या दर्शनाने शुभ शकून मिळतो. घराच्या अवती भोवती चिंचेची जाड बुंध्याची दाटी होती आणि त्याच्यावर कावळे, बगळे यांची कॉलनी होती. सकाळी जर झाडाखालून जायची वेळ आली तर खूप जपून जावं लागे कारण कावळे आणि बगळे कधी केस आणि कपडे सफेद रंगाने रंगवतील याचा नेम नसे.
कधी कधी अपघाताने एखादा कावळा मेला की त्यांची शोक सभा भरे आणि दोन चार तास विचित्र आवाज काढत ते शोक व्यक्त करत. तर कुणी चुकून माकून भेटायला यायचे राहिले तर पुन्हा हवेत झेप घेऊन त्याला पाचारीत. कधी कधी दुष्ट माणसाने झाडाची फांदी तोडल्यानी जर घर खाली पडले तर सर्व बांधव कल्ला करत आणि त्याला हुसकावून लावत तर एखादा जास्त धीट कावळा त्याच्यावर हल्ला करायला मागे पुढे पाहात नसे.
गावातील वस्ती म्हणजे शे शंभर घरे, त्याभोवती शेत पसरलं होत. या शेतांना निवडुंगाची कुंपणे होती, याच कुंपणावर बोरीची झाडे होती. ही बोरे आंबट गोड, तुरट,कडवट आणि मधुर गोड अशी वेगवेगळ्या चवीची होती. डिसेंबर जानेवारी महिन्यात या बोरांची लयलूट असायची. ही बोरे मिळावी म्हणून आम्ही थंडीच्या दिवसात उजाडण्या आधी बोरीखाली धाव घ्यायचो. गावातील शेत संपली की गुरचरण किंवा गावठाण असायचे इथे गावातील सर्व पाळीव प्राणी मुक्त हुंदडायचे.
त्यांच्यासाठी हे राखीव कुरण होत असे म्हटले तर वावग ठरू नये. ह्या गावठाणा बाहेर वळसा घालून ओहोळ वहात असे. फेब्रुवारी महिन्या पर्यंत त्याला मुबलक पाणी असे पण चैत्र लागला की प्रवाह थकून जाई आणि मग ओहोळतील डबक्या डबक्यात पाणी शिल्लक राही. या डबक्यातील पाण्यावर प्राणी तहान भागवत.
ओहोळा पलीकडे जंगलपट्टी सुरू होत असे. आधी विरळ झाडे दिसत यात आपटा, सावर, पळस, ऐन अशी झाडे दिसत,
जमिनीवर वाळलेले गवत कुठे ताठ मानेने तर कूठे लोळण घेत पहुडलेले दिसे. काही गवताला भाल्यासारखे बाण असत. आपट्याची पाने आपण दस-याला सोन म्हणून वाटतो पण एखाद्या आपट्याला भरघोस शेंगा लगडलेल्या दिसत. ह्या शेंगा करड्या झाल्या की चवीला सुरेख लागत.हा अर्धा एक किलोमीटर टप्पा ओलांडला की डोंगर नजरेस पडे, मग गर्द झाडी लागे. या डोंगरातून दुसऱ्या गावाकडे वळणे वळणे घेत रस्ता धावे. आम्ही बच्चे कंपनी घरातील मोठ्या माणसाच्या बरोबर दर रविवारी, उजाडण्यापूर्वी ह्या जंगलाचा रस्ता धरत असू. तेव्हा रेशनकार्डवर मिळणारे दोन लिटर रॉकेल फक्त दिवाबत्ती करता वापरावे लागे. त्यामुळे डोंगरातून सरपण आणणे हाच कमी खर्चिक किंवा सोप्पा मार्ग असे.
डोंगरतून फक्त सुके सरपण जमविण्यासाठी फॉरेस्ट खात्याची हरकत नसे मात्र जिवंत झाड तोडताना कुणी सापडले तर त्याला शिक्षा होत असे. अर्थात खूप मोठे इमारती वापराचे झाड व्यावसायिक निमित्ताने तोडले तर वनरक्षक पकडत. जंगली झाड तोडले तर कानाडोळा करत. त्यांना दादा, मामा, काका असा मान दिला तर ते या जंगल तोडीकडे मुद्दाम पहात नसत शेवटी त्यांना त्यांचा जीव प्यारा होताच.
जंगलात सुट्टीच्या दिवशी जायला मला आवडे, एप्रिल मे महिन्यात आम्ही बरीच मुले आवर्जून जात असू याचे कारण लाकडे आणण्याची हौस नसून या काळात करवंदे, हटुर्णे, आसने, पेटारे, चारबोरे, हुंबे अशा विविध रानमेव्याची लयलूट या काळात असे. किती घेशील पामरा दो हाताने असे म्हणत तो वनदेव पद्मासनात निश्चल बसून आमच्या हावरट स्वभावाकडे पाहून हसत असे.
मात्र जंगलातील वाट खाचखळग्याची दगड गोट्यांची,काटा कुट्यांची. कधी ठेच लागून अथवा करंदीचा काटा लागून भळभळत रक्त येईल ते सांगताच येणार नाही किंवा कधी दगड धोंड्यात पाय लचकेल ते कळणार नाही. जो पर्यंत जंगलात शिरत नाही, तोपर्यंत फारशी भिती वाटत नाही मात्र एकदा जंगलात प्रवेश केला की वातावरणात अद्भुत गुढता येते. पायाखाली सरपटणारे जनावर कधी येईल सांगता येत नसे. पाऊल वाटेवर सकलेल्या पानांचा खच पडलेला असे आणि दिवसभर तापून कुरकुरीत बनलेल्या पानांवर पाऊल पडले की वेगळाच आवाज येई.
सपाट रस्त्यावरून चालत असतो तो पर्यंत फारशी भिती नसे मात्र एकदा चिंचोळ्या वाटेवरून रस्ता सूरू झाला की पायाखाली दगड येऊन धडपडायला होईल किंवा सरपटणारा प्राणी पायाखाली येऊन घाबरगुंडी उडेल ते कळणे कठीणच. कधी दूर वर ससा लांब लांब उड्या मारत निघून जाई आणि जो पर्यंत ससाच आहे हे नजरेस पडत नसे तोपर्यंत छाती दडपून जाई.
या जंगलात काकड,ऐन, कुडा, व्हेळा, पेटारे, टेम्भुर्णी, खैर, साग, चामली, आसनं, पळस, कारवी, करवंदी, ऊक्षी, हुम्ब, शिवण, काटेआसन, पंगारा अशी नानाविधी झाडे झुडपे होती. आम्ही सरळ वाढलेली झाडे, फांद्या कोयत्याने तोडून घ्यायचो.
बायका लहान लहान लाकडांची मोळी रचत, ही मोळी साधारण आठ ते दहा फूट लांब आणि दोन हाताच्या विळख्यात बसेल इतक्या व्यासाची असे. ही मोळी बांधण्यासाठी प्रथम काथ्याच्या दोऱ्या दीड दोन फुटावर आडव्या पसरून त्यावर तोडलेली लाकडे उभी रचली की त्या दोऱ्या आवळून मोळी करकचून बांधावी लागे. ही मोळी सुटू नये म्हणून बांधलेल्या दोऱ्या आटवण्यासाठी त्याला छोट्या काठीच्या तुकड्याने पीळ भरत असू, मोळी बांधणे हे म्हटले तर कौशल्य पूर्ण काम असे कारण मोळी नीट रचली गेली नाही किंवा बांधली नाही तर वाटेत डोक्यावरच सुटण्याची दाट शक्यता असे.
जिथे जिथे मोळी बांधण्यासाठी दोरी सभोवती फिरवलेली असे तिथे दोरी छोट्या लाकडाने आटवावी लागे. ह्या मोळीचा मध्यभाग सरळ लाकडांचा नसेल तर मोळी डोक्यास खुपत राही. मोळी डोक्यावर घेण्यापूर्वी चुंभळ तयार करून डोक्यावर फेट्या प्रमाणे घट्ट बांधावी लागे. ही चुंभळ जुनी साडी किंवा चादर चकली, कडबोळी प्रमाणे गोल गोल गुंडाळून त्याचे शेवटचे टोक घट्ट अडकवून ठेवले की तयार होत असे. अनेक बायकांना ही चुंबळ तयार करता येत नसे.
मोळी डोक्यावर घेताना तिचा तोल दोन्ही बाजूस सारखा घ्यावा लागे अन्यथा मान लचकण्याची भीती होतीच.पुरुष मोळी एवजी एखादे सरळ झाड पाहून त्याला कुऱ्हाडीने आडवे करीत आणि त्याला उचलेल एवढा बुंधा छाटून घेत आणि शाकार तिथेच टाकून वाटेला लागत,हा शाकार थोडा सुकला की त्याचे वजन कमी होत असे मग तो भाग साफ करून महिला मोळी आणत.
जोपर्यंत आई किंवा ताई मोळी बांधत असत किंवा मोठी माणसे झाड तोडत तेवढ्या वेळात आम्ही करवंदावर तुटून पडत असू. ह्या करवंदीची फुले सफेद रंगाची आणि अतिशय नाजूक असत.करवंदीची झाळ पसरलेली असे त्यावर जांभळ्या काळ्या रंगाचे घोसच्या घोस लटकलेले असत, मन भरे पर्यंत आम्ही ती ओरबाडून खात असू. मात्र नीट लक्ष दिलं नाही तर करवंदीच्या काट्याने हात फाळला जाई आणि रक्ताची धार लागे. या करवंदीच्या झाळीकडे कधी कधी एखादे मुंग्यांचे वारूळ दिसे आणि महर्षी वाल्मिकी तप करीत असताना त्यांचा शरीरावर वारूळ तयार झाले ही कथा आठवून माझे मन पुराण काळात फिरून येई. न जाणो इथेही एखाद्या वारुळात कोणी तपस्वी आराधना करीत असावा.
जंगलाची आणि त्याच्या रान मेव्याची मजाच काही और, लाल चुटुक हटुर्णे ही चनीया मानिया बोरा इतकी छोटी असतात पिकण्यापूर्वी ती हिरवी असतात मात्र पिकली की लालसर करड्या रंगाची होतात ती चवीला गोड असतात.या झाडालाही छोटे अणकुचीदार काटे असतात तेव्हा यांच्याशी जपूनच लगट करावी लागते.
हुंबाचे झाड मोठे असते, याची पाने सीताफळाच्या पानांपेक्षा लांबट असतात. ती घोसाने धरतात आणि पिकली की जांभळ्या रंगाची होतात. एक घोसात दहा ते पंधरा हुंबे असतात आणि आकाराने छोटया अहमदाबादी बोरा एव्हढी असतात. ही चवीला तुरट गोड असतात. हुम्ब खाल्ली की संपूर्ण तोंड जांभळे काळे रंगते, पण फळांची गोडी अवीट म्हणावी अशी असते.
पेटारे याचे झाड उंच वाढते, त्याचे पान हृदय रेखाटतो तसे परंतु अतिशय पातळ असते. खोड सफेद किंवा पांढुरक्या रंगाचे असते. त्यावर ही विलायती चिंचेचे बेटुक जसे दिसेल तशी चप्पट गोल पेटारे धरतात. ती कच्ची असतांना सिताफळा सारखी हिरवट सफेद दिसतात मात्र पिकली की त्याला गुलाबी छटा येते. त्याच्या आत, शुभ्र रंगाचा गर असतो तो गोड लागतो.
टेंभुर्णीच झाड फार उंच वाढत नाही त्यावर चिकूच्या रंगाची परंतु गोल फळे धरतात ती पिकली की बगबगीत होतात आणि नरम पडलेल्या चिकू सारखी दिसतात याची चवही न्यारी असते. या झाडाला छोटे काटे असतात.
आसनाचे झाड आठ दहा फुटापर्यंत वाढते याची पाने पांढरट झाक असणारी आणि लांबट असतात ही झाडी वनस्पती आहे.खुप छोट्या छोट्या फांद्या हे तिचे वैशिष्ट्य. याच्या फांदीवर बंदूकीच्या छऱ्या एवढ्या आकाराची हिरव्या रंगाचे फळे घोसाने धरतात आणि पिकली की लालसर होतात.ह्या फळाला करवंदी सारखा चीक असतो.
चारबोरे म्हणजे चारोळी. याची झाडे कोकणात खूप आहेत, योग्य मार्गदर्शन नसल्याने गावी सरपणासाठी याची झाडे तोडतात. याची पाने टोकाला थोडी निमुळती होत गेलेली आणि जाड असतात. फळे अतिशय छोटी असतात आणि घोसाने धरतात चवीला आंबट गोड लागतात. आकाराला चप्पट गोल असतात. ही फळे झाडावर सुकली की खाली पडतात. ती जमा करून ठेऊन सवड असेल तशी नाजूक हाताने फोडली की बाजारात हजार रूपये किलो विकली जाणारी चारोळी तयार होतात, मात्र हे काम कष्टाचे आहे.
जंगलात किती प्रकारचा रान मेवा मिळतो त्याची ही फक्त झलक आहे. आम्ही शहरात पळसाचे द्रोण भरलेली करवंदे दहा रूपयांत असली तरी त्याच्यावर टाकून मागतो, जर स्वतः कधीतरी जंगलात जावून द्रोणभर करवंदे करवंदिच्या झाळीवरुन काढण्यासाठी किती वेळ आणि कष्ट लागतात त्याचा अनुभव घेतला तर पून्हा चार करवंदे टाकना गं अस नक्कीच म्हणणार नाही.
तर जंगल संपत्ती हे प्राणवायूच कोठार आहे त्याचा जपूनच वापर होण गरजेचे आहे. आजही जंगलाच्या आसपास राहणारे आदीवासी त्यातील बारीक सारीक सरपण जमा करुन गावाकडे नेऊन विकतात आणि उदरनिर्वाह करतात.
जंगलाला हानी पोचते ते जंगल माफिया यांच्या कडून, पूर्ण वाढ झालेली इमारती लाकडे विना परवाना तोडून घेऊन जातात.याच बरोबर सांबर, चितळ, हरीण अशा शाकाहारी आणि वाघ बिबट्या, अस्वल अशा हिंस्र प्राण्यांची शिकार करतात परिणाम वन आणि पर्यावरण संतुलन बिघडते.
जंगलात माकडं, भेकर, हरीण, डुक्कर, कोल्हे, ससे इत्यादी प्राणी आहेत. पूर्वी मुंबईतील मोठे साहेब लोक शिकारीसाठी गावात येत. गावातील स्थानिक प्रतिष्ठित व्यक्ती त्यांच्यासाठी शिकारीची व्यवस्था करत. हे साहेब लोक मोठ मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर काम करत त्यामुळे या कंपनीत येथील मोठ्या मुलांची नोकरीसाठी सोय करत. परिणाम या साहेब लोकांची बडदास्त राखण्यात स्थानिक पूढाकार घेत. ससा, डुक्कर, भेकर, मोर यांची शिकार करून हे साहेबलोक मुंबईत परतत.
जंगलात हिंस्त्र प्राणी नसतील तर माणसाला भय उरणार नाही आपणच जंगलाचे राजे अशा घमेंडीत जंगलच नष्ट करतील म्हणूनच जंगलाचे रक्षण झाले पाहिजे. जंगलात अनेक सरीसृप राहतात आणि म्हणूनच ते सुरक्षित राहते.
लेख संपवण्यापूर्वी माझ्या बालपणीचा किस्सा सांगतो.आम्ही चार सहा मुले असेच आई, ताई, शेजारच्या काकू यांच्या सोबत जंगलात जात असू. मुख्य रस्ता सोडून जंगलाची पायवाट धरली की अरूंद रस्त्याने एका मागे एक असे आम्ही चालत असू, अजूनही पूर्ण उजाडलेले नसे त्या वाटेवर दुतर्फा झाडी असल्याने सूर्य पूर्ण वर आल्यानंतरच पायाखाली दिसत असे. अचानक पायाखाली सूका पतेरा आला की दचकायला होई.
अगदी सापसरडा जरी पानातून गेला तरी त्याचा सरसर आवाज होई आणि जनावर तर नसेल ना असे वाटून अंगावर भितीने काटा येई. कुणीही चालतांना थोडे मागे राहिले तरी उगाचच मनात शंका येई म्हणून ती पन्नास शंभर फुटांची अरूद पायवाट संपेपर्यंत आम्ही मुले मनात देवाचा धावा करत असू. ही वाट संपली की इंग्रजी Y अक्षरा प्रमाणे वाटा फुटत.या पैकी एक वाट भुतीच्या पोंद्यात जात होती. हा भाग त्रिकोणी आणि खालील बाजूस निमुळता होत गेलेला होता आणि त्याच्या खाली खोलगट दरी सदृश भाग होता म्हणून त्याला पोंदा म्हणत.अशी वदंता होती की तेथे भूत राहात होते आणि ते तिथे जाणाऱ्या माणसांना त्यांच्या नावाने हाक मारते आणि वेडे करून सोडते किंवा ठार मारते. गावातील एक विवाहित बाई त्या भागात घाबरल्यानी वेडी झाली अशी माहिती गावातले सांगत त्या मुळे तो भाग जवळ आला की सर्व सावध चालत.
आम्ही जंगला बाबत या पूर्वी सुरस पण भीतीदायक गोष्टी ऐकल्या होत्या यामुळे सावध तो सुखी या म्हणी प्रमाणे आमचे वागणे होते. जंगलातील अरुंद वाटेवर किंवा भुतीच्या पोंद्याजवळ आम्ही पोचलो की अतिसावधपणे इतर दोघांच्या मधोमध राहण्याचा प्रयत्न करत असू न जाणो, झाडावरचे भूत आम्हाला घेऊन जाईल, अशी भीती मनात ठाण मांडून असे. अर्थात त्या काळात आमच्यापैकी कोणालाच असा कटू अनुभव न आल्याने आमची भीती अनाठायी होती हे उशिराने पटले. मात्र याच जंगलात अजगराच्या जातीचा कांबळ्या जातीचा सात आठ फूट लांबीचा आणि फूटभर घेराचा साप आम्ही आमच्या जवळून सरपटत जातांना पहिला आणि आमची पाचावर धारण बसली. तो निघून गेला तरी तोंडातून शब्द फुटत नव्हते.
तांदुळवाडी किल्यावर आम्ही लहानपणी जाऊ शकलो नाही. त्या किल्ल्याबाबत मनात दहशत होती तिथे वाघ, बिबटे राहतात असे ऐकले होते, जंगलात असताना कोणत्याही प्राण्यांचा आवाज ऐकला की त्याच्या आजूबाजूस वाघ असावा असा संशय मला येत असे. मात्र दहावी नंतर माझ्या मनातील भीती हळू हळू कमी झाली. पाच सहा वर्षांपूर्वी आम्ही किल्यावर शंभर, सव्वाशे शाळेची मुले घेऊन गेलो. या मुलानी ट्रेक एन्जॉय केला. त्यांना शक्य तितक्या झाडांची माहिती सांगितली.
शहरातील सर्वांनी आपण स्वतः व आपल्या बच्चेकंपनीला आपल्या आजूबाजूच्या जंगलाची सफर घडवणे गरजेचे आहे अर्थात जंगलाचे नियम स्वतः पाळणे आवश्यक आहे. शांतता राखून आणि परिसंस्थेला इजा न पोचवता तुम्ही जंगल सफर एन्जॉय करू शकता. नागमोडी पाय वाट चालताना आजू बाजूच्या वेलींचा हळवा स्पर्श अनुभव घ्या. कवडे रानातून भुर्र करून उडत गेल्यावर अंगावर येणारे रोमांच अनुभवून पहा. गुढग्यावर बसून झऱ्याचे थंडगार पाणी प्या, एखादा रानआवळा खाल्ला आणि त्यावर हे रान पाणी प्यायले की जे सुख जिभेला मिळते तो अनुभव घ्या. करवंदाची फुला फळांनी सजलेली झाळी पहा.
जंगलातील रान मेव्याचा आस्वाद घ्या, तिथे वाहणाऱ्या ओढ्यात पाय सोडून बसा आणि छोट्या मासोळ्या काय सांगतात ते ऐका, काळा कुळकुळीत खेकडा बिळात कसा शिरतो ते पहा. तुमच्या नशिबात असेल तर एखादा ससा टूण टूण उड्या मारत कसा पसार होतो ते पहा. फुल पाखरे रान फुलावर कशी बागडतात ते पहा. आणि जंगलातील पाखरे एकमेकांना कशी साद घालतात ते ऐका.
काकाकूवाला साद घालून तो कसा प्रतिसाद देतो, कसा चिडून ओरडतो ते ऐका किंवा कोकिळेला शीळ घालत चिडवून पहा. या सर्व गोष्टी अनुभूतीच्या आहेत. शब्दात मांडून कळणार नाहीत आणि मनाला आनंद देणार नाहीत. पण आनंद मिळवायचा तर वाट वाकडी करावी लागेल. आजही हे लिहिताना मी माझ्या गावच्या जंगलात फेरफटका मारल्याचा आनंद मला मिळतो.
हा आनंद तुम्ही मिळवा आणि शहरातील Mall आणि धम्माल या पलीकडे असणार नंदनवन पाहायला सवड काढा. मी आजही गावात गेलो तर झऱ्याचे संगीत ऐकण्यासाठी एकटाच वाट वाकडी करत जातो आणि त्याच्या संगीताने भारावून जातो.ते चैतन्य नव्याने जगण्याची ऊर्जा पुरवते. मनातील मरगळ दूर करते. त्या चैतन्याचा शोध तुम्हालाही जरूर लागेल जर तुमचे पाय त्या जंगलाच्या वाटेवर निघाले तर.