कोकणातील किनारपट्टी पर्यटन भाग 1
भारताने २०१४ नंतर देशाच्या विमान वाहतूक सेवेचा विस्तार केला आहे. त्याचा फायदा छोट्या शहरातील नागरिकांना व्हावा असा चांगला उद्देश यामागे आहे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोकणात सध्या चिपी विमानतळ आणि मोपा (गोवा) हे दोन विमानतळ सेवेत आहेत.या शिवाय मेरी टाईम संस्था भाऊचा धक्का ते गोवा अशी रोरो पध्दतीच जलवाहतूक सुरू झाली आहे. तेव्हा या सेवेचा लाभ घेऊन आपण शिवाजी महाराजांचे अनेक गडकिल्ले पाहू शकू.
महाराष्ट्राला ७०० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. डहाणू, बोर्डी, वाणगाव, केळवे माहिम, अर्नाळा, वसई ते शिरोडा हा संपूर्ण भागच कोकण किनारपट्टी म्हणून ओळखला जातो. या किनारपट्टीच्या लगत ऐतिहासिक शहरे वसली होती जसे ‘शुर्पारक’ हे नालासोपारा याचे प्राचीन नाव आहे तर ‘सोपारा’ हे ऐतिहासिक नाव असून ब्रिटिशांनी ‘नाळा गाव’ आणि ‘सोपारा गाव’ याच्या दरम्यान रेल्वे स्टेशन बांधले आणि त्याला नालासोपारा नाव दिले. ते अंत्यंत समृद्ध बंदर होते. एकेकाळी नालासोपारा येथून देशविदेशात व्यापार होत असे असा उल्लेख आढळतो.
या भागातील अर्नाळा येथील हा जलदुर्ग वैतरणा नदी जेथे समुद्राला मिळते तेथे आहे त्यामुळे आजुबाजूच्या समुद्रावर लक्ष ठेवता येते. या किल्ल्यावर जाण्यासाठी बोटीने जावे लागते ही सेवा सकाळी ८ ते १२.३० आणि संध्याकाळी ०४ ते ६.३० या वेळेतच असते. इतर वेळी छोट्या होड्या ने-आण करतात. पोर्तुगीज सत्तेनंतर हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. पहिल्या बाजीरावाने याची पुनर्बांधणी केली. या किल्ल्यावर गोड्या पाण्याच्या विहीरी आहेत. महादजी मंदिर आहे. येथे जाण्यासाठी फेरी बोटीची व्यवस्था आहे.
वसईचा चिमाजी आप्पांनी विजय मिळवलेला पोर्तुगीजांचा किल्ला हा भुईकोट किल्ला आहे, तो समुद्र किनाऱ्यालगत बांधलेला आहे. हा मुळ किल्ला देवगिरी यादवकालीन आहे. त्यावर पोर्तुगीज आणि मराठ्यांनी राज्य केले. या किल्ल्यावर जहाज बांधणी केली जात होती अस इतिहासकार सांगतात. हा किल्ला ३ बाजूंनी समुद्राने वेढलेला असून एका बाजूला खंदक आहे. याला ३० फुट उंच तटबंदी आहे. हा किल्ला आता भग्नावस्थेतीत असून येथे चर्चचे ढाचे आणि काही कमानी आणि चिमाजी आप्पा यांचा अश्वारूढ पुतळा आहे. वसई स्टेशन येथून बससेवा उपलब्ध आहे.
आपल्याला अलिबाग किल्ल्याबद्दल माहिती करून घ्यायला आवडेल. ‘कुलाबा किल्ला’ म्हणजेच अलिबागचा किल्ला. खरे तर कुलाबा किल्ला हा अलिबाग किनारपट्टीपासून ०२ किलोमीटर अंतरावर आहे आणि तो पाण्याने वेढलेला आहे. ओहोटीच्या वेळी तेथे चालत जाता येते. किनाऱ्यावरून चालत तो अवघ्या पंधरा मिनिटांवर आहे मात्र भरती ओहटीच्या वेळा तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. अन्यथा किल्ला पहायला चालत जाल आणि भितीने लाटांबरोबर वाहून जाल.
अलिबाग येथे १६६२ मध्ये त्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी कान्होजी आंग्रे यांच्या देखरेखीखाली नाविक तळ उभारले आणि १६८० रोजी किल्ल्याचे बांधकाम सुरु झाले मात्र संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत किल्ला पूर्ण झाला. १७१३ साली तो पेशव्यांनी कान्होजी आंग्रे यांना ब्रिटिश बोटींवर छापा घालण्यासाठी सोपवला. हाच तो कुलाबा किल्ला. या किल्ल्यावर काही जुन्या तोफा, गोड्या पाण्याच्या टाक्या, धान्य कोठार आणि मंदिरे आहेत.
मित्रांनो आपण जंजिरा ह्या अजिंक्य किल्ल्याबाबत ऐकले असेलच. हा किल्ला मुरूड गावाजवळ अरबी समुद्रात सिद्दी जोहर आणि राजाराम पाटील यांनी बांधलेला किल्ला आहे. या किल्ल्यावर कलाल बांगडी ही महाकाय तोफ, गोड्या पाण्याचे तलाव आणि राजवाडा आहे. हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज, छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजीराजांनी केला. संभाजी महाराजांनी किल्ले जिंकण्यासाठी शर्थ केली, जंजिरा जिंकण्यासाठी फेसळणाऱ्या समुद्रात ८०० मीटर सेतू बांधला होता. पण हा किल्ला खडकाळ भागावर उभारण्यात आला होता आणि त्यावर १९ बुरूज लांब पल्ल्याच्या तोफा होत्या. संभाजी महाराजांनी जेव्हा सिध्दीवर आक्रमण केले तेव्हा त्याला मुघल आणि ब्रिटीशांची मदत होती तसेच रायगडवरील मुघलांच्या संभाव्य हल्ल्याची शक्यता असल्याने संभाजी महाराजांना ही मोहीम अर्धवट सोडावी लागली. पण त्यापूर्वी त्यांनी सिद्दी जोहरचे बरेच नुकसान केले. अलिबाग ते मुरूड हे ४१ किलोमीटर अंतर असून तेथे पोचायला साधारण दिड तास लागतो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील वाघोटन खाडीच्या मुखाशी असलेला विजयदुर्ग हा ऐक ऐतिहासिक आणि अभेद्य जलदुर्ग आहे. तो शिलाहार राजांनी बांधला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहा याच्याकडून जिंकून घेतला. तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला किल्ला मराठा आरमाराचे प्रमुख केंद्र होते. देवगड हे शहर हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असून येथेच प्राचीन ,’कुणकेश्वर’ स्वयंभू शिवमंदिर अरबी समुद्रकिनाऱ्यावर उभे आहे. त्याचा संदर्भ ११०० वर्षे जुना असून ते ‘चालुक्य किंवा यादव’ घराण्यांनी उभारले असावे. शिवाजी महाराजांनी त्याचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर कोकणातील ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखले जाते. महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव असतो, जत्रा भरते. या उत्सवात देवाचे मानकरी काठ्या नाचवतात ते पाहणे मनोरंजक असते. मंदिराला लागूनच स्वच्छ सफेद वाळूचा किनारा आहे. कणकवली किंवा नांदगाव रेल्वे स्टेशन येथून ५६ किलोमीटर अंतरावरील देवगडला एसटी बसने किंवा खाजगी वाहनाने जाता येते. चिपी हे जवळचे विमानतळ येथून ६५ किलोमीटर अंतरावर आहे.
रत्नागिरी शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर रत्नदुर्ग हा बहमनी काळात बांधला गेला, तो आदिलशाही याच्याकडून शिवाजी महाराजांनी १६२० मध्ये जिंकून घेतला. किल्ला अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला असून तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. त्याच्या सभोवती भक्कम तट होता, हा तट किल्ल्याचे समुद्राच्या लाटांपासून संरक्षण करत आहे. आज तटाचा काही भाग कोसळलेला आहे.येथे प्रत्येक शंभर मिटर अंतरावर बुरूज आहेत. जेथून छोट्या तोफांचा मारा करणे शक्य होते. येथे भगवती देवीचे मंदिर आहे. या किल्ल्यावर दीपगृह किंवा Light house आहे .
रत्नदुर्ग येथे शिवकालीन भुयारी वाट देखील होती जी किनाऱ्यावर जात होती. आज ती पुर्णतः झाडांच्या मुळ्यांनी बुजली आहे. येथे स्वतःच्या वाहनाने किंवा रीक्षा करून जाता येते. शहरातून किल्ल्यावर जाणारा रस्ता अरूंद असल्याने सुट्टीच्या काळात वाहतूक रखडपट्टी होते. या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले अतिक्रमण हटवून मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांतून शिवसृष्टी उभारली असून त्यावर संभाजी महाराज, वीर तानाजी, बाजीप्रभू देशपांडे, इत्यादी वीरांचे भव्यदिव्य पुतळे आहेत व त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई आहे. येथे काही किल्ल्यांचे माँडेल उभारले आहेत. हा परिसर देखणा बनवला आहे.
सिंधुदुर्ग हा अभेद्य जलदुर्ग शिवाजी महाराजांनी बांधला असून अरबी समुद्रात मालवण पासून दोन किलोमीटर अंतरावर आहे हा अतिशय कठीण अशा विशाल खडकाळ भागावर असून, किल्ल्याचे ऐकून क्षेत्रफळ ४८ एकर वर आहे. किल्ल्याची तटबंदी ०३ किलोमीटर लांब आहे. या किल्ल्यावर जुनी वस्ती आहे. पावसाळ्यात समुद्रात खवळलि आणि क्षमोठ मोठ्या लाटा आल्या की येथील घरांचा मालवण शहराशी असणारा संबंध तुटतो. या किल्ल्यावर २५ कुटुंबे राहतात. तेथे प्राथमिक शाळा आहे. या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. मालवण येथून अंदाजे चार किलोमीटरवर तारकर्ली येथे स्कुबा डायव्हिंग , पँराग्लायडिंग, बोटींगची सोय आहे. येथे टू स्टार हॉटेल्स, आणि लॉजिंग, बोर्डिंग सोय उपलब्ध आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अवघ्या ५० वर्षांच्या आयुष्यात जी अचाट कामगिरी केली त्याचा लेखाजोखा मांडताना तोंडात बोटे जातात. शिवाजी महाराजांनी १११ किल्ले स्वतः बांधल्याची नोंद बखरीत आढळते. तर ४९ किल्ल्यांची डागडुजी केल्याचे लक्षात येते. त्यांच्या कारकीर्दत राज्यात ३०० किल्ले वापरात होते. आपल्या आयुष्यात एक बंगला किंवा घर बांधताना नाकीनऊ येतात मग शिवाजी महाराजांना इतके किल्ले बांधणे कसे शक्य झाले? तर आपले सहकारी आणि एकनिष्ठ सेवक यांच्यावर असलला विश्वास आणि अहोरात्र मेहनत घेण्याची तयारी याच्या जोरावर महाराजांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राज्य केले.
याशिवाय पर्यटन करतांना नवे प्रदेश, तेथील नद्या, निसर्ग याची ओळख होते. तेथील भाषा, पोशाख, आहार, संस्कृती अनुभवता येते. आपण नव्या भूभागाशी जोडले जातो. तेथील व्यवसाय समजून घेतो. त्यामुळे पर्यटन म्हणजे फक्त मज्जा नव्हे तर नवीन माहिती मिळवणे आणि नवे मित्र जोडणे पर्यटनामूळे शक्य होते. ग्रामीण भागातील लोकांना रोजगारही मिळतो. वय वाढल्यानंतर फक्त पैशांचा संचय काय कामाचा? जर साठवून ठेवलेले पैसे स्वतःच्या आनंदासाठी उपयोगी पडलेच नाही तर काय कामाचे? त्यापेक्षा निसर्गाच्या सोबत जगण्याचा आनंद नक्कीच आनंददायी आहे.
कोकणात पर्यटन व्यवसाय उभारी घेत आहे. अगदी माथेरान, महाबळेश्वर ,अलिबाग ते श्रीवर्धन, गणपतीपुळे वेंगुर्ला-शिरोडा रेड्डी आणि तेरेखोल खाडी पर्यंत असणारे स्वच्छ सुंदर, निसर्गरम्य किनारे, कांदळवनाची सफर, जिथे गेल्यानंतर आपण अंदमानात गेल्याचा आभास व्हावा इतके शांत पाणी आणि त्याच्या तळाशी असणारे शंखशिंपले. या सर्वावर कडी म्हणजे याची माहिती मालवणी बोली भाषेत देणारे स्थानिक कोकणी.
कोकणातील वेतोबा, आदिनारायण, माऊली, सातेरी अशी अनेक पुरातन सुंदर आणि वैभवशाली मंदिराचा थाट पाहण्यासारखा आहे. त्यातील बरीच मंदिरे शिल्पकलेचा उत्तम नमुना ठरावित अशी आहेत. विशेष म्हणजे लाकडावरील कोरीव काम दृष्ट लागण्यासारखे आहे. या रस्त्यावर छान नागमोडी रस्त्याची सफर जोडीला गणपतीपुळे, तारकर्ली, वेंगुर्ला समुद्रातील पँरासेलींग, पँराग्लायडिंग सारखे साहसी खेळाची संधी आणि तेथील स्थानिक खाद्य संस्कृती मग एलापे, धोंडस, शेवया, फणसाची भाजी यासारखे शाकाहारी पदार्थ असो की ताजे फडफडीत मासे, सोलकढी, भोकाचे वडे आणि सागुती याची मेजवानी. सागराची गाज आणि सुरूच्या बनातील एकांत. कोकण म्हणजे कलेची जननी. या भूमीत मधू मंगेश कर्णिक, मंगेश पाडगावकर, चि.त्र्य. खनोलकर, केशवसुत आणि सुनिता देशपांडे ठाकूर ही रत्ने जन्मली.
थंडीच्या मोसमात कोकण किनाऱ्यावर सफर केली तर जन्माचे सार्थक झाल्याचे वाटेल कारण येथील रत्नदुर्ग, सिंधुदुर्ग, जयगड, विजयदुर्ग, निवती किल्ला हे किल्ले तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून देतील. तेरेखोलची गढी आणि तिथून दिसणारा अथांग दर्या याच बरोबर कुणकेश्वर, मार्लेश्वर, वेळणेश्वर अशा डोंगराच्या माथ्यावर किंवा पायथ्याशी असणारी मंदिरे पाहताना प्रवास आनंददायी होतोच पण गरमागरम पदार्थाचा आस्वाद घेता येतो. कांदा भजी आणि चहा घ्यावा तो ही नजरेसमोर मोठ्या कढईत तळल्या जाणाऱ्या टपरीवर.
या वर्षी पर्यटक मोठ्या संख्येने मालवण, वेंगुर्ला, रत्नागिरी, येथे उतरले होते. गोव्यातील गजबजाटापेक्षा थोडे शांत वातावरण आणि देवदेवतांच्या मंदिरातील शांत पवित्र वातावरण तुम्हाला नक्कीच भावेल. येथे मंदिरातील घंटा वाजवली आणि त्याचा ध्वनी ऐकला तर ह्रदयातील कंपन लहरी देवाशी नाते जोडून देतील आणि दर्शन घेतल्यावर आगळे समाधान लाभेल. कोकणातही काही उच्च दर्जाची रेस्टॉरंट अगदी समुद्राची गाज सहज ऐकू यावी आणि बाल्कनीतून त्याची अथांगता पाहताना डोळ्याचे पारणे फिटावे इतक्या रेंजमध्ये आहेत. संध्याकाळी समुद्रावरून येणारा गार वारा आणि लाटा किनाऱ्यावर येताना पर्यटकांची लगबग पाहूनच मन प्रसन्न होईल.
क्रमशः