एक धुमकेतू

एक धुमकेतू

गावी गेलं की आमच्या पाड्यावर रस्त्याच्या कडेला एक दोन मजल्याची इमारत दिसते आणि ती पाहताच आठवण होते ती गांगुली अंकलची. आज ते किवा त्यांची पत्नी हयात नाही पण काही माणसं मरण्यापुर्वी आपल्या स्मृती सोडून जातात. त्यांच्या बऱ्यावाईट वागण्याची छाप कायमची सोडून जातात. गांगुली गावात एखाद्या धूमकेतू सारखे. गांगुली कुठुन आले हे आजपर्यंत कोणाला माहिती नाही, माहिती करून घेण्याचे कारणही नाही. त्याला ते विचारण्याचा कोणी प्रयत्न केला नाही.

पश्चिम बंगाल येथून इथ येतांना मुंबई सारख शहर सोडून या आडगावात गांगुली का आले? हे एक कोडंच होतं. शिडशिडीत अंगयष्टी, उभा चेहरा आणि केसांचा उलटा पाठी जाणारा भांग. केस्टो मुखर्जी सारख थोडंसं ध्यान म्हणता येईल. त्या वेळच्या स्टाईल प्रमाणे नॅरो पॅन्ट, पायात चपला, डोक्यावर गंधा टिळा हातात स्टीलच कडं असं त्याचं तेव्हा रूप होतं.

रोज सकाळी नियमित वेळेवर देवपूजा हे एक आणखी वैशिष्ट्य. घराबाहेर निघतांना परफ्यूम किंवा अत्तर वापरत असावेत, ते बाहेर पडले की रस्त्याला त्याचा घमघमाट असे. नेहमी सायकलवरून ते स्टेशन गाठत. त्यांनी या गावात येऊन इथल्या मुलीशी लग्न केलं आणि तिच्या घराशेजारी सरकारी जमिनीवर ज्याला गावठण किंवा गुरचरण म्हणतात तिथे घर बांधलं. आधी घर की आधी लग्न हा संदर्भ मिळवणं कठीण. आज आंतरजातीय विवाह कॉमन झाला आहे मात्र तेव्हा एका बंगाली ब्राह्मण बाबूमोशायन खालच्या समाजातील अशिक्षित मुलीशी केलेला तो विवाह म्हणजे निव्वळ चक्रमपणाच म्हणावा लागेल. जिच्याशी लग्न केलं ती ना दिसायला सुंदर होती ना घरून श्रीमंत. आम्ही तिला पाहिलं तेव्हा ती गावठी दारू ढोसायची आणि यांना काहीही व्यसन नव्हतं. नाही म्हणायला कधीतरी पान खात असावेत. त्यांची या विवाहामागे काय मजबूरी होती त्यांनाच माहिती. आम्हाला कळू लागलं तेव्हा ते चाळिशी च्या दरम्यान असावे.

गांगुली यांचे कपडे अतिशय स्वच्छ, नीटनेटके आणि चेहरा सात्विक वाटावा असाच. त्यांच्या मराठी बोलण्यात बंगाली हेल डोकावत असे. ते उंचेपुरे, अबोल चेहरा, मितभाषी असल्याने लोक त्यांच्या पासून चार हात दूर रहात. एक दिवस त्यांनी माझा मित्र सुधाकर याला रस्त्यात विचारले, ” ए पोरा, तु शाला आमचेकडे येल का? थोडा काम होता.” वयाने मोठा माणूस आपल्याला विचारतो म्हटल्यावर सुधाकर थोडा बावरला. “येईन की, पण काय काम आहे?” त्यांनी विचारलं. “तशा फार काय मोठा काम नाय, थोडा लिवायचा होता, अपलेल्या साला म्हराठी लिवायला येत नाय म्हणून वांदा, तेवडी मदत करेल तो मेहरबानी होईल. आपला पोरगा काय बी कामाचा नाय, सगल्या नोटबुकवर मुर्गीचे पाय काडून ठेवला हाय. शाला किमती पेफरचा वाट लावून टाकेल. ” सुधाकर नाही म्हणू शकला नाही, “ठीक आहे, अंकल मला जमेल तसं लिहीन.” “तो मी जरा ठेसनात जाऊन येतो नी तुला हाक मारतो, शालेला वेल आहे ना, तेच्या आत मी येतो. तेवडा आपल्याला लिवून दे.” गांगुली काका, सायकलवर टांग टाकून निघून गेला. तेव्हा सायकल फारच थोड्या लोकांकडे होती. दर आठ पंधरा दिवसांनी ते त्याची मरम्मत करत. तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटले, कधी नव्हे तो, ते रस्त्यावर उभे राहून आमच्या मित्राशी बोलले.

सुधाकला कळेना, गांगुली अंकल त्यालाच लिहायला का बोलावत होते? हे घरी आई, आण्णा यांना सांगावं की नाही? तो संभ्रमात होता. अण्णा त्यांच्याशी बोलतांना सुधाकरने पाहिलं नव्हतं. आई अण्णा नक्की रागावतील वाटल्याने त्याने तो विचार झटकून टाकला. मित्र विटी दांडा खेळत होते तिथे त्याने धाव घेतली, त्याला मित्रांनी घेराव घालून विचारले, काय रं, बंगाली अंकल क्याला बोलवत होता? तुला काय काम सांगला?” सुधाकरला कळेना, गांगुली अंकलने काय सांगितले ते सांगून टाकावं, की खोटं काही तरी सांगावं? पण खोटं तरी का सांगावं? तस तो म्हणाला, “त्यांना काहीतरी मजकूर लिहून हवा आहे, माझं अक्षर सुंदर आहे ना, म्हणून, बोलवत होते. ते स्टेशनवरून आले की हाक मारणार आहेत.” सुधाकरने अभिमानाने सांगून टाकले. “त्याची पोरा हान त्यांनी क्याला नी सांगत, तुच क्याला लिवायचा? नी लिवायचू सांगाय हवा होता.” मदन बोलला. सुधाकर म्हणाला, “त्यांच अक्षर कोंबडीचे पाय आहेत अस अकंल म्हणाले.” विटी -दांडू खेळाच्या गडबडित सगळी मुलं असल्याने गांगुली काकाला विसरूनही गेली. थोड्या वेळाने मुन्नाच्या घरून हाक आली म्हणून राज्य टाकून तो निघून गेला. मग नव्याने दहा वीस करून राज्य कोण घेणार म्हणून डाव संपवून सगळ्यांनी घरची वाट धरली.





सुधाकरने, शाळेचे दप्तर लांब पिशवीत कोंबले. दगडी पाटीच्या फ्रेमची चूक बाहेर निघाली होती त्यामुळे चूक लागून दप्तर फाटण्याची नेहमी भीती वाटे. अण्णा सकाळीच शाळेला गेले होते, त्यांना सांगून चुक आत ठोकून घ्यायला हवी हे त्याला नेहमी अण्णा नसतांना आठवे. आजही तेच झाले. तो थोड्या वेळाने जेऊन शाळेला निघणार होता इतक्यात त्याला हाक आली, “ए मुला, सुधाकर ये सुधाकर , जरा इकडे ये.” तो, “आलो ,आलो!” म्हणत दाराबाहेर पाय टाकणार तो त्याची आई, सुवर्णा काकू रागावल्या, “ए मुला, जेवायला वाढते की, अरे शाळेला जायचं आहे लक्षात आहे ना?” “हो , अगं गांगुली अंकल का हाक मारतात ते पाहून येतो, हा गेलो आणि हा आलो. तू वाढ जेवायला मी येतोच.” तो गांगुली काकांच्या घराची ओसरी चढला तर म्हणाले,”तुझा नोटबुक घेऊन येल तर बरा होईल.” तो पून्हा घरी आला तेव्हा ठोक्याच्या घड्याळात दहा ठोके पडले. त्याने घाईघाईने एक वही उचलली आणि गांगुली काकांना दाखवली. वही पाहून ते खूश झाले, “लय चांगला अक्षर हाये. मी सांगतो तसा तुझे वहिवर लीव.” असं म्हणत त्यांनी मजकूर सांगितला, तो त्यांच्या संमिश्र भाषेत असल्याने त्याला आगापिछा नव्हता. सुधाकरने आपल्या मनाने काही बदल त्यात केला आणि तो मजकूर त्यांना पून्हा वाचून दाखवला.

गांगुली अंकल एकदम खुश झाले. “एकदम परफेक्ट लिवला. आमचे पोराला लिवायला नसत जमलं, आता एक कर, ह्यो पून्यांदा या मोठ्या पेपरवर लीवून काड.” सुधाकर म्हणाला, “अंकल आता माझी शाळा आहे, मी संध्याकाळी आलो की तुम्हाला लिहून देतो.” “अरे पोरा, असा करेल तो काय फायदा, मला पत्र आजच सायबाकडे द्यायचा आहे.” काय करावं त्याला सुचत नव्हतं, तो म्हणाला, “अंकल, मी घरून लिहून आणतो. शाळेत जातांना देईन.” त्यांनी मान डोलवली, “हे बग त्याचेवर निट लिव, खाडाखोड नक करू तो पेपर लय महाग हाये. तो पेपर मित्रांना दाखवू नको.”
सुधाकर घरी आला ,आई रागावली, “काय रे काय काम होतं त्या बंगाल्याच? तुला शाळेत जायच आहे की नाही?” “अग आई, मला जेवायला वाढ, मला शाळेला उशीर होईल. त्यांनी एक अर्ज लिहायला सांगीतला होता, तो लिहीत होतो. आधी कच्चा माझ्या वहिवर लिहिला. आता तो मोठ्या पेपरवर लिहायला हवा.” “हे बघ सुधाकर, ते काका, उलट सुलट कामं करतात अस अण्णा नेहमी म्हणतात. तू त्यांच्या नादी लागू नको.” “बरं,बरं पून्हा म्हणाले तर नक्कीच नाही म्हणेन. पण नाही म्हणणं बरं दिसतं का?” सुधाकर पटापट जेवला आणि त्यांनी वहित लिहिलेला मजकूर कागदावर सुवाच्य अक्षरात लिहून काढला आणि वहित लिहिलेला कागद वहितून अलगद फाडून काढला. बाईंनी पाहिला असता तर नक्की रागवल्या असत्या. शाळेत जाताजाता लिहिलेला कागद त्यांनी गांगुली काकांना देऊन टाकला. ते एकदम खूश झाले. त्यांनी त्याच्या हातावर रावळगाव ठेवले. “मला गरज लागलं तेवा अशीच मदत कर हो पोरा. शान लिवतो तू.” तो त्या कौतुकाने हसला. तो शाळेच्या वाटेवर चालू लागला.

संध्याकाळी तो शाळेतून घरी आला. दप्तर एका कोपऱ्यात टाकून तो ओरडला, “आई मला लवकर चहा बिस्कीट दे खेळायला जाऊ दे.” आई काही बोलली नाही. अण्णा आराम खुर्चीवर वर्तमानपत्र घेऊन बसले होते. ते त्याच्या हालचालींवर लक्ष ठेऊन होते. सुधाकरने घाईघाईने चहा संपवला आणि तो खेळायला नेहमीप्रमाणे बाहेर पडणार तो अण्णांनी हाक मारली, “सुधाकर!” त्यांच्या आवाजात जरब होती. सुधाकर जाता जाता पाठी वळला, “हा अण्णा! काय म्हणता?” त्याच्या समोर सकाळी त्याने लिहिलेला कागद धरत म्हणाले, हा कागद तू लिहिला आहेस का?” कागदावर नजर टाकत त्याने मान डोलवली, “हो, ते गांगुली अंकल म्हणाले, तुझ अक्षर सुंदर आहे , जरा, लिहून देतोस का?म्हणून- – – – ” “तुझे गांगुली अंकल गेले चुलीत, त्यांनी सांगितले आणि तू लिहीले. हा कागद वाचून पाहिलास का? काय लिहिले आहे त्यात ते?” “नाही, म्हणजे हो, म्हणजे नाही, म्हणजे वेळ नव्हता म्हणून नाही वाचलं” “कोणी शहाणपणा करायला सांगितला होता ? आईला विचारलं होतस का?” “न, न म्हणजे नाही, मी खेळायला गेलो होतो तेव्हा त्यांनी बोलावून लिहायला सांगतले.” “कोणालाही न विचारता अति शहाणपणा का केलास? हात पूढे कर.” त्यांनी सुधाकच्या तळहातावर छडीचे दोन फटके सपकन मारले.” “आई आई गं” आई धावत बैठकीच्या खोलीत आली,”अहो,अहो !का मारताय त्याला? चुकले असेल त्याचे म्हणून कळवळेल असं माराल का? तो काही इतकाही मोठा नाही की त्या मेल्याने काय लिहून घेतल ते कळेल.” “चुप्प बैस, ते कळावं म्हणूनच ही शिक्षा, पुन्हा चुक घडू नये म्हणून. दोन छड्यांनी मरण्याइतका तो कमकुवत नाही.”





खर तर गांगुली अंकलना त्यानी लिहून दिले त्याबद्दल अण्णांनी कौतुक करायला हवे होते. इथे मात्र उलटच घडत होतं. त्याला कळेना,नक्की काय चुकले?” त्याला अण्णांचा राग आला, कौतुक करण्याऐवजी फटके दिले होते. तळहात चुरचुरत होते. तो कळवळून म्हणाला, “चुकलं माझ पुन्हा नाही लिहिणार. खेळायला जाऊ ना?” त्यांनी मान डोलवली, तो गेल्यानंतर त्यांनी सौ ला हाक मारली. “शांते इथं ये, नुसत घरातलं करत बसू नको,मुलावर लक्ष ठेव, नाहीतर एक दिवस गोत्यात आणेल.”

दुसऱ्या दिवशी अण्णा नसतांना आई ओरडली “कशाला उपकार करायला गेलास? अण्णांचा मार खाल्ला ना? पुन्हा विचारले, तर नाही सांग. अरे ते गांगुली अंकल चुकीची काम करून लोकांची फसवणूक करतात. तू लिहून देतोस ही मदतच झाली उद्या त्यांच्यावर गुन्हा नोंदवला गेला तर अर्ज लिहून दिल्याबद्दल पोलीस तुझीही चौकशी करतील.”

“का म्हणून,पोलीस काय वेडे आहेत का? आपल्याला कोणी मदत करायला सांगितली आणि आपण केली यात गुन्हा काय झाला? श्यामच्या आई पुस्तकात शाम ने मदत केली तर आई कुठे रागावली होती. पण तू म्हणतेस तर मी यापुढे त्यांना नाही लिहून देणार मग तर झालं.” कालांतराने सरकारी शिक्के वापरून गांगुली अंकल खोटे दस्तऐवज तयार करतात हे त्याला समजलं. तिथपासून त्याने कानाला खडा लावला.

गांगुली अंकल रोज देवपूजा करत त्याचा अगम्य आवाज रस्त्यावर येत असे. घरी देवपूजा आणि देवपूजा संपली की ते त्यांच्या कामावर जात. चुकीच्या पध्दतीने ते व्यवहार करत असावेत हे त्याला खरं वाटेना. कोणी म्हणे ते इलेक्ट्रिक वायरिंगची कामे करत असत. रोज रोज कोण वायरिंग करून घेणार? त्यांच्या सारखे वायरिंग करून देणारे आणखी लोक होते त्यामुळे कधीकधी त्यांना काम नसे म्हणून काम मिळावे यासाठी ज्याच्या घरची वायरिंग जीर्ण झाली असेल त्याला ते खोट्या सही शिक्यानिशी, आपले इन्स्टॉलेशन धोकादायक बनले असून कधीही इलेक्ट्रिक अपघात घडून आग लागू शकते, सबब आपण त्वरेने वायरिंग बदलून घ्यावे, तसे न केल्यास आपले विज कनेक्शन कापण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे सरकारी सही शिक्यासह पत्र पाठवत. ते वाचताच ग्राहक घाबरून वायरिंग बदलण्यासाठी कुणाच्यातरी शोधात असे.

नेमके तेव्हाच अंकल दत्त म्हणून त्याच्या दारी हजर होऊन तुला मी स्वस्तात वायरिंग करून देतो असा दिलासा देत असत. बकरा गळाला लागला कळलं की त्याच वायरिंग स्वस्तातील सामान वापरून करून देत. यात दुहेरी फसवणूक अशी होती की ते विज कंपनीचा खोटा धाक दाखवून काम पदरात पाडून घेत. वायरिंग साठी वापरलेलं समान अगदी हलक्यातलं असे. हा जालीम फार्मुला ते पिठाच्या गिरण्या, छोटे उद्योग यांच्यावर करत परिणामी आपला व्यवसाय बंद होऊ नये म्हणून ते तातडीने दुरुस्ती करून घेत.

लोकांच काम घेतलं तरी ते वेळच्या वेळी करत नसतं काही अफरातफर किंवा व्यवसायात भांडण उद्भवले की कधीतरी ते अचानक गायब होत आणि आठ पंधरा दिवसांनी पुन्हा हजर होत. याचे गोडबंगाल कुणालाच ठावूक नसे. ते घरी नसतील तेव्हा त्यांची बायको घरी गावठी दारू गाळून पैसे कमवी. ही गोष्ट त्यांना अजिबात मान्य नव्हती. त्यामुळे त्या दोघांमध्ये आधी शाब्दिक खटके उडत आणि कधीतरी गांगुली अंकल पत्नीला बेदम माराहाण करत. अंकल अतिशय हौशी होते. घरासमोर मोठे अंगण होते तेथे रांगोळी काढून घेत. दिवाळीला पूर्ण घरा सभोवती पणतीची आरास करत. घरासमोर विजेची तोरण लावत. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी खूप फटाके घरासमोर फोडत. फराळही चारोळी, पिस्ता, अक्रोड, बदाम याचा वापर करून होई. दिवाळीत पाचही मुलांना नवीन कपडे. भरपूर फटाके आणत अशी अगदी दणक्यात दिवाळी असे. त्यांना स्वतःला फटाके वाजवायला आवडे. एका दिवाळीला ते शिट्टीच विमान हा फटाका स्वतः लावत होते, ते पेटवलं की शिट्टी सारखा आवाज करत उंच उडे. त्या दिवशी त्यांनी विमान जमिनीवर ठेऊन फटाक्यांची वात पेटवली आणि ते पाठी परतत होते पण विमान वर जाण्याऐवजी सूssss,सूsss करत पाठी आलं आणि दोन पायांच्या मधे शिरलं. अंगात लांब पॅन्ट आणि मलमलचा झब्बा होता. त्याने पेट घेतला आणि नको ते घडलं. महिना भर अर्ध कपड्यात घरी बोंबलत होते. हौशेच मोल कधीकधी महाग पडत किंवा जीवावर बेततं ते असं.

त्यांच घर कारवीच्या कुडाचं पण भरपूर मोठ्ठ होतं. घराभोवती चिंचेच्या फांद्यांच कुंपण होत. दर दोन वर्षांनी ते कुंपण थोडंथोडं पाठी सरकवून सरकारी जागा बळकावत. हे पाहून गावातील लोक संतापले. त्यांना तस न करण्याविषयी सांगून पाहिलं ,ताकीद दिली पण त्यांच म्हणण, “जागा सरकारी आहे. तुम्हाला काय फरक पडतो?”

ते ऐकत नाही पाहून शेवटी गावातल्या काही लोकांनी कुंपण उचकटून टाकलं. त्यांच्यावर घरासमोर कुंपण वाढवत रस्त्यावर आणलं होतं. या वादातून हमरीतुमरी झाली त्यांनी गावातील एका माणसावर हात उचलला. बरेच गावकरी त्यांना मारायला चालून आले होते. त्यांनी स्वतःचा बचाव करतांना गावातील एका माणसाला गुप्तांगावर चावा घेतला. तो माणूस कळवळला. लोकांनी मारू नये म्हणून ते पळून गेले. महिनाभर लोक त्यांच्या पाळतीवर होते, हळूहळू लोक विसरले. दोन तीन महिन्यांनी ते पुन्हा गावात हजर झाले. अशा अतरंगी स्वभावामुळे लोक दचकून असत.

दर दोन तीन वर्षांनी एखादे प्रकरण अंगाशी बेतले की ते गावातून निघून जात आणि प्रकरण विस्मृतीत जात आहे अस वाटलं की पुन्हा हजर होत. त्यांच्या गैरहजेरीत त्यांच्या कुटुंबाच कसं भागत असे? ते एक गोडबंगालच होत.माणूस मात्र निरव्यसनी होता. त्यांचा शेजारी पाजारी त्रासही नव्हता. जी काही भांडण होती ती जमीन वाद किंवा मुल शिस्तबद्ध वागत नव्हती म्हणून पत्नी बरोबर असत.

रोज सकाळी साडेआठ नऊ वाजता ते घर सोडत. सायकल वरून स्टेशन गाठणे सहजा चुकत नसे. विरार येथे त्यांच काम चाले. हाताखाली एक दोन कामगार होते पण व्यवसाय सरळमार्गी नव्हता. अगदी वयस्कर होई पर्यंत घरासाठी त्यांनी भरपूर श्रम केले पण मुलांजवळून त्यांना फारस समाधान मिळालं नाही. उतार वयात काही दिवस ते आजारी पडले आणि दूरच्या प्रवासाला निघून गेले. बऱ्याच मोठ्या जागेवर त्यांनी कब्जा केला होता. मुलांनी ती जागा कुणा बिल्डरला भागिदारीत दिली. बिल्डरने त्या जागेवर इमारत उभारली. आज अचानक इमारत पाहून गांगुली अंकल आठवले. कोणत्या प्रसंगाने कोणती आठवण मनात उफाळून येईल सांगण तस अवघड पण बालपणी घडलेल्या किंवा पाहिलेल्या काही गोष्टी मनात खोलवर दडून बसतात आणि कधीतरी अचानक उफाळून वर येतात. त्यांना डिलीट करून टाकणं फारच अवघड असत. ते धुमकेतू सारखे जगले. त्यांच्या पश्चिम बंगाल येथून या खेड्यात येण्यामागचं रहस्य न उलगडताच ते गेले याचंच दुःख आहे.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar