आणि वादळ माणसाळले भाग ५

आणि वादळ माणसाळले भाग ५

मी संशयान तिच्याकडे बगलय, तर म्हणाला, “अगे, पुण्याचे रमेश lकामत ते. मागे इलेले आणि आत्याक पैसे देय होते. तेच ते. त्यांनी माझो नंबर विचारलो, मी सांगलय, माका काय ठावक, त्यांका कित्याक नंबर व्हयो तो, ते माका विचारी होते, लग्नाचं बघताय का? म्हणान मी सांगलय आमच्या आप्पांशी बोला.” समीर, गमतीन म्हणालो, “पाच सहा वेळा चॅटिंग करून इतक्याच बोलणा झाला. माका वाटला त्यांनी तुका पुण्यात बोलावल्यानी ” राणी चिडली, “आई, बघ, हो उगाच सतवता, ह्याका सांग नायतर सणसणीत दोन लावतलय.” सीमा तणतणत निघून गेली.
मी ह्यांच्या कानावर घातलय,”हे म्हणाले, गो, कामत म्हणजे सारस्वत, ते आमच्यापैकी न्हय, कुडाळ्यात काय मुला नाय? मुंबयत होई तितकी स्थळा आसत.” मी म्हटलंय, “तुमचे पावणे आसत ना गोरेगाव, मुलुंड आणि डोंबिवलीत. आज पर्यंत कोणी कित्याक स्थळ नाय धाडूक? तिका पसंत असलो तर करीना सारस्वत. सोनार, मराठ्यापेक्षा काय वाईट!” हे रागावर इले, ह्यांका वाटला मी शरू वरसून ह्यांका टोमणो मारलो “इतक्या आडून बोलण्याची गरज नाय, शरूचा ती बघून घेईत.”

दुसऱ्या दिवशी ही गोष्ट शरयूच्या कानावर घातलंय, शरयू म्हणाली, “माका lती फॅमिली बरी वाटली, नुसत्या जातीक काय चाटूचा आसा, त्याचा शिक्षण काय? काय करता ? माहिती काढूक व्हयी, थय पुण्यात आमची मावशी रवा, इतक्या वर्षात तिची कधी चौकशी करून नाय, आता आसा की नाय ता पण ठावक नाय. पण चौकशी केल्याशिवाय कोणाक होय नाय काय येक सांगा नको. काय काय प्रकरणा घडतत ता ठावक आसा ना!” आमचे हे काय, ऐकण्या, बोलण्या पलीकडे, म्हणाले, “पुण्याक कोण जातला माहिती काढूक?” पण शरयू हुशार. कुठूनसो मावशीच्या चडवाचो फोन शोधून माहिती काढून मोकळी. कामतांची फॅमिली खूप वर्षा कोथरुडाक रवतत.त्यांची दूध डेरी आसा, मूलगो बजाज फायनान्स मध्ये मॅनेजर आसा.
शरयू आणि समीरान पुण्याक जावन त्यांची माहिती काढूची ठरवली. टुरिस्ट गाडी ठरवून जाऊन इले, मुलाची बाहेरून माहिती घेतली तेव्हा कळला मुलाक पार्टीत wine घेण्याची सवय आसा. शरयू सीमाक मोबाईलवर कॉल करून बोलली, “बाय, तो ड्रिंक घेता ही गोष्ट तुका त्याणा सांगितली काय?” सीमा म्हणाला, “मी ह्या कधी विचारुक नाय? एक दोनदा बोलून, तुका काय व्यसन आसा, असा विचारतत काय? तो काय म्हणीत?”

“गो, खरी गोम थयच हा, लोक दिखाऊपणा करतत आणि भुरळ घालून लगीन करतत. नंतर कळता, मोठ्या घरचो पोकळ वासो. काय विचारुचा ता अगोदर विचारुक व्हया, अक्षता पडले की मेलस कर्मात, कोणाक सांगशीत? दारवेपायी बायको विकणारी माणसा जगात आसत.” “आते काय पण बोला नको, मी काय मेलल्या गायचा वासरू न्हय, नाय त्याका कोर्टात खेचलय तर ठाकूरांचा नाव सांगूचय नाय!” “होय तर कोर्टातव खेचशीत, त्याने काय होतला, झाललां आयुष्याचा नुकसान भरून येयत. मी तुका सावध केलय.” शरु म्हणला.



affiliate link

घरी इल्यावर शरयू आपल्या भावाशीक म्हणाला, “त्या मुलाची फॅमिली पैसेवाली आसा पण मुलाक ड्रिंक घेण्याची सवय हा, राणीक ह्या मी फोनवर सांगलय तर माझ्यावर आराडला, तिची इच्छा असली तर ठरव. उद्या राणीन म्हणता नये आत्यान मोडता घातल्यान.” हे तिच्यावर रागवले, “गो शरू, काय म्हणतस? तु काय तिच्या वायटाचा सांगशीत आणि तिचा डोक्या काय म्याड हा, दारू घेणाऱ्या मुला वांगडा लगीन करूक!” “आप्पा,तुका मी खरा ताच सांगलय, कायतरी सांगून माझो काय फायदो, तूच म्हणशीत चवकशी कसली डोंबलाची केलास?”
मी शरयू कडसून कळलेली सगळी हकीगत राणीक सांगितली, राणी म्हणाला, “गे आई, आज शहरात सगळेच जण ड्रिंक घेतत, म्हणजे ते दारुडे नसतत. कधीतरी गंमत म्हणान आणि कमी प्रमाणात ड्रिंक घेतला तर काय तोटो नसता. मी त्याका विचारलय, तो म्हणालो, “पार्टी असली किंवा गेट टुगेदर असलं तर wine घेतो,पण मला रोज किंवा दर Sunday ला हवी अस नाही.” मी ता ऐकलंय आणि माका लक्षात इला, मुलानं हिच्यावर छाप पाडलीहा, गोष्ट बरीच पुढे गेलीली दिसता. तरी तिका सावध केलंय, “राणी, हो आयुष्याचो प्रश्न आसा, लग्न म्हणजे खेळ न्हय. उद्या त्याचा व्यसन वाढला तर कपाळावर हात घेवची पाळी येईत. तुझ्याकडे ना नोकरी, करशीत काय? तुका काय झाला तर आमका कळाचाव नाय.” तरी राणी त्याच्या विषयी आग्रही होती. मी राणी काय म्हणता ता त्यांका सांगलय, ते म्हणाले, “ठरवन उडी घालतला तर मग उपाय काय?”

आम्ही शिरसाठाची गाडी ठरवन पुण्यात गेलव. मुलाचा घर दार बघलव, त्याच्या ऑफिसमध्ये चौकशी केलव आणि दोन दिवस पुण्यात रवान पाठी इलव. पुन्हा राणीशी बोललव, राणीचो विचार ठाम होतो. ती म्हणाली, “आई,आप्पांका सांग माझा मुलाशी बोलणा झाला हां, जर तुमची इच्छा नसात तर प्रश्न मिटलो पण माका तो काय म्हणालो त्यात कुठे खोटेपणा दिसणा नाय. पुढे तुमची मर्जी.”

चार दिवसांनी त्यांचो ह्यांका फोन इलो. लग्नाची बोलणी करूक ते बोलावीत होते, समीर म्हणालो, “आप्पा, तुम्ही त्यांकाच हय बोलवा. आपण पंधरा हजार खर्च केले, त्यांचो रुपयो पण खर्च जावक नाय. आम्ही व्यवसाय सोडून येऊ शकत नाय. आठ दिवसांनी त्यांची चार सहा माणसा बोलणी करूक इली. त्यांचो पाहुणचार केलो. दुपारी बैठक ठरवली. शरयू, आमचो सुदो, ह्यांचो चुलत भाऊ आणि नाना सामंत. नानाच वडीलकीच्या नात्यान मुलाच्या वडिलांका बोलले, “कामत साहेब बोला काय म्हणण तुमचं. ते म्हणाले, “दोघे एकमेकांना पसंत आहेत तेव्हा यात व्यवहार कसला, दोन्ही मांडवाचा खर्च करा, बाकी आम्हाला काही नको, देवदयेन सर्व आहे. आमचा दुधाचा व्यापार आहे. मुलांसाठी वेगळा ब्लॉक घेऊन ठेवला आहे. त्यांना वाटलं तर वेगळं राहावं.”

हे म्हणाले, “आमच्याकडे दोन्ही मांडवाचा खर्च करण्याची पध्दत नाही. आम्ही निम्मे निम्मे खर्च करतो. पण आता दोघ एकमेकांना आवडली आहेत म्हणून ७५%खर्च मी करेन २५%तुम्ही करा.” सुरवातीला कामत मंडळींनी आढेवेढे घेतले, आमच्या पुण्यात सगळा खर्च मुलीकडचे करतात अस पालूपद लावल. पण हे ठाम रवले. म्हणाले, “कामत साहेब तुम्ही पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट सांगत आहात, आता सगळीकडे निम्मा निम्मा खर्च रूढ आहे. हो ना करता कामत तयार झाले. लग्न कुठे करावे यावरून चर्चा सुरु झाली. मुलाकडच्या मंडळींना शक्य तो प्रवासाचा जास्त व्याप वाढू नये अशी ठाकूर मंडळींची इच्छा होती. आमचे हे म्हणाले,,” मी मालवण किंवा कुडाळ इथे व्यवस्था करू शकतो किंवा तुमची हरकत नसेल तर इथे मांडव घालून लग्न करण्याची व्यवस्था करू शकतो. पण इथे तुमच्या पन्नास साठ पेक्षा जास्त माणसांची राहायची व्यवस्था करू शकत नाही. तुम्ही ठरवा,जे तुम्हाला मान्य असेल तो पर्याय देण्याचा प्रयत्न करू.” त्यांनी आपसात चर्चा केली आणि म्हणाले, “ठाकूर,आमच्या घरातलीच पन्नास माणस असतील, तुम्ही किमान शंभर माणसांची व्यवस्था करू शकलात तर बरं होईल किंवा तुम्ही पुण्यात या,आम्ही तुमची व्यवस्था करू.” नाना म्हणाले,”कामत साहेब, अहो या खेड्यात एवढ्या माणसांची राहण्याची सोय शक्य नाही, आपण कुडाळ येथे काही सोय होते का पाहू. मुख्य म्हणजे आम्हाला एवढ्या लोकांच्या राहण्याची व्यवस्था करण्याचा खर्च परवडणारा नाही. आमचा व्यवसाय नवीन आहे आणि मुलीचे वडील साधे लिपिक होते. त्यांना काही फार निवृत्ती लाभ मिळालेला नाही.तेव्हा—–“





मुलाची आत्या म्हणाली, “सामंत, अहो आम्ही काही हुंडा मागत नाही की दागिने घाला म्हणत नाही, एवढं तुम्हाला करावं लागेल, मुलगा चांगल्या पोस्टवर आहे. तेव्हा आम्ही काही तुम्हाला जास्त सांगत नाही. पाहुणे आले तर त्यांचं आदरातिथ्य करावं लागणारच ना!” नाना तरी शांत आवाजात म्हणाले, “वहिनी, आम्हाला शंभर माणसांच्या वास्तव्याचा खर्च खरंच परवडणारा नाही, लग्नाच्या खर्चाला आमची काही ना नाही. वास्तव्याचा निम्मा खर्च तुम्ही उचलत असाल तर पहा. मुलीच्या वडिलांना खर्च झेपेल आणि आनंदाने दोन घर जोडली जातील म्हणून मी मध्यम मार्ग सांगतोय.”

पुन्हा मुलगा आणि वडील यांची चर्चा झाली आणि ते निम्मा रहाण्याचा खर्च देण्यासाठी तयार झाले. आता लग्न मुहूर्त आणि हॉल, मेनू यावर चर्चा सुरू झाली. समीरने कुडाळमधील दोन तीन हॉल आणि त्यांच्या तारखा फोन करून विचारल्या आणि त्यांना दाखवल्या. डिसेंबर आणि पंधरा जानेवारी पर्यंत बुकिंग फुल्ल होत. शेवटी हो ना करता फेब्रुवारी महिन्याचा दुसरा शनिवार ठरला, सोमवारी सार्वजनिक सुट्टी होती म्हणजे किमान दोन दिवसाचे लॉज किंवा हॉटेल बुकिंग करावे लागणार होते. पण आता माघार घेणे म्हणजे राणीला नाराज करण्या सारखे होते. दुसऱ्या दिवशी हॉल पाहायला जायचे ठरले. ते मालवणला हॉटेलमध्ये थांबले होते. समीरने आग्रह केला आणि ती मंडळी जेवायला थांबली. समीरने मित्राला मालवणला पाठवून ताज्या सुरमई, पापलेट आणि कोलंबीची सोय केली होती. शरयू माणसांसह स्वयंपाक करायला गेली. आता संध्याकाळ झाली होती, मासेमारीसाठी गेलेल्या बोटी येत होत्या आणि कामत मंडळी, राणीला घेऊन समुद्रावर गेली. नाना, ह्यांका म्हणाले, “का रे बाबा, ह्या झेपतला मा, रे एक एक खोलीचा भाडा नाय म्हटलंस तरी दोन अडीज हजारच्या आत बाहेर बसतला. एका खोलीत पाच, सहा माणसा रवतीत म्हणजे आठ ते धा खोलयांचो दोन दिवसचो खर्च तुझ्यावर बसात, शिवाय नाश्तो, जेवण खाण आसाच म्हणजे खोलये आणि जेवण खाण ह्याच लाख,दीड लाखा बाहेर गेला. हॉल सजावट आणि मेनू ठरूचो हां, जपून बोल नायतर खर्चात घालतीत.”

हे म्हणाले, “राणीची निवड, बघू काय तरी जुळवणी करूक व्हयी, नशीब हुंडो बोलूक नाय,आम्ही पुण्याक गेलव तरी तितकोच खर्च जातलो.” “रे हल्ली हुंड्याची प्रथा खय हा? पण अजून सारस्वतात मुलीक संसार देवची प्रथा हा, अगदी भांड्याकुंड्यापासून ते बेड, गादी, कपाट, फ्रीज सगळा देतात. आमच्यात ती प्रथा नाय ता बरा नायतर ज्याका दोन चडवा असतीत तो भिकेक लागात.” नाना गडगडाटी हसले.

रात्रीचा जेवणखाण जाईसर साडे धा वाजले. पाहूणे निघून गेले. पाठची आवरा आवरी करीसर एक वाजलो. जे कस्टमर आज वस्तीक होते त्यांका आज फिस्ट गावली. नशीब त्यांचा. राणी माका म्हणाली, “आप्पांका सांग मी ह्याच स्थळाचो आग्रह धरणय नाय,आपणाक त्यांचो खर्च झेपात सो वाटणा नाय. उद्या त्यांची शंभर माणसा उतरली तर पन्नास माणसांचो दोन तीन दिवस रवण्याचो, खाण्याचो खर्च आमच्यावर बसतलो. त्यांका काय खा, काय नको, सांगू शकणव नाय, उद्या जास्त बिल झाला तरी आमका भागवक लागतला. त्या पेक्षा अंदाज घेऊन त्यांका एक रकमी पैसे हातावर घाला, काय कमी जास्त होतीत ते त्यांका करु दे, ते गेल्यावर आम्ही बिल भागवूक गेलो आणि नंतर कळला की रक्कम मोठी आसा तरी झक मारीत भरूचा लागात, त्या पेक्षा आधी काय ता ठरावा. त्यांनी नकार दिलो तर सोडून देवा.” राणीचा म्हणणा ह्यांका पटला, सावध तो सुखी, उद्याच ह्या विषयी स्पष्ट केलेला बरा नंतर संबंध बिघडण्यापेक्षा आधीच व्यवहार ठरवलेलो बरो.



affiliate link

दुसऱ्या दिवशी नाना सामंत, आमचे हे,शरयू आणि आमचो सुदो कुडाळाक गेले. कामत मंडळी मागोमाग पोचली, नाईक यांचो हॉल पसंत पडलो. नाईक यांनीच हॉटेलचे पत्ते दिल्यानी. पावण्यानी कुडाळ मधली पाच सहा हॉटेल फिरून बघितल्यानी. एक दोन हॉटेलात शंभर माणसा रवतीत अशी सोय होती, बाकी सगळी अगदीच धा वीस प्रवाशांची. अनंत मुक्ताई हॉटेल त्यातल्या त्यात प्रशस्त वाटला, ता त्यांनी पसंत केल्यानी. त्यांचा किचन फिरून बघितल्यानी, मेनू कार्ड, त्यावरचे दर बघितल्यानी.

नाईकांचा नाव सांगून मॅनेजर बरोबर बोलणी करूक बसले, कामत म्हणाले, “शंभर माणसांचा दोन दिवस, तीन रात्री स्टे, चार वेळा नाश्ता, तीन वेळा जेवण आणि चहा याचा खर्च किती येईल ते सांगा म्हणजे आम्ही तुम्हाला आमच्या येण्या जाण्याच्या वेळ, कागदावर लिहून देतो.” मॅनेजर मोठो हुशार म्हणाला,”सरासरी एक दिवसाक स्टे, नाश्तो, जेवण याचा खर्च मेनू नुसार माणसी पाचशे ते सातशे होईत. त्यावर आठ टक्के जी.एस. टी.धरा. तुम्ही नाईक साहेबांकडून आलाय म्हणून अंदाजे दोन लाख धरून चला.”

कामत मॅनेजरला म्हणाले, “तुम्ही जेवणात काय देणार ते सांगितलं तर बरं, खूप हेवी नको पण कोकणात आलोय, तर नाश्त्याला आंबोळी, मुलांसाठी चायनिज, मंचूरियन आणि कांदेपोहे हवे, जेवणात कोंबडी वडे, मासे हवे. उसळ, फणसाची भाजी अस काहीतरी वेगळ हव.”

मॅनेजर म्हणाला, “साहेब,नाश्त्याला तीन किंवा चार पदार्थ असतील. चहा आणि कॉफी दोन्ही असेल, जेवणात शाकाहारी असेल तेव्हा दोन किंवा तीन भाज्या, व्हेज बिर्याणी, प्लेन राईस, डाळ, एक स्वीट आणि सोलकढी. आणि नॉनव्हेज असेल तेव्हा मासे, चिकन किंवा मटण, पुरी,चपाती, भाकरी, प्लेन राईस, आमटी आणि सोलकढी, लोणचं पापड असेल. तुम्हाला टेस्ट पहायची असेल तर तुम्ही किचन मध्ये रेडिमेड असेल ते जावून खाऊन पहा किंवा ऑर्डर सांगा म्हणजे शेफ बनवून देईल. “कामत यांच्या बहिणीने उपमा आणि इडली खाऊन पाहिली. तिला टेस्ट पसंत पडली. मेनू पसंत पडला, पुन्हा कॉस्टकडे गाडी अडली. कामत मॅनेजरला बायका आणि मुलं फारस खात नाहीत हे समजवायचा प्रयत्न करत होते, मोठी माणसं फार फार तर तीस असतील अस सांगत होते, मात्र मॅनेजर म्हणाला, “साहेब, आम्ही असा हिशोब करत नाही, आम्ही एकदा ऑर्डर घेतली की तुम्ही खा अथवा खाऊ नका. आम्हाला पूर्ण मोठी माणसे गृहीत धरून सोय करावी लागते. तेव्हा पैशात बार्गेन करू नका. आमची सर्विस बघा, तुम्ही पुन्हा दुसरं कुठे जाणार नाही.”

मॅनेजर एक हजार पर डे म्हणत होतो, शेवटी हो ना करत सहाशे पर पर्सन, पर डे, रेट नुसार मॅनेजर तयार झालो. एका व्यक्तीचे दोन डे, तीन नाईट नुसार अठराशे देवक झाले म्हणजे आमका लाख सव्वा लाख रुपये देवक व्हये होते. आमच्या ह्यानी ते मान्य केले. हो बोवाळ देवबागात शक्य नव्हतो. इतक्या माणसाची सोय करिसर टाके ढीले झाले असते शिवाय कोणाची वेळेवर सोय झाली नसती तर माणसांची विना कारण नाराजी आणि धुसफूस जातली ती वेगळीच. झाला ता एका अर्थी बराच झाला.

नाईक यांचा अडीचशे माणसांचा हॉल भाडा, सजावट, शहनाई, सकाळचो नाश्तो, चहा कॉफी , पेढो,फुले, सॉफ्ट ड्रिंक, लग्न विधी, भटजी, बुफे जेवण, आईस्क्रीम, दुपरचो चहा कॉफी याचो खर्च चार लाखाच्या आरते परते जातलो. अजून राणीक घालूचे दागिने, जावयाक चेन, अंगठी, पोशाख, मान-पान, रिटर्न गिफ्ट, अहेराची भांडी, रुखवात, कितीसा काय बाकी होता. दोन अडीज लाख खय जातीत त्याचो नेम नव्हतो. लग्नाक येणाऱ्या माणसांका घेवन जावक आणि परत सोडूक गाडी. ह्या लगीन किती खर्चात टाकतला ता कळेना. माका आमचा लगीन आठवला. माझो बापूस शेतकरी, घराकडेच मांडव घातलो आणि रानडे भटजींनी लगीन लावन दिला. शा पाचशी माणसा जेवन गेली. भात बक्कळ पिका, वाण्याकडून खात्यावर सामान भरला. ह्यांका अर्ध्या तोळ्याची अंगठी, माका एक तोळ्याची माळ. झाला, मान पान नाय आणि हुंडो पण नाय. मी ह्यांका सहज म्हटलय तर म्हणाले, “आमच्या लग्नाची गोष्ट वेगळी. ते दिवस परत येवचे नाय, आता सगळा पैशाक लागला,काय होईत तो खर्च करतलय, माझ्या चडवाक तुझ्या बापाशीन काय केल्यान म्हणून कोणी विचारता नये.”



affiliate link

लगीन थाटामाटात पार पडला, समीरान दोन बस भाड्यान घेतलले. शरयूचो घोव बसची व्यवस्था बघूक होतो. दोन ट्रिप मारले तेवा आमची माणसा हॉलवर पोचली. शरयूच्या घोवान एक लाख रुपये मदत केली, आज ना उद्या पैसे परत करूक व्हये पण वेळेक कोणाकडे मागूची पाळी येवक नाय. शरयूच्या घोवान ह्यांच्या बरोबरीने पळापळ केली येणारे, जाणारे, पै, पावणे यांच्यावर लक्ष दिलो. काय व्हया नको, उरला सवरला किती झंगटा असतत, आयत्या वेळेक काय येक आठवणा नाय पण त्यांनी लग्नाक शेवटपर्यंत मदत केली. आमचे हे म्हणाले, “कायेव म्हण, शरूचो घोव कामाचो, मनात घेतल्यान तर मदतीक भारी माणूस.”

मुंबई वरून ह्यांची चुलत बहीण, मावशी, तिचा चडू, जावई अशी माणसा लग्नाच्या दोन दिवस आधी इली. समीरने हॉटेल पुढील चार दिवस “घरातील कार्यामुळे बंद राहील. गैरसोय होत असल्याबद्दल क्षमत्व” असो बोर्ड लावलो. इलेल्या पावण्यांनी खूप धमाल केल्यानी. बोटींग, झुला अगदी एन्जॉय केल्यानी. रावल्यानं आमका भरपूर मदत केल्यान. राणीच्या Law कॉलेजचे मित्र, मैत्रिणी इले होते. कामत मंडळींनी तीन लक्सरी बस हाडलेले. “मुक्ताई हॉटेलमध्ये” पावण्यांची सुंदर सोय झाली. ह्यानी अगोदरच त्यांका सांगितला होता, तुमच्याकडे जातीने लक्ष देवक आमच्याकडे माणस नाहीत, तरी राग मानता नये. कामत मंडळी समजूतदार होती. त्यांनी कसली तक्रार करूक नाय.

दोन दिवसांनी पावणे जावक गेले. ह्यानी घुडघुडी, भाजीचे फणस, सुके बांगडे असा काय माय पाहुण्यांका दिला. आठ दिवस बोवाळात गेले. नाय म्हटला तरी धंद्याचा लाख दोन लाखाचा नुकसान झाला पण इलाज नव्हतो. राणीच्या लग्नामुळे एक हात कमी झालो. हळूहळू समीरची गाडी रुळावर इली. पण राणी असताना धंद्यात जो जोश होतो तो थोडो कमी झालो. राणी आमची बोल घेवडी, बोलून कामा करून घेवची कला आतेकडून उचलली हा. एक दिवस मीच आमच्या शरयूक म्हटलय, “ताई, समीरच्या मदतीक पूनम नायतर श्रेयसाक धाडशीत तर त्याका मदत होयत, राणी गेल्या पासून बिचारो एकटो पडलो हा, खूप धांदल होता.”
शरयू म्हणाली, “ह्यांका विचारून बघीनस, मी काय सांगू. तिचा ग्रॅज्युएशन पूर्ण झाला, हे म्हणतत जिल्हा परिषदेत चिकटवक व्हयी.” “गो, मी खय म्हणतंय कायमची धाड म्हणान, पण त्येचा कामाचा नक्की होयपर्यंत इला तरी खूप मदत होयत,आता सिजन सुरू झालो हा, बाहेरची माणसा काउंटर सांभाळूक उपयोगी नाय, समीराक सारख्या आत बाहेर बघूचा लागता.”

आमच्या शरयूचा नीट काय कळणा नाय. कधी आपणहून मदत करीत तर कधी भायल्या सारख्खा वागात, नेम नाय. घरातला माणूस म्हणान मी तिका देवचो तो मान देतंय. समीर तिची मदत फुकट घेणा नाय तिच्या खात्यात दर महिन्याक पैसे टाकता. शरयूच्या घोवाक विचारुचा तसा माका जडच आणि ह्यांचे संबंध किती बरे ह्या कळणा नाय. कधी त्यांची स्तुती करतत तर कधी “मराठो तो” असा म्हणतत. मी बाई माणूस तोंड उघडून बोलण्याची चोरी. माणसा जोडूची म्हणजे तोंडात साखर आणि कान बहीरे व्हये. पण धीर करून विचारुक व्हया. गरज आमका हा. ते दोघे दिवसभर काम करतत त्यांका माझो तसो उपयोग नाय. मी तरी काय करतलय, घरात काय काम कमी हां.

गेल्या दोन महिन्यात हे डॉक्टराक दाखवक जावक नाय. लग्नाची दगदग आणि आता ही कामा, तरी शरद मदतीक आसा म्हणून ठिक. ह्यांनी राणीच्या लग्नाक अगदी हात सोडून पैसो खर्च केलो. माझ्या भावाशीक अगदी मुलांसकट कपडोलत्तो दिलो,जावयेवक पैसे दिले. मीच म्हणी होतय, दोघांच्या बायकांका आणि मुलांका देवा, सगळ्यांका देवक परवडतला? पण आपणच म्हणाले, “घरातला पयला लगीन आसा, पुढच्या लग्नाक नाय दिला तरी येयत.”

मी समीराक सांगलय, “रे आप्पांका डॉक्टरकडे नेवन आण, एकदा रिपोर्ट केले म्हणजे बरे,औषधा काय बदलूची असतीत तरी सांगतीत, त्यांच्या जिवाक थारो नाय,अशान तब्बेत बिघडात.” माका म्हणालो,”गे आवशी, दोन दिवस थांब, येत्या मंगळवार, बुधवाराक बुकींग कमी हा, तेवा मामाक बघूक सांगतय आणि मी जावन येतय. सध्या धा पंधरा माणसांचा चार दिवस बुकींग हां. मोठी पार्टी आसा, चांगली ट्रिटमेंट दिलय तर आणखी कस्टमर मिळात.”

मी चिडलय, “रे मेल्या, बापाशी पेक्षा कस्टमर मोठे काय? त्यांका काय झाला तर कोणाकडे बगशीत?” तो काययेक बोलाक नाय, धंद्याची नशा वेगळीच असता. दोन तीन महिने काय ती गर्दी असतली, एकदा पावसान जोर पकडलो की चार दोन प्रवाशीसुध्दा येणत नाय. मग माशा मारीत बसूक व्हया आणि दोन तीन माणसा फुकट पोसूक व्हयी.

बुधवारी सकाळीच हे डॉक्टरकडे रिपोर्ट काढून इले.दुपारचे उन्हा उतरली तसे रिपोर्ट काडूक गेले. दोन दोन वेळा जाण्याचो तसो कंटाळोच पण महीन्या दोन महिन्यात एकदा रिपोर्ट काढून ब्लड, बी.पी. कोलेस्टेरॉल, शुगर, काय ते टेस्ट केले म्हणजे जिवाक घोर रवणा नाय. दोन दिवसांनी पुन्हा रिपोर्ट दाखवक गेले, डॉक्टर गोखले म्हणाले, “अहो ठाकूर, ब्लड प्रेशर थोडा हाय आहे, सध्या घराकडे काय गडबड आहे, जरा विश्रांती घेत जा.चहा कमी करा.” हे म्हणाले, “डॉक्टर, मी सकाळी एकदा आणि अगदी तल्लफ इलीच तर संध्याकाळी थोडा चहा घेतो,तो ही कमी साखरेचा. गेल्या महिन्यात मुलीच लग्न झालं तेव्हा थोडी दगदग झाली खरी.” डॉक्टर हसले, “मग बरोबर, आहेत त्या गोळ्या सुरू ठेवा आणि हो, थोडी विश्रांती घ्या. या तुम्ही, काही काळजी करण्यासारख नाही.”





हे डॉक्टर जवळून इले तेव्हा शरयू होती. त्येणाच ह्यांका विचारल्यान “आप्पा,डॉक्टर काय म्हणाले रिपोर्ट ठिक आसत ना?” “अगो, तुझी वयनी, थारो करी नाय, माका काय धाड भरलीहा. आता थोडो बी.पी. वाढलोहा तो वाढतलो, तरी लग्नाचो बोवाळ घराकडे नव्हतो नाय तर ह्या उचलणा शक्यच नव्हता. डॉक्टर म्हणतत आराम करा, हय काय जड काम हां, हात पाय हलवक नको, नायतर पॉट सुटात. तो एकटो खय पुरो पडतलो? माका त्याची चिंता, किती पळापळ होता,तरी हिचो भावस आसा म्हणान ठीक. माझा मरांदे गो, पण तुका पूनम बद्दल घोवाक विचारुक सांगलय त्यांचा काय झाला?”

“रे, तूच तेंका विचारी नस? माका कसा तरी वाटता, म्हणतीत आपण जाता आणि आता चडवाकव.”. “असा म्हणतं. बरा, मी विचारतंय. मी म्हटला, बायकोन विचारलेला बरा, नाय म्हटला तरी आमी भायले, मग आता असतीत मोकळे की रात्री करू?” “आताच कर, तुझो फोन बघीतल्यावर घेतले. नंतर आणि अंतर. चांगल्या कामाक मुहूर्त कित्याक?” शरयू बोलला. “हॅलो,हॅलो, हा मी बोलतंय, आप्पा. हा, मोकळे आसास ना, जरा बोलूंचा होता.”
“काय म्हणतास? गडबड काय? नाय नाय, गडबड काय नाय, वेळ नसात तर नंतर बोलतंय. काय म्हणतास? हा तसा काय अर्जंट नाय जरा विनंती होती.
होय, विनंतीच करूक व्हयी, तुमी नाय म्हटलास तरी, रागवण्याचो प्रश्न नाय. पण जरा अडचण होती म्हणान—–“
“सांगू म्हणतास? अवो, जरा पूनम आमच्या मदतीक इला असता तर बरा झाला असता, येयत काय? हया विचारुचा होता”. राणी गेल्यापासून समीराची धावपळ होता, सकाळची वेळ काउंटर सांभाळूक पूनम मदत करीत तर भायली कामा करूक त्याका वेळ गावात. बघा, जरा हे दोन महिने धांदलीचे म्हणान.” “काय म्हणतास? तिका विचारुक व्हया, हो हो जरूर, विचारीनास, ता स्वखुशीन इला तर ठीक. तब्येत! ठीक हा, आजच रिपोर्ट दाखवन इलय.” “डॉक्टर मा? ते काय सांगतले? म्हणाले, आराम करा.होय तर — मी सकाळी वायच मदत करतंय, संध्याकाळी मी मोकळो असतंय. फिरान येतंय. व्यायाम करतंय. बाकी—–? बाकी ठीक,जरा पुनमचा आठवणीनं बघा.”

“काय म्हणतत हे? बरे बोलले मा?” शरयू भावाशीच्या तोंडाकडे बघीत बोलला. “तुझो घोव तो, सरळ सांगीत काय? म्हणालो पुन्याक विचारतय आणि सांगतय.बघूया तुझा चडू काय म्हणता ता.” दुसऱ्या दिवशी सकाळीच पूनम इला, माका भेटला, “गे मामी, काल बाबांनी माका समीर दादाच्या मदतीक जावक सांगल्यांनी पण मी म्हणतय, माका तेतूरली काय एक म्हायती नाय, मी काय करतलय?”

“गो चडवा, समीराक खय काय येय होता? आपणच शिकलो मां ! पाण्यात पडला का पेवाक येता. राणीक तरी खय काय येय होता?” “मी काय मदत करू, दादा काय सांगतलो? माका एमपीएससीची परीक्षा देवची हां, माका पर्यटनात अजिबात इंटरेस्ट नाय.” “गो चडवा,राणीक खय तुझो तो इंटरेस्ट होतो?काय शिकला? Law पण भावाशीक मदत करूची लागली आणि इंटरेस्ट इलो. सगळा बघी. तुझ्या आवशी बरोबर किचन बघी आणि काउंटर सांभाळी, बुकींग घेय, बिला बनवी. समीर नसलो तरी एकटा सांभाळी.” मी तिच्या बरोबर ऑफिसमध्ये गेलय आणि ह्यांच्या समोर तिका उभी केलंय. हे हसले. डोक्यावरून हात फिरवित म्हणाले,”काय म्हणाले बाबा?” “जा, नाय तर नको जाव, तूच ठरव, पण मामीक भेटान ये. उदया, ठाकूरांनी म्हणाक नको, माझ्या शब्दाक मान देऊक नाय म्हणान, बरोबर मा!” “अय्या मामा, तुला कस कळलं?अगदी अस्सच म्हणाले.ए, मामा, तुच बघ मी कॉमर्स केलं, त्याचा हॉटेल लाईनशी काय संबंध आहे का? मला काय येईल?”

“पूनम झाला तुझा बोलून. बँकेत कॅशियर कोण असता? रेल्वेचे तिकीट कोण देता? ट्रॅव्हल कंपनीत बुकिंग कोण करता? थय सगळेच काय ताच काम शिकलेले नसतत, खरा मा आणि समजा, तुका नाय इला तर कोण बोलणारो आसा काय? आपणच मालक आणि आपणच नोकर, बरोबर” पूनम हसला.आमचे हे समजूत घालण्यात हुशार. “मामा, मला करमलं तर मी थांबेन आणि दिवसभर नाही हा! “पूनम ह्यांका सांगत होता.हे म्हणाले, “गो,आधी हय दोन दिवस रव, मगे तुका आवडता का नाय ता सांग. ह्या समजून घेवक तूका दोन दिवस जातीत.” मी पून्याक ह्यांच्या स्वाधीन करून वाटेक लागलय, घराकडे कामधंदो होतो,तो करूक व्हयो,ह्या खुळग्या वागंडा रवान माझो वेळ फुकट जायत.



affiliate link

मी निघतांना कस्टमर इले,समीरान त्याका बोलवन घेतल्यान. पाच, सहा मोठी मुला पिकनिक एंजॉय करूक इली होती. तिका काउंटरवर थांबवून तो कस्टमराक रूम दाखवक गेलो. पूनम काउंटरवर ठेवलेला कंम्पुटर ऑपरेट करून पहात होती. अर्ध्या तासानंतर समीर आला, कस्टमरना कमी बजेटमध्ये पाचही जणांची सोय करून हवी होती. समीरने त्यांना अर्धातास समजावले, टेन्ट चा पर्याय सांगितला, तो त्यांना खर्चीक वाटला शेवटी त्यांना दोन रूमवर १०% सूट दिली. तेव्हा कुठे ते दोन रूम घ्यायला तयार झाले. पूनमने त्यांची एंट्री रजिस्टर मध्ये केली,माहिती भरून घेतली आणि एकाचे आय.डी.मागून त्याची नोंद केली. Advance collect केला. काउंटरवर कोणीतरी सतत असण गरजेच होत. कधी बाहेरून कॉल येत तर कधी कस्टमर काही विकत घ्यायला येत.

दुपारी शरयू आली. शरद मालवणला जाऊन किचनसाठी लागणारा, भाजीपाला, दूध इतर साहित्य घेऊन आला. शरयूने मुलीला किचन दाखवला. आचारी जेवण बनवत होता. त्यांने शरयूला पाहून नमस्कार केला. “निलेशा ह्या माझा चडू, तिका नवीन काय ता शिकव, उद्या घोवाकडे गेला तर दोष देवक नको,बरोबर?” तो हसला,”ताईंनो, तुमचा चडू काय जेवण करतला? ता शिकलहा तर आफिसात जायत. येसफेस करीत, हय चुलीच्या आणि गॅसच्या धुरात काय मरुचा हां.” पूनम हसली, “बघलांत ना मामा, आमच्या आईक रांदा, वाढा, कपडे धुवा याच्याशीवाय काय दिसणाच नाय, ती ताच करीत रवली आणि आमी ताच करुक व्हया असा तिचा म्हणणा आसा.” “तो हसला, गो बायल माणूस शिकला आणि सायबीण झाला म्हणान काय चूल आणि मूल चुकलाहा काय? हा, तू सायबीण झालस आणि कामाधंद्याक बाईमाणूस ठेवलस तरच बात निराळी,बरोबर ?”

पूनम काही बोलली नाही. तस तो हसून म्हणाला,”माझा म्हणणा तुका कसा पटात, पण शेवटी खरा ताच मी सांगतय. तुझ्या आवशीच्या बाजून नाय बोलणय,ही जगरहाट हा.” शरयू, पूनमकडे पहात म्हणाली,”बघलस, फार शिकाक नसतलो पण ईश्वरान अनुभव दिलोहा, तुमी शिक्षण घेऊन काय फायदो, बापाशीच्या जिवावर उड्ये नको, स्वतः कमवा मगे कळात.

“तु खय गेलस तरी लेक्चर सुरू करतस, तु जा, मी काय शिकूचा ता शिकतल, उगाच माका पिडू नको. “पूनम फणकारत म्हणाली. शरयू जाता जाता निलेशला म्हणाली,”रे भावा,हिका तुझ्या मदतीक घे, नुसती बसान ठेव नको,कळला मां” “होय गो ताई,काय करूचा ता मी बघतय. तु जा, उगाच त्याका चाबरावत बसा नको.”
ती गेल्यावर निलेश पूनमचा मुड ठीक करण्यासाठी म्हणाला, “बाय,तु कसला शिक्षण घेतल?आमची राणीताई वकीली शिकला. कोर्टात जावचा सोडून थेट पुणा गाठल्यान, म्हणान विचारतय. बाकी मी दहावी, एस एस सी केलय, पण काय एक आठवणा नाय. पाठचो बाक आणि आमी. रोज दिवसातून एकदा मास्तर हाणीत,आमची वही कोरी मेंदू कोरो. ह्या जमला म्हणान ठिक.”
पूनम हसत हसत म्हणाली,”म्हणजे एस एस सी केलास तुमी,? पास का नापास?” “गो बाय, माझे वर्गशिक्षक म्हणाले, तुझो फॉर्म भरून काय उपयोग, परीक्षा दिलस तर ज्याच्या हातीक उत्तर पत्रिका तपासूक जाईत तो तपासूक गेलो तर फिट येऊन पडात, तुझा अक्षर इतक्या सुवाच्य की फक्त कोंबडीच वाचू शकता.” पूनम हसत राहिली आणि तिला ठसका लागला,तेवढ्यात समीर आला. तसा तिने तोंडावर हात धरला. “निलेश मामा, ह्या तोंड सांडून हसता कित्याक काय झाला?” “काय नाय रे, मी माझ्या शिक्षणाचो अनुभव सांगी होतय, आमचे मास्तर आणि मी किती प्रेमानं रवव ता. ह्या खुळा हसता.” “गो पून्या, हसून झाला तर चल, तुका काय काय आसा ता दाखवतय, मी मालवणाक गेलय तर तुझा अडाक नको. बरोबर”
ती काही न बोलता त्याच्या बरोबर गेली. त्याने फ्रीजर आणि कुलर उघडून दाखवला, “ह्या बघ, हय सगळी ड्रींक ठेवलेली आसत, एक लिटरच्या वरची बाटली कस्टमरान मागितली तर प्रिंटेड प्राईजवर पाच रूपये सूट देवक हरकत नाय. हय सगळी चॉकलेटा आसत, ऐशी रूपया वरची घेतली तर पाच रूपये सूट देवक हरकत नाय लक्षात इला मा!” पूनम त्याच्याकडे पहात म्हणाली, “तु लिवन कित्याक नाय ठेवणस? सगळा लक्षात रवाक नको!”

“गो, किती आयटम हत? मोजून धा वीस,सोप्या हा, ऐशी रूपयावरची वस्तू असली तर पाच रूपये सूट,मग ता चॉकलेट असां दे, ड्रींक असां दे नायतर इतर वस्तू. दोन चार वेळा बघलस का कळतला. कठीण कायच नाय.” स्टॉक कमी होयत इलो की आठवणीन माका सांग, नायतर माणसाक फोन कर हय नंबर लिवलेले आसत. जे कस्टमर येतत त्यांका सूट दिली की खय बाहेर नाय जावचे. फुटकळ घेतल्यानी तर सूट देव नको. चल मी जरा चक्कर टाकून येतय नीट लक्ष ठेव.”

तो निघून जातांना ती पाहत होती,तो हॅन्डसम दिसत होता,तिच्यापेक्षा सात आठ इंच उंच, गोरापान नसला तरी उजळ आणि थोडया कुरळ्या केसांचा. इतकं जवळून आणि नीट निरीक्षण तिने कधी केल नव्हतं. तो गेल्यावर तीने पुन्हा एकदा फ्रीजर उघडून कुठे काय आहे,किती आहे ते पहिले. एका कागदावर लिहून घेतले. एक दोन वेळा मैत्रिणींचे फोन आले. तिने ती गावातच मामाकडे असल्याचं सांगितले. पाच साडेपाच वाजले तसा तिने समीरला फोन लावला आणि तिला अचानक लाज वाटली काय हाक मारावी, दादा म्हणावं की नुसतंच समीर की काहीच म्हणू नये तिच्या मनाचा गोंधळ उडाला होता, तेवढ्यात त्याने कॉल घेतला, “काय गो, कित्याक फोन केलं?” “तू खय आसस, माका घराकडे जावचा हा,लवकर ये.”
तो बोलला, “गो माका उशीर होतलो, हय बोमट्याच्या घराकडे मिटिंग हा, तू आप्पांका बोलावन घे, ते येतीत.” त्यांने फोन कट केला. तिचा फोन संपत नाही तो आप्पां आले, “गो पून्या घराक जातं मा! जा, मी आसय, कोणाचो फोन इललो?” तिने रजिस्टर काढून दाखवले, “गोरेगाव, मुबंईतून धामणकर यांचो कॉल होतो, विचारी होते, एप्रिल शेवटच्या आठवड्यात टेन्ट रिकामी आसा काय? आणि ग्रुप इलो तर किती Concession देतालात?” “मग,तू काय सांगलय?” “मी सांगलय, ग्रुप इलो तर नक्की concession देऊ, लवकर बुकिंग नाय केलात तर तुमका tent मिळाचो नाय. त्यानी सांगल्यांनी दोन तासान कनफर्म करतो.” पूनम म्हणाली. “बरा, तुका उशीर झालो,तु जा. मी बघतय काय म्हणतत ता,उद्या तुका सांगतय, हा. जा तू” पूनम स्वतःच आवरून आणि फ्रेश होऊन निघाली. वाटेत तिला समीर बाईकवरच येताना दिसला.तिला पाहून त्याने बाईक थांबवली, “गो उशीर सो झालो? लवकर कित्याक नाय निघल? आप्पांका बोलवन घेवचा होता. बस,चल, मी पटकन सोडतय.” “नको,आता किती रवला? जातय मी.”पूनम बोलली. “गो, बस म्हणतय ना,नाटक कित्याक करत? चल, पटकन बस .माका घराकडे कामा हत.”समीर रागावला. ती त्याच्या मागे बसली,त्याने गाडीला किक मारली आणि बाईक पळू लागली. एक दोन वेळा ती मागे सरकली तर कधी त्याच्या पाठीवर झुकली. “गो मेल्या नीट धर, मी काय खातय तुका? पडलस तर कळाचाव नाय.” तिने त्याच्या खांद्यावर धरले,त्याच्या स्पर्शाने ती अवघडली .खांदे मांसल आणि मजबूत होते. अनामिक भिती की हुरहूर तिच्या मनात उतरली. त्याने तिला तिच्या घराकडे सोडली तस ती म्हणाली,”घराकडे नाय येण?” “गो उशीर झालो, आता खंय? परत इलय की येईन,चल जातय मी.” जाणारी मोटरसायकल दूर जाई पर्यंत ती पहात राहिली.
थोड्या वेळाने ती भानावर आली. तिच्या मागे आई उभी होती,”पून्या समीर इलो होतो काय सोडूक?” “होय तर,माका उशीर झालो,भाटीवरसून येय होतो माका सोडून गेलो.” “गो त्याका घराक बोलवक काय झालला, परक्या सारो वाटेवरसून कित्याक म्हणान गेलो?” “ता उद्या त्याका विचार, मी सांगलय त्याका, तर सांगल्यान उशीर झालोहा परत येईन तेवा बघतय. “दोघी घराकडे गेल्या तरी शरयू भाच्याचो, समीरचो विचार करीत रवला. दोन, तीन वर्षापूर्वी होच पोरगो पुढे इतको सुधरात असा कोणी शपथेवर सांगला असता तरी मी विश्वास ठेवल नसतय. ठाकूर घराण्याचा नाव अटकेपार लावल्यान, गुणी निपाजलो. ती स्वतःशीच म्हणाली.



affiliate link

रात्री तिच्या आणि नवऱ्याच्या जेवतांना त्याच गप्पा रंगल्या,”गो पून्या, मग आज मामाकडे जावन काय काय केलस? काय जेवन खावन इलस?” “बाबानू, ओ सांज कधी झाली कळाकव नाय, सकाळी कस्टमर इले, त्यांका रूमचा भाडा लय झाला, सारखे म्हणा होते, आमी ग्रुप ने इलव तुमची जाहिरात YOUTube वर बघून, Concession देवक व्हया, मग समीराक बोलावलंय, त्येणा दहा टक्के Concession दि त्यांका आणि पन्नास टक्के अँडव्हान्स घे म्हणान सांगल्यान. दहा बारा माणसा आसत. AC room घेतल्यानी. ता बिल बनवलय तवसर आई इली.

बाबानू, ही जाईत थय माझी बदनामी करता. तो जेवण बनवणारो निलेश मामा आसा ना, त्याका म्हणता हिका जेवण करूक शिकव, मी करतय की नाय जेवण?
हिका सांगून ठेवा, उगाच कोणासमोर कायेव बोला नको. दोपरण्याक आप्पा मामा इले त्येणी विचारपूस केल्यानी. मग समीरान माका cooler मध्ये काय, chiller मध्ये काय, केवड्याक काय देवचा ता सांगल्यान. मग मी एकटाच होतंय.” पण मी रोज नाय जावचय आधीच सांगतय, मगे म्हणशात आदी बोलाक नाय कित्याक.”

“गो, गेलस तर तेवढो अनुभव गावात. तुका कंटाळो इलो तर नको जावं. मामांका फोन करून सांग मी नाय येणय म्हणान. ते काय फासावर देतत. कधीतरी ह्या उणग्याक ने. भावस कसे कष्ट करता बघून येवं दे म्हणजे कळात. फॅक्टरीत ये सांगलय तर म्हणता माका काजूचो वास आवडणा नाय म्हणान. रे मेल्या चलवशीत कशी Factory? का माझ्या पाठी विकून मोकळे होतलास!”
शरयू रागावली,”गप्प रवा ओ, रात्रीचा ह्या काय बोलाक सुचता तुमका,अंगार पडला की बरोबर शिंगार घेतलो, माझो झिल हा, नाय रे सोन्या?” तो फक्त हसला.
दुसऱ्या दिवशी कुणी न सांगता, पूनम सकाळीच तयार झाला, कपाट विस्कटून ड्रेस शोधीत रवला, तशी आवस इली. “गो पून्या, करत काय? सगळे कपडे शे भायर काढलं, खयचो तो चडव आणि जा.” “थांब गे आई, थय बरे बरे लोक येतत, काउंटर वर असतंय, काय बोन्द्री घालून जावं म्हणत!”

“नाय गे बाय, सजून जा, माजा काय म्हणणा नाय,कपडे काडलस तशे नीट कपाटात लाव नी जा म्हंजे झाला.” कितीतरी वेळ ती आरशात बघून पावडर लावत बसली तशी शरयू चिडली,”गो पावडर थोडीच थाप,नाय तर रोज एक डबी आणूची लागात आणि आता जा अरधो तास झालो नटतं” ती सागर रिसॉर्ट वर पोचली तर आप्पा मामा काउंटरवर होते,तिला पाहून गोड हसले,”इल ये,माका वाटला काल पयलो दिवस दमान झोपलस की काय? दमलस नाय मा?.” “नाय ओ मामा,तयारी करूक थोडो उशीर झालो, उद्या लवकर येतंय.” “छा! गो घाय करून ये म्हणून मी नाय सांगणय,सकाळी मी असतंय,तू आपला येवचा तेवा ये. इल्यावर फक्त, ही बिला कॉम्प्युटर वर बनवतत ती बनव आणि एकदा पैशाचो हिशोब घाल.काय समजला कळला ना” तिने मान डोलवली. “समीर मार्केटमध्ये गेलोहा, तो इलो की बिला बनव. कोण नवीन कस्टमर इला त ह्या रेट कार्ड दाखव, अगदी काय अडला त हाक मार मी आसय.” ते निघून गेले.

तिने कॉम्पुटर सुरू करून की बोर्ड प्रेस करून पाहिला. सर्व सुरळीत होते. समीरचा मामा चक्कर मारून गेला. तिने त्यांना नमस्कार केला,”मामा काय व्हया होता काय? समीर मालवणात गेलोहा,मामा घराकडे आसत.” तो हसला, “गो समीराक बोटीसाठी डिझेल आणूक सांगूंचा होता, एकदम संपला तर पंचाईत होईत. बाकी ठीक मा, तू काय शिक्षण पुरा केल?” “मी B.com केलंय, बघूया, पुढची परीक्षा देवक व्हयी,आपल्या कोकणात नोकरे खय हत? आणि असले तर ह्यांका धा लाख देवचे खयसून?” “एकदम खरा सांगलस, आमी कित्याक अडाणी रवलव, बापूस आमचो शेतकरी, पोटाक भरपूर पण शिकाक पैसो नको.म्हणान घराकडे शाण उचलीत बसलव, नायतर मुंबई नसती गाठली! चल, तु काय करतस ता कर माझी अडचण नको.” शरद मामा निघून गेले.

शरद मामा कस्टमरला काय हवं नको पाहण्याची जबाबदारी सांभाळत. माणसांकडून रूमची साफसफाई करून घेणे, बेडशीट बदली करून घेणे अशी सगळी व्यवस्था पहात, कस्टमरची कोणतीही अडचण होऊ नये किंवा तक्रार येऊ नये याची काळजी घेत. सोलर हिटर वेळेवर सुरू आणि बंद करणे,इन्व्हर्टर नीट राहतील याची काळजी घेणे अशी सगळी कामे पहात असल्याने समीरला इतर व्याप सांभाळणे शक्य होई. बोटींग व्यवस्था, बागेत लहान मुलांना बसवलेले See-Saw, Slides, Zig-Zag, Sweeps अशी साधने चांगली राहावी यासाठी तो स्वतः काळजी घेई. समीर नव्याने स्थापन केलेल्या water Sports club चा अध्यक्ष होता. त्याच्या डोक्यात अनेक कल्पना होत्या. अर्थात आधी स्वतःचा बिझनेस. कोळमकर कधी कधी त्याच्या गप्पांना येई.

समीरने ठरवलं हा बिझनेस सेट होतोय तर वेगळ काही करावं. त्याने फिशेरमन अँड वॉटर स्पोर्ट को ऑपरेटिव्ही सोसायटी स्थापन करायची ठरवली. त्यासाठी भांडवल उभारणी करणे, सहकार खात्याकडे अर्ज करून परवानगी घेणे, इमारतीसाठी जागा शोधणे अशी अनेक कामे होती, दोन महिन्यांनी सिजन संपणार होता. मग मोकळा वेळ काढणे शक्य होणार होते. जस जसा बिझिनेस सेट होत होता. नवनवीन कल्पना डोक्यात नाचत होत्या. गावात एखादा बार काढला तर जोमाने चालला असता. तसे कोळमकर, तारी, रावले सगळेच घसणीचे होते. त्याने व्हिक्टर अंकल जवळ विषय काढला. व्हिक्टर म्हणाले, “रे मेल्या त्याका जागा व्हयी, लायसन लागतला, सप्लायराक डिपॉझिट देवक व्हया. फर्निचर, सजावट, नोकर चाकर ह्याका भांडवल नको?”





अंकल तुम्ही आणि मी भागीदारीत करुया. निम्मो खर्च तुमचो जमात का बघा. तेतूर भरपूर मारजीन हा. नायतरी येणारे लोक मालवणातून आणतत त्यांका हय गावली त काय नको म्हणतीत.?” व्हिक्टर अंकल बोललो, “रे मेल्या, आदी बापाशीक विचार ह्या अशाक असा मी करतय, करू काय? मग पुढला. तुझो बापूस अजिबात तयार जावचो नाय.” रात्री आमच्या चिरंजीवान बापाशीकडे जेवताना विषय काडलो आणि बापूस कडाडलो, “तुका अवदसा आठवली काय रे ? आमी ख्रिस्ताव का हबशी? उद्या म्हणशी कुंटणखानो टाकूया. कमरेचा सोडून डोक्याक गुठाळलस की काय? हो असलो धंदो करण्यापेक्षा भिक मागून पोट भरूक कोणाची चोरी? आज विषय काढलस पूना कोणाकडे बोलू नको. लोक तोंडात शाण घालतीत. आज पर्यंत लोक चोरून पितत. उद्या आमच्या दारात बसून पितीत आणि चखणा आण म्हणान तुका ऑर्डर सोडतीत चलात. लोक काय म्हणतीत ठाऊक हा! बामण पैशासाठी विटामलो.”

त्यांच ऐकून तो निराश झाला. संध्याकाळी तो व्हिक्टर अंकलकडे जाऊन बोलून आला होता आणि आता घरूनच विरोध होता. रात्री उशिरापर्यंत त्याला निज लागली नव्हती. कधीतरी त्याला स्वप्न पडले आणि स्वप्नात असतांना तो ओरडला, “नाना,सोडा, नाना सोडा,मुळीच नाय करुचय, आई शप्पथ! नाय,चुकलय म्हणतय ना, चुकलंय.”
“रे झिला, उठ जागो हो, काय झाला? रे झाला काय?” मी हाक मारलय तसो तो सावध झालो, घामान डबडबलो होतो. माझ्याकडे बघून हसलो,”आई, तु कित्याक उठलं? जा झोप जा.” मी विचारलंय, “रे समीर झाला काय? आरडत कित्या होत?” “अगे आई, आपले नाना स्वप्नात इले, पोटावर बसून दोनी हातांनीदबटून धरल्यांनी अणि माका गाळी घातल्यानी. मायची चुतमाऱ्या दारवेचा दुकान काढतल, पयलो भायलो हो, माझ्या घरात रवा नको, कुळवाडी काय रे आमी! बापाशीन भाडोत्री ठेवली आणि तुका पुढची अवदसा आठावली.” मी त्याचो घाम पुसलय, रात्रीचे अडीज वाजलेले. हे उठान इले, “गो करतास काय इतक्या रात्री? आरडत कोण होता?” “काय नाय वो, झोपा जावा. समीराक सपान पडला होता,आजोबा इल्लले स्वप्नात, मुटके मारी होते छातयेर. काय तरी मनात घेता झाला. मेल्या ह्या पाणी पी आणि निज.” दुसऱ्या दिवशी सकाळीच कस्टमर इले,शरद सांगूक इलो,”आप्पा कस्टमर इले हत रूम व्हयी. हे म्हणाले, “तु हो पुढे, हो मी इलय, एक घोट ‘च्या’ पितय.” कस्टमर वाट बघीत होते,कोणाक तरी जोराची कळ इली होती, “ओ मालक वॉश रूम कुठे?” शरदने त्यांका दाखवल्या दिशेने तो पळत सुटलो. दुसरो म्हणालो,”ओ मालक पाच जण आहोत रूम मिळेल का?” त्यांनी रजिस्टर पाहिलं,”सॉरी, आज संध्याकाळी होईल खाली, आत्ता नाही, तुम्ही दुसरीकडे ट्राय करा.” त्याच बोलण होई पर्यंत टॉयलेटला गेलेला आला. आपल्या मित्रांकडे पहात म्हणाला, “झालं का रूमच अँडजस्ट?”
ते चार जण अजूनही काही अडजेस्टमेंट होईल या आशेने पहात होते. “नाही हो, कुठेही अँडजस्ट होण्यासारखे नाही,आम्हाला कस्टमर नकोत का? पण संध्याकाळीच शक्य होईल, तुम्ही दुसऱ्या ठिकाणी ट्राय करा. हे घ्या त्यांचं कार्ड, इथून पाच मिनिटांवर आहे.” हे म्हणाले. त्यांच्यातील एकजण म्हणाला, “मग इथे सोय झाली तर मला कळवाल का? हा माझा नंबर.”त्यानी एक व्हिजिटिंग कार्ड दिले. “बर मी तसे काही झाले तर आपल्याला कळवतो,very Sorry” ते निघून गेले. साडे नऊ वाजता पूनम आली. तेव्हा शरद मामा काउंटरवर होता. तिला पाहून तो बाजू झाला, “ये इलस, आज बुकिंग नाय, सगळे रूम बुक हत, संध्याकाळी खाली होतीत, तवसर कोणाचा बुकिंग आसा काय बघ, मी जातंय राऊंड घेऊक.” तो निघून गेला. पूनम रजिस्टर चाळत होती, तिथेच सकाळी येऊन गेलेल्या कस्टमरच कार्ड पडलं होतं. अर्थात पुनमला त्या बद्दल माहिती नव्हती. संध्याकाळी दोन रूम खाली होणार होत्या. जर संध्याकाळी नवीन कस्टमर आलं तर तिथे सोय करता येणार होती.

निलेश मामा किचनमध्ये काम करत होता आणि पार्वती बाई त्याला कस्टमर साठी नास्ता द्यायला मदत करत होती. थोड्या वेळाने समीर आला तिच्याकडे पहात हसला.ती ही हसली. “आप्पा सांगा होते आज सकाळी कस्टमर इलेले,पण आपल्याकडे जागा नाय. तु बघलस काय त्यांका?”समीरने विचारले? “नाय बा,मी आत्ताच इलय,शरद मामा हय होते. माका बोलले राऊंड घेवन येतय. कोणाक काय व्हया होयत कळाचा नाय.” “बघ तर, लक्ष ठेव, मी निघतय,आते इली तर तिका सांग, संध्याकाळी एका पार्टीक कुर्ल्याची ऑर्डर आसा, मी मालवणात जाऊन सामायन घेऊन येतंय. काल कोल्ड ड्रिंक मध्ये काय गेला काय?”
“होय तर, एका पार्टीन दोन मँगोला, चार स्प्राईट, आणि एक मोठी दोन लिटरची पेप्सी इतक्या नेलहा. डेरी मिल्क पन्नास वाला नेल्यान. कालच्या दिवसाची नोंद केलेली हा. वही बघ,विसरलस तर म्हणशीत स्टाँक कमी कसो दिसता.” “बरा, तु लिवन ठेवलस ना! आणि तुका काय आठवला तर नंतर फोन करून सांग. मी लवकर जावन येतय. आतासा अकरा वाजान गेले की रमरमान तापता.” ती त्याच्या दिशेने पहात होती. तो दूर गेल्याचे त्याच्या मोटरसायकलचा आवाज कमी कमी होत गेल्यावर लक्षात आले तशी ती भानावर आली. नक्की काय होत होते, ते तिलाही कळत नव्हतं पण तो तिला आवडू लागला होता.मनात त्याच मंदिर उभ रहात होत.

समीर रस्त्याला लागला तसा त्याचा शाळकरी मित्र जयवंत मंदिराच्या रस्त्यावर दिसला, तो हाताने थांबवण्याची खूण करत होता, “समीरा, लय घायत दिसत मालवणाक चलल काय? माका जरा भरडावर सोड, थोडा काम हां” तो पाठी बसला तशी मोटरसायकल भरधाव निघाली. समुद्राची गाज ऐकू येत होती. भरतीच पाणी कर्लीच्या पात्रात शिरत होत. पुलाखालून जाताना पाणी “सपाक् सपाक् ” असे तडाखे लगावत बाहेर पडत होत. थोड्या अंतरावर वेंगुर्लेकर सायकलवर जातांना दिसला. त्याच्या उंचीच्या मानाने सायकल मोटकी होत होती, त्याने दुरूनच हाक मारली,”आबानु ,बरे मां,आज कोणाकडे चललास?”आबा उत्तर देईपर्यंत मोटारसायकल दोन फर्लांग अंतर कापून गेली होती. “रे समीरा, हाली गाव साप टाकलस सो,ना भाटयेवर दिसणस, ना तारीवर.ना मंदिराकडे ना शाळेकडे. चोवीस तास काय चिकटान असतस काय घराकडे?” “रे मेल्या, ता काय तुझ्या बापाशीचा भुशारी दुकान आसा, अमूक वाजता उघडला आणि तमूक वाजता बंद केला. कस्टमर कधीव येवं देत त्यांका अटेंड करुचा लागता, त्यांका काय व्हया नको बघूचा लागता. त्यांच्या ढूंगणाकडे रवल्याशिवाय पुढचा कस्टमर येवचा नाय.” “समीर कायेव सांग पण तुझो धंदो भारी हां, एकदा एक मासो गळाक लागलो की त्याका थोड्या थोड्या वेळान पाण्यात बुडवीत ठेवलो की तो जितो आसा तवसर तु दुसरे मासे पकडूक तयार.” “चुतमाऱ्या! माझी म्यानत बघणस नाय, रे मेल्या, अन्न गिळाक वेळ नसता. कधी कोणता कस्टमर काय मागात सांगूक येणा नाय, एखाद्या कस्टमर काय बोलला तरी निवांत घेवचा लागता,कधी एखादो पदार्थ अळणी रवता, कधी मीठ जास्त होता,कधी तिखटाण जास्त होता. कधी एखादो हुंदीर नेमको खोलयेत जावन आत्महत्या करता. कधी काय होयत ता ईश्वराकव कळाचा नाय? जोडप्या इला की जबाबदारी वाढता. मेले एंजॉय करुक येतत आणि कचाकचा भांडतत. त्यांचा काय? काय गोंधळ घातल्यानी तर आमी लटाकलव.” “व्हय रे,ह्या जोखमीचाच काम आसा,पण तसे दाबून पैशे घेतास मां! आणि व्हयती नवी जोडपी इली म्हणजे गंमतव बघूक गावता, बरोबर मा. तितकोच टाईम पास” “रांडेच्या, असले धंदे थय नाय चलणत,लोक जुत्यान तोंड फोडतीत. तो पाणचटपणा तुकाच लख लाभ. आमका धंदो महत्वाचो. उद्या असा काय झाला तर कुत्रोव आमच्याकडे फिरकाचो नाय,कळला. मेल्या बोलाचालीत भरड केवा इला तांव कळाक नाय,जा चल टाईमपास झालो खरो.”

क्रमशः

भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

3 thoughts on “आणि वादळ माणसाळले भाग ५

  1. आणि वादळ माणसाळले भाग ३ - प रि व र्त न

    […] १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग […]

  2. zovrelioptor

    Hey there! I’ve been reading your blog for some time now and finally got the bravery to go ahead and give you a shout out from New Caney Tx! Just wanted to say keep up the good job!

  3. related site

    I have been browsing online greater than three hours today, yet I never found any attention-grabbing article like yours. It’s lovely worth sufficient for me. Personally, if all web owners and bloggers made just right content material as you probably did, the web will be much more helpful than ever before. “Oh, that way madness lies let me shun that.” by William Shakespeare.

Comments are closed.